दिल्लीवाला
ल्युटन्स दिल्लीमध्ये राजकारण्यांचा उच्छाद बाजूला केला तर फक्त दोन गोष्टींचा त्रास असतो. डास आणि माकडं. ‘जी-२०’ची शिखर परिषद झाली, तेव्हा दिल्लीच्या स्थानिक प्रशासनाला सर्वाधिक काळजी या दोघांची होती. डासांनी आणि माकडांनी गडबड केली तर काय, या भीतीने प्रशासनाने ‘बंदोबस्त’ वाढवला होता. ही नाकाबंदी तात्पुरती होती. डास आणि माकडं येणारच. संसदेला लागून असलेल्या रेडक्रॉस रोडवर माकडांना बागडायला नवा नवा रस्ता मिळाला आहे. हा रस्ता संसदेला लागून आहे, नव्या इमारतीचं बांधकाम सुरू असल्याने हा रस्ता दोन वर्ष बंद होता. इथल्या पादचारी मार्गावर चहाच्या दोन टपऱ्या आहेत. मझार आहे. रेडक्रॉस सोसायटी आहे. या सगळय़ा परिसरात माकडांची सत्ता असते. ही माकडं रेडक्रॉस सोसायटीच्या एका सुरक्षारक्षकाला मात्र घाबरतात असं दिसलं. हा सुरक्षारक्षक सोसायटीच्या लोखंडी दारावर दंडुका असा बडवतो की माकडांची चिल्लीपिल्ली, त्यांचे आई-बाप जीव तोडून पळतात. खरंतर या माकडांना हाकलून काही फायदा नसतो. संसदेच्या परिसरात ती फिरत राहतात. मग त्यांच्याकडं हनुमानाचं रूप म्हणून पाहून ही हनुमानाची टोळी संसदेची सुरक्षा करत आहे, असं मानायला काय हरकत आहे? या ‘हनुमाना’च्या टोळीतील काही सदस्य संसदेतही पाहायला मिळतात. नव्या इमारतीत त्यांना आतमध्ये येण्याची संधी मिळत नाही. तिथं वेगळीच मंडळी असतात. जुन्या इमारतीत आता कोणी नसतं. तिथं पूर्ण शांतता असते. ही माकडं निवांत दुपारचं ऊन खात बसलेली असतात. त्यांच्या जोडीला सांद्रीत कबुतरं बसलेली असतात. ही कबुतरं म्हणजे राजकारण्यांचे जणू अस्वस्थ आत्मेच, अशी गम्मत-जम्मत पत्रकार नेहमीच करतात. संसदेत फक्त अव्वल दर्जाचे अभिनेते, कथित चाणक्य, धुरंधरच असतात असं नव्हे प्राणीमात्रांनाही संसदेचा परिसर आवडतो. वर्षांनुवर्षे राजकारणी इथं रमतात, तसंच प्राणीमात्रही आपलंच घर म्हणून इथं वावरतात.
बायजूंचा बंध
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय’ यात्रेत आसाममध्ये अडथळे निर्माण झाले होते. राहुल गांधी आणि त्यांचे अत्यंत विश्वासू के. बी. बायजू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात्रेच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी बायजूंकडे आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा-शर्मा यांनी वैयक्तिक हेत्वारोपामुळे ही यात्रा ‘प्रकाशझोतात’ राहील याची सोय करून टाकली. पण, त्यानिमित्ताने बायजूंकडे पुन्हा लक्ष वेधले गेले. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना राहुल गांधींवर खरमरीत टीका केली होती. सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रामध्ये राहुल गांधींचे ‘स्वीय सचिव आणि सुरक्षारक्षक’ पक्षामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असल्याचा आरोप केला होता. हे आरोप झालेले सुरक्षारक्षक म्हणजे के. बी. बायजू. कधीकाळी बायजू हे राहुल गांधींना दिलेल्या एसपीजी सुरक्षेचे भाग होते. तिथंच दोघांचं टय़ुनिंग जमलं. आता, बायजू हे राहुल गांधींच्या चमूतील अविभाज्य घटक आहेत. असं म्हणतात की, त्यांची मैत्री इतकी घट्ट आहे की, कोणत्याही आरोपाचा आणि टीकेचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. पहिल्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्येही बायजूंचा महत्त्वाचा सहभाग होता. राहुल गांधींच्या निकटवर्तीयांच्या वर्तुळात बायजूंचे स्थान काय याची माहिती असणारे काही होतकरू काँग्रेस कार्यकर्ते बायजूंच्या भोवती घोटाळताना दिसत होते. बायजूच नव्हे इतरही निकटवर्तीय अजून ‘टीम राहुल’मध्ये टिकून आहेत. राहुल गांधींच्या वर्तुळातील अलंकार सवाईही यात्रेमध्ये त्यांच्यासोबत होते. यात्रेमध्ये छोटय़ा अपघातात एक पोलीस जखमी झाला होता. राहुल गांधींच्या ताफ्यातील रुग्णवाहिका त्यांची परवानगी मिळाल्यानंतर पोलिसाला घेऊन गेली होती. दिग्विजय सिंह यांनी स्वत: अलंकार यांना फोन करून ही परवानगी घेतली होती. ‘ईडी’च्या समेमिऱ्यामुळे अलंकारही चर्चेत आले होते. सचिन राव आता काँग्रेसचे मुखपत्र ‘संदेश’ची जबाबदारी सांभाळतात. प्रवीण चक्रवर्ती यांना संशोधन विभागाची जबाबदारी देण्यात आली होती, आता त्यांना प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष केले आहे. के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, अजय माकन यांनी तर थेट संघटनेमध्ये मोठय़ा पदांवर पकड मिळवली आहे. के. राजू हे अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. या वर्तुळात ये-जा सुरू असली तरी, बायजूंचं स्थान अढळ आहे.
रामाचा प्रसाद
राम मंदिराच्या उद्घाटनामध्ये उपस्थितांपैकी सगळं लक्ष मोदींवर केंद्रित झालं होतं. तिथं ना केंद्रीय मंत्र्यांना महत्त्व होतं, ना भाजपच्या नेत्यांना. या सोहळय़ाला मोदींच्या मंत्र्यांनी हजेरी लावली नव्हती. तिथं अमित शहा नव्हते, जे. पी. नड्डा नव्हते. राजनाथ सिंह वा नितीन गडकरीही नव्हते. मोदींच्या वाचाळ मंत्र्यांनाही तिथं स्थान नव्हतं. खरंतर मोदींच्या मंत्र्यांनी वा नेत्यांनी अयोध्येत जाणं अपेक्षितच नव्हतं. तरी देखील भाजपचे एक वाचाळ नेते आवर्जून आलेले होते. रामायणातील रामाच्या शेजारी बसून ते घंटा वाजवत असल्याचं दिसत होतं. लोकसभेतील दुसरे वाचाळ खासदार रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांचा ‘दहशतवादी, कटवा’ असं म्हणत अपमान केला होता. तेव्हा हे नेते मोठय़ा तोंडानं हसताना अनेकांनी पाहिले. भाजपच्या या नेत्याला श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने निमंत्रण दिलं होतं. इतका मान दिल्यावर कोणीही अयोध्येत येणारच. हे महान नेते म्हणजे रवीशंकर प्रसाद. राम मंदिर प्रकरणामध्ये न्यायालयात प्रसाद हे रामलल्लाचे वकील होते. त्यांनी रामलल्लासाठी युक्तिवाद केला होता, याची आठवण ठेवून न्यासाने त्यांना निमंत्रण दिलं होतं. केंद्रात मंत्री झाल्याने प्रसाद यांना नंतर सर्वोच्च न्यायालयात रामलल्लाची बाजू मांडता आली नाही. पण, पूर्वी केलेल्या कामाचं बक्षीस त्यांना मिळालं. अयोध्येत आलेल्या सात हजार निमंत्रितांमध्ये प्रसादांचाही समावेश झाला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान नाही तर निदान मोदींच्या ऐतिहासिक कार्यक्रमात तरी मिळालं..
विश्वासाची ऐशीतैशी
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार वर्ष-दोन वर्षांतून एकदा कोलांटउडय़ा मारतात, आताही ते आपलं कौशल्य दाखवतील. नितीशकुमार यांच्यासारखा राष्ट्रीय स्तरावरील नेताच नव्हे तर, ज्यांना थोडंफार वलय आहे, असा कोणताही नेता पलटी मारतो. त्यांच्या मनात पक्षबदलूपणा करताना नैतिकता वा अनैतिकतेचा विचार येत नाही, त्यावरून आत्ताचं राजकारण कसं आहे, याची कल्पना करता येते. दिल्लीत एके ठिकाणी मेजवानी होती, तिथं काही पक्षबदलू होते. गप्पाटप्पा रंगल्या होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये समाजवादी विचारांच्या नेत्यांनी भाजपची कास पकडली आहे. या मैफिलीत समाजवादी पठडीतील नेताही होता. या नेत्याचं वलय अजूनही टिकून आहे. कधीकाळी राष्ट्रीय स्तरावर राजकारणाचे फड गाजवणाऱ्या वडिलांचा या नेत्याला वारसाही लाभलेला आहे. आता वडिलांची पुण्याई फारशी कामाला येणार नाही याची या नेत्याला जाणीव झाली होती. समाजवादी मूळचे काँग्रेसविरोधी. त्यामुळं तिकडे जाता येत नाही. शिवाय, काँग्रेसला सत्ताही मिळणार नाही, हा सगळा हिशेब या समाजवादी नेत्याने केला होता. ना खासदारकी, ना कुठलं पद, ना पक्ष. मग, काय करणार? दरम्यान भाजपच्या केंद्रीय नेत्याचा फोन आला, त्यांनी पक्षात बोलवलं. हे नेते लगेच संघवाल्यांच्या भाजपमध्ये जाऊन बसले. ते राज्यसभेचे खासदारही बनले. या नेत्याचा हिशेब सरळसाधा होता. त्यांचं म्हणणं होतं की, आत्ताचं राजकारण बदललंय. राजकारणामध्ये नैतिकतेचा फारसा कोण विचार करत नाही. प्रवाहात उडी टाका आणि टिकून राहा! हा नेता सत्तेपासून काही काळ दूर राहिला होता, सहा महिने खासदारकीही नव्हती. पद-सत्ता नसल्यानं त्याच्याकडं कोणी फिरकत नव्हतं. कोणी विचारत नव्हतं. लोकांशी संपर्क तुटला होता. मग त्यांनी ठरवलं की, सत्तेत जायचं, पद मिळवायचं आणि टिकून राहायचं. सत्ता महत्त्वाची. मग, नैतिकता वगैरे. आता हा नेता खूश आहे, आता तो मोदींचं गुणगान गातो. त्याला कदाचित दुसऱ्यांदाही राज्यसभेची खासदारकी मिळू शकेल. नितीशकुमार यांच्या समाजवादी विचारांच्या वर्तुळातील या नेत्याचं म्हणणं ऐकल्यावर नितीशकुमार यांच्या कोलांटय़ांमध्ये नवल काय? भाजप आपली कोंडी करतोय असं वाटू लागल्यावर त्यांना भाजपविरोधी ऐक्य आठवलं, त्यांनी राष्ट्रीय जनता दलाशी युती केली. आत्ता लालूप्रसाद यादव आपली पंचाईत करताहेत असं वाटू लागल्यानं नितीशकुमार पुन्हा भाजपची कास पकडत आहेत. दीड महिन्यांपूर्वी नितीशकुमार यांनी दिल्लीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जनता दलाचे (संयुक्त) अध्यक्ष ललन सिंह यांची पदावरून हकालपट्टी केली होती. ही घटना राष्ट्रीय राजकारणासाठी फारशी दखलपात्र नव्हती. पण, नितीशकुमार यांनी ललन सिंह यांच्यावर अविश्वास दाखवला होता. आपलंच प्यादं आपल्याच विरोधात वापरलं जातंय अशी शंका नितीशकुमार यांना आली होती. ललन सिंह यांना हाताशी धरून लालूप्रसाद यादव आपला पक्ष फोडण्याचा प्रयत्न करताहेत असा नितीशकुमार यांचा कयास होता. ललन सिंह यांना बाजूला केल्यानंतर फोडाफोडी झाली नाही पण, आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून कधीही हटवलं जाऊ शकतं ही भीती नितीशकुमार यांच्या मनात घर करून राहिली. मग, नितीशकुमार म्हणाले, विश्वासाची ऐशीतैशी. आधी सत्ता मग, नैतिकता..