‘क्राइम रिड्स’ या संकेतस्थळावर या आठवडय़ाच्या आरंभी दाखल होणाऱ्या १० नव्या पुस्तकांची माहिती आली. त्यात अमिताव घोष यांच्या नव्या पुस्तकाच्या वेगळय़ा मुखपृष्ठाच्या आवृत्तीसह एक बरेच जुने पुस्तक दिसत होते. जॅक क्लार्क यांचे ‘नोबडीज एंजल’ नावाचे. जॅक क्लार्क काही खूपविका लेखक नाही. पण अमेरिकेच्या सांस्कृतिक प्रोत्साहनाच्या वातावरणामुळे अत्यंत निम्नआर्थिक स्तरातून लेखक होण्याच्या परंपरेतील एक प्रतिनिधी. इतर उदाहरणे द्यायची तर कादंबरी येण्यापूर्वी शाळेतील उद्वाहक म्हणून काम करणारा स्टिवन किंग, नळदुरुस्तीची कामे करता करता ‘लेखन नळ’ रिता करणारा जॉन ग्रिशम, ‘इट-प्रे-लव्ह’च्या दोन दशके आधी बारमध्ये मद्यप्याले पोहोचविणारी एलिझाबेथ गिल्बर्ट ही जगाला ज्ञात असलेली प्रोत्साहक नावे. पण वयाच्या १८ व्या वर्षांपासून चाळिशीपर्यंत वेश्यागृहाजवळ दलाली करून जगणाऱ्या आणि नंतर ‘पिंप : द स्टोरी ऑफ माय लाइफ’ या आत्मकथेमुळे रातोरात तारांकित बनलेला आईसबर्ग स्लिम, वयाच्या पन्नाशीपर्यंत कागद कारखान्यात रोजंदारीवर काम करणारा डोनाल्ड रे पोलॉक ही नावे मर्यादित लोकप्रियतेच्या वर्तुळातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोनाल्ड रे पोलॉक या साहित्यिकाने दीड दशकापूर्वी आपल्या शहरगावावर लिहिलेल्या कथांचे पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर दोन कादंबऱ्या लिहिल्या. त्यांतील अनुभवांच्या नव्या तपशिलांमुळे कादंबरी लेखनात पदवी घेणाऱ्या आणि त्यासाठी ढीगभर संशोधनाचे डोंगर उभारणाऱ्या लेखकांपेक्षा पोलॉकची पुस्तके गाजू लागली. त्याच्या शहरगावातील तो तारांकित व्यक्ती झालाच, पण इतर देशांत अनुवादित होऊन या कादंबऱ्या गेल्या. (यात मोठे काय म्हणत, हयातभर पीठगिरणी चालविणारे महादेव मोरे, शिपाई म्हणून आयुष्यभर राबणारे उत्तम बंडू तुपे आणि तळागाळातील बहुअनुभवांचा समुद्र कथेत मांडणारे चारुता सागर ही मराठी नावे उदाहरणादाखल सांगता येतील. तरीही या अशक्य तळागाळातून आलेल्या अमेरिकी लेखकांची पुस्तके त्यांच्या इतिहास-भूगोलामुळे कशी पुढे गेली ते लक्षात येईल. पण इथे मुद्दा जॅक क्लार्कचा)

‘शिकागो रीडर’ या मासिकात १९७५ साली जॅक क्लार्क याची पहिली कथा प्रकाशित झाली, तेव्हा तो एका बँकेत उद्वाहक म्हणून काम करीत होता. पुढल्या अनेक वर्षांत घरांतील वस्तू वाहण्याची हमाली आणि इतर मिळतील ती कामे करता करता त्याचे लिखाण सुरूच होते. १९९६ साली त्याने ‘नोबडीज एंजल’ ही आपल्या टॅक्सीचालक म्हणून आलेल्या अनुभवांवरची कादंबरी प्रकाशित केली. स्वखर्चाने छापलेल्या या कादंबरीची विक्री तो आपल्या टॅक्सीमधील ग्राहकांकडे करी. काही वाचक असलेले प्रवासी कुतूहलापोटी या कादंबरीच्या प्रती खरेदी करीत. तर बरेच पुस्तकद्वेष्टे किंवा थट्टावादी मंडळी कादंबरीस नाकारत. खूनसत्राच्या प्रकारात अडकलेल्या टॅक्सी ड्रायव्हरची ही कल्पित कथा पुढल्या काही वर्षांत वाचलेल्या प्रवाशांच्या चर्चेतून नावाजली गेली. त्याचमुळे तिला प्रकाशकही मिळाला. त्याद्वारे २०१० साली तिची देखणी आवृत्ती बाजारात आली. ती बऱ्यापैकी परीक्षण-समीक्षणांद्वारे मोठय़ा वाचक गटापर्यंत पोहोचली. मग ‘हार्ड क्राइम’ वाचकांद्वारे तिची बऱ्यापैकी विक्रीही झाली. अर्थात बरी म्हणजे जुन्या जगण्यापेक्षा थोडे चांगले दिवस लेखकाला मिळाले. यादरम्यान त्याची आणखी चार पुस्तकेही प्रकाशित झाली. दहा वर्षांचा करार संपल्यानंतर २०२१ साली कादंबरीचे हक्क पुन्हा क्लार्क यांच्याकडे आले. तोवर त्यांच्या नावावर आणखी पुस्तके आली. त्यांतून पैसा इतका आला की पुढले पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाला पॅरिसमध्ये काटकसरीने का होईना, पण पॅरिसमध्ये राहण्याइतपत ऐपत तयार झाली. पण नव्या वर्षांच्या आधी या लेखकाला एक भलतीच ‘लॉटरी’ लागली. चित्रपट दिग्दर्शक क्वेन्टीन टेरेन्टीनो याने ‘नोबडीज एंजल’ वाचली. त्याला टॅक्सी ड्रायव्हरच्या या कादंबरीतील खूननाटय़ इतके आवडले की ‘वर्षभरात मला आवडलेले सर्वोत्तम पुस्तक’ असल्याचे त्याने समाजमाध्यमांवर जाहीर केले. त्याने नमूद केले की, शिकागोमध्ये टॅक्सीचालकांना लुबाडणारे आणि त्यांच्या हत्यांची मालिका असलेले हे कथानक प्रचंड थरारक असून, हा वाचनानंद प्रत्यक्षात आणणाऱ्या ‘हार्ड केस क्राइम’ या प्रकाशनाचे आणि लेखकाचे अनंत आभार.’ टेरेण्टीनोच्या या अभिप्रायानंतर त्याच्याशी परिचय होण्याची शक्यता नसलेला जॅक क्लार्क अचानक प्रकाशझोतात आला. सर्वच खंडात टेरेन्टीनोचे चाहते विखुरलेले असल्याने ‘कोण हा जॅक क्लार्क?’ आणि कुठली त्याची कादंबरी याचा शोध सुरू झाला. अ‍ॅमेझॉनवर नसलेली त्याची आधीची पुस्तकेही अचानक त्यामुळे उपलब्ध झाली. त्याहून महत्त्वाचे म्हणजे कादंबरीचे हक्क पुन्हा प्रकाशकाने अर्थातच वेगळय़ा करारानिशी खरेदी करून या कादंबरीवर क्वेन्टीन टेरेन्टीनोचा अभिप्रायच छापायचा निर्णय घेतला. टेरेन्टीनोचे सिनेमाखूळ व गुन्हेविलक्षण कादंबऱ्या वाचण्याचे प्रेमही जगजाहीर आहे. गेल्या वर्षी त्याचे सिनेआत्मवृत्त आणि एक कादंबरी निव्वळ साहित्य वाचणाऱ्यांनी नाही तर फक्त त्याचा सिनेमा पाहणाऱ्यांनी बेस्ट सेलर बनवली. नऊ सिनेमे बनविणाऱ्या या दिग्दर्शकाने ‘आपण फक्त दहाच सिनेमे बनवून चित्रसंन्यास घेणार’ हे जाहीर केले आहे. त्याच्या दहाव्या फिल्मचे काम सुरू असून तो पुढल्या वर्षी प्रदर्शित होईल. त्यानंतर तो कायमस्वरूपी पुस्तक लेखन व वाचनाकडे वळेल, असे भाकीत वर्तविले जात आहे. त्याचा अभिप्रायही किती लाखमोलाचा ठरू शकतो, हे सोमवारपासून पाच दिवसांत खूपविकी बनलेल्या ‘नोबडीज एंजल’ पुस्तकाच्या लेखकाला सर्वाधिक उमजले आहे.

हेही वाचा

बुक बातमीत उल्लेख असलेला जॅक क्लार्क हा या आठवडय़ात अचानक चर्चेत आलेला लेखक आहे. त्याची जुनी मुलाखत आणि त्याचा टॅक्सीप्रवासासह लेखनप्रवास जाणून घेण्यासाठी.  http:// surl. li/ qoive

बुक बातमीत उल्लेख केलेल्या ‘डोनाल्ड रे पोलॉक’ या लेखकाची एक ऑनलाइन मोफत उपलब्ध असलेली कथा. या माणसाचा उतारवयापर्यंत साहित्याशी संबंध आलेला नव्हता. पण त्याने कथा लिहिण्यास सुरुवात केली, तेव्हा आपल्या गावातील भवतालाला आणि तिथल्या माणसांना कथांमध्ये चित्रित केले. अनेक नावाजलेल्या लेखकांना या निरीक्षणांचा धक्काच बसला होता.

http:// surl. li/ qoiko

शीळ हे वाद्य आहे काय? दात-ओठ आणि श्वास यांच्या आधाराने वाद्याच्या सुरावट क्षमतेहून वरच्या पट्टीला स्पर्श करणारी एक शीळवादक सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मॉली लुईस हे तिचे नाव. ‘बार्बी’ या चित्रपटात तिच्या शिट्टीवर असलेले गाणे गाजत आहे. जन्माने ऑस्ट्रेलियन आणि कर्माने अमेरिकी असलेली मॉली लुईस ही अमेरिकी शीळवादनातील ‘चॅम्पियन’ आहे. यूटय़ूबवर तिचे शिट्टी कारनामे पाहता-ऐकता येतात. पण न्यू यॉर्क आणि न्यू यॉर्कर या दोन्ही साप्ताहिकांत ती एकाच वेळी झळकलेली आहे.

 http:// surl. li/ qoipo

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta bookbatmi novel crime reads book jack clarke amy
Show comments