अपर्णा महाजन

‘भीती निर्माण होणं ते त्यावर मात करणं ही एक टप्प्याटप्प्यांची प्रक्रिया आहे. त्या सर्व टप्प्यांत प्रमुख सहभाग आपल्या मनाचाच. हे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, माझ्याही ते आले. त्या प्रत्येक वेळी मला मनाच्या खेळांची आणि माझ्यातल्या भावनिक सामर्थ्याची नव्यानं ओळख पटली.’

आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी संप्रेरकं निर्माण होतात. कोणी आपल्याला आवडणारी व्यक्ती दिसल्यास, भेटल्यास किंवा छान व्यायाम झाल्यास, एखादी आनंददायी बातमी कानावर पडल्यास आणि अशा इतर अनेक गोष्टींमुळे ‘आनंदी हार्मोन्स’ निर्माण होतात, तसंच भीतीचंही!

भीतीच्या अनेकरंगी, अनेकपदरी छटा आहेत. ताणातून, कुतूहलातून, अज्ञानातून, प्रत्यक्षात नसलेल्या, पण कल्पनेतून जन्माला आलेल्या चमत्कारिक विचारांमुळे भीती, धास्ती, ताण अशा भावना निर्माण होतात. नको त्या विचारांमुळे, स्वत:च मनात त्यांचं भयंकरीकरण केल्यामुळे, भीतीच्या वेगवेगळ्या छटांची वीण घट्ट होत जाते. मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ही भीती ठाण मांडून बसते. अज्ञान, अनिश्चितता, अर्धवट माहितीवर आधारित अस्पष्ट विचार, मित्र वा नाती गमावण्याचे विचार, ही भीतीची जणू आवडती खाद्यांच आहेत. अशा भीतीच्या छटा मनात कारणपरत्वे निर्माण होत असतात. कधी त्याचा आपल्याही नकळत निचरा होत असतो, तर कधी आपल्याला तो जाणीवपूर्वक करावा लागतो. भीती वाटू नये, हे शिकवण्यासाठी कुठला वर्ग नसतो. ते आपल्यालाच करावं लागतं. त्यासाठी मनात निर्माण झालेल्या भीतीला सामोरं जाणं, नेमकी कशाबद्दल ही भावना आहे, हे समजून घेणं आणि त्यावर कधी विचारांच्या पातळीवर, भावनिक पातळीवर, कधी इतरांशी बोलून, प्रसंगी कधी औषधांचीही मदत घेऊन भीती घालवावी लागते. भीती, धास्ती वाटणं हे वैगुण्य नाही. एकमेकांच्या साहाय्यानं, आपल्यातल्या धैर्यानं, त्यावर मात करता येते. सगळ्यांच्या आयुष्यात कोणत्या तरी रूपात ही भीती आपल्याला भेटून गेलेली असते! आज ६४ वर्षांची आहे मी, पण मला आजही स्पष्टपणे आठवतात माझ्या आयुष्यातल्या त्या दोन महत्वाच्या घटना…

मी दहिवडी (सातारा जिल्हा) या अतिशय छोट्या खेड्यात मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले. नंतर पुण्याच्या ‘स. प. महाविद्यालया’त प्रवेश घेऊन बारावीपासून हॉस्टेलमध्ये राहात होते. सुरुवातीला ‘आता एकटं कसं राहायचं?’पासून ‘आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता येईल का?’, ‘मित्रमैत्रिणी मिळतील का?’, ‘माझी रूम पार्टनर कशी असेल?’, ‘मी नापास झाले तर?’, अशा अनेक भीतींनी मी पछाडली गेले होते. तिथूनच मी इंग्रजी साहित्यात ‘बी.ए.’ केलं आणि पुणे विद्यापीठात ‘एम.ए.’ करायला गेले. ‘एस.पी.’पेक्षा विद्यापीठातला वर्ग वेगळा होता. खूप वेगवेगळ्या प्रांतांतून, महाविद्यालयांतून गुणवत्तेवर आलेली मुलं-मुली आमच्या वर्गात होती. पुण्यातल्या ‘भारी’ समजल्या जाणाऱ्या महाविद्यालयातून आलेल्या, ‘कॉन्व्हेंट’ शाळेत शिकलेल्या, ‘फाड्-फाड्’ इंग्रजी बोलू शकणाऱ्या दोन मुली तिथे होत्या. ज्यांना इंग्रजीतून बोलता येत नसे, त्यांचा त्या तोंडावरच ‘दॅट डम्बो’ असा उल्लेख करत. सगळ्यांना विचित्र नावं ठेवणं आणि व्यक्तीला अगदी ज्यानं भीती वाटेल अशा प्रकारे त्यांना हसणं चाले. त्या दोघींची ही आक्रमक वृत्ती मला आवडत नसे. त्यांचं हे ‘रॅगिंग’ करणं सुरू राहिलं. पण तुम्ही असं वागू नका, बोलू नका, हे सांगण्याचं धाडस माझ्यातही नव्हतं त्या वेळी. मग मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असे. पण त्या आजूबाजूला असल्या की मी मनातून घाबरलेली असे! माझं इंग्रजी लिखाण मात्र चांगलं होतं. माझं म्हणणं मी इंग्रजीतून मांडू शकत असे. लगभनापूर्वीचं माझं नाव अपर्णा अंतुरकर, त्यामुळे कोणत्याही तोंडी परीक्षेला मलाच पहिल्यांदा जावं लागे. मला परीक्षेची कधी भीती नाही वाटली, पण बाहेर आल्यावर ‘काय काय विचारलं त्यांनी?’ असं विचारायला त्या आक्रमकपणे पुढे येत. त्यात उत्सुकतेपेक्षा घाबरवायला अंगावर येणं असे. त्याचा मला प्रचंड ताण येई. पहिल्या सेमिस्टरला या सगळ्या गोष्टींत त्या दोघींनी माझ्या मनाचा अनेक वेळा चुरगळा केला होता. हळूहळू आम्ही अभ्यासात व्यग्र झालो. आमच्या ‘इंटर्नल’ परीक्षांचे गुण तेव्हा नोटीस बोर्डवर लावत. ‘लिंग्विस्टिक्स’ हा विषय तेव्हा नवीन होता आणि त्याच्या पहिल्याच ‘ट्युटोरिअल’मध्ये मला चांगले गुण मिळाले होते. सरांनी माझ्या पेपरचा वर्गात उल्लेखही केला. तो एक असा क्षण होता, ज्या क्षणापासून मला त्या मुलींची भीती वाटेनाशी झाली! नव्हे, ती भीती माझ्या मनातून कायमची पुसली गेली,आणि त्या दोघीही. मला अभ्यास करायला हुरूप आला. पुढे तर खूप मित्रमैत्रिणीही मिळाल्या.

पुढच्या काळातली भीती तर वेगळीच होती. लग्नानंतर बाळाला जन्म द्यायचं ठरवलं आणि ‘बाळ’ या विषयाचा माझा अभ्यास सुरू झाला! ‘रीडर्स डायजेस्ट’चं ‘ Zero to Ten years… a complete guide’ हे पुस्तक माझ्या हाती आलं. ते त्या काळातलं माझं आवडतं पुस्तक होतं. मी अशी पुस्तकात बघून बाळंतपणाची तयारी करतेय, हे माझ्या सासरी सहजपणे मान्य होत नव्हतं. पण माझं छान चालू होतं.

पुढे मला माझ्या डॉक्टरबाईंनी गरोदरपणात करायचे व्यायामप्रकार शिकवलेे. त्याच काळात डॉ. बेंजामिन स्पॉक यांचं एक पुस्तक वाचनात आलं. मनात येणाऱ्या कित्येक छोट्या छोट्या शंकांचं उत्तर त्यात असे. माझी एक मैत्रीण तेव्हा तळेगावमधल्या जनरल हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ होती. तिनं एकदा मला विचारलं. ‘तुला बघायची आहे का प्रत्यक्ष प्रसूती?’ मी ‘हो’ म्हणाले आणि गेले हॉस्पिटलमध्ये! एका खेडेगावातून आलेल्या, अतिशय कृश बाई लेबर टेबलवर होत्या. मी त्या कसे श्वास घेतील, याकडे लक्ष देऊन होते. पण त्यांनी जोरजोरात नवऱ्याला अत्यंत गलिच्छ शिव्या द्यायला सुरुवात केली. डॉक्टर त्यांना श्वास घ्यायला सांगत होते… पण त्या किंचाळत होत्या, रडत होत्या, शिव्या देत होत्या. त्यापूर्वी असं काही माझ्या वाचनात आलं नव्हतं! मला हे सगळं बघून गरगरायला लागलं. तिथल्या सिस्टर मला बाहेर घेऊन गेल्या, मला कॉफी दिली. एका झाडाखाली बसून मी जोरजोरात श्वास घेतले तेव्हा बरं वाटलं. ‘प्रसूती अशी असते?…’ या भीतीनं मन गोठून गेलं होतं. ‘असं कोणी बघतं का?… काय गरज होती जायची? नको तो अभ्यास!’ अशी शेलकी बोलणी नंतर घरातून मिळालीच.

त्याच काळात आमच्याकडे सोनी ही डॉबरमन जातीची कुत्री होती. तिला पिल्लं होणार होती. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला तिनं एकेक अशी आठ पिल्लं जन्माला घातली. अगदी शांतपणे. एक पिल्लू जन्माला घालायची. मग उठायची, चक्कर मारायची आणि ध्यानसाधना केल्यासारखा चेहरा करून दुसरं पिल्लू द्यायची! चेहऱ्यावर श्रांत भाव दिसे, पण उद्वेग नव्हता, उद्रेक नव्हता. मी विस्मयचकित होऊन तिच्याकडे पाहत होते, सारा वेळ तिच्याबरोबर होते. हॉस्पिटलमधल्या त्या बाईंची आठवण आली. उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘सोनीनं मला कळा कशा द्यायच्या हे शिकवलं आज!’

अखेर १४ जुलै १९८५ रोजी संध्याकाळी ज्या कळांबद्दल मी पुस्तकात वाचलं होतं, त्या सुरू झाल्या. माझी ताई मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. पुस्तकात वाचलं होतं, तेव्हा ते खूप ‘रोमॅन्टिक’ होतं, पण त्या म्हणे ‘फॉल्स पेन्स’ होत्या. मनात पुन्हा भीतीचा डोंब उसळला. म्हटलं, जर या ‘फॉल्स पेन्स’ असतील, तर खऱ्या कशा असतील?… अखेर घरी परतलो. मला शिकवलेले व्यायाम प्रकार आणि आमच्या सोनीची आठवण काढून मी शांत राहण्याचा प्रयत्न करत होते. मी ठरवलेल्या सगळ्या गोष्टी आठवल्या, धीर एकवटला. ताईला बाळंतपणाचा अनुभव होता, पण असा अनुभव नवीनच होता. आम्ही दोघी एकमेकींबरोबर होतो. भीती, उत्सुकता, दडपण, अस्वस्थता, हुरहुर, गंमत, अशा किती तरी भावनांची सरमिसळ होत होती. खऱ्या की खोट्या माहीत नव्हतं, पण कळा तर सुरूच होत्या. ताई मला फार वेळ इकडेतिकडे जाऊ देत नव्हती. शेवटी समजलं, की खऱ्या कळा कशा असतात! आम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. अनेक परिचारिका, डॉक्टर येऊन मला तपासत होते. कोणीही यावं, पोटाला हात लावून बघावं, असं चाललेलं. वेळ जातच होता. या सगळ्यानं माझ्या मनात निष्कारण भीती शिरायला सुरुवात झाली. एक ज्येष्ठ सिस्टर आल्या आणि त्यांनी सांगितलं, ‘‘बेबी हलत नाहीये! सीझर करावं लागेल.’’ मी स्तब्ध झाले…

सिझेरियन टाळण्यासाठी गेले नऊ महिने केलेला व्यायाम, दररोज पाच किलोमीटर चालणं, ‘रिलॅक्सेशन’चे व्यायाम, आहार, सगळं इतकं नीट केलं होतं… आणि असं कसं? अस्वस्थपणे मी उठून चकरा मारायला सुरुवात केली. कळाही विसरले. ताईला म्हटलं, ‘‘मला फक्त ५ मिनिटं एकटीला राहू दे. सांगतेस का तू डॉक्टरांना?’ डॉक्टरांनी ते ऐकलं. माझ्यासाठी तो निर्णायक क्षण होता.भीतीवर मात करण्याचा.

मी एकटीने भिंतीकडे तोंड करून, डोळे मिटून मोठे मोठे श्वास घेतले. हात, पाय, मन, डोकं शांत करण्यासाठी कवायतीसारखे काही शिकवलेले व्यायाम केले. मोठमोठे श्वास घेत खोलीत इकडून तिकडे चालले आणि अचानक पोटातल्या बाळानं एकदम ढुशी दिली! ताईला सांगितलं, तेव्हा आम्हा दोघींना झालेला आनंद कसा वर्णन करू? डॉक्टर हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘चला लेबर टेबलवर!’’ मी कवायत करत आणि श्वासाचे व्यायाम करतच आत गेले. मोठा श्वास घेतला तर बाळाला बाहेर यायला मदत होते, हे आठवून मोठ्ठे श्वास घेत होते! आणि आमच्या मैत्रेयचा जन्म झाला. नंतर डॉक्टर भेटायला येणाऱ्या प्रत्येकांना सांगत होत्या, ‘‘अपर्णा अगदी शहाण्यासारखी कळा देत होती. न रडता, आरडाओरडा न करता, हू की चू न करता बाळाला जन्म देणारी मी पहिल्यांदाच पाहिली!’’ मी हसत होते. माझ्या मनात आमची सोनी होती!

त्या दिवशी संततधार पाऊस सुरूच होता, आईच्या डोळ्यात पाणी आणि कौतुक होतं. तर नवरा विदुर ‘वडील झाल्याच्या’ वेगळ्याच मूडमध्ये… त्या रात्री मैत्रेय खूप रडत होता. मी विचारलं, ‘‘का इतका रडतोय?’’ सिस्टर म्हणाल्या, ‘‘जितका रडेल, तितकी त्याची फुप्फुसं बळकट होतील!’’ मी ‘बरं’ म्हटलं, जेवले आणि ताईवर सगळं सोपवून कधी झोपले मला समजलंही नाही!

भीतीचा मागमूसही आता उरला नव्हता!

aparnavm@gmail.com