तीन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यात कंबोडियन वंशाचा, २८ वर्षांचा एक अमेरिकी कथालेखक अमली पदार्थाच्या अतिमात्रेने मेला. पण तेवढय़ाशा वयातच ‘न्यू यॉर्कर’ आणि ‘पॅरिस रिव्ह्यू’मध्ये कथा छापून मान्यता पावलेला. त्याच्या आगामी दोन पुस्तकांसाठी तीन लाख डॉलरची बोली लागल्याने तो ‘लिटररी स्टार’पद अनुभवत होता. अन् त्याच्या मृत्यूची बातमी धडकली. अँथनी व्हिसना सो हे त्याचे नाव. त्याला आपल्या पुस्तकांना पाहता आले नाही. पण तोवर त्याच्या अल्पशा लेखनकाळातील महत्ता जगभर पोहोचली होती. त्यामुळे अमेरिकी प्रकाशकाने त्याच्या पहिल्याच कथासंग्रहाच्या (आफ्टरपार्टीज) एक लाख प्रती छापल्या. कथासंग्रह इतक्या प्रतींनी छापून येण्याचा मान सांप्रत काळात जॉर्ज सॉण्डर्स आणि ब्रायन वॉशिंग्टन याच लेखकांना मिळाला आहे.
या लेखकाने कंबोडियातून अमेरिकेत वसलेल्या दोन पिढय़ांचा इतिहास कथांमध्ये उतरवला. कंबोडियातील नागरिकांनी अमेरिकेत वसविलेले ‘भिन्न कंबोडिया’, ख्मेर राजवटीतील नरसंहाराच्या त्यांच्या न पुसल्या गेलेल्या आठवणी, त्यातून आकारलेले जगण्याचे तत्त्वज्ञान,परंपरा यांच्याकडे तिरकस अमेरिकी नजरेतून अँथनी व्हिसना सो याने कथांमधून पाहिले. पुनर्जन्मापासून लग्नसोहळय़ातील कल्पनांची, धार्मिक विधींची येथे यथेच्छ खिल्ली उडवली. हा संग्रह तुफान खपलाच पण त्याला अनेक पारितोषिकेसुद्धा मिळाली. त्याचे गेल्या वर्षी अखेरीस टीव्ही मालिकेचे हक्कही विकले गेले.
त्याच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी या महिन्यात त्याचे ‘निबंध आणि नोंदीं’चे ‘साँग्ज ऑन एण्डलेस रिपीट’ नावाचे नवे पुस्तक आले आहे. प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार जोनाथन डी यांची त्याला प्रस्तावना आहे. हेलेन डेविट, गॅब्रिअल गार्सिया मार्खेज आणि जॉन केनडी टूल या धारदार लेखकांच्या शैलीवर त्याचे असलेले प्रेम लक्षात येते. लेखन-वाचन या गोष्टीचे दैनंदिन महत्त्व हा लेखक किती जपत होता, हे उमगते. नव्या पुस्तकात त्याची अमेरिकी कंबोडियन वस्ती, काही व्यक्तिरेखा, वाचनाचे वर्ष आणि काही व्यक्तिचित्रणांचा समावेश आहे. ज्याची शैली आधीच्या कथांसारखीच खुसखुशीत आणि सहज आवडणारी आहे. अमेरिकी बाजारात हे पुस्तक सध्या गाजत असून लवकरच खूपविक्या गटात जाण्याची शक्यता आहे.
तोत्तो-चान गिनिज बुकमध्ये
जपानी भाषेतलं एक पुस्तक जगभरातील २० हून अधिक भाषांत अनुवादित होतं आणि विविध पिढय़ांतील बालकांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग होऊन जातं. सर्वाधिक प्रती प्रकाशित झालेलं आत्मचरित्र म्हणून गिनिज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डसमध्ये त्याचं नाव कोरलं जातं.. तेत्सुको कुरोयानागी यांच्या ‘तोत्तो-चान- द लिट्ल गर्ल अॅट द विंडो’ या पुस्तकाने हा मान मिळविला आहे.
पुस्तक प्रकाशित करणाऱ्या ‘कोदान्शा प्रकाशना’ने सप्टेंबर २०२३अखेरीस या पुस्तकाच्या तब्बल दोन कोटी ५१ लाख १३ हजार ८६२ प्रतींची विक्री झाल्याचं म्हटलं आहे. तोत्तो-चान सर्वप्रथम प्रसिद्ध झालं १९८१मध्ये. तेत्सुको कुरोयानागी या जपानी निवेदिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आपल्या शालेय जीवनाची गोष्ट यात अत्यंत निरागसतेने मांडली आहे.
सुरुवातीला कुरोयानागी यांनी या आठवणी लिहिल्या तेव्हा निव्वळ आपल्या बालपणीच्या घटनांची नोंद असावी, एवढाच उद्देश होता. हा मजकूर पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्याचा विचारही त्या वेळी त्यांनी केला नव्हता. त्यात त्यांचे शिक्षक कोबायाशी आणि शाळेतील मित्र-मैत्रिणींच्या आठवणींचा समावेश होता. पुढे या नोंदी पुस्तकस्वरूपात प्रकाशित झाल्या आणि जगभरातील बालकांपर्यंत पोहोचल्या.. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये या पुस्तकाचा पुढील भागही प्रकाशित झाला असून त्यामुळे मुळातच अत्यंत लोकप्रिय असलेल्या तोत्तो-चानच्या आयुष्यातील आणखी काही किस्से अनुभवण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.
पुस्तक प्रकाशित होऊन ४० वर्ष आणि पुस्तकात वर्णिलेल्या काळाला ७० वर्ष उलटली आहेत. या कालावधीत बालपण बदलत गेलं, बालकांचा भोवताल बदलला, त्यांच्या अनुभवविश्वात तेव्हा कल्पनाही करता आली नसती अशा आकर्षणांची भर पडली, पण काही गोष्टी कधीच शिळय़ा होत नाहीत. तोत्तो-चान हा याचाच पुरावा आहे.