नव्या संसदेच्या कुठल्याशा कोपऱ्यामध्ये ‘मीडिया लाऊंज’ नावाची छोटी खोली आहे, जिथं कोणी पत्रकार जातही नाही. कारण, ही खोली ‘गावकुसाबाहेर’ आहे. तिथं आसपास भटकणारी माकडंही येत नाहीत. मीडिया लाऊंजचा उपयोग फक्त पाणी पिण्यासाठी होतो कारण नव्या संसदेच्या कॅन्टिनमध्ये पाणी पिण्याची सुविधा उपलब्ध नाही. मजल्यावर एका टोकाला विमानतळासारखी पाणी पिण्याची सुविधा आहे, तिथून एक भांडं पाणी पिणंदेखील शक्य नाही. ‘मीडिया लाऊंज’च्या शेजारी पत्रकार परिषद घेण्यासाठी कक्ष बनवलेला आहे पण, गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सरकारने राजकीय पक्षांच्या पत्रकार परिषदांवर बंदी घातलेली आहे. जुन्या संसदभवनामध्ये दोन मोठय़ा कक्षांमध्ये अधिवेशनाच्या काळात काँग्रेस, भाजप, माकप अशा अनेक पक्षांचे नेते पत्रकार परिषद घेत असत. ही परंपरा मोदी सरकारने मोडून काढलेली आहे! करोनाच्या काळात वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसाठी दोन आडोसे उभे केले गेले. तिथे येऊन सत्ताधारी नेते प्रामुख्याने पीयुष गोयल वा प्रल्हाद जोशी बाइट देत असत. आता फक्त एकच आडोसा शिल्लक राहिलेला आहे. नव्या संसद भवनामध्ये पत्रकारांवर इतका अंकुश आहे की त्याला कोणत्याही खासदाराशी बोलता येत नाही. जुन्या संसदेमध्ये कामकाज संपल्यावर पत्रकार कक्षातून खाली येऊन बाहेरच्या लॉबीमध्ये खासदारांशी बोलू शकत होते. अनेकदा मल्लिकार्जुन खरगे, डेरेक ओब्रायन, शरद पवार अशा अनेक वरिष्ठ नेत्यांशी दोन-पाच मिनिटे का होईना बोलणं होत असे. त्यातून अनेक राजकीय घडामोडींचा अंदाज येत असे. ही खासदारांशी संवाद साधण्याची व्यवस्थाही नष्ट करण्यात आली आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार एकमेकांना भेटू शकत नाहीत तर पत्रकारांची काय कथा ? पत्रकारांना खासदार-नेते भेटण्याची शक्यता मकरद्वाराच्या आतील चौकात निर्माण झाली होती. पण, या कॉरिडोरमध्ये पाऊल टाकण्यासही पत्रकारांना मनाई करण्यात आली आहे. याच कॉरिडोरमध्ये अमित शहा, नितीन गडकरी आदी मंत्र्यांचे कक्ष आहेत. आता त्यांच्या कक्षांपर्यंत पोहोचणेही शक्य नाही. मकरद्वार हे नव्या संसदेचे मुख्य प्रवेशद्वार आहे. याच द्वारावर केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी निमंत्रण दिलेल्या बॉलीवूडमधील अभिनेत्रींनी फोटोसेशन केलं होतं. आता मात्र इथल्या परिसराची सुरक्षा यंत्रणांनी नाकाबंदी केलेली आहे. तिथं उभ्या केलेल्या अडथळय़ांच्या पलीकडं जाऊन खासदारांशी बोलता येत नाही. तिथं उभं राहून खासदार फारसं बोलत नाहीत. त्यांच्या कार आलेल्या असतात, सुरक्षा यंत्रणा या गाडय़ांना फारवेळ आवारात थांबू देत नाहीत. त्यामुळं खासदार कारमध्ये बसून निघून जातात. संसदेच्या आवारात, संसदेच्या इमारतीमध्ये, अगदी संसदेच्या आवाराबाहेर देखील दोन-चार जणांचा घोळका देखील उभा राहू दिला जात नाही. ही कथा ‘नशीबवान’ पत्रकारांची ज्यांना संसदेच्या आवारात येण्याची मुभा तरी आहे. बाकी अनेक पत्रकारांनी संसद कोसो लांब उभं राहून पाहायची. १७ वी लोकसभा आता संपुष्टात येत असल्याने जुलैमध्ये काय परिस्थिती असेल याची कल्पना करता येऊ शकेल.
अर्थमंत्र्यांचा रुद्रावतार
संसदेच्या सभागृहांमध्ये आक्रमक विरोधकांचा आवाज बंद करण्याचे दोन मार्ग असतात. पहिल्या बाकावर बसलेले अधीररंजन चौधरी, कल्याण बॅनर्जी वा दुसऱ्या-तिसऱ्या बाकावर बसलेले दानिश अली, सौगत राय या बिनधास्त नेत्यांना गप्प करायचं असेल तर त्यांच्याकडं अजिबात लक्ष न देता आपलं भाषण चालू ठेवणं किंवा मिस्किलपणे त्यांना प्रत्युत्तर देऊन त्यांच्या टोमण्यांमधील हवा काढून घेणं. बरेच मंत्री पहिला मार्ग पसंत करतात. नेहरू, इंदिरा, सोनिया-राहुल आदींवर टीका केली की, काँग्रेसवाले उसळतात मग, त्यांच्याकडं दुर्लक्ष करत भाषण पुढं न्यायचं. पण, अमित शहा, नरेंद्र मोदींसारखे पट्टीचे वक्ते दुसरा मार्ग निवडतात. टोमण्यांना टोमणे देत, हास्यमस्करी करत त्यांनी अनेकदा विरोधकांना गप्प बसवलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांचं वय बघून त्यांना माफ केलं जातं. सौगत राय यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर खरंतर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती पण, ते नेहमीच टीकेच्या प्रत्युत्तराच्या तावडीतून निसटतात. काही मंत्री विरोधकांशी संवाद साधायला तयार असतात, त्यांना विरोधकांचा राग आलेला असतो पण, त्यांच्या आवेशामुळं विरोधकांना आणखी बळ मिळतं. निर्मला सीतारामन तिसऱ्या प्रकारातील मंत्री आहेत. विरोधकांच्या प्रत्येक आक्षेपाचं त्यांना उत्तर द्यायचं असतं. श्वेतपत्रिकेवर सीतारामन दोनदा बोलल्या. प्रत्येक वेळी त्यांनी विरोधकांशी वाद घातले. लोकसभेत बसलेले केंद्री संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सातत्याने सीतारामन यांना खूण करून सांगत होते की, विरोधी सदस्यांकडं लक्ष देऊ नका, तुम्ही भाषण सुरू ठेवा. पण सीतारामन ऐकायला तयार नव्हत्या. त्यांना अरे ला कारे करायचंच होतं. मागून एका मंत्र्याने सीतारामन यांना विरोधकांना स्पष्टीकरण देऊ नका, अशी सूचना केली तर सीतारामन त्या मंत्र्यावर भडकल्या. मला उत्तर द्यावंच लागेल मंत्रीजी, असं म्हणून सीतारामन यांनी पुन्हा तलवारबाजी सुरू केली. त्यांनी इतक्या वेळी ‘अय्ययो, अय्ययो’ केलं की, सत्ताधारीही विरोधकांच्या हास्यात सामील झाले. सीतरामन काँग्रेसविरोधात जबरदस्त हल्लाबोल करत होत्या. त्यांची ही टीका श्वेतपत्रिकेतील मुद्दय़ांना धरून नव्हती. अखेर त्यांच्यासमोर बसलेल्या सोनिया गांधींनी सीतारामन यांना श्वेतपत्रिकेवर बोला अशी सूचना केली. त्यामुळं सीतारामन आणखी संतापल्या. ‘मी श्वेतपत्रिकेवरच बोलतेय मॅडम’, असं म्हणून सीतारामन यांनी काँग्रेसच्या कुकर्मावर बोट ठेवलं. त्यावर ‘झूठ, झूठ’ आरोळय़ा ऐकू आल्या. झूठ हा शब्द असंसदीय ठरवला गेल्यामुळं सीतारामन यांनी वारंवार लोकसभाध्यक्षांना असंसदीय शब्द इतिवृत्तातून काढून टाका, अशी विनंती केली. संसदेच्या सभागृहांमधील सीतारामन यांचं भाषण म्हणजे अर्थमंत्र्यांचा रुद्रावतार होता.
९१ व्या वर्षी ‘रोमान्स’
दोन कर्नाटकी नेत्यांमध्ये एक आहेत ऐंशी पार आणि दुसरे आहेत नव्वद पार.. या दोघांच्या नात्याला वरिष्ठांच्या सभागृहात उजाळा मिळाला. हे नेते म्हणजे खरगे आणि देवेगौडा. दोन्हीही राष्ट्रीय स्तरावरील नेते, सगळी हयात त्यांनी राजकारणात घालवली. राजकारणातील अनेक घटना, टप्पे, आघाडय़ा-युत्या, नेते-त्यांचे किस्से असा अनुभवांचा खजिना या दोघांकडं आहे. खरगेंनी कधी काँग्रेस पक्ष सोडला नाही आणि देवेगौडांनी जनता दल सोडले नाही. त्यांचं राजकारण बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात तर, क्वचित प्रसंगी सोबत झालं. देवेगौडा पंतप्रधान होऊ शकले पण, खरगेंची कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याची देखील संधी हुकली. देवेगौडांचे पुत्र कुमारस्वामी काँग्रेसच्या पािठब्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. २०१९ मध्ये जनता दलापेक्षा काँग्रेसच्या जागा अधिक होत्या. कदाचित खरगे मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण, सोनिया गांधींनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जनता दलाशी आघाडी करून कुमारस्वामींना मुख्यमंत्री केलं. हे सरकार टिकलं नाही, त्याचा देवेगौडांना राग आला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी आघाडी केली नाही. आता तर काँग्रेसवरील रागापोटी त्यांनी भाजपशी युती केली आहे. कुमारस्वामींचं सरकार काँग्रेसमुळं गेलं. काँग्रेस जनता दलाला वाढू देणार नाही, म्हणून आम्ही भाजपशी युती केली असं देवेगौडा राज्यसभेत म्हणाले. देवेगौडांचा हा तक्रारीचा सूर खरगेंबद्दल नाही, तर काँग्रेस हायकमांडबद्दल होता. खरगेंची त्यांनी स्तुती केली. असं असलं तरी खरगेंचं आत्तापर्यंत कधी देवेगौडांशी फारसं पटलं नाही. देवेगौडांनी भाजपशी युती करणं आणि मोदींचं कौतुक करणंही खरगेंना आवडलेलं दिसत नाही. ‘देवेगौडांनी सेक्युलॅरिझम, समाजवादी, शेतकरी आंदोलन सगळे केलं पण, आता त्यांनी मोदींना इतकी घट्ट मिठी मारली आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचा हा भाजपशी रोमान्स सुरू आहे.. देवेगौडांनी कधी कोणाची प्रशंसा केलीच नाही. कर्नाटकमध्ये आम्ही दोघांनी राजकारण केलेलं आहे. पण, कोणाचं कौतुक केल्याचं कधी पाहिलं नाही. पण, तुमचं (मोदी) त्यांनी इतकं कौतुक केलं की, काय विचारता?.. मोदी हे एकमेव नेते आहेत, ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, असं देवेगौडा म्हणतात. भाजपशी हे प्रेम प्रकरण आधी झालं असतं तर बरं झालं असतं खरगेंचं हे वाक्य ऐकून सभागृहात मोदीही हसायला लागले.