साठोत्तरीच्या काळात जी भय-रहस्य मासिके पुण्या-मुंबईतून निघत, त्यांनी एक विचित्र ग्रह मराठी वाचकांच्या मनात निर्माण केला.. आल्फ्रेड हिचकॉक हा चित्रपट दिग्दर्शक कथालेखक देखील असल्याचा! ‘‘हिचकॉक’च्या कथा’ अशी दरमहा सदरेच काही मासिकांनी चालविली होती. कित्येकांनी किडूक-मिडूक वकुबात ‘हिचकॉकच्या (तथाकथित) कथां’ना मराठीत वाचकांच्या माथी मारण्याचा सपाटा लावला. प्रत्यक्षात पटकथांखेरीज लेखन न करणारा भयपटांचा हा बादशहा वगैरे बिरुद मिळविलेला चित्रपट दिग्दर्शक कधीही कथा लिहित नव्हता. नाही म्हणायला, ‘हिचकॉक प्रेझेण्ट्स’ नावाने येणाऱ्या संकलन ग्रंथात या दिग्दर्शकाची कुंथत कुंथत लिहिलेली जेमतेम दीड-दोन पानांची प्रस्तावना असे. त्यांत त्याला आवडलेल्या भयकथांबद्दलची कारणे चार-दोन वाक्यात उरकलेली असत. ‘टेल्स ऑफ टेरर’ (५८ कथा), ‘द बेस्ट ऑफ मिस्टरी’ (६३ कथा), ‘पोट्र्रेट्स ऑफ मर्डर’ (४७ कथा), ‘स्टोरीज दॅट ईव्हन स्केअर्ड मी’ (२३ कथा) आणि ‘स्टोरीज दॅट गो बम्प इन द नाइट’ हे या ‘हिचकॉक प्रेझेण्ट्स’ मालिकेतले महत्त्वाचे ग्रंथ. यांतल्या सगळय़ा कथा महाराष्ट्रभूमीतल्या वेगवेगळय़ा लेखकांनी परत-परत वेगवेगळय़ा चुकांसह, व्यक्तिरेखांच्या नावांच्या बहुआकलनी उच्चारांसह मराठीत आणल्या. अजूनही एखाद्या दिवाळी अंकामध्ये हिचकॉकच्या जनकत्वासह एखादी शब्द भूतरत्नकळा सापडू शकतेच. ‘ओ माय गॉड’ या मराठी वाक्यांसह पात्रांची कठीण समयी किंचाळण्याची पद्धत सगळय़ा अनुवादांत ओळखीची व्हायला लागते. हिचकॉकच्या चित्रपटांमध्ये जसे धक्कातंत्र सापडते, तशा या कथा चमकदार शेवटासाठी हिचकॉकने निवडल्या होत्या. इंग्रजीत त्या वाचताना खरेच त्यात भयघटक असल्याची खात्री होते, मात्र मराठीत त्याचे ‘स्वैरावैरा’ झालेले रूपांतर किंचितही धक्का देत नाही. या अनुवादांपैकी एका पुस्तकाचे नाव ‘हिचकॉक’च्या धक्कांतिका असले, तरीही गेल्या पन्नासेक वर्षांत त्यांतील कथा वाचून कुणाला तीव्र वा सौम्य धक्का बसल्याचे ऐकिवात नाही. या ‘हिचकॉक प्रेझेण्ट्स’ भयग्रंथमालांची आठवण झाली, ती सांप्रत काळात भय-धक्कातंत्रात मुरलेल्या जॉर्डन पील या आफ्रो-अमेरिकी दिग्दर्शकाने संपादित केलेल्या नव्या कृष्णवंशीय लेखकांच्या भयकथांच्या ताज्या पुस्तकामुळे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा