अभिजीत रणदिवे

आधुनिकता काळात गोठवता येत नाही, तर तिला सतत नवोन्मेषी आविष्कारांची गरज असते. याचा अर्थ दर वेळी एखाद्या नव्या भविष्याची आशा घेऊन हे नवोन्मेष येतील असंही नाही. ‘समकालीन आधुनिक’ घडवण्यासाठी ‘जुनं आधुनिक’ कालबाह्य झालेलं आहे हे मान्य करणं भाग असतं. पूर्वी आधुनिक मानली गेलेली एखादी कलाकृती आताच्या काळात अतिपरिचित आणि ठोकळेबाज वाटू शकते, हे स्वीकारल्याशिवाय समकालीन आधुनिकतेचं आपलं आकलन अपूर्ण राहतं. सध्याच्या अमेरिकन साहित्यातला एक महत्त्वाचा आवाज असलेल्या पर्सिव्हल एव्हरेट या लेखकानं मार्क ट्वेनच्या ‘हकलबरी फिन’ या सुप्रसिद्ध कादंबरीच्या ऐवजातून ‘जेम्स’ ही आपली ताजी कादंबरी घडवताना असाच विचार केलेला दिसतो.

मार्क ट्वेनच्या कादंबरीचा निवेदक आणि नायक हकलबरी ऊर्फ हक १३-१४ वर्षांचा आहे. त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. दारुडा बाप त्याला मारहाण करतो. फाटक्या कपड्यांत गावभर उंडारणारा हा मुलगा निरुद्याोगी असला तरी निरागसही आहे. मात्र, शिव्या देणे, सिगारेट ओढणे, अशा त्याच्या वाईट सवयींमुळे आणि लोकांच्या कोंबड्या चोरणे वगैरे उचापतींमुळे गावकऱ्यांना तो नकोसा झाला आहे. त्याचं रीतसर शिक्षण झालेलं नाही. गावातल्या एका सुविचारी विधवेनं त्याचं मानद पालकत्व स्वत:कडे घेऊन त्याला शिकवण्याचा आणि ‘माणसांत आणण्याचा’ चंग बांधलेला आहे. त्याला मात्र आपलं स्वातंत्र्यच प्रिय आहे. बापाच्या जाचाला कंटाळून हक आपल्या मृत्यूचा बनाव रचतो आणि गावातून पळ काढतो. त्यानंतरच्या त्याच्या करामतींच्या आणि साहसांच्या गोष्टी उर्वरित कादंबरीत आहेत. हक समाजाचे नियम झुगारतो. काय योग्य, काय अयोग्य याविषयीचे निर्णय तो आपल्या मनानं घेतो. समाजमान्यतेला त्यात स्थान नाही, कारण स्वातंत्र्याच्या त्याच्या संकल्पनेत ‘लोक काय म्हणतील?’ हा प्रश्नच उद्भवत नाही.

कादंबरी १८८५ साली अमेरिकेत प्रकाशित झाली आणि तिनं इतिहास घडवला. एक तर रूढ नैतिक चौकट न मानणाऱ्या निरुद्याोगी मुलाला कादंबरीचा नायक करणं त्या काळी धक्कादायक होतं. ‘निगर’ शब्दाचा सढळ वापर करणारी त्यातली रांगडी भाषाही अनेकांना रुचली नाही. शिवाय, ही केवळ रंजक साहसकथा नाही, तर तो हकच्या माणूस होण्याचा प्रवास आहे. जिम ही कादंबरीतली दुसरी मध्यवर्ती व्यक्तिरेखा त्याला कारणीभूत ठरते. हकच्याच गावातला, वयानं प्रौढ असलेला जिम हा काळा गुलाम हकच्या ओळखीचा आहे. आपली मालकीण आपल्याला विकणार असल्याची खबर मिळाल्यामुळे तोही गावातून पळालेला आहे.

जिम आणि हक कधी छोट्या तराफ्यातून तर कधी होडीतून मिसिसिपी नदीमधून पुढे जात राहतात, त्यांना वेगवेगळी माणसं भेटत जातात आणि त्यातून कथानक पुढे सरकत राहतं. या प्रवासात हळूहळू हकची जिमशी मैत्री होते. काळ्या लोकांबद्दलचे आपले पूर्वग्रह किती फोल आहेत हे त्याच्या लक्षात येतं. आपल्यासारखी तीही माणसंच असतात याचा त्याला प्रत्यय येतो. गुलामगिरीची प्रथा किती अनैतिक आहे आणि गोरा समाज किती दांभिक आहे याचीही त्याद्वारे त्याला जाणीव होते. समाज जरी आज त्यांना स्वातंत्र्य द्यायला आणि समतेनं वागवायला तयार नसला, तरीही हे हक्क त्यांना मिळायला हवेत, हे त्याला उमगतं.

वंशभेदावर आणि तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर टीका करणारी कादंबरी म्हणून अमेरिकन संस्कृतीत ‘हकलबरी फिन’ला अनन्यसाधारण स्थान आहे. शालेय अभ्यासक्रमांत तिचा समावेश असतो. त्यामुळे अमेरिकनांच्या कित्येक पिढ्यांना ही कादंबरी सुपरिचित आहे. अशा कादंबरीकडे एव्हरेटला आज पुन्हा वळावंसं का वाटलं असावं, हे समजण्यासाठी त्यानं आपल्या कादंबरीत काय बदल केले हे पाहावं लागेल. एव्हरेट स्वत: काळ्या वंशाचा आहे. त्यानं कादंबरीचा निवेदक म्हणून हकऐवजी काळ्या जेम्सची योजना केली आहे. मूळ कादंबरीतला जिम निरक्षर आहे, तर एव्हरेटचा जेम्स साक्षर आहे. एका न्यायाधीशाकडे काम करताना जेम्सनं गुपचूप त्याच्या संग्रहातली पुस्तकं वाचली आहेत. रूसो, व्होल्तेअर आणि लॉकसारख्या स्वातंत्र्य-समतावादी विचारवंतांशी पुस्तकांद्वारे त्याचा परिचय झाला आहे. त्यांच्याशी तो मनातल्या मनात (किंवा स्वप्नात) संवाद साधतो आणि वादही घालतो. आणि तो लिहितो. त्याला लिहिण्यासाठी हवी असते म्हणून दुसरा एक गुलाम पेन्सिल चोरतो. या कारणापायी गोऱ्या लोकांचा जमाव त्याची क्रूरपणे हत्या करतो. ज्या गुलामांनी मान वर करून गोऱ्यांशी बोलणंही निषिद्ध असायचं, त्यांना आपल्या कहाण्या सांगण्यासाठी पुस्तकं लिहिताच येणार नव्हती. मूळ कादंबरीतला जिम त्या गुलामांचं प्रतिनिधित्व करतो. तो ‘शुद्ध’ इंग्रजी (म्हणजेच गोऱ्यांची प्रमाण भाषा) बोलत नाही, तर गुलामांची त्या काळातली बोली इंग्रजी त्याच्या तोंडी आहे. याउलट एव्हरेटचा जेम्स कादंबरीतल्या इतर अनेक काळ्या व्यक्तिरेखांप्रमाणेच इंग्रजी व्यवस्थित बोलू शकतो. मात्र, आपण गोऱ्या मालकांसारखं बोलू- लिहू- वाचू शकतो, आणि आपला शब्दसंग्रह तर बहुसंख्य गोऱ्यांच्या तुलनेत असामान्यच आहे हे जर आपल्या परिसरातल्या गोऱ्यांना कळलं तर त्यांना असुरक्षित वाटेल आणि त्यातून आपल्या जिवाला धोका निर्माण होईल याची त्याला पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे तो आणि इतर गुलाम आपापसांत संवाद साधताना प्रमाण भाषा वापरतात, तर गोरे समोर असताना मुद्दाम त्यांना अपेक्षित असलेली काळ्यांची बोली वापरतात. जिवंत राहायचं असेल तर गोऱ्यांसमोर आपण कधीच आपलं खरं, व्यामिश्र, हाडामांसाचं रूप उघड करता कामा नये; उलट गोऱ्यांच्या मनातल्या काळ्यांविषयीच्या ठोकळेबाज प्रतिमेनुसारच आपण वागायला हवं, याची जाणीव नसानसांत भिनवून घेण्यावाचून त्यांना दुसरा पर्याय नाही. यातलं कारुण्य उघड आहे. मात्र, त्याबरोबर मूळ कादंबरीतली जिमची ठोकळेबाज व्यक्तिरेखा म्हणजे जणू एक नाटक आहे, आणि खरा जिम- म्हणजेच जेम्स- दिसायला हवा असेल तर तुम्हाला माझी कादंबरी वाचावी लागेल, असा एक गमतीचा खेळही एव्हरेटने मांडला आहे.

गोष्टीत जिथं हक आणि जेम्स यांची ताटातूट होते तिथं कथानक जेम्ससोबत पुढे जातं. त्याद्वारे मूळ कादंबरीत नसलेले पण वंशभेद आणि गुलामगिरी यांचं भयप्रद दर्शन घडवणारे प्रसंग कादंबरीत आहेत. काही विनोदी वाटणारे प्रसंगही घडतात. गावोगावी फिरत समूहगान करणाऱ्या गोऱ्यांचा एक वृंद जेम्सला भेटतो. हे गोरे चेहऱ्याला काळं फासून काळ्या लोकांविषयीची गाणी गात लोकांचं मनोरंजन करत पैसे मिळवतात. जेम्सला चांगलं गाता येतं म्हणून त्याला ते आपल्यात घेतात. गुलामगिरीची प्रथा आपल्याला मान्य नाही असं त्यांचा प्रमुख जेम्सला सांगतो, मात्र पैसे देऊन तो जेम्सला विकत घेतो. पैसे वसूल होईपर्यंत जेम्सनं आपल्या वृंदात गात राहावं अशी त्याची अपेक्षा असते. तोंडाला काळं फासून गोऱ्याचा काळा बनण्याचा आभास निर्माण करत मूळचाच काळा जेम्स गोऱ्या प्रेक्षकांसमोर गातो. वाचताना या प्रसंगातली विसंगती गमतीशीर वाटू शकते, पण काळ्या माणसानं असं गोऱ्याचं सोंग आणून गोऱ्यांच्या नजरेला नजर भिडवणं किती धोकादायक आहे याची जाणीव जेम्सला भेदरवून टाकत असते. आपलं सोंग उघडं पडलं तर आपण मारले जाऊ ही त्याची भीती रास्तही असते.

पुस्तकात लागोपाठ विविध चित्तथरारक घटना घडत जातात. त्यातले उत्कर्षबिंदू हॉलीवूडच्या एखाद्या अॅक्शनपटात शोभावेसे आहेत. अखेरच्या टप्प्यावर एक अचाट रहस्यभेदही होतो. एव्हरेटची भाषेवरची पकड जबरदस्त आहे. त्याचे संवाद चटपटीत आहेत आणि हवे तिथे ते भेदकही होतात. त्यामुळे एकदा हातात घेतल्यावर पुस्तक खाली ठेवणं कठीण जातं. कथानक जसजसं पुढे सरकतं तसतशी गुलामांवर होणाऱ्या अन्यायाची अनेक उदाहरणं जेम्सच्या डोळ्यांसमोर घडत जातात. खुद्द जेम्सला कातडी सोलवटेपर्यंत चाबकाचे फटके खावे लागतात. शिवाय, लैंगिक शोषण, झुंडबळी (लिंचिंग), अशा अनेक घटना कथानकात आहेत. या अन्यायाविरुद्ध जेम्समध्ये धुमसणारा अंगार हळूहळू उफाळून वर येऊ लागतो. अखेर त्याचा उद्रेक होतो.

कथानकाचा नायक हक नसून जेम्स असणं हा एव्हरेटनं केलेला सर्वात महत्त्वाचा बदल आहे. मूळ कादंबरीत हकचं मतपरिवर्तन होण्यासाठीचं साधन म्हणून जिमची योजना केलेली आहे. इथं मात्र कर्तेपण स्पष्टपणे जेम्सकडे आहे. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे आधुनिकता या मूल्याला समकालीन करण्यासाठी केलेला हा बदल आहे. ही जेम्सची गोष्ट आहे. इथं तो आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ इच्छितो आणि त्याचे परिणामही भोगतो. जी पेन्सिल मिळवण्यासाठी एका गुलामाला जीव गमवावा लागला ती पेन्सिल वापरून आपली गोष्ट सांगणं जेम्स आपली नैतिक जबाबदारी मानतो. ती पेन्सिल त्याच्या अस्तित्वाचाच एक भाग होते आणि त्याला आपल्या कथेचा ताबा घ्यायला भाग पाडते. गुलामगिरीविषयी आणि एकंदरीत वंशभेदाविषयी खूप काही लिहिलं गेलं असतानाच्या आताच्या काळातही या आणि अशा अनेक कथननिर्णयांद्वारे वाचकांना अंतर्मुख करण्याची एव्हरेटची ताकद लक्षणीय आहे.

आतापर्यंत एव्हरेटनं आपल्या अनेक पुस्तकांत अमेरिकन वंशभेदावर आसूड ओढला आहे. मुख्य प्रवाहामधल्या अमेरिकन साहित्यातल्या काळ्यांच्या ठोकळेबाज चित्रणाविषयी त्याला चीड आहे. त्यामुळे काळ्या लोकांचं वास्तव त्यातल्या समग्र, वैविध्यपूर्ण तपशिलांसह कागदावर उतरवणं ही आपली नैतिक जबाबदारी ठरते हे एव्हरेट जाणतो. कादंबरीतला जेम्स जणू त्याचंच प्रतिनिधित्व करतो. शिवाय, अचाट कल्पनाशक्ती आणि कथनाची विलक्षण हातोटी एव्हरेटला लाभली आहे. ‘इरेजर’ या त्याच्या कादंबरीवर आधारित ‘अमेरिकन फिक्शन’ या चित्रपटाला गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट आधारित पटकथेचं ऑस्कर मिळालं होतं. यापूर्वीही एव्हरेटला बुकर मानांकन होतं, पण पुरस्कार काही मिळाला नव्हता. लागोपाठ चार वर्षं बुकर पुरस्कार पुरुषांना मिळाला आहे. या वर्षी मानांकन मिळालेल्यांत एव्हरेट हा एकच पुरुष आहे. त्यामुळे बुकर या वर्षीही त्याला हुलकावणी देण्याची शक्यता दाट आहे, आणि त्यामागेही आधुनिकतेला समकालीन करण्याचाच एक वेगळा प्रकल्प असू शकतो. पुरस्कार मिळो न मिळो, मार्क ट्वेनसारख्या दिग्गजाचं ऋण मान्य करत, त्याला आव्हान देऊन एव्हरेटनं आपल्या कारकीर्दीचं एक नवीन शिखर गाठलं आहे हे मात्र नक्की.

rabhijeet@gmail.com