दिल्लीवाला
पंतप्रधान मोदीच नव्हे तर त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांचं व्यक्तिमत्त्वही बहुआयामी आहे. एकाचवेळी ते मंत्रालयाचं काम बघत असतात, सभा-समारंभांना उपस्थित राहतात, चर्चामध्ये सहभागी होतात. देश-विदेशचे दौरे करतात, अखंड प्रवास करत असतात. तरीही त्यांच्याकडे वेगळं काही तरी करण्यासाठी वेळ असतो. काही केंद्रीय मंत्र्यांनी वेळात वेळ काढून पुस्तकंही लिहिलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंदर यादव यांनीही ‘राइज ऑफ भाजप’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. मोदींचे गुरू लालकृष्ण अडवाणींचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावियादेखील पुस्तक लिहित आहेत. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या अनुभवावर आधारित पुस्तकांची तयारी ते करत आहेत. ‘मनाचे श्लोक’ लिहिणं सोपं असू शकतं पण, आरोग्यासारख्या गंभीर विषयावर संशोधनावर आधारित पुस्तक लिहिणं हे कष्टाचं काम आहे. मंडाविया यांच्याकडे आरोग्य मंत्रालयासारखं महत्त्वाचं मंत्रालय आहे, त्याचा व्यापही खूप. आता तर मंडाविया लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. राज्यसभेवर निवडून येण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची मर्जी सांभाळावी लागते, तिथं निवडून येणं सोपं असतं. लोकसभेत लोकांच्या मर्जीवर तुमचं भवितव्य अवलंबून असतं. यावेळी मंडावियांनी राजकीय भविष्य पणाला लावलेलं आहे. तरीही ते पुस्तक लिहिण्याचा विचार करत आहेत.
भाजपच्या कार्यालयात अज़ान
दिल्लीच्या दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयात लोकसभा निवडणुकीमुळे अचानक गर्दी वाढू लागली आहे. नेते, कार्यकर्ते, हौशे नौशे गौशे असे सगळेच दिसू लागले आहेत. इतरवेळी भाजपचं कार्यालय ओस पडलेलं असतं. शाळेला सुट्टी लागल्यानंतर शाळेत जशी सामसूम असते तशी अवस्था या प्रचंड कार्यालयाची असते. लोकसभेची निवडणूक असल्याने इथली शाळा भरलेली आहे आणि गोंगाटही ऐकू येऊ लागला आहे. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे. भाजपच्या नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांना पक्षाने नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त बांसुरी यांची पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बांसुरी यांची मुख्यालयातील पहिलीच पत्रकार परिषद असल्यामुळे त्या काय बोलणार याची उत्सुकता होती. बराच वेळ वाट पाहूनही बांसुरी आल्या नाहीत. त्या अन्य कार्यक्रमामध्ये व्यग्र असल्याने त्यांना मुख्यालयात येणं जमलं नसावं. पत्रकार तसेच बसून होते, अखेर पक्षाने महिला दिनावर बोलायला प्रवक्ते शहजाद पुनावाला यांना पाठवलं. त्यांनी जबरदस्त किल्ला लढवला. त्यांच्याकडे खरंतर बोलण्यासारखं काही नव्हतं, नेमका मुद्दाही नव्हता. तरीही ते पश्चिम बंगालमधील संदेशखालीच्या मुद्दय़ावर तावातावाने बोलत होते. या प्रकरणातील आरोपी शेख शाहजहाँ याला ममता बॅनर्जी सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तृणमूल काँग्रेस मतांचं राजकारण करत आहे, हा तुष्टीकरणाचा प्रकार आहे, असा युक्तिवाद पुनावाला करत असताना अचानक अज़ान सुरू झाली. सगळेच चपापले. भाजपच्या कार्यालयात अज़ान? एवढी हिंमत कोणी दाखवली? कोणालाही कळेना अज़ान कुठून ऐकू येत आहे. एकदम शांतता पसरली. पुनावाला यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे होते. त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर एक महाशय मोबाइल पाहण्यात गर्क होते, त्यांना पत्रकार परिषद सुरू आहे याचंही भान नसावं. यू टय़ुबवरील रील बघता बघता एका रीलवर त्यांची बोटं थबकली आणि अज़ान सुरू झाली. मोबाइलचा आवाज मोठा होता, क्षणभर का होईना अज़ानचा आवाज घुमला! कोणीच बोलायला तयार नव्हतं. अखेर पुनावालांनी, आपल्या देशात मोबाइल डाटा इतका स्वस्त आहे की.. असं म्हणत पत्रकार परिषद आवरती घेतली.
दुसरी यादी कधी?
काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आली खरी, पण सगळय़ांना उत्सुकता होती की राहुल गांधी अमेठीमधून लढणार की नाही? राहुल गांधी वायनाडमधून लढणारच आहेत, अमेठीतून स्मृती इराणींविरोधात उभे राहणार का हे सांगा, हा पत्रकारांचा एकच प्रश्न होता. संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांना या प्रश्नाची अपेक्षा होतीच. त्यांनी हसत हसत प्रश्नाला बगल दिली. आम्ही उत्तर प्रदेशवर चर्चा केलेली नाही. आम्ही ६० जागांवर चर्चा केली, आत्ता ३९ जागांची यादी जाहीर करतोय. ११ तारखेला पुन्हा चर्चा करू. मग, तुम्हाला कळेलच, असं म्हणत अमेठीचा मुद्दा गुलदस्त्यात ठेवला. पण, उत्तर प्रदेशच्या नेत्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अमेठी आणि रायबरेलीतून लढलंच पाहिजे असा आग्रह धरलेला आहे. त्यामुळे निदान राहुल गांधी तरी अमेठीतून लढणार असं गृहीत धरलं जाऊ लागलं आहे. तिकडे भाजपमध्येही दुसऱ्या यादीची चर्चा होऊ लागली आहे. पहिली यादी जाहीर होऊन आठवडा होऊन गेला तरी पक्षातून काही हालचाल होत नसल्याने उत्सुकता ताणली गेली आहे. भाजपच्या विविध राज्यांतील जागावाटपासंदर्भात कोअर ग्रुपच्या रात्ररात्र बैठका होत आहेत. एकाच दिवशी चार-चार राज्यांचे नेते दिल्लीत येऊन दाखल होत आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल अशी आशा सगळेच बाळगून आहेत. ही बैठक लगेचच होईल अशी चर्चा होत होती. पण, ‘एनडीए’तील घटक पक्षांशी जागावाटपासंदर्भातील बोलणी संपलेली नाहीत. महाराष्ट्र, बिहार या दोन्ही प्रमुख राज्यांमधील प्रादेशिक पक्ष भाजपवर नाराज झालेले आहेत. त्यांना भाजपकडून अधिक जागा मिळण्याची अपेक्षा आहे, पण भाजप त्यांचं म्हणणं ऐकायला तयार नाही. चर्चेच्या फेऱ्या होऊनही वाद मिटत नाही. ही बोलणी होत नाहीत तर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेऊन फायदा काय, असा विचार भाजपचे नेते करत आहेत. शिवाय, मोदीही दिल्लीत नाहीत. त्यांना वेळ मिळाल्याशिवाय समितीची बैठक होऊ शकत नाही. शहा-नड्डा यांनी तयार केलेल्या उमेदवारांच्या यादीवर मोदी आक्षेप घेत नाहीत पण, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय दुसरी यादी जाहीर करता येत नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यालयात डोकावणारे विचारत आहेत की दुसरी यादी कधी?
म्हणून पक्षाचा विस्तार करायचा!
काँग्रेसच्या एका बडय़ा नेत्याकडे वेगवेगळय़ा क्षेत्रांतील मान्यवर जमलेले होते. काही राजकारणीही होते, त्यामध्ये बिगर-काँग्रेस नेतेही होते. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे चर्चा जागावाटपावर होणारच. ‘इंडिया’ आघाडीमध्ये एकत्र आलेले पक्ष आत्ता काँग्रेसशी जुळवून घेत असले तरी, त्यांचा उदय काँग्रेस विरोधातून झालेला आहे. काँग्रेसचा वरचष्मा त्यांना आवडत नाही.
या नेत्यांचं म्हणणं होतं की, काँग्रेसकडे ताकद उरलेली नाही. आम्ही नाइलाज म्हणून दोन जागा तरी त्यांना द्यायला तयार झालोय. त्या मतदारसंघांमध्ये आमचेच आमदार आहेत. आमच्याच आमदारांच्या ताकदीवर काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणावं लागेल. मग, कशाला काँग्रेसला जास्त जागा सोडायच्या? जागावाटपाच्या भांडणामध्ये दोन्ही पक्षांमध्ये बिनसलं. आता चर्चा होण्याची शक्यता संपुष्टात आलेली आहे. काँग्रेससोबत ही भांडणं टाळायची असतील तर प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्याबाहेर पक्षाचा विस्तार केला पाहिजे. तसं झालं तर ‘बार्गेिनग पॉवर’ निर्माण होते. मग, आमच्या राज्यांत दोन जागा दिल्या तर तुमच्या राज्यात आम्हाला दोन जागा मिळाल्याच पाहिजेत असा आग्रह धरता येईल. आता प्रादेशिक पक्षांची ताकद फक्त त्यांच्या राज्यापुरती असल्याने काँग्रेसशी ‘सौदेबाजी’ करता येत नाही, हा नेत्यांचा युक्तिवाद होता.
खरंतर या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी हा विचार अमलात आणला आहे. केजरीवाल यांनी तीन-चार वर्षांत दिल्लीबाहेर आपलं बस्तान बसवलं आहे. आधी दिल्ली मग, पंजाब, हळूच गुजरात, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंड अशा राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार केला आहे. त्याच जिवावर तर ‘आप’ने दिल्लीत काँग्रेसशी जागावाटप केलेलं आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ‘आप’चा फटका बसला होता. ‘आप’ची मतांची टक्केवारी वाढली, काँग्रेसची कमी झाली. भाजपने टक्केवारी टिकवली. प्रादेशिक पक्षांच्या विस्ताराचं कारण काँग्रेसशी बरोबरी हेच असावं.