मागल्या वर्षीचं साहित्यासाठीचं नोबेल मिळवणारी दक्षिण कोरियाची हान कांग कदाचित आजवरची सर्वात लाजरीबुजरी, प्रसिद्धीपराङ्मुख मनस्वी लेखिका. जागतिक सन्मानानंतरही पाय घट्ट जमिनीवर आणि शक्य तेवढं ‘लो प्रोफाइल’ ठेवणारी! फक्त चार आटोपशीर पुस्तकांच्या बळावर मुराकामी, मार्गारेट अॅटवूड, सान शोया, सलमान रश्दी यांसारख्या ज्येष्ठ मंडळींना मागे टाकून या सन्मानाची मानकरी ठरलेली. तिच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘वी डू नॉट पार्ट’ या कादंबरीची घोषणा, नोबेल जाहीर होण्याआधीच झाली होती. सन्मान जाहीर होताच प्रकाशनपूर्व नोंदणीत अक्षरश: हजारो पटीने वाढ झाली. देखण्या आवृत्त्या इंग्लिश आणि फ्रेंचमध्ये प्रकाशित होताच दोन आठवड्यांत ती ‘टाइम्स’च्या बेस्ट सेलर्स यादीवर झळकू लागली. हान कांगच्या प्रत्येकच पुस्तकात अगदी कोवळ्या वयापासून आसपास पाहिलेलं, सत्ताधीशांनी मांडलेलं कत्तलींचं क्रूर तांडव आणि सशस्त्र दहशतवादाला निमूटपणे सामोरं जावं लागणारी सामान्य जनता – यांचं अस्तित्व अधोरेखित होताना दिसतं. हे तिच्या संवेदनशील मनावर असलेलं जाणिवांचं ओझं, इतकं सतत ठसठसणारं की जगभरात घडत असलेल्या युद्ध आणि द्वेषांध मानवी संहाराला (गाझा, युक्रेन आणि तिचा स्वत:चा दक्षिण कोरिया) प्रखर विरोध तिनं नोबेल स्वीकृतीच्या भाषणातही व्यक्त केलेला आहे. जगात इतका बीभत्स कत्ले-आम चालू असताना आपण सन्मान कसा स्वीकारावा, त्याचा आनंद कसा साजरा करावा? असे प्रश्न तिला अवघडून टाकतात.

नोबेल स्वीकारल्यावर केलेल्या छोट्याशा भाषणात तिने आपल्या लिहिण्याचं सार अगदी सोप्या विधानांतून बोलून दाखवलं होतं, ‘‘मला बालपणापासूनच आजूबाजूला जे घडतं त्याबद्दल कायम प्रश्न पडायचे. आपल्या अल्पकाळच्या अस्तित्वाचं प्रयोजन काय? कुठल्याही परिस्थितीत आपल्यातलं निखळ माणूसपण जागतं ठेवणं शक्य असतं का? भाषेचा धागा पकडून मी इतरांच्या हृदयात खोलवर उतरू पाहते, मला पडणारे महत्त्वाचे, निकडीचे प्रश्न त्या धाग्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून ते वाचणाऱ्या, स्वत्वाचा शोध घेणाऱ्या सर्वांना पाठवून देते…’’ आधीच्या चारीही मुक्त शैलीत लिहिलेल्या पुस्तकांत वेळोवेळी हिंसक मृत्यू, माणसांवर आणि नात्यांवर होणारे परिणाम आणि माथेफिरू सत्तेनं जनतेच्या जिवाशी मांडलेला विकृत दहशतवादी खेळ प्रतिबिंबित करणारी रूपकं आणि आकृतिबंध भेटत राहतात.

‘वी डू नॉट पार्ट’ आधीच्या पुस्तकांपेक्षा स्पष्ट मांडणीची, थोडीशी ‘दि व्हेजिटेरिअन’ या पहिल्या कादंबरीसारखी. कथेची निवेदक असलेल्या क्युनघाच्या मनात उठणाऱ्या विचारांच्या आवर्तातला चेतनाप्रवाह भूत, वर्तमान आणि भविष्यात झुळझुळत राहणारा. निसर्गाच्या साक्षीनं, समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या छोट्याशा गावात, जेजूत घडणारी ही त्रिमितीय गोष्ट : कोरिअन ‘सखी- वेळाची’, संवादाइतकीच नि:शब्दतेतून उलगडत जाणारी.

अचानक इतिहासातून जिवंत होऊन समोर येतो, १९४८-५० च्या दरम्यान सरकारनं निर्ममतेनं घडवून आणलेला ३० हजारांहून अधिक जणांचा मनुष्यसंहार. यात इन्सेऑनचे कुटुंबही होरपळले आहे, वडील जन्मभरासाठी परागंदा झाले आहेत. या बेटावरची ७० टक्के लोकसंख्या केवळ संशयापोटी जनावरांच्या मौतीनं संपवणाऱ्या, जेजू बेटावरच्या कत्तलीच्या प्रदीर्घ पर्वानंतर अमेरिकन सत्तेच्या आदेशानुसार देशात आणखी दोन लाख नागरिक मारून टाकले गेले… संशयित साम्यवादी बंडखोरी रोखण्यासाठी! दोन तरुणींमधल्या त्रोटक संवादांच्या कोलाजमधून हळूहळू उलगडत जाणारं कथानक. काही मनाच्या तळाशी चिकटून राहिलेल्या आठवणींतून, तर काही घरात सापडलेल्या छायाचित्रं आणि कागदपत्रांमधून अचानक हाती लागणाऱ्या दुव्यांची जमेल तितकी सांगड घालत. आजी (आईची आई), मामा, वडील तुकड्या- तुकड्यांत भेटत जाणारे. कुटुंबानं, समाजानं दडवून ठेवलेल्या दु:खद भूतकाळाला त्या दोघींनी एकमेकींचे हात हातात घेऊन सामोरे जाणं. कथानकाच्या मांडणीत अमूर्त चित्रासारखे ‘ग्रे एरियाज’ कमी असले तरी त्याची जागा बर्फाळ शुभ्रतेने घेतली आहे. परिणाम तोच – चित्रांत पांढऱ्या सोडलेल्या जागांचं जे महत्त्व असतं, ते या बर्फाच्या चित्रशैलीतल्या वर्णनांनी साकार केलंय. ज्याने प्रत्यक्षात कधी हिमवर्षाव आणि बर्फाची धुमश्चक्री पहिली नसेल त्यालासुद्धा ती स्वत: पाहिल्यासारखी वाटेल एवढी जिवंत वर्णनं… घनदाट आशय, वर्तमान आणि भूतकाळात फिरता राहणारा.

सुरुवात होते तीच आगळेवेगळेपणानं! सोलमध्ये राहणाऱ्या, प्रतिकूल परिस्थिती आणि शारीरिक व्याधींशी झगडत असलेल्या क्युनघाला गेली काही वर्षं जेजूतल्या वडिलोपार्जित घरात जाऊन राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीचा, इन्सेऑनचा अगदी अचानक सोलच्याच हॉस्पिटलमधून ‘ताबडतोब निघून ये’ म्हणून फोन येतो. तिथे गेल्यावर कळतं की इन्सेऑनचा तिच्या जेजूच्या घरात काम करत असताना अपघात झालाय आणि तिची हाताची बोटं यंत्रात सापडून कापली गेली आहेत. कशीबशी रुग्णवाहिका बोलावून जवळच्या शहराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या भानगडीत ती तिच्या पाळीव पक्ष्याच्या पिंजऱ्यात अन्नपाणी ठेवायचं विसरली आहे. ती क्युनघाला विनंती करते की तू रात्रभरचा प्रवास करून ताबडतोब जेजूला जा आणि त्या पक्षिणीचे प्राण वाचव. बाहेरचा तगडा हिमवर्षाव आणि पोटात अन्न गेलं नाही तर ती पक्षिणी मरूनच जाईल. पोटशूळानं ग्रासलेली, प्रवासानं ढेपाळलेली क्युनघा कशीबशी जेजूच्या घरी पोहोचते खरी, पण तिला सारखे भास होत असतात, भयग्रस्त स्वप्नं पडत असतात. एका स्वप्नात ती जिच्यासाठी एवढी धडपडत आली ती पक्षिणी मेल्याचं, तिला घराच्या मागल्या बाजूला झाडाखाली पुरल्याचं स्वप्न पडतं. पण ते स्वप्नच होतं ती पक्षिणी वाचलेली असते, हे नंतर उघड होतं.

क्युनघा आणि इन्सेऑन जवळच्या मैत्रिणी. विशेष म्हणजे एकमेकींशी घट्ट भावनिक किंवा आरपार दोस्तीसारखे असे काही नाही. फक्त एकदाच मैत्रीच्या पोतावर, विश्वासाच्या ठेव्यावर छोटासा संवाद होतो, तेवढाच. इन्सेऑन आणि तिच्या आईचं जेजूचं वडिलोपार्जित घर क्युनघाच्या ओळखीचं; पण भारी हिमपाताच्या रात्री रात्रभर बसने प्रवास करून तिथं पोहोचणं तिलाही वैताग वाटत असतं. पण प्रश्न भूतदयेचा असतो. याआधीच्या मुक्कामात, अतिशहाण्या वाटलेल्या पक्षिणीचा फारसा लळा लागलेला नसला… आणि ‘मीच का? हिला कोणी दुसऱ्या आसपासच्या मैत्रिणी नाहीत का?’ अशासारखे प्रश्न भंडावत असले तरी पक्षिणीला उपासमार आणि थंडीने मरू देण्याइतपत क्युनघा असंवेदनशील नसते. शिवाय दोन-तीन दिवसांत इन्सेऑनला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली की तिची जबाबदारी संपणार असते. भारतीय मनोवृत्तीच्या वाचकांना हे सगळं जरा अवास्तवच वाटणारं. एका मैत्रिणीनं तोळामासा तब्येतीच्या दुसरीला बर्फाच्या वादळात रात्रभर प्रवास करून पक्ष्याला खायला घालून तिचे प्राण वाचवायला सांगणं आणि तिने ते मनातल्या मनात कुरकुरत का होईना पार पाडणं. पण हान कांगच्या बाबतीत, तिच्या स्वभावातल्या बौद्ध अनुकंपेत अगदी नैसर्गिकपणे घडणारं! केवढा प्रखर विरोधाभास म्हणायचा की, ७५ वर्षांपूर्वी घडलेल्या हजारो निरपराधी नागरिकांच्या अकारण हत्यांमुळे जवळपास निर्मनुष्य झालेलं जेजू बेट, आणि त्याच गावांत एका पक्षिणीचा जीव वाचवायला बर्फाच्या वादळातून वाट काढत आलेली हल्लक प्रकृतीची क्युनघा! इन्सेऑन हॉस्पिटलमधनं सुट्टी मिळताच ठरल्याप्रमाणे घरी जेजूला परतते, क्युनघाला काही दिवस सोबतीला राहायला ठेवून घेते. दोघी मैत्रिणी आईचं सामान आवरताना एकेक दुवे त्यांच्याहाती लागत जातात. आणि तो नरसंहाराचा काळ परत कुठेतरी अर्धवट जिवंत होतो. कुटुंबाच्या तीन पिढ्यांमधून वाहत राहिलेलं हे दु:ख इन्सेऑनच्या आईनं तिला अगदी अत्यावश्यक तितकंच सांगून, बाकी उडवाउडवी केलेली, आणि नंतर तर तिचा स्मृतिभ्रंशच झालेला.

हे बेट निर्मनुष्य करून टाकण्याच्या मोहिमेवर नागरिकांनाच- दहशतीखाली पोलिसांचे गणवेश घालून- पाठवलं गेलं होतं. बालहत्येसाठी बक्षिसं देण्याचा अधमपणा होता आणि संचारमाध्यमांची तोंडं धाकदपटशानं बंद केल्यामुळे सत्य आणि बातम्या बाहेर येणं अशक्य करून टाकलं होतं. दीड- दोन वर्षं चाललेल्या हत्याकांडाबद्दलचं सत्य ते घडून गेल्यावर दशकभरानं बाहेर आलं. प्रेतांची विल्हेवाट लावायची भानगडच नको म्हणून नागरिकांना घराघरांतून उचलून आणलेलं आणि समुद्रासमोरच त्यांना गोळ्या घालून मारलेलं, की मृतदेह भरतीबरोबर वाहत जावेत, चिल्ल्या- पिल्ल्यांसह असंख्य गेलेही असणार, हिशेब ठेवायचा प्रश्नच नव्हता. पण काही सांगाडे, हाडं अजूनही किनाऱ्यातल्या वाळूत अचानक येतात वर… जेजूच्या समुद्र किनाऱ्यावर हाडात शिरून थैमान मांडणाऱ्या थंडीपेक्षा क्युनघाला हा तुकड्यातून समोर येणारा इतिहास गोठवून टाकणारा वाटतोय.

ज्यांनी हान कांगच्या कादंबऱ्या वाचल्यात, त्यांच्यासाठी ‘देजा वू’सारखा प्रकार आहे हा… ‘दि व्हेजिटेरिअन’ आणि ‘ग्रीक लेसन्स’मधल्या नायिकांसारखीच ही कथानायिका क्युनघासुद्धा शारीरिक व्याधीनं तोळामासा झालेली आहे. त्याचं मूळ तिच्या आसपासच्या दडपशाहीच्या वातावरणात भरून राहिलेला अन्याय आणि अमानुष क्रौर्य कल्पनेतसुद्धा न पचवू शकणाऱ्या साध्या, उत्कट स्वभावात आहे. ती हळवी, लेचीपेची नाही, अतिशय बुद्धिमान आणि म्हणून तेवढीच संवेदनशील आहे. जेजूचं हजारोंचे बळी घेणारं हत्याकांडही, हान कांगच्या ‘ह्यूमन अॅक्ट्स’ कादंबरीतल्या ‘हुकूमशाहीविरुद्ध ग्वान जूमधल्या तरुणाईनं केलेली अहिंसक निदर्शनं’ किंवा शस्त्रास्त्रांनी चिरडलेल्या आणखी काही दाहक घटनांच्या चित्रणाची आठवण करून देणारं.

पण हेही उमगणं की भूतकाळानं काजळलेला असला तरी हाच वर्तमानकाळ आपण जगायचा आहे. स्वत:च्या आणि समाजाच्या जखमा भरत, आपापल्या आनंदाच्या वाटा शोधायच्या आहेत. ‘गवसलेलं मैत्र जपून ठेवायचं आहे,’ हा निश्चय तर पुस्तकाच्या नावातूनही ध्वनित होतोच आहे. युद्धाच्या आगीत होरपळून कोलमडलेल्या अनेक वृक्षांना बऱ्याच वर्षांनी नवे धुमारे फुटलेत, जमिनीतून ठिकठिकाणी नवे कोंब वर काढू लागलेत. बर्फावर शांतपणे पडलेल्या दोन सर्जनशील सख्ख्या मैत्रिणींना मैत्रीच्या घट्ट विणीची साक्ष पटली आहे आणि जाणवतंय की, मिळून करायच्या प्रकल्पाची सुरुवात करायची वेळ झाली आहे.

वी डू नॉट पार्ट’

 लेखिका : हान कांग

अनुवादक : ई. यूव्न, पी. ई. मॉरिस

प्रकाशक : हॅमिश हॅमिल्टन पृष्ठे : ३८४ ; किंमत : ९९९ रु.

सिनसिनाटीची सनसनाटी…

एमिली हेन्री गेल्या पाच-सात वर्षांत खूपविकी पुस्तकांचे विक्रम मोडणारी लेखिका. पुस्तकांच्या ८० वगैरे लाख प्रती अधिकृतरीत्या विकल्या गेल्यामुळे सिनसिनाटी या अमेरिकी शहरासाठी दरवर्षी ‘समर’आधी ती सनसनाटी बातमी बनून जाते. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तिचे नवे पुस्तक आले. ‘ग्रेट बिग ब्युटिफुल लाइफ’ नावाचे. यानिमित्ताने तिच्या मुलाखती चिकार मिळतील. पण ही तिच्या चाहतीने केलेली नव्या पुस्तकाची चिकित्सा. तब्बल १९ मिनिटे चालणारी.

https:// tinyurl. com/55 ndw5 hy

एक ताजी कथा…

इमर्सन कॉलेजच्या प्लाऊशेअर मासिकाच्या नव्या अंकाकडे कथाप्रेमींचे लक्ष असते, ते त्यात दाखल होणाऱ्या नव्या लेखकांमुळे. ताज्या ‘स्प्रिंग इश्यू’मध्ये मार्जोरी सॅण्डर या कथालेखिका आणि संपादिकेची ‘लोर्काज गिटार’ ही कथा त्याच्या शीर्षकामुळे अनेकांचे कुतूहल वाढवून आहे. ती अद्याप मोफत वाचण्यासाठी उघडण्यात झालेली नाही. पण याच अंकात ‘हिअर नाऊ’ नावाची सर्जनशील लेखन शिकविणाऱ्या नॅथन ब्लूम यांची कथा काही दिवसांसाठी येथे वाचता येईल.

https:// tinyurl. com/3 nc9 kzf4

त्या’ वर्षातले ‘ते’ शहर...

गीतांजली श्री या हिंदी लेखिकेची वेगळी ओळख या पानाच्या वाचकांना करून द्यायला नको. डेझी रॉकवेल या त्यांच्या अनुवादकाचीदेखील ख्याती ‘इंटरनॅशनल बुकर’ पारितोषिकानंतर जगभर पसरली. तर या जोडगळीचा नवा इंग्रजी प्रकल्प ‘अवर सिटी दॅट इयर’ गेल्या वर्षी अखेरीस ‘हार्पर कॉलिन्स’कडून प्रकाशित झाला. १९९८ साली ‘हमारा शहर उस बरस’ नावाने ही मूूळ हिंदी कादंबरी आली होती. ते ‘उस बरस’ म्हणजे नक्की कोणते, हे शीर्षक वाचणाऱ्याच्या चाणाक्षतेची परीक्षा. तर सांप्रदायिक दंगलींची पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी हिंदीत उपलब्ध आहेच. आता जगभरातील वाचकांना ‘त्या विशिष्ट वर्षा’चा भारतीय तपशील या कादंबरीने हळूहळूू ओळखीचा होतोय. या कादंबरीतील अनुवाद झालेला एक संक्षिप्त भाग अमेरिकी बाजारपेठेसाठी केलेल्या ताज्या मुखपृष्ठासह इथे वाचता येईल.

https:// tinyurl. com/8 puhxnvf

नवा कथागुच्छ खंड…

ओ. हेन्री. प्राइझ स्टोरीज या मूळ आणि इंग्रजीत अनुवादित होऊन आलेल्या वर्षभरातील सर्वोत्तम कथासंचाची घोषणा याच आठवड्यात झाली. २०२४ मधील सर्वोत्तम कथा संचात वाचता येतील. न्यूू यॉर्कर, हार्पर्स, ऑक्सफर्ड अमेरिकन या प्रख्यात मासिकांपासून थ्री पेनी रिव्ह्यू, येल रिव्ह्यू या पसारा कमी असलेल्या मासिकांतील कथानिवड यंदा झाली आहे. डेव्ह एगर्ससह थोडकीच प्रख्यात नावे असून इतर बहुतांश नव्या लेखकांच्या कथांचा यात सहभाग आहे. या लेखकांची यादी आणि निवड-संपादन प्रक्रियेसह येथे वाचता येईल.

https:// tinyurl. com/6 udkzma6

arundhati. deosthale@gmail. Com