लाखो गुरु है जगत में, पर एक भी निह कामका।
सब स्वरथों के आसरे, डंका बजाते नाम का।।
असा खणखणीत इशारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वच धर्मपंथातील ढोंगींना दिला. भारत-साधुसमाजाची स्थापना साधुशुद्धी, शासनशुद्धी व जनताशुद्धी करण्याच्या दृष्टीने केली आहे. हृदयपरिवर्तन करून विधायक कार्यक्रम व सेवाभाव या मार्गाद्वारे भारतीय जनतेच्या विकासाला मदत करणे हे त्यांचे ध्येय आहे. ही स्वतंत्र संस्था आहे आणि येथे कोणाचीही- मग ती सरकारची असो वा धनिकांची असो-मुळीच लुडबुड चालणार नाही. साधुसमाजाचे लोक राजकारणात आणि निवडणुकांत सहभागी होणार नाहीत. कोणाचेही दडपण सहन करणार नाहीत किंवा कोणाला मिंधेही राहणार नाहीत. जनतेच्या विकासाकरिता प्रसंगी सरकारकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध सुद्धा ते झगडण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत. सरकारच्या चांगल्या कार्यात सहकार्य करणे व वाईट धोरणे झुगारून देणे ही भारत साधुसमाजाची अखंड नीती राहील, अशी भारत साधुसमाजाच्या स्थापने मागची भूमिका १९५६ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संस्थापक अध्यक्ष नात्याने मांडली होती.
भारत साधुसमाजाची अयोध्या, ऋषीकेश, पंढरपूर, नाशिक व दिल्लीसह भारतभर ठिकठिकाणी संमेलने झाली. यामध्ये विविध धर्मपीठांचे महंत, महामंडलेश्वर, साधू-संत सहभागी झाले. महाराज म्हणतात, ‘‘जनतेला आजपर्यंत अनाथ, अशिक्षित, दरिद्री व दुर्बल ठेवण्याचा दोष समाजातील साधू, राजकारणी पुरुष, धनवान व सुशिक्षित लोकांचा आहे. काळाची पावले ओळखून त्यांनी समाजाला जागृत केले नाही, उलट दडपून टाकले. त्यांची नीती भ्रष्ट करण्यातच शक्ती खर्च केली. त्यांनी आपली जबाबदारी आता ओळखली पाहिजे. जवळच्या देशांतील लोक उन्नत होत असताना भारतातील लोकांना आपली दैना सहन होणार नाही. साधुसमाजही आपल्यावरील ही जबाबदारी ओळखून वेळीच जागृत झाला आहे. प्रेम, सत्य, सेवा, त्याग व अिहसा या मार्गाने तो समाजाला अनुशासित करेल. देशाची नाडी साधूइतकी इतर कोणालाच माहीत नाही. हे करताना ज्यावेळी साधूत राजकारण शिरेल त्यावेळी साधुसमाजाची गरज उरणार नाही व मी पहिल्यांदा पदाचा राजीनामा देऊन विरोधी प्रचार करेन,’’ असे महाराज बजावतात. मी कोणत्याही धर्मावर, पंथावर टीका केली नाही. मिशनऱ्यांसारखी जनसेवा आमचे लोक व साधू करतील आणि माणुसकीचा पुरावा देतील तर अध्यात्माच्या बाबतीत विश्वाला मातृतुल्य शोभणाऱ्या या भारतदेशाला खरी प्रतिष्ठा व जगाच्या बाजारात किंमत प्राप्त होईल! महाराज आपल्या बरखेत इशारा देताना म्हणतात,
शासक धरम का गुरू बने,
फिर गुरू को क्या उद्योग है?
उसने चलाना हल कहीं, या खेती करना योग्य है।।
नेता ही सब बन जायेगे, तब काम करने कौन है?
सब साधु ही बनने लगे, तब कौन सेवक भी रहें?
राजेश बोबडे