अमिताव घोष हे २०१८ च्या ‘ज्ञानपीठ’सह अनेक पुरस्कारांचे आणि देश-विदेशात वाचकप्रिय ठरलेले लेखक. मानवी लालसा व तिचा निसर्ग, पर्यावरण यांवर होणारा परिणाम हा त्यांच्या लेखनाचा गाभा. मराठीसह अनेक भाषांत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत. वाचकाचं सुप्त पर्यावरण-प्रेम घोष यांच्या ललित आणि ललितेतर (प्रामुख्यानं, अज्ञात इतिहास सांगणाऱ्या) पुस्तकांनी नेमकं जागवलं आहे. या घोष यांचं ताजं पुस्तक १४ जानेवारी रोजी प्रकाशित होतं आहे.
‘वाइल्ड फिक्शन्स’ हे या पुस्तकाचं नाव. तो निबंध-संग्रह आहे आणि घोष यांच्या आस्थेचे सारेच विषय त्यात आहेत… भाषा, वाङ्मय, पर्यावरण, निसर्ग, वातावरणीय बदल, मानवी जीवनातले बदल, प्रवास, नवे शोध आणि त्यांचे परिणाम यांबद्दलचे हे निबंध आहेत. प्रकाशनाचा पहिला सोहळा दिल्लीत झाल्यावर १६ जानेवारीस मुंबईच्या ऑपेरा हाउसमध्येही घोष यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रकाशन होईल. घोष यांच्या लिखाणातल्या छटा समजून घेण्यासाठी वाचकांना हे पुस्तक उपयुक्त ठरावं.
बुकनेट
साहित्याबद्दल आस्था असणाऱ्या वाचकांची पुस्तक असोशी वाढविणारे नवे सदर. यात वाचण्यासाठी उत्तम लेखांबरोबरच दृक्-श्राव्य मुलाखती, लेखक- पुस्तकासंबंधींचे लघुपट, माहितीपट आणि अवांतर विषयांचा दुवा दिला जाईल.
लेखक होण्याची गोष्ट : गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात पॉल ऑस्टर या लेखकाचा मृत्यू झाला. न्यूू यॉर्क शहरावर कादंबरीत्रयी, तीही रहस्यकथेच्या बाजाने लिहिणाऱ्या या लेखकाने दिलेल्या मुलाखतीचा १७ मिनिटांचा तुकडा.
surl.li/ymywtj
शहाणे पुस्तकवेड : फ्रान्समधील ‘बिब्लिओमेनिआक’ पंथाचा सहाएक मिनिटांत आढावा घेणारी क्लिप. फार पूर्वीची असली, तर त्यात एका पुस्तकवेड्याच्या घरापासून तिथल्या पुस्तकबाजारांचा फेरफटका येतो. काही अट्टल ग्रंथप्रेमींची झलकही मिळते.
https://shorturl. at/LAygU
बाप्सी सिधवांचे मोठेपण : भारतीयांना ‘द अर्थ’ या दीपा मेहतांच्या चित्रपटामुळे माहीत झालेल्या पाकिस्तानी-अमेरिकी कादंबरीकार बाप्सी सिधवा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कारकीर्दीचा कृतज्ञतापूर्वक आढावा घेणारा लेख.
surl.li/bmrtuk