सातासमुद्राअलीकडे भारतात ‘एमटीव्ही’, ‘व्ही चॅनल’ संगीतबाह्य ‘रिअॅलिटी शोज’ने व्यापलेले असतानादेखील २००० साली जन्मलेल्या मुंबई-पुण्यातच नाही तर बदलापूरपासून ते बारामती किंवा खर्डीपासून बोर्डीपर्यंत इंग्रजी माध्यमांत शिकणाऱ्या अख्ख्या पिढीच्या कानांनी कुणाचे संगीत वारंवार कानांत मुरवले असेल, ते म्हणजे टेलर स्विफ्टचे. या विधानात अतिशयोक्तीचा भास होत असला तर अवती-भवती तपासून पाहाच. मोबाइलवर त्राटक करणारी ताजी पिढी तिची गाणी नुसती ऐकतच नाहीत, तर जगतातदेखील. ती जगातील सर्वात श्रीमंत (अंदाजे १६० कोटी डॉलर) गायिका का आहे, याचे उत्तर सर्वच खंडांतील आबालवृद्धांना तिची गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटावीत इतकी सहज बनलेली भासतात. तिने स्वत:च लिहिलेल्या गाण्यांत तिच्या दैनंदिन जगण्याला परिकथेचे रूप दिलेले असते. लोक ग्रंथ वाचत नसले तर काय? तिच्या गाण्यांना ऐकून ते आधुनिक परिकथा ‘वाचना’चाच आनंद घेत असतात. उदाहरणार्थ ‘वंडरलॅण्ड’ गाण्यातून ‘अॅलिस इन वंडरलॅण्ड’चा अर्क तिने काढलेला असतो. ‘लव्हस्टोरी’ गाण्यामधून कॉलेजमधील ‘रोमियो-ज्युलिएट’ची कहाणी नव्याने ऐकवायला घेतलेली असते. ‘टुडे वॉज फेअरीटेल’मधून गान-वाचनाचा आणखी नवा पाठ द्यायला सुरुवात केलेली असते. ‘वी आर नेव्हर गेटिंग बॅक टुगेदर’, ‘ आय न्यू यू वेअर ट्रबल’ आदी गाण्यांतून प्रेमभंगाला ग्रंथगीत रूप दिलेले असते. तिने केलेल्या विक्रमांची, पारितोषिक पराक्रमांची नोंद तुम्हाला ‘गूगल’वर सहज वाचता येणार असल्याने, ते सांगण्यात काय हशील? काही महिन्यांपूर्वी युरोपातील देशांत तिने सांगीतिक दौरा आखला. अर्थात नव्या अल्बमचा प्रचार-प्रसार हा हेतू. पण त्या दौऱ्याने देशांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. तिच्या मैफली असलेल्या शहरांना त्या काळात पर्यटनस्थळांची स्थिती प्रात झाली. तर तिची फॅन गाइड्स वर्षात अनेकदा अद्यायावत होत विमानतळांच्या स्टॉल्सवर खूपविकी ठरतात.

तर बातमीचा मुद्दा हा की, गेल्या आठवड्यात प्रकाशित ‘हार्टब्रेक इज द नॅशनल अॅन्थम : हाऊ टेलर स्विफ्ट रिइन्व्हेण्टेड द म्युझिक’ या तारांकित व्यक्तीसाठी नव्हे, तर रॉब शेफिल्ड या तारांकित संगीत समीक्षकाकडून टेलरच्या अवलोकनासाठी ‘खूपविके’ होण्याच्या मार्गावर स्थिरावले आहे.

रॉब शेफिल्ड हा कोण याचे उत्तरही तुम्हाला ‘गुगल’ सांगेल. पण ‘लव्ह इज मिक्स टेप : लाइफ अॅण्ड लॉस, वन साँग अॅट ए टाइम’ या त्याच्या संगीत आत्मचरित्राची महत्ता स्पष्ट करू शकणार नाही. त्याआधी थोडे अधिक नजीकचे स्पष्टीकरण आवश्यक. भारतातील संगीत समीक्षा हा एक विनोदाने पाहावा असा प्रांत आहे. शास्त्रीय संगीताच्या बाबत अपवादात्मक चांगली उदाहरणे सापडतील. पण लोकप्रिय संगीताच्या नादी लागून ‘संगीत समीक्षक’ होण्याचा अट्टहास धरणारी त्रोटकू-लेखकूंची मोठी फौज दरदशकांत सापडू शकेल. विशेषणांचा सोस असलेल्या या तथाकथित समीक्षेत संगीताऐवजी ‘साडेतीन तापात’ देवा-देवीने गायलेल्या गाण्यांच्या तद्दन स्तुतीची बेरीज असते. ‘दैवी सूर’, ‘अवीटगोडी’, ‘मंत्रमुग्धी’ असल्या कालबाह्य शब्दपखरणीने कित्येक दशके ही समीक्षा बाल्यावस्थेतून पुढे सरकलेली नाही. (तरलतुंद वाचकही त्यामुळे आकलनशून्यापलीकडे गेले नाहीत.)

रॉब शेफिल्ड हा रोलिंग स्टोन या अमेरिकी संगीत मासिकातील लेखक-समीक्षक. साठोत्तरीतील जगभरच्या पॉप संगीताचा अभ्यासक. ‘डेव्हिड बोवी’, ‘बीटल्स’ यांवरील त्याची पुस्तके जनप्रिय आहेतच. पण कराओके युगावरचे त्याचे पुस्तकही बरेच गाजले आहे. ‘टॉकिंग टू गर्ल्स अबाउट डुरान डुरान’ या पुस्तकातील आणि ‘मिक्सटेप’ या आत्मचरित्रातील लेख वाचलेत तर कलाकारांना देव्हाऱ्यात बसविले जाण्यापलीकडे खरेखुरे संगीतावर बोलणारे लेखन काय असते, याची कल्पना येईल. संगीतसमीक्षा म्हणजे समीक्षकाची ‘शब्दप्रतिभा’ अथवा कठीण शब्दांचा उतमात नसतो, तर त्याला आकलन झालेले जग असते. टेलर स्विफ्टचे ‘अवर साँग’ हे गाणे २००७ वगैरेच्या दरम्यान अमेरिकी संगीतसमीक्षेत ‘दादा’पद अनुभवत असताना शेफिल्डने कॅफेमध्ये ऐकले. गाण्यात ‘कण्ट्री म्युझिक’चा (बेंजोलिन-व्हायोलिन- गिटार) सारा जामानिमा असलेल्या या नव्या आवाजाचा शोध घेण्यासाठी त्याने ‘कोण बरे ही गायिका?’ असा गूगलवर शोध घेतला. त्या प्रथम ध्वनीपरिचयापासून अलीकडचा टेलर स्विफ्टने साऱ्या सांगीतिक सन्मानांना पुरून उरण्याचा पराक्रम रॉब शेफिल्डच्या पत्रकारी नजरेतून या पुस्तकात ग्रथित झाला आहे. कंपन्यांशी संगीतशुल्कावरून झालेल्या प्रदीर्घ वादातून स्विफ्टने आपल्या आधीच्या चारही अल्बम्सना नव्याने रेकॉर्ड करून ‘टेलर व्हर्शन’ या नावाने उपलब्ध करून दिले. असा जोखमीचा प्रकार अवलंबणारी आणि तो यशस्वी करणारी ती एकमेव गायिका आहे. तिने संगीत जगतात काय बदल केले गूगल स्पष्ट करू शकेलही, पण टेलर स्विफ्टवरचे ‘हार्टब्रेक इज द नॅशनल अॅन्थेम’ हे नवे पुस्तकरूपी शेफिल्ड ‘व्हर्जन’ या व्यक्तिमत्त्वामागच्या वलयाचे खोलात आकलन करून देऊ शकेल. देव्हाऱ्यापुढे बसून न केलेली (खरीखुरी) समीक्षा काय असते, याचे (समजून घ्यायचे असल्यास) भान देईल.

(गेल्या रविवारी शेफिल्डने या पुस्तकासाठी दिलेली मुलाखत येथे पाहता येईल.)

https://shorturl. at/EikZN

मुराकामी आणि जपानी साहित्याची निर्यात

जपानी लेखक हारुकी मुराकामी याची पंधरावी कादंबरी दीड आठवड्यांपूर्वीच (जगासह) भारतात दाखल झाली असली, तरी तिच्या विक्रीचे विक्रम समजायला आणखी दोनेक आठवड्यांचा कालावधी जाईल. सध्या युरोप-अमेरिकेतील वृत्तपत्रांच्या वीकान्ती पुरवण्यांमध्ये ‘खरा मुराकामी पंडित मीच’ हे सिद्ध करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. काहींनी ‘हार्डबॉइल्ड वंडरलॅण्ड’ या कादंबरीतच या अज्ञात शहराचा तपशील आला आहे, याचा उलगडा करून दिला आहे, तर काहींनी मुराकामीच्या इतर कादंबऱ्यांतील साधर्म्यबिंदूंना आपल्या शोधलेखांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नव्वदीच्या दशकात ‘कोडान्शा इंटरनॅशनल’ प्रकाशनाने अमेरिकेत मुराकामीची ओळख करून दिली. दशकभरात झाडून साऱ्या मासिकांनी त्याच्या कथा जपानमधून अनुवादित करून घेतल्या. अमेरिकेतून जपानमध्ये शिरलेली अनुवादकांची फौज, प्रकाशन संस्थांचा उत्साह आणि यथोचित प्रसिद्धी या बळावर मुराकामीच्या कादंबऱ्या जगभरात झिरपल्या. दोन हजारोत्तर काळात भारतात त्यांचा रेटा इतका होता, की रस्तापुस्तक दालनांच्या खूपविक्या पुस्तकांत ‘मुराकामी’ अव्वल बनला. सध्या ‘सिटी अॅण्ड इट्स अनसर्टन वॉल’ या इंग्रजीत अनुवादित झालेल्या पुुस्तकातील अ-प्रेमकथा आणि पुस्तक-प्रेमकथा वाचण्यात ‘मुराकामियन्स’ गुंतलेत. मुराकामीमुळे जपानी पुस्तकांची जगभरात निर्यात वाढली आहे. ती कशी? याचा सांख्यिकी आणि शाब्दिकी अहवाल गेल्या आठवड्यात ‘गार्डियन’ने दिला आहे. मुराकामीची त्यासह घेतलेली त्रोटक मुलाखत, हा आणखी एक वाचनलाभ आहे.

https://shorturl. at/ZH869