गेल्या शंभर वर्षांपासून पॅरिस या शहराचा कुठलाही कोपरा आता उरला नसेल, ज्यावर लिहिले गेले नाही अन् तो कॅमेऱ्यात चित्रित झाला नाही. लेखक, कलाकारांनी सदा-सर्वकाळ व्यापलेल्या या शहरामध्येच अमेरिकी लेखक अर्नेस्ट हेेमिंग्वेने आपल्या उमेदीच्या वर्षात म्हणजे १९२० वगैरेच्या काळात पत्रकारिता केली. कथा लिहिल्या. कफल्लकतेच्या असंख्य नोंदी गोंदविल्या. ‘शेक्सपिअर अॅण्ड कंपनी’ या पुस्तकालयाच्या सिल्व्हिया बीच या मालकिणीशी मैत्रीच्या, तिने नि:शुल्क वाचू दिलेल्या पुस्तकांच्या कहाण्याही सांगितल्या. या शहराच्या प्रेेमापोटी त्याने ‘अ मुव्हेबल फिस्ट’ नावाचे छोटेखानी पुस्तक लिहिले. जे त्याच्या मृत्यूनंतर १९६५ साली प्रसिद्ध झाले. त्यानंतरच्या सहा-सात दशकांतही पॅरिस शहराची अनेकाविध प्रवास वर्णनांनी भरलेली शेकडो पुस्तके येत राहिली. त्यात ताजे आहे काही महिन्यांपूर्वी आलेले जॉन बॅक्स्टर यांचे ‘अनटोल्ड पॅरिस’. बॅक्स्टर यांचे हे पुस्तक ‘बुकबातमी’साठी का? याचे कारण बॅक्स्टर यांची मातृभूमी नसूनही त्यांच्याइतके पॅरिस खचितच कुणी खंगाळून काढले असेल.
जॉन बॅक्स्टर हे जन्माने ऑस्ट्रेलियन. कर्माने बरेचसे चित्रपट आणि पुस्तकवेडे. ऑस्ट्रेलियात आयुष्याची आरंभीची वर्षे लेखक-वाचक म्हणून मिरवून काढल्यावर ब्रिटन आणि अमेरिका या दोन्ही देशांत त्यांचे बराच काळ वास्तव्य राहिले, ते दुर्मीळ पुस्तकांचा खासगी संग्रह जमवत. १९८९ साली ते पॅरिसमध्ये आले ते आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी. ही प्रेयसी राहत होती त्या इमारतीतच ‘शेक्सपिअर अॅण्ड कंपनी’चे दुकानदेखील आहे. तिच्या घरातून दिसणाऱ्या देखण्या शहराविषयी त्यांना बायकोपेक्षाही दुप्पट प्रेम वाटू लागले. त्यानंतर त्या प्रेमाच्या खुणा या शहरावरच्या पुस्तकांतून उमटवत राहिले. ऑस्ट्रेलियन विज्ञानकथांचे संपादन हा त्यांचा एक प्रांत. जॉर्ज लुकास, वुडी अॅलन आणि हॉलीवूडच्या इतिहासाबाबतची पुस्तके हा दुसरा. पुस्तकवेडाचार सांगणारी आत्मचरित्रे हा तिसरा. ‘अ पाउण्ड ऑफ पेपर : अ कन्फेशन ऑफ अ बुक अॅडिक्ट’ हे या आत्मचरित्रांतील पुस्तक आपल्याकडेही बऱ्यापैकी ओळखीचे असलेले. पण त्यांचा सर्वाधिक ग्रंथलेखनाचा प्रांत हा पॅरिस शहराशी निगडित. ‘अ इयर इन पॅरिस’, ‘फाइव्ह नाइट्स इन पॅरिस’, ‘गोल्डन मोमेण्ट्स इन पॅरिस’, ‘पॅरिस अॅट द एण्ड ऑफ द वर्ल्ड’, ‘क्रॉनिकल्स ऑफ ओल्ड पॅरिस’, ‘इमुव्हेबल फिस्ट : अ पॅरिस ख्रिासमस’ आदी गाजलेली निवडक नावे. संपूर्ण यादी भरपूर लांब होईल. महायुद्धाच्या दरम्यानचे पॅरिस, शहरातील हरवलेली रेस्तराँ, त्यांच्या विशेष व्यंजनांच्या चवींबद्दल, तिथल्या कलाकारांच्या इतिहासाबद्दल, सणाच्या वातावरणाबद्दल आणि नागरिकांच्या ग्रंथप्रेमाबद्दल बॅक्स्टर इतकी वर्षे लिहूनही थकले नाहीत. शहराचा साहित्यिक फेरफटकाही ते माहितीविक्या (गाईड) होत वयाच्या ८५ व्या वर्षीदेखील आयोजित करतात. आपल्या नसलेल्या शहरात रमून त्यावर इतके सांगून आणि लिहून झाल्यानंतरही ‘अनटोल्ड पॅरिस’ हे त्यांचे ताजे पुस्तक आले. शहराची आणखी, नव्याने सापडलेली रहस्ये हुडकून, पुस्तक वेडात पार बुडालेल्या या माणसाच्या हाती शहरासंबंधित जुनी पुस्तके-मासिके- तपशील लागले की मग हा त्यांच्या मागे हात धुऊन लागतो आणि जुन्या संदर्भांना नव्या माहितीने अद्यायावत करतो. साहित्यिकांनी भरलेल्या कॅफे संस्कृतीवर एक लेख आहे, तर दुसरा इथल्या रस्त्यांवर कला सादर करणाऱ्यांविषयीचा. गोदार्द या सिनेमा दिग्दर्शकाच्या घराजवळच्या परिसराला नव्या माहितीची जोड देत एक लेख जमला आहे. ऑपेराजमध्ये फॅण्टम साकारणाऱ्या मुखवटावीरांवर, गिटारवादकांवर, जॅझ कलाकारांवर, सर्रियल चळवळीबद्दल, खाद्यासंस्कृतीबद्दल, गोगलगायींच्या पाककृतीबद्दल, पावनिर्मितीच्या इथल्या इतिहासावर, वेटर्स व त्यांच्या तऱ्हेवाईक वर्तणुकीबद्दल. या देश-शहराबद्दल परकीयदृष्टी असूनही बॅक्स्टर रंजक माहिती काढता-काढता या शहरात किती मुरलेला आहे ते कळू लागते. आधी या शहराबद्दल वाचून किंवा पाहून आपल्या गाठीशी असलेल्या संदर्भात नवी भर पाडणारी पुस्तके ही बॅक्स्टरची खासियत. नवे पुस्तकही त्याला अपवाद नाही.
बुक-नेट
साहित्याबद्दल आस्था असणाऱ्या वाचकांची पुस्तक असोशी वाढविणारे नवे सदर. यात वाचण्यासाठी उत्तम लेखांबरोबरच दृक-श्राव्य मुलाखती, लेखक- पुस्तकासंबंधींचे लघुपट, माहितीपट आणि अवांतर विषयांचा दुवा दिला जाईल.
पुस्तकवेड्यांची घरे : बार्न्स अॅण्ड नोबल या पुस्तकदालनाचे बरेच उपक्रम सुरू असतात. ‘बुक ऑबसेस्ड’ नावाच्या अगदी चार-सहा मिनिटांच्या लघुपटासारख्या चित्रफिती या त्यातल्या खूप पाहिल्या गेलेल्या. ३५ हजार पुस्तकांहून अधिक ग्रंथ घरात असलेल्या एका माणसाबाबतचा व्हिडीओ जितका लोकप्रिय, तितकेच या मालिकेतील इतर भाग सहज सापडू शकतील. फक्त रहस्यकथा वाचणारे आणि जमवणारे जोडपे, एका पटकथाकाराचे कित्येक हजार पुस्तकांचे घरदेखील पाहता येईल.
‘इट, प्रे, लव्ह’ हे अकथनात्मक पुस्तक लिहून जगभर गाजलेली एलिझाबेथ गिल्बर्ट ही प्रत्यक्षात कथालेखिका. पहिला कथासंग्रह मग कादंबऱ्या लिहून नंतर पत्रकारिताही करणारी. या लेखिकेने आपल्या लेखनाच्या प्रेमाबद्दल, त्यातल्या सातत्याबद्दल केलेला ‘टेड टॉक’ गेली १५ वर्षे लाखो लिहित्या-वाचत्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला. या लेखिकेचा अद्भुत आत्मविश्वास येथे अनुभवता येईल.
ग्रॅहम नॉर्टन हा ‘बीबीसी’ वाहिनीवर त्याच्या स्वत:च्याच नावाचा लोकप्रिय शो २००७ पासून करतो. गायक, संगीतकार, चित्रपट कलाकार आदी तारांकित व्यक्तींशी गप्पांचा हा आठवडी कार्यक्रम. सध्या तो वेगळ्याच कारणासाठी ग्रंथवर्तुळात झळकतोय. वयाच्या ६१ व्या वर्षी त्याने त्याची पहिली कादंबरी लिहिली. ‘फ्रॅन्की’ नावाची. या कादंबरीबाबत आणि या टीव्ही निवेदकाच्या वाचनआयुष्याबद्दल सांगणारी मुलाखत.