डॉ. सुनीलकुमार लवटे
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे वडील बाळाजी जोशी यांचा जोशीपणाचा पैतृक व्यवसाय होता. पारंपरिक भिक्षुकीही होती. वडील नाशिकच्या वेदशाळेत शिकलेले. ते वैदिक आणि याज्ञिक होते. घरोघरी चालणारी कर्मकांडे करणारा तो याज्ञिक, श्राद्ध, पूजा, देव प्रतिष्ठा, श्रावणी, उपनयन, विवाहादी विधी ते करत नि वेदपठणही. तर्कतीर्थांना बालपणीच आधुनिक दृष्टी लाभली, ती नारायणशास्त्री मराठे (पुढे संन्यास धारण केल्यावर ते स्वामी केवलानंद सरस्वती म्हणून ओळखले गेले) यांच्या प्राज्ञपाठशाळा, वाई येथील गुरुकुलात. तत्पूर्वी, ते पिंपळनेर या आपल्या जन्मगावी प्राथमिक शाळेत इ. चौथीपर्यंत लेखन, वाचन शिकले. प्राज्ञपाठशाळेत तर्कतीर्थ व्युत्पत्ती, वाचनविकास करीत व्याकरण, न्याय, मीमांसा शिकले. काशीमध्ये जाऊन त्यांनी नव्य-न्याय, व्याकरण, शास्त्रार्थ, तर्कशास्त्र इ.चा अभ्यास करून कलकत्त्याच्या (आताचे कोलकाता) शासकीय संस्कृत महाविद्यालया (आता विद्यापीठ झालेले) मधून ‘तर्कतीर्थ’ पदवी संपादन केली नि तीच त्यांची ओळख ठरली.
‘न्यायमुक्तावली’, ‘दिनकरी’, ‘चतुर्दशलक्षणी’, ‘जागदीशी’, ‘मादाधरी’, ‘सिद्धांतलक्षण’, ‘तर्कदीपिका’, ‘वेदांतसार,’ ‘पाञ्चादशी’, ‘अर्थसंग्रह’ इ. ग्रंथ वाचन, अभ्यास, शास्त्रार्थातून तर्कतीर्थांतील संस्कृत पंडित आणि वेदांती आकारला. तर्कतीर्थांना इंग्रजी शिकवले त्यांचे प्राज्ञपाठशाळा, वाईतील सहाध्यायी आचार्य विनोब भावे यांनी. १९१७ मध्ये वाईत शिकत असताना आपल्या या सहाध्यायास विनोबा नेहमी म्हणत, ‘हे जे प्राचीन अध्ययन आहे, घटपटाची खटपट आहे, त्याने देशाचा काही उद्धार व्हायचा नाही, तर आधुनिक शिक्षण घेतले पाहिजे आणि या देशामध्ये यंत्रोद्याोग आले पाहिजेत. त्यासाठी तुला अमेरिकत जावे लागले तरी जा.’ हे लक्षात ठेवून तर्कतीर्थांनी पळून जाऊन बडोद्यात विनोबांकडे इंग्रजी शिक्षण घेतले. ‘तर्खडकर भाषांतरमाला’ची तीन पुस्तके तीन महिन्यांत पूर्ण केली. त्यानंतर ‘सॅन्फर्ड अँड मर्टन’ पूर्ण केले. ‘लँब्स टेल्स’, ‘टेल्स फ्रॉम शेक्सपिअर’ वाचत गती आली; पण स्पेलिंग कच्चेच राहिले. विनोबांनी त्यांना साबरमती आश्रमात पाठवायची तयारी सुरू केल्याची कुणकुण लागताच त्यांनी पळ काढला, तो या विचाराने की, ‘मी अमेरिकेला जाण्यासाठी इंग्रजी शिकत होतो आणि त्याच्याऐवजी विणकाम करायचे, चरखा चालवायचा, हे काही मला पटेना.’ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मराठी साहित्य वाचन सुरू झाले ते वैचारिक वाङ्मयातून. ‘निबंधमाला’, ‘काळातील निवड निबंध’ वाचत त्यांच्यातील विचारवंताची पठडी तयार झाली. केशवसुत, चंद्रशेखर, गोविंदाग्रज, अनिल, बोरकरही वाचले; पण भावले ते आगरकरच! पुढे हिंदीत स्वामी सत्यदेव यांचे निबंध वाचनात आले नि साहित्याचं सत्त्व, सत्य उमगलं.
हेही वाचा ; अन्वयार्थ : माफीने मणिपुरात सलोखा दिसेल?
शास्त्री-पंडितांच्या सहवासानंतर तर्कतीर्थ स्वातंत्र्य चळवळीतील कायदेभंगाच्या सत्याग्रहात तुरुंगात गेले. तिथे द्वा. भ. कर्णिकांच्या सान्निध्यात कार्ल मार्क्सचा ‘मॅनिफेस्टो’ वाचला नि त्यांच्या धारणा बदलल्या. स्पोन्सरच्या वाचनाने त्यांचं विचारविश्व बदललं. पुढे ते मानवेंद्रनाथ रॉय, महात्मा गांधींच्या निकट सहवासात राहिले. हिंसा-अहिंसा, क्रांती-परिवर्तन, अध्यात्म-आधुनिकता यांचे द्वंद्व हा त्यांच्या जीवनघडणीचा अविभाज्य भाग होत गेला. मूलत:च विरोधी असलेली विचारसरणी त्यांच्या विचारपथात आली की ती त्यांच्यात क्षोभ (परिवर्तन) निर्माण करत असे, हे त्यांच्या घडणीचा विचार करताना लक्षात येते. पक्षी जसा एका फांदीवर विसावत नाही, तसे ते एकाच विचारधारेत फार काळ रमले नाहीत. मार्क्सचा विरोध विकास सिद्धांत हा त्यांच्या जीवनाचे सूत्र होऊन विकसित होत राहतो.
हेही वाचा ; उलटा चष्मा : भारतातच पाकिस्तान?
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवनाच्या वैचारिक परिवर्तनाचा विचार करताना लक्षात येते की, स्वतंत्र बुद्धीने विचार करणे, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायिभाव होय. माणसे एककल्ली असतात, ती वैचारिक दुराग्रहामुळे. उदारमतवाद माणसास नित्य विस्तारतो. हा विस्तार व्यक्तीचा असतो, तसा व्यवस्थेचाही. नित्य नवा विचार सुचणे, ही तीर्कतीर्थांच्या वैचारिक घडणीची फलश्रुती होती, म्हणून सनातनाचे महत्त्व शब्दप्रामाण्याच्या बळावर अपरिवर्तनीय मानणाऱ्या पुरोहित वर्गास, धर्मपंडितांना सनातन म्हणजे पारंपरिक नसून, वैश्विक (युनिव्हर्सल) होय आणि ते आचार-विचार परिवर्तनानेच शक्य असल्याचे ते सांगत होते. ते आज समजून घेणे अधिक सयुक्तिक ठरेल.
डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com