‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-़कातिल में है’चं कफन डोक्याला बांधून आयुष्याची मागली काही दशकं जगणाऱ्या, रशियातील माजी विरोधी पक्षनेते अलेक्सी नवाल्नींना, कुठल्याही क्षणी राज्यकर्त्या हुकूमशाहीचा पोलादी पंजा आपल्याला संपवू शकतो हे माहीतच होतं. २०२०मध्ये रशियन सुरक्षादलांनी केलेल्या जालीम विषप्रयोगानंतर, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या तगड्या हस्तक्षेपामुळे त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने जर्मनीत आणून सहा महिने उपचार करून त्यांचा जीव वाचवण्यात आला होता खरा; पण मुजोर यंत्रणेचा रोख स्पष्ट झाला होता. प्रकृतीला उतार पडताच, मर्केल यांचा काही काळ जर्मनीतच राहण्याचा सल्ला न मानता, त्यांनी मॉस्कोत परतून विरोधाची लढाई चालू ठेवायचं ठरवलं. मायदेशी परतताच देशबांधवांशी संवाद साधण्यासाठी विमानतळावरून सरळ जाहीर सभांसाठी जायचं हा नवाल्नी यांचा शिरस्ता. पण या वेळी यंत्रणेने ती संधीच मोडून काढली, त्यांनी मातृभूमीवर पाय टेकताच अटक करून सैबेरियातील तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली.
नवाल्नींच्या पक्षाच्या मागण्या अवास्तव नव्हत्याच : सरकारसंमतीने समाजात रुजलेला भ्रष्टाचार संपवला पाहिजे. (मंत्रिमंडळातील बहुतेकांची परदेशी बँकांमध्ये खाती आणि प्रशस्त बंगले, अमुक एका कंपनीच्या दोनेकशे लोकांना महिनाभर परदेशी सुट्टी, सुखलोलुप जीवनशैली, गोल्डन पासपोर्ट ते सामान्यजनांसाठी, युनिव्हर्सिटी अॅडमिशनमध्ये किंवा आवश्यक तो निकाल खरेदी करायला लागणारी लाच. पुतिन यांच्या भोग-विलासी जीवनशैलीच्या कहाण्या सर्वश्रुत आहेतच; पण २०१६ मध्ये उपपंतप्रधानांच्या कुर्त्याला एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यायला तब्बल ६० मिलियन डॉलर्स खर्च केला गेला होता.) युक्रेनवरील आक्रमण किंवा अफगाणिस्तानमधील शिरकाव देशाच्या ८५ टक्के जनतेला अमान्य असल्याने, युद्धग्रस्त सामान्यजनांच्या नुकसानभरपाईची व्यवस्था केली जावी. पत्रकारितेला पूर्ण स्वातंत्र्य हवं, न्याय्य मार्गाने निवडणुका घेतल्या जाव्या आणि सरकारी हिसक्याच्या धाकाखाली जगणाऱ्या सामान्य नागरिकांना न्याय आणि हक्क मिळायला हवेत. सभांमधून मांडत असलेल्या या मागण्यांमध्ये आम जनतेच्या शिक्षण आणि आरोग्यावर भर देणारा अर्थसंकल्प आणि परिस्थितीचा फायदा घेऊन सरकार कृपेने गब्बर बनलेल्या उद्याोजकांवर (ऑलिगार्क) भारी कर, हे प्रमुख मुद्दे!
उत्तरादाखल सरकारतर्फे नवाल्नींवर मुख्यत: चार प्रकारचे आरोप लावण्यात आले : आतंकवादाला खत-पाणी घालून त्याचा प्रचार-प्रसार करणे, युक्रेनवरील हल्ल्यांचा व हिंसाचाराचा निषेध वगैरे भडकाऊ कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे, देशविरोधी कार्यक्रमांसाठी आर्थिक पाठबळ उभे करणे आणि नाझीवादाचे पुनरुज्जीवन करणे. वकील नवाल्नी या आरोपांमध्ये काडीचंही तथ्य नसल्याचं पुराव्यांसकट, मुद्देसूद खंडनातून दाखवून देतात. माध्यमांवर निर्बंध असल्याने नवाल्नी ब्लॉग लिहित आणि त्यात पूर्ण बातम्या , गैरव्यवहाराची प्रकरणं सटीकपणे मांडत. त्यांचे ब्लॉग्स रशियातील सर्वात लोकप्रिय मानले जात. ते म्हणत , ‘‘मी कधी ‘असेल’ किंवा ‘शक्य आहे’ अशा भाषेत नाही बोलत, मी थेट ‘आहे’ असंच म्हणतो कारण माझ्याजवळ सबळ पुरावे असतात.’’ पण इथे प्रश्न सत्य-असत्याचा नसतोच, कायद्यांचा देखावा करून अशा वेगवेगळ्या आरोपांखाली त्यांना पुढली ३०-३५ वर्षं गजांआड ठेवायचं (सुटलेच एखाद्यातून तर दुसरा पुढे करून परत अटक) आणि जनसंपर्कापासून तोडायचं हे ध्येय!
२०२१च्या दरम्यान, बर्लिनमध्ये तब्येतीला उतार पडल्यावर त्यांनी हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहायला घेतलं, हे प्रचंड मानसिक ताकदीचं काम. आपल्या माघारी त्याचं महत्त्व नवाल्नींनी जोखलेलं असणार. देशद्रोहाच्या आरोपाखाली आर्क्टिकमध्ये कडाक्याच्या थंडीत तुरुंगवासात, प्रखर मानसिक छळ सोसत त्यांनी तीन वर्षं काढली होती, तरी ते शक्य होईल तसे लिहिते राहिले. एकदा त्यांच्या सगळ्या कुटुंबीयांची भेट अगदी जवळ येताच नियम बदलून रद्द केली व त्यांची सहा महिन्यांतून एकदा भेटीच्या श्रेणीत रवानगी झाली. पत्रं सेन्सॉर होऊनच मिळत पण पत्नी यूलिया साध्या वाक्यांतून काहीतरी सांकेतिक लिहित असेल या संशयापोटी तिच्या पत्रांवर बंदी घातली गेली. थोडक्यात नवाल्नींना; त्यांचं ओअॅसिस असणाऱ्या कुटुंबापासून तोडलं गेलं. त्यांच्या दैनंदिनीतील शेवटची नोंद २० जानेवारी २०२४ची आहे. त्यानंतर संशयास्पदरीत्या त्यांचा ‘मृत्यू’ झाल्याचं जाहीर झालं! हे पुस्तक म्हणजे मरणाच्या डोळ्याला डोळा देऊन नवाल्नी यांनी त्यांच्या देशवासीयांशी, जगाशी साधलेला हा अर्थपूर्ण संवाद, ‘की घेतले व्रत हे आम्ही अंधतेने’ची ग्वाही बनलेला. वकील, रशियन विरोधी पक्षनेते, लेखक, येल युनिव्हर्सिटीचे फेलो, भ्रष्टाचाराविरुद्ध ठोस पुराव्यांसहित मोहीम चालवणारे सामाजिक कार्यकर्ते, ४७ वर्षीय नवाल्नी एक वीराचं, सार्थ आयुष्य जगले, येत्या १६ फेब्रुवारीला त्यांची पहिली पुण्यतिथी! लहानपणापासून पाहिलेल्या क्रेमलिनच्या इतिहासातली वळणं (गोर्बाचेव्ह, येल्तसिन, पुतिन, मेदवेदेव ते परत पुतिन) त्यांना कशी घडवत गेली याचा इतिहासच ते एका सर्वसामान्य जागरूक नागरिकाच्या नजरेतून, ओघवत्या शैलीत सांगतात. त्यातून अनेक गोष्टी नव्याने समजतात, ज्या एरवी माध्यमांवरील निर्बंधांमुळे ज्ञात झाल्या नसत्या.
लोकसंख्या घटत चालली असूनही रशियाचा विस्ताराचा ध्यास घेतलेल्या झार-वृत्तीच्या पुतिनना युक्रेनशी युद्ध स्वत:चा निर्णय नसून तो जनमताचा कौल म्हणून दाखवायचा हव्यास होता. साम्यवादी आजोळ युक्रेनमध्ये असल्याने नवाल्नींना युद्धाबाबत लोकांपासून दडवून ठेवलेले महत्त्वाचे तपशील स्थानिकांकडून माहीत होते. चेर्नोबिलचीही तीच कथा. नवाल्नींनी हे विषय सामाजिक चर्चेत आणल्याने सत्ताधीशांच्या नाकाला मिरच्या झोंबणारच होत्या, त्यासाठी त्यांना ३० वर्षं कैद सुनावण्यात आली- रशियन कायद्यानुसार ही सर्वात मोठी शिक्षा. पुतिन तर त्यांचा नामोच्चारही टाळत. कुटुंबाच्या धैर्याच्या खच्चीकरणासाठी नवाल्नींच्या भावावर निमित्तमात्र आरोप ठेवून त्यालाही तुरुंगात डांबण्यात आलं होतं.
मृत्यूनंतर तुरुंगातून मिळालेल्या त्यांच्या डायऱ्या, टिपणं आणि निवडक पत्रव्यवहाराचं हे पुस्तक त्यांच्या पत्नी यूलिया नवलनाया यांनी प्रकाशित केलं. आपला जिंदगीनामा मांडताना नवाल्नी व्यक्तिगत/ सामाजिक/ राजकीय धागे विणत वर्तमान आणि भूतकाळात येत-जात राहतात. वाचताना सारखा मनात विचार घोळत राहातो, कुठल्या मिट्टीची बनलेली असतात ही माणसं की कशाचं भय न बाळगता, विरोध चिरडूनच टाकणाऱ्या महाशक्तिशाली हुकूमशाहीला असं खुलं आव्हान देत असतात? हे पुस्तक म्हणजे संपूर्ण देशाला आवाहन आहे, हुकूमशाहीचं जोखड भिरकावून देण्यासाठी केलेलं. एका नोंदीत टॉलस्टॉयच्या ‘रेसरेक्शन’ या कादंबरीच्या नायकानं केलेलं, ‘सध्या रशियात प्रामाणिक माणसांसाठी एकच जागा आहे, तुरुंग!’ हे विधान पुढे नेऊन ते म्हणतात, ‘‘जे त्या काळी चुकीचं होतं, ते आज महाचुकीचं आहे. भिऊन गप्प राहणं आता मला शक्य नाही. रशियात आजही लाखो प्रामाणिक माणसं आहेत. पण ती दहशतीखाली आहेत, बोलायचं धाडस हरवून बसलेली. इतकं की सामाजिक माध्यमांवर माझ्या पोस्ट्स लाईक करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, त्यांच्या नोकऱ्या जात आहेत.’’ तरीही कोणीतरी आपल्या हातातली लोकशाहीच्या संघर्षाची मशाल पुढे नेण्यासाठी येईल, परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी स्वत:चा बळी देता-देता व्यक्त केला आहे.
विरोधकांना फक्त भरडून टाकण्याचं धोरण राबवणाऱ्या सत्तेविरुद्ध देशहितासाठी जिवाची बाजी लावून सत्याचा आग्रह धरणं हे व्यवहार्य नव्हेच. एकीकडे गेली कित्येक वर्षं, ज्यांनी विरोधकांचा संघटित आवाज बनावं असे लाखो परदेशांत आसरा घेऊन राहिलेत आणि दुसरीकडे देशातली आम जनता, घाबरून खालमानेनं वावरणारी. तर मग मूठभर लोकांच्या बलिदानाने काय साध्य होणार आहे? असं तुम्हा-आम्हासारखे कातडीबचाऊ स्वत:लाच समजावत असतात. वाढत्या हुकूमशहांची सरकारं एकमेकांकडून शिकत, आंतरराष्ट्रीय दबावाकडे दुर्लक्ष करण्याचं धोरण बाळगत असतात. पण जुलमी, क्रूर राजवटीविरोधात उठाव करायचा असेल तर तो काही बलिदानं मागणारच, जितका उठाव मोठा तितकी पोलादी पडद्याआड बसलेल्या मूठभर सत्तेला बसणारी धडक मोठी, हे स्पष्ट असताना कोणीतरी सुळावर चढणं क्रमप्राप्त होतंच.
नवाल्नी या दशकातले सर्वात प्रभावी हुतात्मा आहेत हे नि:संशय, त्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात होती. त्यांच्यावर बनलेल्या ‘नवाल्नी’ या एक तासाच्या डॉक्युमेंटरीला २०२२चं ऑस्कर मिळालं आहे, गेली दोन-तीन वर्षं ते नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित होत होते. पण अशा डोईजड होणाऱ्या विरोधकांचं काय करायचं हे सरकारला माहीतच असतं, नाही का?
स्वत:ची सुटका होणार नाही आणि देशातील हुकूमशाहीसुद्धा नजीकच्या भविष्यात अस्तंगत होणार नाही हे सत्य नवाल्नीनी स्वीकारलं होतं. राजवट आपल्याच कर्मानं कोसळली तरी, त्याआधी त्यांना संपवून टाकण्यात कुचराई होणार नव्हती हे ते जाणून होते, म्हणून नैराश्य दूर ठेवण्यासाठी ते ‘सेल्फ हेल्प’वर पुस्तकं वाचत असत. काहीही झालं तरी ध्येयापासून न ढळण्याचा त्यांचा निर्धार याही पुस्तकात कुठेही तसूभरही हललेला दिसत नाही. जागोजागी विनोदबुद्धी शाबूत ठेवून सरकारी यंत्रणेवर कोरडे ओढलेत. ‘पुतिन किंवा मेदवेदेवच्या प्रासादासारखं माझ्याही बराकीसमोर सहा मीटर उंचीचं तारांचं कुंपण आहे. त्यांच्यासारखंच मला भेटायला येणाऱ्यांना ४-५ तास बाहेर बसवून ठेवतात. पण ते सकाळी दहाच्या सुमाराला उठतात, पोहून मध आणि पनीरचा नाश्ता करतात, ते मात्र वेगळं.’’
नवाल्नी परत परत म्हणतात, ‘‘आपल्याला भीती वाटायला हवी ती कायम खोटं बोलत आपल्या प्रिय मातृभूमीला लुटत राहणाऱ्या गुंडांच्या हाती देश सोपवण्याची. देशप्रेमाचं नाटक करत ते गब्बर होत चाललेत आणि सामान्य नागरिक खचत चालले आहेत. आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, देशाच्या चारित्र्यासाठी आपण लढायलाच हवं.’’ पुस्तकभर कुटुंबावरल्या प्रेमाचे नाजूक क्षण विखुरलेले दिसतात. यूलियाबरोबरची प्रेमकथा, तिला लिहिलेली पत्रं सुंदरच. विषप्रयोगानंतरच्या दीर्घ कोमात त्यांना यूलिया खोलीच्या दारातून आत येतेय ही वेळोवेळी होणारी जाणीव संजीवनीसारखी भासत असे. हुकूमशाहीला खुले आव्हान देणारे नवाल्नी अगदी सिनेमातलंही कुत्र्याचं अनाथपण पाहून रडणारे, परिजन, मित्रमैत्रिणी आणि देशबांधवांवर जिवापाड प्रेम करणारे. दैनंदिनीत बहुतांश टिपणांखाली आपल्या समर्थकांना मनापासून धन्यवाद द्यायला विसरत नाहीत. कर्तृत्वानं पहाड असलेला हा धीरोदात्त नायक ‘मृदूनि कुसुमादपि’ होता हे पुस्तकभर जाणवत राहतं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी यूलिया आणि स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटीत शिकत असलेली मुलगी दाशा फक्त शोकसंतप्त होऊन बसलेल्या नाहीत. देशाच्या लोकशाहीसाठी आरंभलेली लढाई दोघी आणि त्यांच्या मानवी हक्कांसाठी झगडणाऱ्या संस्थेनं पुढं न्यायचं ठरवलं आहे. देशोदेशींच्या व्यासपीठांवरून या दोघींना निमंत्रणं येतात आणि देशातली परिस्थिती आणि पुढचा मार्ग यांवर आपलं मत नवाल्नी कुटुंबाचं वैशिष्ट्य बनलेल्या शैलीत, ठामपणाने मांडत असतात. नाटकीयता नाही, संदिग्धतेचा आडोसा घेणं नाही आणि भडकाऊपणाही नाही. पुराव्यांनिशी आकडेवारी, तारखा देऊन केलेली अन्याय आणि लाचलुचपतीविरोधी विधानं विचार करायला बाध्य करणारी, निर्णय लोकांवर सोडणारी. आता किंमत माहीत झालीय, खुला श्वास घेणारी लोकशाही आणायची की यंत्रणेला दबून समाजातील तफावत रुंदावत नेणारी जबरदस्त लाचखोरी आणि जीवनभर अन्यायाची तयारी ठेवायची? हे देशातल्या जनतेने ठरवायचं आहे.
आदर्शवाद आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचा अस्त पाहिलेल्या युगात, एखाद्या अॅलेक्सी नवाल्नींचा उदय आणि अस्त, जगाच्या एकंदरच झालेल्या उद्ध्वस्त धर्मशाळेवर शिक्कामोर्तब करणारा. ‘‘कुटिल बुद्धीचे लोक जिंकतात कारण त्यांच्यापेक्षा अधिक संख्येत असणारी चांगली, स्वच्छ बुद्धीची माणसं गप्प राहतात’’ हे वैश्विक कडवं सत्य पुन्हा एकदा दाखवून देणारं हे देखणं पुस्तक म्हणजे महासत्ता म्हणवणाऱ्या रशियाच्या इतिहासातलं एक काळंकुट्ट प्रकरण. लिहिलेला प्रत्येक शब्द सच्चा आहे, सगळ्या जगासमोर पोलादी पडद्याआड राहणाऱ्या सरकारवर पूर्ण पारदर्शक मार्गानं आरोपपत्र ठोकणारा. पुस्तकातल्या वर्णनांचं- सरकारी यंत्रणेने घडवून आणलेले गुन्हे, संपवलेली माणसं, चुकीचे निर्णय आणि भ्रष्टाचाराचे आकडे वा पुरावे यांचं कुठलंही खंडन अधिकृतरीत्या करण्यात आलेलं नाही, हे तथ्यही पुरेसं बोलकं.
‘पेट्रियट’
लेखक : अलेक्सी नवाल्नी
प्रकाशक : आल्फ्रेड नॉफ (पेन्ग्विन रॅण्डम हाऊस)
किंमत : २,३३५ रुपये
पृष्ठे : ३२०
लेखकाची घडणावळ...
स्टीव्हन किंग हा भारतीय आंग्ल वाचकांमध्ये सर्वाधिक वाचला जात असलेेला लेखक. तब्बल तीन-चार दशके तरी त्यात बदल झालेला नाही. येत्या मे महिन्यात ‘नेव्हर फ्लिंच’ नावाची त्याची गुन्हे कादंबरी येत आहे. वयाच्या ७७ व्या वर्षीदेखील चालता-बोलता आणि सर्वाधिक लिहिता लेखक म्हणून त्याची ख्याती. गेल्या वर्षी ‘यू लाइक इट डार्कर’ या कादंबरीपल्ल्याच्या काही कथा असलेल्या संग्रहानिमित्ताने त्याच्या लेखनआयुष्याची ओळख करून देणारी मुलाखत.
सहामजली पुस्तक दुकान…
न्यू यॉर्कमध्ये शंभर वर्षांपासून असलेले ‘आर्गसी बुकशॉप’ हे दालन. म्हणजे मॅनहटनच्या एकोणसाठाव्या रस्त्यावर १९२५ साली उघडण्यात आलेले. संपूर्ण सहा मजल्यांच्या ग्रंथदुकानाचे लघुपर्यटन घडवणारी क्लिप. शंभर वर्षांत या परिसरातील जागांचे भाव गगनाला गेल्यानंतरही पुस्तकविक्रीतून येणाऱ्या नफ्यावर इथली तिसरी पिढी समाधानी. दुकानाच्या मालकाच्या नातवाने ग्रंथदालनातून केलेला स-माहिती फेरफटका.
https:// tinyurl. com/329 j2 mmn
एक उत्तम कथा
‘अलास्का क्वार्टर्ली रिव्ह्यू’ नावाचे नियतकालिक अमेरिकेत चाळीस वर्षे सुरू आहे. उत्तम कथा, निबंध, काव्यात्मक लिखाण यांचा यात समावेश असतो. एकीकडे बहुतांश लिटररी मासिकांनी आपल्या संकेतस्थळांवरील वाचन सशुल्क केलेले असताना या मासिकाचे चाळीस वर्षांचे अंक पूर्णपणे मोफत वाचता येतात. पुलित्झर पारितोषिक मिळविलेल्या अनेक लेखकांचे साहित्य इथे सापडेल. सोबतचा दुवा एका उत्तम कथेचा. संकेतस्थळाच्या ‘अर्काइव्ह’मधून वाचनलुटीचा भरपूर ऐवज मिळू शकेल.
https:// tinyurl. com/3 cpdjxb7
arundhati. deosthale@gmail. Com