काँग्रेसच्या बेळगावीमध्ये झालेल्या अधिवशेनामध्ये ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ ही देशव्यापी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता. बेळगावीमध्ये मोठी जाहीरसभाही होणार होती. पण, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं ही सभा रद्द झाली. आता ही सभा २१ जानेवारी होईल आणि या मोहिमेची सांगता २७ जानेवारीला मध्य प्रदेशात महूमध्ये होणार आहे. महू हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मगाव आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसनं ‘संविधान बचाओ’चा मुद्दा हाती घेतलेला आहे. लोकसभेनंतर झालेल्या हरियाणा-महाराष्ट्र या दोन राज्यांतील विधानसभांमध्ये काँग्रेसच्या या मुद्द्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही पण, संविधानाचा मुद्दा सोडायचा नाही असं राहुल गांधीचं म्हणणं आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतील पहिल्या प्रचारसभेलाही ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ म्हटलं गेलं. शनिवारी बिहारमध्ये पाटण्यात राहुल गांधींनी ‘संविधान बचाओ’ची सभा घेतली. निवडणुकांमध्ये यश मिळो वा न मिळो काँग्रेस संविधानाच्या मुद्द्यावरच लक्ष केंद्रित करणार असं दिसू लागलं आहे.

हेही वाचा : तळटीपा : आत्मलुब्धांचं वर्गचरित्र!

काँग्रेसच्या दारातील ‘भिक्षेकरी’?

लोकशाहीसाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाच्या उद्घाटनावरून गेले तीन-चार दिवस वाद रंगला होता. हा वाद काँग्रेसने नाहक का निर्माण केला हे समजले नाही पण, नंतर शनिवारी तडजोड झाली. ४६ वर्षांनंतर काँग्रेसचं मुख्यालय २४ अकबर रोडवरून कोटला रोडवर स्थलांतरित झालं. उद्घाटनाचा कार्यक्रम काँग्रेसनं आपल्या-आपल्यात उरकून घेतला. दोन वृत्तसंस्था वगळता एकाही पत्रकाराला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं गेलं नाही. काँग्रेस बीट बघणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मुख्यालयाचं उद्घाटन १५ जानेवारीला किती वाजता होणार हे समजल्यावर ते स्वत:च सकाळी दहा वाजता ‘९-अ कोटला’ रोडवरील कार्यालयासमोर पोहोचले. पण, त्यांना प्रवेशच मिळाला नाही. हे सर्व पत्रकार नियमितपणे काँग्रेसच्या पत्रकार परिषदांचं, कार्यक्रमांचं वृत्तांकन करतात. काँग्रेसचं मुख्यालयाचं उद्घाटन पत्रकारांना मुख्यालयाच्या मुख्य द्वारासमोर ताटकळत ठेवून केलं गेलं. उद्घाटनानंतर बाहेर आलेल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेण्याशिवाय पत्रकारांना पर्याय उरला नाही. काँग्रेसच्या दारात पत्रकारांची अवस्था एखाद्या भिक्षेकऱ्यासारखी झाली होती. काँग्रेसनं पत्रकारांचा इतका अपमान कधी केला नसेल. काँग्रेसने दिलेल्या नगण्य वागणुकीमुळे सगळ्यांचा रागाचा पारा चढलेला होता. पत्रकारांनी ही लोकशाहीविरोधी बाब समाजमाध्यमांवरून व्हायरल केली. काँग्रेसवर पक्षाच्या बातम्या देणारेच चिडलेले होते. पत्रकारांनी काँग्रेसच्या लोकशाहीविरोधी कृत्याची बाब थेट सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंपर्यंत पोहोचवली. काँग्रेसच्या नेत्यांचा फाजीलपणा केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचल्यामुळं काँग्रेसची अडचण झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या हाती कोलीत द्यायला नको असा विचार करून काँग्रेसच्या नेत्यांनी तडजोडीची भूमिका घेतली. अकबर रोडवरील मुख्यालयात दोन नेत्यांनी पत्रकारांना अनौपचारिक गप्पांसाठी बोलवलं आणि दादापुता करून प्रकरण मिटवलं. पत्रकारांनीही तडजोड मान्य केली. मग, ठरलं की शनिवारी नव्या मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित करायची. पत्रकारांना जेवायला घालायचं. काँग्रेस बीटवाल्या पत्रकारांना निरोप दिले गेले. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची महती सांगितली गेली आणि मुख्यालयातील पाचपैकी चार मजल्यांची धावती भेट घडवून आणली गेली. काँग्रेसवाले अडचणीची प्रकरण अलगदपणे मिटवून टाकतात. पत्रकारांना दिलेल्या वाईट वागणुकीचं प्रकरणही जेवण देऊन मिटवून टाकलं गेलं. उद्घाटनाच्या कार्यक्रमापासून पत्रकारांना वंचित ठेवण्यामागे दोन नेत्यांचं डोकं असावं असं मानलं जातं. एक नेते पक्षापेक्षा राहुल गांधींचे अधिक निष्ठावान असल्याचं बोललं जातं आणि दुसरे नेते मसुदा लिहिण्यात माहीर आहेत. या नेत्यांवर समाजमाध्यमांतून खरपूस टीका होऊ लागली आहे. काहींनी तर हे दोन नेते भाजपचे ‘स्लीपरसेल’ असल्याचाही शोध लावला. ‘स्लीपरसेल’ म्हणणं ही अतिशयोक्ती झाली. पण, पत्रकारांना अडवून काँग्रेसलाही भाजपचं वारं लागलं का, अशी चर्चा पत्रकारांमध्ये रंगली होती. तसंही काँग्रेसच्या नव्या मुख्यालयापासून भाजपचं मुख्यालय जमतेम एक किमीवर आहे! जुन्या मुख्यालयात पत्रकारांचा वावर सर्वत्र असे. तिथं खुलेपणा होता. आता नव्या मुख्यालयात पत्रकारांचा वावर फक्त तळमजल्यावरच असेल. वरच्या मजल्यावर जायचं असेल तर परवानगी लागेल. असा मज्जाव तर भाजपच्यादेखील मुख्यालयात नाही. तिथं तळमजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या कक्षामध्ये जाण्याची पत्रकारांना मुभा आहे. काँग्रेसने बहुधा ‘माकप’चा कित्ता गिरवायला सुरुवात केली असावी. गोल मार्केटमधील ‘माकप’च्या मुख्यालयात परवानगीशिवाय वरच्या मजल्यावर जाता येत नाही. मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांमध्ये आधीच काँग्रेसला जागा कमी दिली जाते, त्यात काँग्रेसवाले बीट पत्रकारांनादेखील दूर ठेवू लागले आहेत. बीट पत्रकारांनी फार मनाला लावून घेतलं नाही म्हणून बरं झालं.

हेही वाचा : काळाचे गणित : सरकती संक्रांत

दिल्लीत कोण?

दिल्ली विधानसभेचं वारं वाहू लागल्यापासून एका नावाची अधूनमधून चर्चा ऐकू येत होती ते नाव म्हणजे भाजपच्या माजी खासदार स्मृती इराणी. मध्यंतरी इराणी दिल्लीत एक-दोन ठिकाणी दिसल्याही. दिल्लीतील भाजपचे ज्येष्ठ नेते विजय गोयल यांच्या निवासस्थानी त्यांच्या नावाची पाटी लावली गेली तेव्हा इराणी या ‘नामकरण’ सोहळ्याच्या कार्यक्रमात दिसल्या. अमेठीत पराभव झाल्यानंतर त्या तिकडं फिरकल्याच नाहीत असं सांगितलं जातं. दिल्लीतही त्यांचा सार्वजनिक वावर कमी झालेला आहे. एखाद-दोन वेळा त्यांनी भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली इतकंच. पण, इराणी मूळच्या दिल्लीच्या असल्यानं त्यांना कदाचित दिल्लीच्या निवडणुकीत उतरवलं जाईल असं म्हटलं जात होतं. तशी भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्ये चर्चादेखील झाली असं सांगितलं जातं. त्यानंतरही त्यांचं नाव उमेदवारांच्या यादीत समाविष्ट झालं नाही. इराणींना डावलण्यामागं दोन कारणं दिली जातात. त्यांना दिल्लीच्या निवडणुकीत उतरवलं तर त्यांनी अमेठी कायमचं सोडलं असं मानलं जाऊ शकतं. काँग्रेससमोर भाजप नमलं असाही अर्थ काढला जाईल. त्यापेक्षा इराणींना दिल्लीपासून लांब ठेवलेलं बरं असं बहुधा ठरलं असावं. शिवाय, दिल्लीत ‘पॅराशूट’ उमेदवार देऊन पक्षाला किती लाभ होणार असाही विचार केला असं म्हणतात. शेवटच्या क्षणी केजरीवालांविरोधात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणूनही इराणींना उभं करता येणार नाही. मग, इराणी ७० उमेदवारांपैकी एक होतील. त्यामुळं इराणींचं नाव मागं पडलं असं सांगितलं जातं. भाजपनं इराणींना पंतप्रधान संग्रहालयाच्या कार्यकारिणी समिती सदस्य केलं आहे. इराणींकडं काही कामच नाही असं नाही.

हेही वाचा : बुकमार्क : ‘जोडी नंबर १’चे फसलेले आडाखे!

अखेर नरसिंह रावांना जागा मिळाली!

काँग्रेसच्या मुख्यालयाच्या उद्घाटनाचा वाद सोडून द्या… या मुख्यालयातील विशेष बाब म्हणजे इथे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मानाचं स्थान मिळालेलं आहे! स्वातंत्र्यापासून म्हणजे १९४७ पासून २०२३ पर्यंतच्या काँग्रेसच्या प्रवासाचं चित्रण वेगवेगळ्या मजल्यांवर केलेलं पाहायला मिळतं. काँग्रेसचे पंतप्रधान नेहरूंपासून मनमोहन सिंगपर्यंत आणि काँग्रेसचे पक्षाध्यक्ष नेहरूंपासून मल्लिकार्जुन खरगेंपर्यंत अशा विविध नेत्यांच्या सत्ताकाळातील काँग्रेसने घेतलेले महत्त्वाचे आणि दिशादर्शक निर्णय-घटनांचा ओघवता प्रवास पाहायला मिळतो. या प्रवासात आर्थिक उदारीकरणाच्या निर्णयाचाही समावेश होतो. देशाच्या अर्थकारणाला वळण देणाऱ्या निर्णयाचे श्रेय माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना देण्यात आले आहे. चौथ्या मजल्यावर नरसिंह राव यांचे मोठे छायाचित्रही पाहायला मिळते. काँग्रेसचे नवे मुख्यालय, इंदिरा भवन पाच मजली आहे. सर्वात वरच्या मजल्यावर पक्षाध्यक्ष खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींची दालने आहेत. उर्वरित चार मजल्यावर राष्ट्रीय महासचिवांपासून काँग्रेसच्या विविध संघटनांच्या अध्यक्षांची दालने आणि त्यांची कार्यालये आहेत. दुसऱ्या मजल्यावर मोठे अत्याधुनिक सभागृह आहे. काँग्रेसच्या जवाहर भवनातील सभागृहाइतकेच हे सभागृह मोठे आहे. महत्त्वाच्या पत्रकार परिषदाही इथे घेतल्या जाऊ शकतात. तळमजल्यावर ग्रंथालयालाही जागा देण्यात आली आहे. शिवाय, पत्रकार कक्ष, पत्रकारांसाठी छोटेखानी लाऊंज अशा सगळ्या सोयी-सुविधांनी युक्त असे हे मुख्यालय काळानुरूप बनवलेले आहे. काँग्रेस हा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा हा पक्ष साक्षीदार आहे. त्यामुळं अशा असंख्य घटनांची छायाचित्रं काँग्रेसकडं आहेत आणि ती तळमजल्यापासून पाचव्या मजल्यापर्यंत प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक कक्षामध्ये विखुरलेली आहेत. ही छायाचित्रं बघताना देशाचा १५० वर्षांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. अख्खं काँग्रेसचं मुख्यालय म्हणजे ऐतिहासिक खजिना म्हणता येईल. ‘इंदिरा भवन’ हे एक संग्रहालयच बनलेलं आहे. नव्या मुख्यालयात जपलेला हा ठेवा पाहिल्यावर इंदिरा भवन बांधल्याचं थोडंतरी कौतुक करायला हवं!

Story img Loader