‘मास्टर्स’ या शब्दाला चित्रकलेच्या इतिहासात महत्त्व आहे. मुळात चित्रकलेचा इतिहासबितिहास लिहिण्याची प्रथा पाश्चात्त्यांनीच सुरू केली; त्यापैकी सन १५५० मध्ये जॉर्जिओ वसारीनं इटालियन भाषेत लिहिलेलं ‘लाइव्ह्ज ऑफ एक्सलंट पेन्टर्स’ या अर्थाच्या नावाचं पुस्तक पहिलं मानलं जातं. त्या पुस्तकाआधारे ‘रेनेसाँ मास्टर्स’ कोण, हे ठरून गेलं. राजेरजवाडे किंवा धनिकवणिकांचा आश्रय मिळालेले पुरुष चित्रकारच चित्रकलेचा इतिहास घडवतात आणि त्यांनाच ‘मास्टर्स’ म्हणायचं, हेसुद्धा ठरून गेलं. आपल्या मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीनं ‘इंडियन मास्टर्स’ अशी वार्षिक प्रदर्शनमालिका १९९० च्या दशकात सुरू केली, तोवर ‘मास्टर’ चित्रकार म्हणजे पुरुषच, हे समीकरण पक्कं झालेलं होतं. अमृता शेरगिलला कुणी ‘मास्टर पेंटर’ म्हटलं नाही. पण एकविसाव्या शतकात एकंदर कलेतिहासातली बरीच समीकरणं बदलू लागली, तसं हेही बदललं. याची साक्ष म्हणजे २०१८ पर्यंत अमृता शेरगिल, बी. प्रभा, नसरीन मोहम्मदी, अर्पिता सिंग आणि नलिनी मलानी यांचा उल्लेख भारतीय कलाबाजारात तरी ‘विमेन मास्टर्स’ म्हणून होऊ लागला. आंतरराष्ट्रीय कलासंग्रहालयांमध्ये एकटीच्या कलाकृतींची प्रदर्शनं भरणं, लिलावांमध्ये चित्रं हमखास अधिक किमतीला विकली जाणं वगैरे पूर्वापार ‘मास्टर्स’ लक्षणं यांनी जणू पूर्ण केली! हे ‘मास्टर्स’माहात्म्य सांगतानाचा सूर त्यातल्या कलाबाजाराच्या वरचढपणामुळे व्यर्थतावादी (सिनिकल) झालाही असेल; पण दृश्यकलेचा इतिहास हा ‘मास्टर्स’मुळे घडलेला दिसतो. ‘मास्टर्स’ ठरण्याच्या प्रक्रियेत इतिहासाला प्राधान्य आहे, बाजाराला नाही- हे मान्य करणारा कलाव्यापार मेळा म्हणजे ‘फ्रीझ मास्टर्स’. हा जरी कलाव्यापार मेळाच असला तरी, ‘फ्रीझ’ या कलाविषयक नियतकालिकातर्फे तो भरवला जातो. सन २००३ पासून सुरू झालेल्या या मेळ्यात ‘फ्रीझ मास्टर्स’ची भर पडली ती २०१२ पासून. मग गेल्या वर्षीपासून त्यात, ‘विमेन मास्टर्स’ असाही खास विभाग सुरू झाला. दहा महिला-दृश्यकलावंतांचं काम त्या त्या चित्रकर्तींची चित्रं (किंवा मांडणशिल्पकर्तींची मांडणशिल्पं) एरवीही विकणाऱ्या खासगी मालकीच्या कलादालनांनी सविस्तरपणे दाखवावं, पण त्या दहाजणींची निवड मात्र ‘फ्रीझ’ नियतकालिकामार्फत होणार. त्यामुळे ही निव्वळ विकावीक ठरत नाही. यंदा या ‘विमेन मास्टर्स’मध्ये नीलिमा शेख यांचा समावेश आहे आणि ही चित्रं मुंबईच्या ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ या खासगी कलादालनानं मांडली आहेत. नीलिमा शेख यांच्या चित्रांना याआधी कासेल शहरातल्या ‘डॉक्युमेण्टा’ महाप्रदर्शनात स्थान मिळालेलं होतं, हेही महत्त्वाचं आहे.

ही पार्श्वभूमी वाचायला कंटाळवाणी वाटली, तरी महत्त्वाची ठरते कारण इतिहास आणि बाजार या दोन्ही अंगांनी नीलिमा शेख यांच्या कलाकृतींचं महत्त्व वाढलेलं आहे- आणि ते आता कुणी नाकारू शकणार नाही, हे लक्षात यावं.

sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Pranav Mohanlal is working on a farm in Spain for food
वडील सुपरस्टार, स्वतःही केले हिट चित्रपट; आता जग…
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये
kiara advani and mithun chakravarti
मिथून चक्रवर्ती ते कियारा अडवाणी, बॉलीवूडमधील ‘या’ लोकप्रिय कलाकरांची खरी नावे माहित आहेत का?

हेही वाचा: अन्वयार्थ: हा राजकीय क्षुद्रपणाच

नीलिमा शेख यांची चित्रं मुंबईत गेल्या अनेक वर्षांत वेळोवेळी प्रदर्शित झालेली आहेत. ‘व्हेन चम्पा ग्रू अप’ ही चम्पा नावाच्या मुलीची कथा सांगणारी चित्रमालिका (१९८५) त्यांच्या कला-कारकीर्दीत महत्त्वाची मानली जाते, ती मात्र दिल्लीतच प्रदर्शित झाली होती. चम्पा नावाची मुलगी वाढते, तिचं लग्न होतं आणि ती जाळली जाते, असं कथानक या चित्रमालिकेत होतं. त्या चित्रांचा आकार लहान होता. त्या सुमारास नीलिमा, त्यांचे सहचर गुलाममोहम्मद शेख, चित्रकार मित्र भूपेन खक्कर हे तिघेही जुन्या भारतीय लघुचित्रांची निवडक शैलीवैशिष्ट्यं आपल्या चित्रांत यावीत, अशा ध्यासानं काम करत होते. पण नीलिमा शेख यांनी भारतीय कलाप्रकारांच्या अभ्यासाची शिष्यवृत्ती मिळवली आणि निव्वळ टिपणं काढत अभ्यास न करता द्वारकालाल जांगीड, चिरंजीवीलाल शर्मा अशा पिछवाई-चित्रकारांकडे शिक्षण घेतलं. पिछवाई लांबरुंद असते आणि मूर्तीच्या किंवा राजेरजवाड्यांच्या बैठकीच्या मागची भिंत झाकणारं चित्र म्हणून तिचा वापर होतो, हे ज्यांना माहीत असेल त्यांना हेही माहीतच असेल की, जरी लांबरुंद असली तरी पिछवाईत अवकाश-विभाजनाची पद्धत लघुचित्रांसारखीच असते. नाथद्वारा आणि बनास चित्रशैली, हवेली-चित्रं असा अभ्यास नीलिमा शेख यांनी प्रात्यक्षिकांसह केला. शिवाय अन्य प्रकारची लघुचित्रं अभ्यासली. याखेरीज वाचन-मनन जे काही सुरू होतं, ते नेहमीप्रमाणेच विविधांगी होतं. या वाचनात आगा शाहिद अलींच्या कविताही आल्या.

तिथून सगळं बदललं.

नीलिमा शेख यांच्या चित्रांत काश्मीर आलं. आगा शाहिद अली हे मूळचे भारतीय पण आता अमेरिकेत राहणारे कवी. साधारण १९८७ पासून त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध होताहेत. ‘कंट्री विदाउट अ पोस्ट ऑफिस’ हा त्यांचा तिसरा का चौथा संग्रह १९९७ सालचा. अली हे काश्मिरात वाढल्यानं त्यांच्या कवितांत काश्मीरचे संदर्भ अनेकदा येतात. हे संदर्भ दिल्लीतच वाढलेल्या पण दर सुट्टीत काश्मीर जवळून पाहिलेल्या नीलिमा यांना भिडले, तोवर काश्मिरी दहशतवादाचीच चर्चा सर्वत्र होती. काश्मीर खोऱ्यातलं साधं जगणं दबून गेलं, ते अली यांच्या कवितेत होतं- त्यात त्रागा नव्हता, रडगाणं नव्हतं किंवा तक्रारीचा सूरही नव्हता. आहे हे असं आहे, एवढंच सांगणाऱ्या अमेरिकी धाटणीच्या कविता. त्यावर आधारित चित्रमालिकाच नीलिमा शेख यांनी केली. तशी उशिराच. २००३ मध्ये ही चित्रमालिका प्रदर्शित झाली. त्याआधी सूफी संत बुल्लेशाह यांच्या रचनांची पार्श्वभूमी त्यांच्या चित्रांना होती. कविता मनात रुजते, पण तिचा थेट संदर्भ चित्रांना नसतो- आपलं चित्र हे ‘कवितेचं बोधचित्र’ नसतं, इतपत भान तर त्यांना आधीपासून होतंच.

हेही वाचा: व्यक्तिवेध: दीपा कर्माकर

पण चित्रांमध्ये काश्मीर स्थिरावलं. बाकीचे विषय जणू काश्मीरच्या अनुषंगानं आले. म्हणजे, नीलिमा या बडोद्यातच राहात असूनही नर्मदा धरणग्रस्तांच्या विस्थापनाचा विषय मात्र काश्मिरी विस्थापनाच्या अनुषंगानं आला. ही चित्रं कशी आहेत? रंग उष्ण आहेत- पिवळा, नारंगी, लाल… पण एकंदर चित्र शांत, अनाग्रही. त्यांतल्या मानवाकृती लहान, रंगविस्तार मोठे. झाडं किंवा घरं अशा वारंवार येणाऱ्या आकारांसाठी स्टेन्सिलचा वापर मधूनच जाळीचा आकार. सोनेरी, चंदेरी रंगसुद्धा. ही चित्रं टेम्परा रंगातली आहेत. नीलिमा शेख आता वयपरत्वे सहायकांचीही मदत घेतात. पण चित्रांतलं ड्रॉइंग त्यांचं, त्याहीपेक्षा संदर्भ आणि चित्रं यांची सांगड घालणारा विचार त्यांचा.

‘फ्रीझ मास्टर्स’मध्ये प्रदर्शित झालेलं एक चित्र सरळच काश्मीरचं आहे. या अख्ख्या मोठ्या चित्राच्या ज्या भागांत माणसं, घरं वगैरे दिसतात तिथं कथा समजते, पण चित्रभर अनेक ठिकाणी आढळणाऱ्या अलंकारिक आकारांतून चित्राचा एकंदर मूड उमगतो. चित्रात काही शब्दही दिसतात… माझा देह नष्ट होईल पण मी इतिहासातून उगवेन, अशा अर्थाच्या ओळी. पण याच भागात ‘असिफा’ हे नावही दिसतं. कठुआ बलात्कार प्रकरण ज्यांना माहीत आहे, त्यांना हे नाव अस्वस्थ करतं.

हेही वाचा: संविधानभान : वित्त आयोगाची भूमिका

पिछवाईसारखं हे लांबरुंद चित्र. पिछवाईचा सांस्कृतिक अर्थ न समजणाऱ्या इंग्रजी भाषेत पिछवाई म्हणजेही बॅकड्रॉप आणि घडामोडींची पार्श्वभूमी म्हणजेही बॅकड्रॉपच. भाषा अपुरी असते ती अशी. पण पिछवाई ही गुणवर्णनासाठी, महिमाकथनासाठी, प्रसन्नतेसाठी असते… तशी ही काश्मीरची पिछवाई नाही. तिला घडामोडींची पार्श्वभूमी आहे आणि त्या घडामोडींबाबत इतरांनी केलेल्या अभिव्यक्तीचीही आहे.

abhijit.tamhane@expressindia.com

सौजन्य: केमोल्ड प्रिस्कॉट रोड