कामावर जाणं ही एके काळी जवळपास प्रत्येक पुरुषासाठी तरी कर्तव्याची गोष्ट असायची. घरातल्या थोरल्या मुलाची इतिकर्तव्यता कशात? तर लवकरात लवकर ‘मार्गाला लागण्यात’. म्हणजे आपल्या पायावर उभे राहण्यात. या मानसिकतेतनं आपल्याकडे महाप्रचंड प्रमाणात नोकरदार वर्ग तयार झाला. कोणत्या तरी सरकारी कार्यालयात लवकरात लवकर चिकटणे आणि वार्षिक वेतनवाढी, महागाई भत्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकण्याएवढ्या रजा साठवत त्याच कार्यालयातनं जमेल तितक्या अधिकारपदावरनं निवृत्त होणं ही आयुष्याची इतिकर्तव्यता.
***
पण त्याच काळात आपल्याकडेही काही असे होते की ज्यांना हवं ते काम करण्याची संधी मिळाली. ते कळपातल्या मेंढरांप्रमाणे कुठे तरी वाहत जात चिकटले नाहीत. अलीकडचा शब्द वापरायचा तर त्यांनी ‘करिअर’ केलं. त्यासाठी परिस्थिती अनुकूल होती असं नाही. पण तरीही त्यांना स्वत:ला जे आवडतं ते करायला मिळालं. त्यासाठी त्यांनी कष्ट केले आणि वाट पाहिली. स्वातंत्र्यानंतर ज्या काळात आपल्याकडे घरोघरी नोकरदारांची मोठी पैदास होत होती त्याच काळात हे करिअर करू पाहणारेही निपजले. या दोन वर्गांतला फरक म्हणजे काळ घडवणारे कर्तृत्ववान आणि काळाच्या ओघात वाहत जाणारे यांतला फरक.
***
‘वर्क, विज्डम, लेगसी’ या अत्यंत रोचक पुस्तकात तो सहज, हसत-खेळत समजून घेता येतो. सार्वजनिक जीवनात काही एक मिळवलेले; राजकारण, खासगी उद्याोग, बँकिंग, प्रशासन/ नोकरशाही, शिक्षण क्षेत्र आणि माध्यम अशा सहा क्षेत्रांतले कर्तृत्ववान या पुस्तकात लिहिते झाले आहेत. या सगळ्या नावांवर नजर टाकली तरी त्या लिहिणाऱ्यांची महती कळावी. पी. चिदम्बरम, यशवंत सिन्हा (दोघेही माजी अर्थमंत्री), अरुण शौरी (माजी निर्गुंतवणूक मंत्री), ‘इन्फोसिस’चे नारायण मूर्ती, ‘आयसीआयसीआय’साठी ओळखले जाणारे के. व्ही. कामत, के. श्रीनाथ रेड्डी, जोयदीप मुखर्जी, माजी अर्थसचिव आणि अर्थपंडित शंकर आचार्य, शीला भिडे, अर्थतज्ज्ञ नितीन देसाई, एन. के. सिंग, सुजाता राव, विद्यामान केंद्रीय अर्थसल्लागार व्ही. ए. नागेश्वरन, रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, पत्रकार लता वेंकटेश, तमाल बंदोपाध्याय, निरंजन राजाध्यक्ष, शाजी विक्रमन इत्यादी ३१ जणांचे आपापल्या कारकीर्दीवरचे लहान लहान निबंध या पुस्तकात आहेत. या सगळ्याला अत्यंत रसाळ अशी प्रस्तावना लिहिलेली आहे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांनी.
***
खरं म्हणजे एखाद्या पुष्पमालेत जे काम सर्व फुलांना धरून ठेवणाऱ्या धाग्याचं तेच काम या पुस्तकात वाय. व्ही. रेड्डी यांचं. रेड्डी यांची रिझर्व्ह बँकेतली कारकीर्द वादातीत आहे. अमेरिकेत २००८ सालच्या जून महिन्यात ‘लिहमन ब्रदर्स’ बँक बुडाली त्यावेळी रिझर्व्ह बँकेची धुरा रेड्डी यांच्या हाती होती. भारत गर्तेत जाण्यापासून वाचला ते त्यांच्या द्रष्ट्या बँक नेतृत्वामुळे. त्या वर्षी सप्टेंबरपर्यंत ते या पदावर होते. रेड्डी यांच्याकडे हे पद आलं बिमल जालान यांच्याकडून आणि त्यांच्यानंतर ते गेलं डी. सुब्बाराव यांच्याकडे. हा रिझर्व्ह बँकेचा कसोटीचा काळ. राजकीय आणि आर्थिकही. यातील रेड्डी आणि सुब्बाराव हे नोकरशहा होते. रेड्डी यांनी केंद्र आणि राज्य सरकारांत विविध पदांवर विविध जबाबदाऱ्या हाताळल्या. त्याचा उपयोग त्यांना रिझर्व्ह बँक हाताळताना झाला. धोरणं राबवणारे काय नजरेनं एखाद्या विषयाकडे पाहातात याचा पुरेसा अनुभव गाठीशी असल्यानं त्यांच्या रिझर्व्ह बँक हाताळणीत केवळ अर्थतज्ज्ञाचा दृष्टिकोन नसे. याचा अर्थ ते सरकारानुकूल भूमिका घेत असा अजिबात नाही. त्यांचेही सरकारशी मतभेद झाले. चिदम्बरम यांच्यासारख्या बुद्धिमान अर्थमंत्र्याच्या रोषाला सामोरं जाण्याची वेळ त्यांच्यावरही आली. हे कसोटीचे क्षण रेड्डी यांनी कसे हाताळले हे मुळातूनच वाचणं अत्यंत रंजक. विनोद हे रेड्डी यांच्या हातचं महत्त्वाचं अस्त्र होतं आणि मुख्य म्हणजे स्वत:वर विनोद करायला त्यांना कमीपणा वाटत नसे. एकदा एका गुंतागुंतीच्या विषयावर त्यांचं भाषण झालं. ते संपल्यावर समोरच्या रांगेत बसलेल्या वार्ताहरानं प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला. रेड्डी यांनी होकार दिल्यावर तो उभा राहिला आणि म्हणाला : तुमच्या भाषणानं त्या विषयाचा गुंता सुटायच्या ऐवजी तो अधिकच वाढला आहे, असं नाही का तुम्हाला वाटत? त्यावर एखादा असता तर रागावला असता. पण रेड्डी म्हणाले : छान… मी माझा गोंधळ तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो याचा मला आनंद आहे! रिझर्व्ह बँकेची जबाबदारी सांभाळत असताना रेड्डी त्या भारानं कधी वाकलेले नव्हते.
***
तीच बाब यातील प्रत्येक निबंध लेखकाविषयी म्हणता येईल. पी. चिदम्बरम आणि अरुण शौरी यांचे लेख तर विशेष वाचण्यासारखे. ‘‘मी चार क्षेत्रातल्या नोकऱ्या केल्या, त्यातल्या दोन खेपेस मला कामावरनं काढून टाकलं गेलं’’, असं शौरी सहज लिहून जातात आणि चिदम्बरम वकिली आणि राजकीय पक्ष यांतल्या संतुलनातली आव्हानं अलगदपणे उलगडून सांगतात. यशवंत सिन्हा हे ‘आयएएस’. कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री असताना बिहारमध्ये त्यांची कारकीर्द सुरू झाली. तिथपासून ते देशाच्या अर्थमंत्रीपदापर्यंतचा प्रवास वाचणाऱ्याला बरंच काही शिकवून जातो.
***
शिकवणारा हा कोणत्याही आविर्भावाशिवाय, ‘‘बघा मी कशी कर्तृत्वाची शिखरं गाठली, त्यासाठी असे असे कष्ट केले’’ या असल्या सुराशिवाय प्रवास सहज सांगत गेला की शिकणारा सहज शिकतो. ते शिकवणं जड आणि अंगावर येणारं वाटत नाही. हे पुस्तक नेमकं असं आहे. एरवी प्रबोधन, सेल्फ हेल्प, यशाचे सात सुलभ मार्ग वगैरे पुस्तकं थोतांडी असतात असं माझं मत आणि अनुभव आहे. तसं नसूनही त्यापेक्षाही अधिक परिणामकारक असं हे पुस्तक ‘सहज वाचन’ (ईझी रीडिंग) किती आनंददायी असतं याचा उत्कृष्ट नमुना आहे. कोणत्याही प्रकरणापासनं सुरुवात करता येते हा आणखी एक फायदा. मराठीत असा काही प्रयोग कोणी करायला हरकत नाही, असं पुस्तक वाचल्यावर वाटून गेलं. भाषिक वाचकांत त्याची अधिक गरज आहे.
वर्क विज्डम लेगसी : 31 एसेज फ्रॉम इंडिया
संकलन : वाय. व्ही. रेड्डी आणि रवी मेनन, शाजी विक्रमन, कवी यागा.
प्रकाशक: ओरिएंट ब्लॅक स्वान
पृष्ठे: ३१६; किंमत: ८५० रु.
girish.kuber@expressindia.com