डॉ. सुनीलकुमार लवटे
हे स्मरणरंजन नव्हे, तर वर्तमानास गतवैभव प्राप्त करून देण्याचा विनम्र प्रयत्न आहे…
‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला’ – याचा विचार करता हे वर्ष (२७ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६) त्यांचं ‘शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष’ म्हणून साहित्य, भाषा, संस्कृती, संशोधन क्षेत्रांत साजरं केलं जाईल, जायलाही हवं. त्याचं कारण, तर्कतीर्थांना १९०१ ते १९९४ असं तब्बल ९३ वर्षांचं आयुष्य लाभलं. त्या अर्थानं ते विसाव्या शतकाचे साक्षीदार, भागीदार होत. त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. वेदशास्त्रसंपन्न, धर्म नि समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक, अस्पृश्यता निर्मूलक, आंतरजातीय विवाह समर्थक, अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाचे कृतिशील पुरोहित, भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या मसुद्याचे संस्कृत भाषांतरकार, राज्य निर्मितीनंतरच्या महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृतीचे शिल्पकार, कोशकार, मराठीला ज्ञानभाषा म्हणून संपन्न करणारे ज्ञानोपासक, प्रबोधक, वक्ते, साहित्यकार अशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेक अंगं सांगता येतील.
त्यांनी आपल्या जीवनकाळात मराठी विश्वकोशात दीडशेहून अधिक नोंदी लिहिल्या नि त्या कोशाच्या आरंभिक १५ खंडांचं संपादन केलं. ‘हिंदुधर्माची समीक्षा’ (१९४१) केली, तसंच ‘धर्मकोश’चे २५ खंड संपादित केले. भारतीय वेद वाङ्मयाची कालक्रमिक संगती लावून हे खंड इंग्रजीत संपादित केले. यामुळे हिंदू धर्मग्रंथ आणि वेद हे वैश्विक अध्ययन, अध्यापन, संशोधन साधन म्हणून उपलब्ध झाले. हे ग्रंथ आजही जगभर प्राच्यविद्या, भारतविद्या, वेदविचार क्षेत्रात प्रामाणिक व प्रमाणित (ट्रू अँड स्टँडर्ड) साधन मानले जातात. तीच गोष्ट ‘मीमांसा कोश’च्या सात खंडांची. ते रचले तर्कतीर्थांचे गुरू स्वामी केवलानंद सरस्वती यांनी; पण प्रकाशात आणले तर्कतीर्थांनी. ‘धर्म’ संकल्पनेचा विचार हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अभ्यासाइतकाच आस्थेचा विषय होता. त्याला ‘सर्वधर्मसमीक्षा’ (१९८४)चं अधिष्ठान होतं. धर्म ही अहंकार, आक्रमण, अस्मितेची बाब नसून, वैश्विक मानवी जीवन एकात्म करण्याच्या बंधुभावाचे विविधमार्गी परंतु एकलक्ष्यी साधन म्हणून ते धर्माकडे पाहत.
हेही वाचा : पहिली बाजू : नेतृत्वमर्यादांमुळे ‘आघाडी’ विघटनाकडे…
तत्त्वज्ञानाच्या पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही विचारप्रवाहांवर अभ्यासक म्हणून त्यांचा समान अधिकार होता. द्वैतवाद, अद्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, विशिष्ट द्वैतवाद, ख्यातिवाद, केवलाद्वैतवाद, एकदेवतावाद, मनुवाद, लोकायत, सांख्यदर्शन, चिद्वाद या विचारांचा तर्कतीर्थांचा व्यासंग पाहिला की त्यांनी हे सर्व अनौपचारिक शिक्षण पद्धतीतून (गुरुकुल) संपादित केलं होतं, यावर आज विश्वास बसत नाही. शिवाय तर्कतीर्थ विचारविकास पाहता, तो वर्तमान औपचारिक शिक्षणाच्या निरंतर स्थूलतेकडे अग्रेसर होणाऱ्या विकासापुढे (खरं तर विस्तारापुढे) प्रश्नचिन्ह निर्माण करतो. तर्कतीर्थांचा इतकाच अधिकार पाश्चात्त्य विचारधारांवरही होता, हे ‘जडवाद अर्थात अनीश्वरवाद’ (१९४१), ‘आनंदमीमांसा’ (१९२८)सारखे त्यांचे प्रबंध वाचताना लक्षात येतं. मार्क्सवाद, रॉयवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद, आधुनिकतावाद, मानवतावाद, नवमानवतावाद त्यांनी जीवनाच्या विविध टप्प्यांवर अभ्यासले आणि आचरलेही होते.
हेही वाचा : अन्वयार्थ : विद्यार्थ्यांशी विसंवाद
‘हाऊ फार दॅट लिटल कँडल थ्रोज इट्स बीम्स; सो शाइन्स ए गुड डीड इन ए नॉटी वर्ल्ड’सारखं शेक्सपिअरचं वचन मला नि आपणाला तर्कतीर्थ-विचाराच्या संदर्भात मननीय ठरावं. जगाचा इतिहास हे सांगत आला आहे की, ‘विश्व कडेलोटाच्या टोकावर तरलेले असते, तेव्हा कोणी तरी तत्त्वज्ञ, विचारवंत, कलाकार, शास्त्रज्ञ जन्माला येतात नि ते आपल्या विचार आणि कृतीच्या तरफेने कडेलोट पावणारे विश्व नुसतेच थोपवून धरत नाहीत, तर त्यास विधायक दिशा आणि दृष्टी देतात.’ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांची प्रस्तुतता अशी की, गतशतकातील असले तरी ते वर्तमान जगास दिशादर्शक ठरतात, अशी माझी धारणा आहे. हा शिळ्या कढीला ऊत नसून, ‘थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पाहा जरा, एक तरी गुण अंगी घ्यावा, हाची सापडे बोध खरा!’ असा विचार करून हाती घेतलेला शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मरण उपक्रम होय. हे स्पष्ट केलेच पाहिजे की, हे स्मरणरंजन नव्हे, तर वर्तमानास गतवैभव प्राप्त करून देण्याचा विनम्र प्रयत्न आहे. कोणत्याही काळात समर्थ लोकसत्ता निर्माण करायची तर ‘वादे वादे जाय ते तत्त्वबोध:’ हाच सत्यशोधक मार्ग उपयोगी ठरतो.
डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com