राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड मध्यंतरी आजारी होते, त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळं आठवडाभर उपसभापती हरिवंश राज्यसभेचं कामकाज पाहात होते. बरे झाल्यावर धनखड पुन्हा आले. कुठल्या तरी एका मुद्द्यावर बोलण्यासाठी खरगे उभे राहिले. मला फार बोलायचं नाही. तुम्हाला त्रास देण्याची माझी इच्छा नाही. तुमची तब्येतही ठीक नाही, असं खरगे म्हणताच, हे वाक्य काढून टाका… माझी तब्येत ठीक आहे, असं म्हणत धनखड यांनी विषय संपवून टाकला. धनखडांनी कामकाज पुन्हा हाती घेताच राज्यसभेच्या सदस्यांनी धनखडांच्या कक्षात जाऊन त्यांची चौकशी केली. सभागृहातही त्यांच्या परतण्यावर आनंद व्यक्त केला. धनखड एम्समध्ये असताना सोनिया गांधींनी धनखडांच्या पत्नीला फोन करून तब्येतीची चौकशी केली होती. त्याचा आवर्जून उल्लेख धनखड यांनी सभागृहात केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींपासून अनेक मुख्यमंत्री आणि खासदारांनी आपुलकीने चौकशी केल्याचंही धनखड यांनी सांगितलं. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी धनखड यांच्याविरोधात प्रस्ताव आणला होता. पण, हेच सदस्य त्यांच्याशी खेळीमेळीने वागतानाही दिसतात. माकपचे खासदार जॉन ब्रिटास प्रश्नोत्तराच्या तासाला धनखड यांना म्हणाले की, तुम्ही परत आल्यापासून मला पहिल्यांदाच बोलण्याची संधी मिळाली आहे… त्यावर, ‘मी नव्हतो तेव्हा तुम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटलं असेल’, असं म्हणत धनखड यांनी ब्रिटास यांची मस्करी केली. गेल्या आठवड्यात धनखड यांनी ‘विशेष विनंती’ करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाच प्रश्न विचारला. धनखड यांच्या राजस्थानातील गावातील रस्ता खराब आहे, त्याची दुरुस्ती करून तो राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याची विनंती केली. हे शक्य असेल की नाही माहिती नाही पण, गडकरींनी, मी लक्ष घालतो असं म्हणत विषय संपवला.
‘अराबिका’, तेही संसदेत?
नव्या संसदेमध्ये खासदारांसाठी दोन कॅन्टीन आहेत, सभागृह तहकूब झालं की खासदार आपापल्या सदनाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसतात. काही खासदार एकदा आले की कामकाज संपल्यावरच घरी जातात. असे खासदार मग कॅन्टीनमध्ये गप्पा मारताना दिसतात. याच कॅन्टीनच्या बाहेर पत्रकार खासदारांना भेटतात, त्यामुळं तिथंही गप्पांचा अड्डा जमतो. एखादा खासदार पत्रकारांना घेऊन कॅन्टीनमध्ये जातो, तिथं भोजन करता करता राजकारणातील गमतीजमतींचा फड रंगतो. पूर्वी जुन्या संसदेमध्ये पहिल्या मजल्यावर खासदारांसाठी वेगळं कॅन्टीन होतं. तिथं दुपारी खासदार भोजनासाठी जात असत. पण, अनेक खासदार संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात जाणं पसंत करत असत. तिथं सर्वपक्षीय खासदार येत असत. पक्षीय राजकारण सोडून त्यांच्यामध्ये गप्पा होत असत. मग, तिथंच असलेल्या टी आणि कॉफी बोर्डाच्या छोट्या कॅन्टीनमधून खाद्यापदार्थ मागवले जात. करोनाच्या आधी वरिष्ठ पत्रकारांनाही मध्यवर्ती सभागृहात जाण्याची मुभा होती. त्यामुळं पत्रकारांसाठी हे सभागृह बातम्यांचा सोर्स असे. नव्या संसदेत अशी कोणती ‘सुविधा’ नाही… गेल्या आठवड्यात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेच्या कॅन्टीनमध्ये येऊन बसले होते. शहा असो वा अन्य वरिष्ठ मंत्री क्वचितच संसदेच्या कॅन्टीनमध्ये जाताना दिसतात. शहांनी कॅन्टीनमध्ये बसून खाण्या-पिण्याचा आस्वाद घेणं म्हणजे कमालच झाली. शहांना त्या दिवशी बहुधा खूपच मोकळा वेळ असावा. अमित शहांबरोबर जे. पी. नड्डा आणि पीयूष गोयल होते. नंतर त्यांच्या मैफलीमध्ये काही भाजपचे खासदारही सहभागी झाले. दोसा, पापटी चाट वगैरे आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेत अमित शहा आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारताना पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. शहा कॅन्टीनमध्ये कसे आले असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या कॅन्टीनच्या दरवाजाच्या शेजारी भलामोठा फलक लावलेला आहे. या फलकाकडं शहांचं लक्ष गेलं की नाही हे माहीत नाही. हा फलक आहे अराकू व्हॅली अराबिका कॉफीचा. आंध्र प्रदेशमधील अराकू व्हॅलीमध्ये अत्यंत उत्तम दर्जाची अराबिका कॉफी मिळते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या कॉफीला मोठी मागणी आहे. या कॉफीला ‘जीआय’ टॅग मिळालेला आहे. ही अराबिका कॉफी संसदेच्या दोन्ही कॅन्टीनमध्ये खासदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या फलकावर अराबिका असं लिहिलं असल्याचं फारसं कोणाच्या लक्षात येत नाही. कॅन्टीनच्या बाहेर पत्रकार एका खासदाराशी गप्पा मारत असताना कोणाचं तरी या फलकाकडं लक्ष गेलं. त्यावर काय लिहिलंय याची उत्सुकता निर्माण झाल्यानं बारकाईनं फलक वाचला गेला. त्या खासदारांना अराबिका शब्द दिसला. ते म्हणाले, ‘अरे, हे असले अराबिका वगैरे शब्द इथं कुठं? संसदेमध्ये अराबिका?…मी हे गमतीनं म्हणालो बरं का’… असं म्हणत हे खासदार त्याच कॅन्टीनमध्ये निघून गेले. त्यांनी अराबिका कॉफीची चव चाखली की नाही हे माहिती नाही!
रमजान आणि अधिवेशन….
रमजानच्या महिन्यातच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळं खासदारांची संध्याकाळ कुठल्या ना कुठल्या इफ्तार पार्टीमध्ये जात होती. अधिवेशनाला आता सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळं अनेक खासदार आठवडाभर इफ्तार पार्ट्या करून शुक्रवारी दुपारीच आपापल्या मतदारसंघात पळाले. अधिवेशनाच्या अखेरच्या तीन दिवसांच्या सत्रांसाठी मंगळवारीच आता ते दिल्लीत दाखल होतील. मंगळवारी वा बुधवारी कदाचित वक्फ दुरुस्ती विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचं नवं मुख्यालय इंदिरा भवनमध्ये सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे. गुरुवार-शुक्रवार असे सलग दोन दिवस जिल्हाध्यक्षांची बैठक होती. तिथं काही मुस्लीम जिल्हाध्यक्षही आले होते. रमजानमुळं ते दिवसभर काही खात नसल्यानं संध्याकाळी त्यांच्या खाण्यापिण्याची खास व्यवस्था इंदिरा भवनामध्ये करण्यात आली होती. त्यांच्या या विशेष इफ्तार पार्टीमध्ये नेतेही सहभागी झाले. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार इम्रान प्रतापगढी यांनीही खासदारांसाठी इफ्तार पार्टी ठेवली होती. सर्वच विरोधी पक्षांतील खासदार सहभागी झालेले दिसले. ऑल इंडिया मुस्लीम लीगच्या खासदारांनी इफ्तार पार्टी ठेवली होती, तिथं सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव यांच्यापासून महुआ मोईत्रा, सुप्रिया सुळे, जया बच्चनपर्यंत असे सगळ्या विरोधी पक्षांचे नेते होते. दिल्लीतील संध्याकाळ खूप रटाळ असते. अनेक खासदारांचे मन लागत नाही. अशा वेळी रमजानच्या इफ्तार पार्ट्यांमुळं त्यांची संध्याकाळ मित्रमंडळींबरोबर गप्पा मारण्यात गेली.
इथं नाटक करता काय?
राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये तूतू-मैमै सुरूच असते. काँग्रेसचे, स्वत:ला अभ्यासू मानणारे खासदार जयराम रमेश यांनी राज्यसभेत अन्नसुरक्षा योजनेसंदर्भात प्रश्न विचारला होता. केंद्र सरकार म्हणतं की, ८१ कोटी लोकांना मोफत धान्य पुरवलं जातं पण, प्रत्यक्षात तसं होत नाही. सरकारचं लक्ष्य आणि लक्ष्यपूर्ती यांच्यामध्ये अंतर आहे. सरकारने न लपवता लक्ष्यपूर्तीचा आकडा जाहीर करावा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गोलमाल उत्तर दिलं. जयराम रमेश कर्नाटकमधून राज्यसभेचे सदस्य झाले आहेत. प्रल्हाद जोशी कर्नाटकातील धारवाड मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य झाले आहेत. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हेही कर्नाटकचे आहेत. त्यामुळे या तीन कर्नाटकी खासदारांमध्ये वाद रंगला. जयराम रमेश म्हणत होते की, जनगणना झाली नसल्यामुळे काही कोटी लोकांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळतच नाही. मंत्री जोशी म्हणत होते की, कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तिथं मोफत धान्य देण्यात सरकार अडचणी आणतं. खरगेंनी या मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जयराम रमेश आणि खरगे म्हणाले की, जोशी तुम्हीही कर्नाटकचेच…. त्यावर, जोशी हसत म्हणाले, आपण सगळे एकच आहोत. या सभागृहाबाहेर आम्ही मित्रच असतो… हे ऐकून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी लगेच टिप्पणी केली. धनखड म्हणाले, ‘तुम्ही एकमेकांचे मित्र आहात, मग, सभागृहात मतभेद असल्याचं नाटक करता का?… ’ खरंतरं या टिप्पणीवर कोण काय बोलणार पण, धनखडांचं म्हणणं गमतीनं घेत जोशी म्हणाले की, सगळ्या पक्षांचे खासदार सभागृहाबाहेर मित्र असतात…