‘मास्टर्स’ या शब्दाला चित्रकलेच्या इतिहासात महत्त्व आहे. मुळात चित्रकलेचा इतिहासबितिहास लिहिण्याची प्रथा पाश्चात्त्यांनीच सुरू केली; त्यापैकी सन १५५० मध्ये जॉर्जिओ वसारीनं इटालियन भाषेत लिहिलेलं ‘लाइव्ह्ज ऑफ एक्सलंट पेन्टर्स’ या अर्थाच्या नावाचं पुस्तक पहिलं मानलं जातं. त्या पुस्तकाआधारे ‘रेनेसाँ मास्टर्स’ कोण, हे ठरून गेलं. राजेरजवाडे किंवा धनिकवणिकांचा आश्रय मिळालेले पुरुष चित्रकारच चित्रकलेचा इतिहास घडवतात आणि त्यांनाच ‘मास्टर्स’ म्हणायचं, हेसुद्धा ठरून गेलं. आपल्या मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीनं ‘इंडियन मास्टर्स’ अशी वार्षिक प्रदर्शनमालिका १९९० च्या दशकात सुरू केली, तोवर ‘मास्टर’ चित्रकार म्हणजे पुरुषच, हे समीकरण पक्कं झालेलं होतं. अमृता शेरगिलला कुणी ‘मास्टर पेंटर’ म्हटलं नाही. पण एकविसाव्या शतकात एकंदर कलेतिहासातली बरीच समीकरणं बदलू लागली, तसं हेही बदललं. याची साक्ष म्हणजे २०१८ पर्यंत अमृता शेरगिल, बी. प्रभा, नसरीन मोहम्मदी, अर्पिता सिंग आणि नलिनी मलानी यांचा उल्लेख भारतीय कलाबाजारात तरी ‘विमेन मास्टर्स’ म्हणून होऊ लागला. आंतरराष्ट्रीय कलासंग्रहालयांमध्ये एकटीच्या कलाकृतींची प्रदर्शनं भरणं, लिलावांमध्ये चित्रं हमखास अधिक किमतीला विकली जाणं वगैरे पूर्वापार ‘मास्टर्स’ लक्षणं यांनी जणू पूर्ण केली! हे ‘मास्टर्स’माहात्म्य सांगतानाचा सूर त्यातल्या कलाबाजाराच्या वरचढपणामुळे व्यर्थतावादी (सिनिकल) झालाही असेल; पण दृश्यकलेचा इतिहास हा ‘मास्टर्स’मुळे घडलेला दिसतो. ‘मास्टर्स’ ठरण्याच्या प्रक्रियेत इतिहासाला प्राधान्य आहे, बाजाराला नाही- हे मान्य करणारा कलाव्यापार मेळा म्हणजे ‘फ्रीझ मास्टर्स’. हा जरी कलाव्यापार मेळाच असला तरी, ‘फ्रीझ’ या कलाविषयक नियतकालिकातर्फे तो भरवला जातो. सन २००३ पासून सुरू झालेल्या या मेळ्यात ‘फ्रीझ मास्टर्स’ची भर पडली ती २०१२ पासून. मग गेल्या वर्षीपासून त्यात, ‘विमेन मास्टर्स’ असाही खास विभाग सुरू झाला. दहा महिला-दृश्यकलावंतांचं काम त्या त्या चित्रकर्तींची चित्रं (किंवा मांडणशिल्पकर्तींची मांडणशिल्पं) एरवीही विकणाऱ्या खासगी मालकीच्या कलादालनांनी सविस्तरपणे दाखवावं, पण त्या दहाजणींची निवड मात्र ‘फ्रीझ’ नियतकालिकामार्फत होणार. त्यामुळे ही निव्वळ विकावीक ठरत नाही. यंदा या ‘विमेन मास्टर्स’मध्ये नीलिमा शेख यांचा समावेश आहे आणि ही चित्रं मुंबईच्या ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ या खासगी कलादालनानं मांडली आहेत. नीलिमा शेख यांच्या चित्रांना याआधी कासेल शहरातल्या ‘डॉक्युमेण्टा’ महाप्रदर्शनात स्थान मिळालेलं होतं, हेही महत्त्वाचं आहे.
कलाकारण: काश्मीरची पिछवाई…
अभ्यासून प्रकटणाऱ्या चित्रकार नीलिमा शेख यांच्या अभिव्यक्तीमध्ये २००३ पासून वारंवार काश्मीर येऊ लागलं, स्थिरावलंच. पण ‘मास्टर्स’पैकी एक म्हणून आता त्यांना मान्यता मिळते आहे...
Written by अभिजीत ताम्हणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-10-2024 at 03:22 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta article on visual artist nilima sheikh paintings on kashmir css