दिल्लीवाला
मोदी-शहांनी देशाचं राजकारण बदलून टाकलं तसं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ते बदललेलं आहे असं दिसतंय. तिहार तुरुंगातून बाहेर आल्यावर केजरीवालांनी ‘इंडिया’ आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला देऊन टाकला. ते म्हणाले की, ईडी-सीबीआयने (म्हणजे भाजपने) तुम्हाला तुरुंगात टाकलं तरी तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही. मीही दिला नाही, तुम्हीही देऊ नका!… केजरीवालांचं म्हणणं होतं की, विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकून पक्ष फोडण्याचा आणि राज्यातील सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं ‘इंडिया’ आघाडीतील मुख्यमंत्र्यांनी नवा मंत्र जपला पाहिजे. काहीही झालं तरी मुख्यमंत्रीपद सोडायचं नाही. ‘इंडिया’ आघाडीतील सर्वांनाच हा मंत्र आवडलेला दिसतो. झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा हेमंत सोरेन यांनी तुरुंगात गेल्यावर मुख्यमंत्रीपद सोडलं होतं पण, जामिनावर सुटल्यावर ते परत घेतलं. आता मात्र विरोधकांपैकी कोणी मुख्यमंत्रीपद सोडण्याची शक्यता दिसत नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न होत आहेत. पण, त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास ठाम नकार दिला आहे, इतकंच नव्हे तर काँग्रेसनेही त्यांच्याकडं राजीनामा मागितलेला नाही. सिद्धरामय्यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला न करण्याचा निर्णय बहुधा काँग्रेसने घेतला असावा असं दिसतंय. केजरीवाल तुरुंगात असताना दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवत होते, तर सिद्धरामय्यांवर नुसते आरोप झाले म्हणून त्यांनी हे पद का सोडायचं, असा विचार काँग्रेसमध्ये केला जात आहे. पूर्वी केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना आरोप झाले म्हणून अनेकांना मंत्रीपदाला आणि मुख्यमंत्रीपदाला मुकावं लागलं होतं. अलीकडच्या काळात भाजपच्या मंत्र्यांवर आरोप होऊनही त्यांनी राजीनामा दिला नाही, त्यांना पक्षाने पाठीशी घातलं होतं. काळ बदलला, सत्ताधारी बदलले आणि विरोधकही!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा