राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांच्या पक्षाला मोदींनी मंत्रीपद दिलंच नाही. कोणीतरी म्हणालं की, मोदींनी मंत्रीपदाचा फॉर्म्युला काढलाय. चार खासदारांमागं एक मंत्रीपद. मंत्री करण्याचा हा काही नियम नव्हता. माध्यमांना काहीतरी बातम्या द्याव्या लागतात म्हणून नेतेच अशा नवनवीन गोष्टी माध्यमांना पुरवत असतात. नाही तर फक्त एक खासदार असलेल्या जीतन मांजी वा अनुप्रिया पटेल यांना मंत्रीपद कसं मिळालं असतं? राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यमंत्रीपद देऊ केलं होतं, पण केंद्रीय मंत्रीपद द्यायचं नाही असं आधीच ठरलेलं होतं असं म्हणतात. राज्यमंत्रीपद मिळालं असतं तर सुनील तटकरेंचा फायदा झाला असता. खरंतर अत्यंत अवघड मतदारसंघातून जिंकून ते लोकसभेत पोहोचले आहेत, त्यांनाच मंत्रीपद मिळायला हवं होतं. मी जिंकून आलोय, तर मग राज्यसभेतील खासदाराला मंत्रीपद का, हा प्रश्न तटकरेंनी विचारला. त्यामुळे तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यामध्ये रुसवा-फुगवा होणं साहजिकच होतं. आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभा मिळून तीन खासदार आहेत. तटकरे लोकसभेत, पटेल आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे दोघे राज्यसभेत. पटेलांनी राजीनामा दिला त्या जागेवर सुनेत्रा पवारांना संधी दिली गेली. वंदना चव्हाण निवृत्त झाल्या, त्यांच्या जागी पटेल आले. साताऱ्याची जागा उदयनराजेंना दिली, त्यांची राज्यसभेतील रिक्त जागा राष्ट्रवादीला मिळेल. त्यामुळं राज्यसभेत राष्ट्रवादीचे दोनाचे तीन खासदार होतील. समजा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला लावला तर पुन्हा मंत्रीपदाचे दावेदार पटेलच. मग, लोकांमधून निवडून आलेले तटकरे पुन्हा बाजूलाच राहणार. मंत्रीपद न मिळाल्याची कसर ते लोकसभेत आक्रमक भाषणातून भरून काढताना दिसले. आम्ही ‘ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस’ म्हणत त्यांनी ताईंना टोला दिला. त्याची परतफेड दुसऱ्या दिवशी अमोल कोल्हेंनी केली हा भाग वेगळा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिस्टर नो...

लोकसभेतील नवनियुक्त महिला खासदार सभागृहातील कामकाज पाहून काहीशा नाराज झाल्या होत्या. त्यांना सभागृहातील गोंधळ नवा नव्हता. त्यांनी विधानसभेच्या आमदार म्हणून काम केलेले आहे. पण, लोकसभेतील कारभार त्यांना आश्चर्यचकित करून गेला असावा. विरोधी पक्षनेत्यांचे माइक बंद होणे वगैरे प्रकारामुळं ‘ही तर अधिकारशाही झाली’ असं त्याचं म्हणणं होतं. त्या काँग्रेसच्या खासदार असल्यानं त्यांनी टिपिकल विरोधी प्रतिक्रिया दिली असावी. पण, या महिला खासदारांना लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांचा अतिरेकी उत्साह भावला नसावा. गेल्या लोकसभेत बिर्ला फक्त विरोधी पक्षांतील नेत्यांना समज देत असत. यावेळी त्यांना आत्मविश्वास वाढलेला दिसतो. ते भाजपच्या नेत्यांनाही समज देऊ लागले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेची सुरुवात भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी केली. अनुराग ठाकूर हे भाजपमधील उद्दाम नेत्यांपैकी एक. भाजपचे असे नेते सभापतींकडे बघून भाषण न करता विरोधी सदस्यांशी थेट संवाद साधून वाद निर्माण करतात. गेल्यावेळी रमेश बिधुडी, रवीशंकर प्रसाद या नेत्यांचे असे प्रताप दिसलेले आहेत. यावेळी अनुराग यांनीही त्यांचा कित्ता गिरवायला सुरुवात केल्यावर बिर्लांनी त्यांना समज देऊन माफी मागायला लावली. अनराग ठाकूर मंत्री असते तर कदाचित हे धाडस बिर्लांनी केलं नसतं. पण, सत्तेची हवा कुठून कुठं वाहू लागली याचा अचूक अंदाज असलेल्या बिर्लांनी अनुराग ठाकूरांना ठणकावलं. मोदींनी रवीशंकर प्रसाद यांना जशी जागा दाखवून दिली तशी ठाकूरांनाही दाखवली. मग, बिर्लांनीही आपलं अस्तित्व दाखवून दिलं. पण, यावेळी विरोधकांनी बिर्लांना सातत्याने अडचणीत आणलं हे मात्र खरं. या विरोधकांचं काय करायचं हा त्यांना प्रश्न पडलेला असावा असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. मोदी भाषण करत होते आणि विरोधक त्यांच्या चेहऱ्यासमोर ओरडत होते. त्यांना सभागृहाबाहेरही काढता येत नव्हतं आणि मोदींना थांबवताही येत नव्हतं. विरोधकांनी मोदींनाच सातत्याने पाणी प्यायला लावलं तर बिर्लांचं काय होणार? मोदी पाणी पिताना थांबले की, तेवढीच संधी साधून बिर्ला विरोधकांना समज देत होते. गेल्या पाच वर्षांत बिर्लांची सभागृहात कोंडी झालेली पहिल्यांदा दिसली! खरंतर बिर्ला हे हसतमुख व्यक्ती आहेत. त्यांना कोणाला दुखवायला आवडत नाही. पहिल्या वेळी बिर्ला लोकसभाध्यक्ष झाले तेव्हा त्यांना लॉटरी लागली असं म्हटलं जात होतं. पहिल्या दोन-तीन वर्षांमध्ये बिर्लांचे विरोधी पक्षनेत्यांशीही वैयक्तिक संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेसचे नेते सहकुटुंब त्यांच्या घरी जात. अखेरच्या दोन वर्षांमध्ये त्यांना विरोधकांशी सक्तीने वागण्याचा आदेश ‘वरून’ दिला गेला असावा. मग, बिर्लांनी व्यवहाराला प्राधान्य दिलं. त्यानंतर त्यांचं विरोधकांना दरडावणं आणि ‘नो-नो’ असं म्हणणं वाढत गेलं. ते इंग्रजीत ‘नो’ एवढाच शब्द उच्चारतात. त्यामुळं बॉण्डच्या सिनेमातील ‘डॉ. नो’प्रमाणं ते लोकसभेतील ‘मिस्टर नो’ झाले आहेत!

इथं मैफल रंगत नाही!

राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार एकट्याच बसलेल्या दिसल्या. त्यांना राजकारण नवं नाही पण, थेट संसदेमध्ये जाऊन खासदार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणं ही पूर्ण वेगळी गोष्ट असते. सुनेत्रा पवार नव्या वातावरणाचा अंदाज घेताना दिसल्या. संसदेचं कामकाज संगणकीकृत झाल्यामुळं अनेक नव्या खासदारांना तिथल्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावं लागतं. लोकसभेतही अडीचशेहून अधिक खासदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळं बहुतांश खासदार तंत्रज्ञानाची ओळख करून घेत आहेत. आपल्या पक्षाच्या जुन्या सोबत्यांना विचारत विचारत कामकाजात सहभागी होताना दिसत आहेत. नव्या खासदारांना एकटंही वाटू शकतं. पण, संसदेच्या कामकाजामध्ये रुळल्यावर प्रभाव टाकण्याची संधी सभागृहात प्रत्येकाला मिळते. सुनेत्रा पवार यांनाही आगामी काळात ती मिळू शकेल. गेल्या लोकसभेत शिवसेनेच्या तत्कालीन खासदार कलाबेन डेलकर होत्या. त्या ठाकरे गटासोबत राहिल्या पण, त्या एकट्या असत. कोणत्याही गटात त्या सामील झालेल्या दिसल्या नाहीत. प्रश्नोत्तराच्या तासाला त्या प्रश्न विचारत पण, त्यांना बोलण्याची संधी फारशी मिळाली नाही. ठाकरे गटाकडून विनायक राऊत वा अरविंद सावंत बोलत असत. डेलकर कधी महिला खासदारांच्या गटातदेखील फारशा रमलेल्या दिसल्या नाहीत. यावेळी त्या भाजपच्या खासदार म्हणून लोकसभेत आल्या आहेत. काही खासदार आपापल्या पक्षांच्या खासदारांसोबत राहतात. काहींचा संचार सर्वपक्षीय असतो. पूर्वी असे खासदार जुन्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात हमखास दिसत. शरद पवार, दिग्विजय सिंह अशा ज्येष्ठ नेत्यांभोवती इतरांचा गराडा असे. तिथे लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातील खासदारांची मैफल जमलेली असे. आता ही संधीच मिळत नाही कारण नव्या संसदेत मध्यवर्ती सभागृहच नाही! मध्यवर्ती सभागृहात न रमणारे काही खासदार या सभागृहाच्या समोर असलेल्या छोट्या ग्रंथालयात दिसत. आता नव्या संसदेमध्ये दोन्ही सभागृहांसाठी वेगवेगळी कॅन्टिन आहेत, तिथं त्यांना जाऊन बसता येतं. पण, पूर्वीसारखी मैफल इथं रंगत नाही!

अवधेश अवतरले!

लोकसभेत गेली दहा वर्षे सोनिया गांधी जिथे बसत असत, त्या पहिल्या रांगेतील आसनावर समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद बसले होते. अवधेश यांनी ती जागा पटकावली अशी विनाकारण चर्चा रंगली होती, पण त्यांचं ‘इंडिया’ आघाडीसाठी वेगळं महत्त्व आहे. खरंतर त्यांना जाणीवपूर्वक पहिल्या रांगेत अखिलेश यादव यांच्याशेजारी बसवण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘सप’चे सगळेच खासदार वाजतगाजत लोकसभेत आले. गमछा आणि लाल टोपी घालून अवधेश प्रसाद यांना अखिलेश यांनी पहिल्या रांगेत बसवून घेतलं. अवधेश प्रसाद फैजाबाद इथले म्हणजे अयोध्येचे खासदार आहेत. दलितांमधील पासी समाजाचे ते प्रतिनिधित्व करतात. ‘भाजपला ४०० जागा द्या, संविधान बदलू’, अशी गर्जना करणाऱ्या भाजपच्या लल्लू सिंह या उठवळ नेत्याचा अवधेश यांनी पराभव केल्यामुळं त्यांना पहिल्या रांगेत बसवून विरोधकांनी भाजपला डिचवलं! अवधेश यांचं लोकसभेतलं पहिलंच भाषण लक्षवेधी होतं. अयोध्येच्या पुनर्निर्माणाच्या नावाखाली शहराची वाताहात झाली आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. हिंदूंचं रोम बनवायला निघालेल्या अयोध्येतच भाजपच्या वाट्याला पराभवाची नामुष्की आल्यामुळं अवधेश प्रसाद यांचा शाब्दिक मार खाण्याशिवाय सत्ताधारी बाकांवरील सदस्यांना काहीच करता आलं नाही. लोकसभेत अयोध्येतून राम नव्हे तर अवधेश अवतरले आहेत. भाजपला आता पुढील पाच वर्षं त्यांना सहन करावं लागेल.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chandani chowkatun dilliwala nationalist congress ajit pawar ministership amy
Show comments