चित्रपटासारख्या झगमगत्या दुनियेत आपले स्थान पक्के करण्यासाठी सुलोचनाबाईंना फार मोठय़ा स्पर्धेला तोंड द्यावे लागले नाही, हे खरे, मात्र त्यांनी जे स्थान मिळवले, त्या जागी त्या अखेपर्यंत अढळ राहिल्या. चित्रपटसृष्टीत अस्सल मराठीपण जपणाऱ्या सुलोचनाबाईंना काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या संस्कृतीचे आणि त्यातील बारकाव्यांचे जे भान होते, ते त्यांच्या कलाकारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे अंग होते. केवळ शालीन व्यक्तिमत्त्व म्हणून तशाच भूमिका मिळाल्या, म्हणून त्या मन लावून केल्या, असे उत्तर त्या कधीही देऊ शकल्या असत्याच. परंतु सोज्वळता आणि शालीनता त्यांच्या अभिनयातही होती, ती त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडणारी होती आणि ती कधीच बटबटीत नव्हती. त्यामुळे अभिनयाच्या आयुष्यात विशिष्ट प्रकारच्या भूमिकाच वाटय़ाला आल्या, म्हणून सुलोचनाबाईंनी कधी त्रागा केला नाही. त्या भूमिकाही त्यांनी त्यांच्या नेहमीच्या कौशल्याने निभावल्या.

‘पडद्यावरची आई’ ही त्यांची प्रतिमा, केवळ त्यांच्या शालीनतेमुळे निर्माण झालेली नाही. त्यातही एक अस्सल मराठीपण लपलेले होते. सोज्वळ सौंदर्य थिल्लरपणासाठी उपयोगात आणायचे नसते, याचे आत्मभान त्यांच्यापाशी होते. त्यामुळेच तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांत भूमिका करूनही आपल्या प्रतिमेला त्यांनी जराही तडा जाऊ दिला नाही. परकरी वयात चित्रपटात पदार्पण करण्याचा तो काळच नव्हता. एकूण त्या काळातील सामाजिक वातावरण स्त्रीला मिरवण्यापासून वंचित करणारे होते. १९३२ मध्ये पहिला मराठी बोलपट प्रदर्शित होईपर्यंत महिलांना या क्षेत्रात पाऊल ठेवायला पाऊलभरही जागा नव्हती. मेनकाबाई शिरोडकर यांच्यासारख्यांनी ही पाऊलभर जागा प्रशस्त केली आणि नंतरच्या काळात तिचा उपयोग करून ज्या अनेक महिलांनी चित्रपटात पदार्पण केले, त्यामध्ये सुलोचनाबाईंचे महत्त्व अधोरेखित करण्यासारखे आहे. याचे कारण त्यांनी या क्षेत्रात केलेली दीर्घ कारकीर्द.

असे असले, तरी सुलोचनाबाईंच्या वाटय़ाला ‘अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया’ यासारखे लावणीगीतही आले होते. त्या गीतातही त्यांच्या अस्सल मराठी साजाचे अपूर्व दर्शन घडलेच. जे ‘सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती’ किंवा ‘कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई’ यासारख्या गीतातूनही घडलेच. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत परत घरी येतात, तो प्रसंग सुलोचनाबाईंनी ‘नवल वर्तले गे माई, विकसला प्रकाशु’ या गीतातून साकार करतानाही दिसले ते वात्सल्यच. ‘साधी माणसं’ या चित्रपटातील त्यांची भूमिका त्यांचे व्यक्तिमत्त्व उजळून टाकणारी होती, त्याप्रमाणेच, ‘सांगत्ये ऐका’, ‘वहिनीच्या बांगडय़ा’, ‘मराठा तितुका मेळवावा’ यासारख्या त्या काळात गाजलेल्या चित्रपटांतून सुलोचनाबाईंनी केलेल्या भूमिका रसिकांच्या सतत नजरेसमोर राहिल्या. भालजी पेंढारकर हे त्यांचे पहिले गुरू. वयाच्या चौदाव्या वर्षी कॅमेऱ्यासमोर उभे राहून भालजींचे समाधान करणे, ही त्या काळी अवघड गोष्ट होती. भालजींनीही त्यांच्यासाठी खूप कष्ट घेतले आणि सुलोचनाबाईंनीही त्यांचा सक्रिय प्रतिसाद दिला. मात्र त्यांचे वेगळेपण असे, की त्या ‘भालजी परंपरे’ला चिकटून राहिल्या नाहीत. त्या काळातल्या तंत्रज्ञानात होत गेलेले बदल त्यांनी कष्टसाध्य केले. आपल्याला सतत बदलत राहण्याशिवाय पर्याय नाही, हे वेळीच लक्षात आल्याने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली नाममुद्रा उमटवली. अशोककुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याने नजरेला नजर भिडवून बोलल्याचा दिलेला कानमंत्र आत्मसात केल्यानंतर त्यांना मागे वळून पाहावेच लागले नाही. स्वच्छ उच्चार, चेहऱ्यावरील भाव आणि सहज होणाऱ्या हालचाली, यातून त्यांची सहजसुंदरता अधिक उठावदार झाली. विजय तेंडुलकरांच्या ‘रातराणी’ या पुस्तकातील सुलोचनाबाईंवरील लेखात ‘त्यांचे व्यक्तिमत्व खरोखरी उमटत होते, बोलत होते, ते त्यांच्या चेहऱ्याद्वारे’ असा उल्लेख आहे, तो शंभर टक्के पटणारा! चहूबाजूंनी प्रलोभने फेर धरून नाचणाऱ्या चित्रपटसृष्टीत नकार देण्याचे धैर्य अंगी बाळगणे ही क्वचित आढळणारी गोष्ट सुलोचनाबाईंकडे होती. आपल्याला जे आवडेल, जमेल आणि रुचेल तेच करायचे, असा जणू दंडकच त्यांनी स्वत:पुरता घालून घेतला होता. सात्त्विकता, सोज्वळता हेच आपले गुणवैशिष्टय़ आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी भूमिकांची निवड केली. ‘आई’ या व्यक्तिमत्त्वाचे ‘मोलकरीण’पासून ‘खून भरी माँग’पर्यंत कितीतरी रंग त्यांनी आपल्या अभिनयातून साकार केले. त्या अभिनयात खोटेपणाचा लवलेश तर नव्हताच, उलट त्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या मनात उतरण्याची क्षमता होती. प्रत्येकासाठी सुलोचनाबाई त्यांच्या आई बनून राहिल्या, हे त्यांचे वेगळेपण. त्यांच्या निधनामुळे रुपेरी दुनियेत दीर्घकाळ काम केलेली एक ज्येष्ठ अभिनेत्री हरपली आहे. त्यांना ‘लोकसत्ता’ची आदरांजली.

Story img Loader