दिल्लीवाला
भाजपमध्ये नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची पक्षातील नेते वाट पाहात आहेत. पण, काँग्रेसमध्ये एकामागून एक प्रयोग सुरू झालेले आहेत. अनेक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले जात आहेत. महाराष्ट्राला नवा प्रदेशाध्यक्ष मिळालेला आहे. आता बिहारमध्ये राजेश कुमार या तरुण दलित नेत्याकडे पक्ष सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा पहिल्यांदाच दलित प्रदेशाध्यक्ष असेल. या बदलामागे दोन समीकरणं असल्याचं सांगितलं जातं. ‘इंडिया’ वा ‘यूपीए’तील घटक पक्षांसमोर न झुकणारा तसंच भाजपशी तडजोड न करणारा प्रदेशाध्यक्ष हवा! राजेश कुमार या दोन्ही निकषात बसतात. बिहारमध्ये काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोणीही असो. पदाची जबाबदारी घेतली की तो थेट लालूप्रसाद यादव यांचे आशीर्वाद घ्यायला जातो असं म्हणतात. त्याने लालूंसमोर मान झुकवली की पक्षालाही वाकावं लागतं. हा मुजरा करण्याची सरंजामी काँग्रेसला मोडून काढायची आहे. राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला पण, ते लालूंना भेटायला गेले नाहीत. त्यांनी राज्यभर दौरे आयोजित केले आहेत. जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन लोकांच्या भेटी घेण्याला प्राधान्य दिलं आहे. बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक असून काँग्रेसला राष्ट्रीय जनता दलाशी युती टिकवायची आहे. पण, लालूंसमोर झुकायचं नाही. जागावाटपात कमी जगा मिळाल्या तरी चालतील पण, आम्हाला हव्या त्याच जागा आम्ही घेऊ, अशी कठोर भूमिका कदाचित काँग्रेसकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. नव्या बदलातून हाच संदेश देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. ‘ईडी’ही राजेश कुमारांच्या नादाला लागणार नाही. बिहारमध्ये काँग्रेसनं जातीचं समीकरण साधण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात. प्रदेशाध्यक्ष दलित करून संदेश दिला गेलाय. राजेश कुमार यांचे मित्र कन्हैया कुमार हे उच्चवर्णीय भूमिहार. त्यांच्याकडं बिहारच्या निवडणुकीची सूत्रं दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबरीने ओबीसी नेता आणि ‘बाहुबली’ पप्पू यादव यांच्यावरही पक्ष अवलंबून असेल. बिहार निवडणुकीत काँग्रेसची त्रिसूत्री कार्यरत होईल असं सांगितलं जातंय.

पायातील बोचरा काटा

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा हा सगळ्यांनाच सुस्ती आणणारा असतो. अनुदानित मागण्यांवर रटाळ चर्चा होत असते. अनेकांना त्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा नसते. त्यामुळे सभागृहात फारसं कोणी नसतं, असतात ते आपापसांमध्ये गप्पा मारण्यात दंग असतात. पण, राज्यसभेत दोन दिवस अचानक उत्साह निर्माण झाला होता. चर्चा गृहमंत्रालयाशी निगडित विषयांवर होती. आता हा विषय सगळ्यांच्या आवडीचा. कारण, सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधकांचं म्हणणं ऐकण्यासाठी ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यासमोर आक्रमक व्हायला विरोधकांना आवडतं. ते शहांचं लक्ष वेधून घेतात. शुक्रवारी राज्यसभेत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह बोलायला उभे राहिले. ते दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीविषयी शहांना बोल लावत होते. सिंह यांनी दिल्ली, हरियाणा वगैरे आसपासच्या राज्यांतील गुन्हेगारीची भलीमोठी आकडेवारी तोंडावर फेकली. मग, ते म्हणाले की, दिल्लीत आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. दिल्लीत महिला मुख्यमंत्री आहेत. तरीही दिल्लीत महिलांविरोधीतील गुन्हे वाढू लागले आहेत. संजय सिंह यांनी महिला अत्याचाराचा विषय काढताच सभागृहात एकच गोंधळ माजला. भाजपचे दिल्लीचे सातही खासदार झोपेतून अचानक जागे झाले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. झालं असं होतं, संजय सिंह यांच्या मागच्या आसनावर स्वाती मालिवाल बसलेल्या होत्या. त्या आता कोणत्या पक्षात आहेत ते त्यांनाही माहीत नाही. संजय सिंह महिलांवरील अत्याचारांवर बोलत असताना भाजपचे खासदार हात करून स्वाती मालिवाल मागेच बसलेल्या असल्याचं संजय सिंह यांना सांगत होते. राज्यसभेच्या खासदाराला ‘आप’ने मारहाण केली होती. त्यांच्यावर अत्याचार केले होते. त्यांचा अपमान केला होता. आता हे संजय सिंह महिला अत्याचारावर बोलू लागलेत… असे म्हणत भाजपच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. स्वाती मालिवाल आपल्या आसनावर मख्ख बसून होत्या. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. संजय सिंह यांचं भाषण होईपर्यंत त्या जागच्या हलल्या नाहीत. याच स्वाती मालिवाल यांना अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहलमध्ये मारहाण झाली होती. केजरीवालांच्या स्वीय सचिवाला या प्रकरणात अटक झालेली आहे. या मारहाणीचा बदला मालिवाल यांनी विधानसभा निवडणुकीत ‘आप’विरोधात प्रचार करून घेतला. मालिवाल यांनी पक्ष अधिकृतपणे सोडला नसल्याने त्या ‘आप’च्याच खासदार आहेत. त्यामुळं मालिवाल ‘आप’च्या पायात टोचणारा काटा ठरू लागल्या आहेत. मालिवाल आणि ‘आप’ यांच्यातील मतभेद टोकाला गेल्याचं कारण वेगळं असल्याचं सांगितलं जातं. निदान त्यावेळी तरी तशी चर्चा होत होती. मालिवाल यांची ‘आप’मधील जवळीक पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या अत्यंत निकटवर्तीयांना पसंत नव्हती. केजरीवालांनी मालिवालांना खासदार केलंच कसं, असं हे लोक विचारत होते. केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले तेव्हा एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला पक्षातील गटबाजीचा फटका बसला होता. या नेत्याला राज्यसभेच्या निवडणुकीत पराभूत व्हावं लागलं होतं. हे नेते केजरीवालांचे अत्यंत जवळचे. त्यांच्याशिवाय केजरीवाल यांचं पान हलत नव्हतं. या नेत्याला पुन्हा राज्यसभेवर आणण्याचे खटाटोप सुरू होते, अशी कुजबुज त्यावेळी ऐकू येत होती. कुजबुज अशी की, मालिवाल यांनी राज्यसभेतील सदस्यत्व सोडून द्यावं व त्या जागी या नेत्याला संधी द्यावी असा विचार केला जात होता. या कथित प्रकरणामध्ये मालिवाल यांचं ‘आप’च्या नेत्यांशी बिनसलं असं म्हणतात. मालिवाल खमक्या निघाल्या. त्यांनी जागा सोडली नाही. ‘आप’चं सरकार गेलं इतकंच नव्हे तर केजरीवालही घरी बसले. राज्यसभेत ‘आप’साठी आता संजय सिंह किल्ला लढवत आहेत. त्यांचे तरुण होतकरू नेते राघव चड्ढा तर गायबच आहेत. लंडनला जाऊन स्थायिक व्हायचं की इथंच राहायचं हे त्यांचं बहुधा ठरायचंय.

अघोषित संघटना महासचिव!

पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत काँग्रेसमध्ये मोठ्या बैठका होणार आहेत असं म्हणतात. काँग्रेसला संघटना मजबूत करायची आहे असंही म्हणतात. भाजपच्या पन्नाप्रमुखाची सुधारित आवृत्ती काँग्रेसला संघटनेमध्ये समाविष्ट करायची आहे असं दिसतंय. ब्लॉक आणि जिल्हा संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. तीन दिवस जिल्हास्तरावरील नेत्यांच्या बैठका होतील. त्याची पूर्वतयारी म्हणून गेल्या आठवड्यामध्ये राज्य प्रभारींची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या दोघांनीही जिल्हास्तरावर पक्षाला अधिक बळकटी आणण्याबाबत सविस्तर चर्चा केली. दीड महिन्यापूर्वी काँग्रेसने प्रभारीही बदलले आहेत. या प्रभारींना जिल्हास्तरावर थेट संपर्क साधण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावरील तरुण होतकरू कार्यकर्ते शोधण्याची जबाबदारी या प्रभारींकडे असेल. या प्रक्रियेमध्ये अर्थातच प्रदेशाध्यक्ष सहभागी असतील. पण, जिल्हाध्यक्ष नियुक्तीपासून त्यांना सक्रिय करण्याचे काम दिल्लीतून ‘एआयसीसी’मधून केले जाईल. म्हणजे काँग्रेसमध्ये पुन्हा केंद्रीकरणच होणार आहे. काँग्रेसमधील काहींचं म्हणणं होतं की, प्रदेशाध्यक्ष सक्रिय नसल्यानं आणि काही प्रदेशाध्यक्ष भाजपच्या भल्याचा विचार अधिक करत असल्यानं काँग्रेसला दिल्लीतून जिल्हास्तरावर थेट संपर्क ठेवावा लागणार आहे. राज्या-राज्यामध्ये गरज असेल तिथं जिल्हाध्यक्ष बदलले जातील. जिल्हाध्यक्षांना निर्णयप्रक्रियेत अधिक वाटा दिला जाईल असं म्हणतात. म्हणजे तिकीट वाटप वगैरे या प्रक्रियेमध्ये जिल्हाध्यक्षांना थेट विचारलं जाईल. त्यांच्या मताला प्राधान्य दिलं जाईल. काँग्रेसमध्ये कोणतेही बदल सांगितले जातात, तितके सोपे नसतात, त्यामध्ये अनेक अडथळे असतात. त्यामुळं जिल्हास्तरावर संपर्काची जबाबदारी कोणावर टाकायची असा प्रश्न होता. या प्रक्रियेमध्ये तीन-चार नेत्यांचा सहभाग असेल, पण प्रमुख जबाबदारी प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडं दिली जाऊ शकते. त्याचे वेगवेगळे अर्थ घेतले जात आहेत. प्रियंका गांधी-वाड्रा याच अघोषित संघटना महासचिव असतील, कदाचित काँग्रेसची संघटनाही हळूहळू प्रियंका यांच्या ताब्यात जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असं दिसतंय.

मामां’ची मध्यस्थी

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला शेतीविषयक प्रश्नांना केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान उत्तर देत होते. द्रमुकच्या खासदार कणिमोळींनीही तमिळनाडूतील शेतीसंदर्भात प्रश्न विचारला होता. शिवराज यांनी उत्तर दिलं पण, कणिमोळींचं समाधान झालं नाही. त्यांनी पीठासीन अधिकाऱ्याकडं नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही असं त्या वारंवार सांगत होत्या. त्यावर, पीठासीन अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे असं म्हणत कणिमोळींना खाली बसायला सांगितलं. त्यामुळं कणिमोळी आणखी नाराज झाल्या. शेतीविषयक प्रश्न संपवून शिवराजसिंह खाली बसले. त्यांच लक्ष कणिमोळींकडं गेलं. तेवढ्यात प्रश्नोत्तराचा तास संपला. शिवराजसिंह उठून थेट विरोधी पक्षांच्या बाकांकडं गेले. लोकसभेत सातव्या ब्लॉकच्या दुसऱ्या रांगेत कणिमोळी बसतात. त्यांच्याशेजारी सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंत बसतात. शिवराजसिंह हे कणिमोळींच्या आसनाकडं गेले. त्यांना बघताच सुळे व सावंत यांनी त्यांना जागा करून दिली. शिवराजसिंह यांनी तिथं बसून कणिमोळींचं म्हणणं नीट ऐकून घेतलं. शून्यप्रहर सुरू असतानाही शिवराज कणिमोळींशी बोलत होते. त्यांनी कदाचित कणिमोळींचा प्रश्न समजून घेतला असावा. चार-पाच मिनिटं शिवराजसिंह तिथं होते. मंत्री आणि विरोधी सदस्य यांच्यात सभागृहात असा मनमोकळा संवाद क्वचितच पाहायला मिळतो. मोदी सरकारमध्ये दोन-तीन मंत्र्यांशी विरोधक आपलेपणानं संवाद साधतात. शिवराजसिंह त्यातील एक आहेत. मामांचं नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी घेतलं जातंय, पण त्यांचा हा मनमोकळा आणि विरोधकांशी संवाद साधण्याचा स्वभावच कदाचित त्यांच्या आड येईल असं दिसतंय.