सातासमुद्राअलीकडे भारतात ‘एमटीव्ही’, ‘व्ही चॅनल’ संगीतबाह्य ‘रिअॅलिटी शोज’ने व्यापलेले असतानादेखील २००० साली जन्मलेल्या मुंबई-पुण्यातच नाही तर बदलापूरपासून ते बारामती किंवा खर्डीपासून बोर्डीपर्यंत इंग्रजी माध्यमांत शिकणाऱ्या अख्ख्या पिढीच्या कानांनी कुणाचे संगीत वारंवार कानांत मुरवले असेल, ते म्हणजे टेलर स्विफ्टचे. या विधानात अतिशयोक्तीचा भास होत असला तर अवती-भवती तपासून पाहाच. मोबाइलवर त्राटक करणारी ताजी पिढी तिची गाणी नुसती ऐकतच नाहीत, तर जगतातदेखील. ती जगातील सर्वात श्रीमंत (अंदाजे १६० कोटी डॉलर) गायिका का आहे, याचे उत्तर सर्वच खंडांतील आबालवृद्धांना तिची गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटावीत इतकी सहज बनलेली भासतात. तिने स्वत:च लिहिलेल्या गाण्यांत तिच्या दैनंदिन जगण्याला परिकथेचे रूप दिलेले असते. लोक ग्रंथ वाचत नसले तर काय? तिच्या गाण्यांना ऐकून ते आधुनिक परिकथा ‘वाचना’चाच आनंद घेत असतात. उदाहरणार्थ ‘वंडरलॅण्ड’ गाण्यातून ‘अॅलिस इन वंडरलॅण्ड’चा अर्क तिने काढलेला असतो. ‘लव्हस्टोरी’ गाण्यामधून कॉलेजमधील ‘रोमियो-ज्युलिएट’ची कहाणी नव्याने ऐकवायला घेतलेली असते. ‘टुडे वॉज फेअरीटेल’मधून गान-वाचनाचा आणखी नवा पाठ द्यायला सुरुवात केलेली असते. ‘वी आर नेव्हर गेटिंग बॅक टुगेदर’, ‘ आय न्यू यू वेअर ट्रबल’ आदी गाण्यांतून प्रेमभंगाला ग्रंथगीत रूप दिलेले असते. तिने केलेल्या विक्रमांची, पारितोषिक पराक्रमांची नोंद तुम्हाला ‘गूगल’वर सहज वाचता येणार असल्याने, ते सांगण्यात काय हशील? काही महिन्यांपूर्वी युरोपातील देशांत तिने सांगीतिक दौरा आखला. अर्थात नव्या अल्बमचा प्रचार-प्रसार हा हेतू. पण त्या दौऱ्याने देशांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. तिच्या मैफली असलेल्या शहरांना त्या काळात पर्यटनस्थळांची स्थिती प्रात झाली. तर तिची फॅन गाइड्स वर्षात अनेकदा अद्यायावत होत विमानतळांच्या स्टॉल्सवर खूपविकी ठरतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा