चित्रकलेत अमूर्ततेची- अॅबस्ट्रॅक्ट’ची रीत जितकी मुंबईत रुजली आणि रुळली, तितकी भारतातल्या अन्य कुठल्याही शहरात ती रुळली नाही. पण म्हणून बाकीच्या शहरांमध्ये अमूर्ततेची जाण कुणाला नव्हतीच, असेही नाही. बडोद्यात जेराम पटेल होते, जन्माने मुंबईकर पण बडोद्यात राहाणाऱ्या नसरीन मोहम्मदी होत्या आणि शिल्पकार हिम्मत शाह पुढे दिल्लीकर झाले, नंतर जयपूरमध्ये राहू लागले, तरी या हिम्मतभाईंचेही कलाशिक्षण बडोद्यातच झालेले होते. पटेल आणि शाह हे दोघे, बडोद्यातील तरुण चित्रकारांनी १९६२ साली स्थापलेल्या ‘ग्रूप १८९०’चे सदस्य होते.
पटेल हे परिणामवादी (इफेक्ट- ओरिएन्टेड) अमूर्तकलेकडे वळले, नसरीन मोहम्मदी भौमितिक अमूर्ततेमध्ये रमल्या; पण हिम्मत शाह यांनी क्युबिझमसारख्या पाश्चात्त्य शैली पचवून, स्वत:ची भारतीय अमूर्ततेची वाट शोधली. हिम्मतभाईंचे निधन २ मार्च रोजी झाल्यामुळे आता, एकेकाळी बडोद्यात रुजलेली अमूर्तकला परंपराही इतिहासजमा झाली आहे.
माणसाच्या डोक्यासारखा पण उभट आणि मोठा आकार, त्यावर कधी डोळे, कधी नाक, कधी कान अशा एखाद्याच अवयवाचा सूचक अवशेष अशा ‘टेराकोटा’ मातीतून घडवलेल्या शिल्पांसाठी हिम्मत शाह अलीकडच्या काळात अधिक लक्षणीय ठरले होते. पण कधीकाळी- १९६१ मध्ये – त्यांची सुरुवात कागदापासून झाली होती.
पुढल्या काळात जेराम पटेल लाकूड जाळून चित्रावकाश निर्माण करत. त्याआधी हिम्मत शाह यांनी कागदाचे काही भाग संयतपणे जाळून अमूर्त अवकाश शोधला. त्यानंतर ते त्रिमित आकारांच्या मांडणीकडे वळले. मुळात चित्रकलेचे शिक्षण घेतलेल्या हिम्मत शाह यांचा शिल्पकार म्हणून प्रवास तिथपासूनच सुरू झाला होता. याच दरम्यान फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. पॅरिसमध्ये रंगचित्रांचे शिक्षण घेण्यात ते फारसे रमले नाहीत, त्याऐवजी स्टॅन्ली विल्यम हेटर यांनी स्थापलेल्या ‘अटेलिए सेव्हन्टीन’ या मुद्राचित्रण कार्यशाळेत जाऊ लागले. हेटर हे अमेरिकेत असताना तिथल्या ‘अॅबस्ट्रॅक्ट एक्प्रेशनिझम’ चळवळीतले मुद्राचित्रणकार.
पॅरिसमधल्या त्यांच्या कार्यशाळेत कृष्णा रेड्डीदेखील मार्गदर्शन करत. बाहेरच्या आकारांमधून अमूर्त-रचना जरी केली, तरी त्यातली सौंदर्यतत्त्वे आधी रचनाकाराला आणि मग प्रेक्षकालाही सहज भिडली पाहिजेत, ही शहाणीव घेऊन हिम्मतभाई पॅरिसहून परतले. दिल्लीच्या गढी स्टुडिओजमध्ये त्यांचा स्टुडिओ सुमारे ३० वर्षे होता. ‘ते काम फार कमी करतात’ असे प्रवादही त्यांच्याबद्दल निर्माण होऊ लागले होते. पण मुळात हिम्मतभाईंची प्रवृत्तीच नेमके कामच ‘कलाकृती’ म्हणून प्रदर्शित करण्याची होती. अभ्यासू रिकामपणा त्यांच्या कलाकृतींमध्ये उतरलेला दिसतो.
कलासमीक्षक गीता कपूर यांनी हिम्मत शाह यांचे वर्णन बेछूट तरीही संन्यासीवृत्तीचा (द बोहेमियन अॅज हर्मिट) असे केले होते. हिम्मतभाईंचे बालपण ज्या प्रकारे गेले, ते पाहाता आधुनिक पाश्चात्त्य कलेचे आकर्षण त्यांना वाटले कसे, असा प्रश्नच अनेकांना पडेल. वडिलांच्या जाचाला कंटाळून घर सोडून पळालेल्या, मंदिरात राहिलेल्या आणि तिथेच ‘हात चांगला आहे या मुलाचा’ हे सांभाळ करणाऱ्या पुजाऱ्यांप्रमाणेच व्यवस्थापकांनाही समजल्याने पुढे कलाशिक्षणाची संधी मिळालेल्या हिम्मतभाईंना ‘रंगप्रभू’ चित्रकार ना. श्री. बेन्द्रे हे बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातील दृश्यकला विभागाचे प्रमुख असताना तिथे शिक्षण घेता आले.
चंडीगढच्या उभारणीनंतर ल कॉर्बुझिए यांनी अहमदाबादेतही काही इमारती उभारल्या होत्या. बडोद्यात तेव्हा नव्या कलाजाणिवा आत्मसात कराव्यात असे वातावरण होते. अर्थात, तरुणपणातला हा निसटता प्रभाव हिम्मत शाह यांनी नेमकेपणाने टिपला, पुढे पॅरिससारख्या पाश्चात्त्य आधुनिक कलेच्या मक्केत जाऊनही आपण काही निराळे करावे याची जाणीव त्यांना झाली, हे त्यांच्या मोठेपणामागचे रहस्य.