सन २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पद्माकर शिवलकर आणि राजिंदर गोयल या दोघांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना निवृत्त होऊन काही दशके लोटल्यानंतर जीवनगौरव देण्यात त्यांच्या गौरवशाली कारकीर्दींना दाद देण्याचा हेतू होताच. पण कुठे तरी ते भारतीय क्रिकेट व्यवस्थेचे ‘पापक्षालन’ही ठरले. शिवलकर आणि गोयल हे दोघेही असामान्य प्रतिभेचे डावखुरे फिरकीपटू. त्यांची कारकीर्द साठ आणि सत्तरच्या दशकात बिशनसिंग बेदी यांच्यामुळे झाकोळली गेली. स्थानिक क्रिकेट गाजवूनही बेदींमुळे त्यांना भारतीय संघात संधीच मिळाली नाही. बेदी स्वत: निर्विवाद प्रतिभेचे डावखुरे फिरकीपटू होते. त्यांना वगळून शिवलकर किंवा आणखी कुणास संधी मिळावी असे प्रसंगच उद्भवले नाहीत. बेदींच्या निवृत्तीनंतर त्या वेळच्या युवा गोलंदाजांना अधिक पसंती दिली गेली.

१२४ सामन्यांत २० हून कमीच्या सरासरीने ५८९ बळी मिळवणारा गोलंदाज भारतीय क्रिकेट संघातून खेळू शकत नाही हा केवळ नियतीचा खेळ असू शकत नाही. त्यात व्यवस्थेचाही काहीएक दोष आहेच. म्हणूनही बहुधा तो जीवनगौरव पुरस्कार समयोचित ठरला. त्या दिवशी दोन प्रतिक्रिया अतिशय उल्लेखनीय ठरल्या. भारतीय संघाकडून खेळण्याची संधी हुकली त्याबद्दल खंत वाटते का, असा प्रश्न शिवलकरांना ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने विचारला. हा प्रश्न त्यांना अर्थातच हजार वेळा तरी विचारला गेला असेल. पण त्याबद्दल त्रागा न करता शिवलकरांनी त्यांच्या आवडीच्या गाण्याची एक ओळच गाऊन दाखवली – ‘जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया’! जे मिळाले ते प्राक्तन म्हणून स्वीकारणे हे तत्त्व शिवलकरांनी आयुष्यभर आनंदाने पाळले.

त्या दिवशीची दुसरी दखलपात्र प्रतिक्रिया होती विक्रमवीर आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांची. ‘पॅडी’ला (शिवलकरांचे अधिक प्रचलित नाव) भारतीय संघात खेळवण्याबद्दल निवड समितीचे मन वळवू शकलो नाही, ही आपली आजवरची सर्वांत मोठी खंत असे गावस्कर म्हणाले!

हा सगळा कालखंड शिवलकर यांच्या असंख्य चाहत्यांसाठी खंतावणारा खराच. याचे कारण म्हणजे एकीकडे त्यांची फिरकी गोलंदाजीतली असामान्य प्रतिभा आणि दुसरीकडे त्यांचे लोभस व्यक्तिमत्त्व. अशा निर्विष माणसावर सातत्याने वर्षानुवर्षे अन्याय होत राहिला. मुंबई ही स्वाभिमानी क्रिकेटप्रेमींची नगरी. इथे सामान्य वकुबाचा कोणी लोकप्रिय होऊ शकत नाही. आणि असामान्यत्व गाठायला आव्हानांचे अनेक अडथळे पार करावे लागतात. शिवलकरांनी ते केले.

१९६२ मध्ये सीसीआयकडून निमंत्रितांच्या आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध ते आत्मविश्वासाने खेळले. तो त्यांचा पहिलाच प्रथम श्रेणी सामना. समोरच्या संघात होते बॉब सिम्प्सन, टॉम ग्रेव्हनी, रिची बेनॉ, कॉलिन काउड्रे, एव्हर्टन वीक्स असे दिग्गज फलंदाज. मात्र मुंबई संघातून त्या वेळी बापू नाडकर्णी खेळायचे, जे अर्थातच भारतीय संघाकडूनही चमकत होते. नाडकर्णी निवृत्तीकडे आले त्या वेळी भारतीय संघात बेदींचे आगमन झाले. बेदी निवृत्त झाले, त्या वेळी शिवलकर ३७ वर्षांचे झाले होते. पुढे दिलीप दोशी, रवी शास्त्री, मनिंदर सिंग या युवा डावखुऱ्या गोलंदाजांना पसंती मिळाली. पण त्यांनी खंतावून क्रिकेटला अंतर दिले नाही. हिंदी चित्रपटांची गाणी हे त्यांचे दुसरे आवडीचे क्षेत्र. साधे आणि प्रसन्नचित्त शिवलकर मुंबई क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट स्थानिक क्रिकेटचे ‘आयकॉन’ बनले. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना आदरांजली.

Story img Loader