एका कवी संमेलनाला संबोधताना महाराज म्हणतात, ‘‘साहित्य संमेलनाच्या रूपाने उत्तम विचारांच्या कवींचा संगम झालेला पाहून विकासमार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या खेडूत जनतेलादेखील मोठा हर्ष होणे साहजिकच आहे. कवींचे संमेलन छोटय़ा गावात घेण्याच्या मुळाशी आमचे दोन प्रमुख विचार आहेत. एक तर खेडूत जनतेला थोर विचारांच्या जागृत लोकांचा सहवास घडेल आणि दुसरे म्हणजे, या साहित्यिकांनादेखील ग्रामीण जीवनाचे अत्यंत जवळून दर्शन घेता येईल. अशा रीतीने साहित्यिक व जनता यांचा संयोग घडून आल्यास त्यातून राष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य उदयास येणे केव्हाही अशक्य नाही. आज देशात या गोष्टीची अत्यंत गरज आहे. जाणते लोक, साहित्यिक, कवी, कीर्तनकार इत्यादी सर्वानी आपल्या कलांचा, बुद्धीचा आणि शक्तीचा विनियोग जनजागृतीसाठी करण्याचे ठरविले तर, भारताचेच नव्हे तर जगताचेही प्रश्न मोठय़ा सहजतेने सुटू लागतील. जनतेच्या वास्तविक गरजांकडे डोळेझाक करून केवळ काव्यमय भाषेने व आपल्या कल्पनाकौशल्याने जीवन रेखाटणारे कवी आपल्या काव्याने कदाचित कीर्ती मिळवू शकतील; पण त्यांचे काव्य जर त्या मागासलेल्या जनतेला जागृत करण्याच्या, त्यांचे यथार्थ जीवन लोकांपुढे मांडून तिकडे सर्वाचे लक्ष वेधून घेण्याच्या किंवा विधायक दृष्टीने समाजाची पुनर्रचना करण्याच्या कामी उपयोगी पडले नाही तर त्याचा काय उपयोग?’’
‘‘उच्च विचारांनी प्रेरित आणि सक्रियतेला प्रोत्साहित करणारे काव्य तेच खरे काव्य मी समजतो. आमच्या संतकवीच्या काव्यात हीच गोष्ट प्रामुख्याने दिसून येते. त्यांच्या त्या साधेपणाचे महत्त्व आजच्या कित्येक कवींना न कळून, ते कौशल्याच्या व पांडित्याच्या दृष्टीने संतकाव्याला तुच्छ लेखू पाहतात, ही त्यांची फार मोठी चूक आहे. संतकाव्याने समाजाच्या हृदयात जिवंतपणा जागृत ठेवून सर्वाचा विकास करण्याचे जे कार्य केले ते अमोल होते. कवींच्या हृदयात हीच तळमळ असली पाहिजे म्हणजे त्यांचे काव्य केवळ करमणुकीचा खेळ न ठरता राष्ट्राची महान प्रेरक शक्ती बनेल! प्रत्येक मानव माझा आप्त आहे, ही भावना हृदयात जागृत होणे हे कवीचे पहिले लक्षण होय. जन्मभर मंदिरात पूजापाठ करणाराही शेवटी गाढवाचा बापच राहिल्यास त्या साधनाला अर्थ काय? मूर्तीच्या पूजेने माणूस देव होण्याऐवजी दगड झाला! मानव्यविकासाचा तो प्रयोग असफल ठरला! तेच कार्य कवींना, साहित्यिकांना आपल्या रचनेच्या बळाने आज सफल करावयाचे आहे. या जगातच स्वर्ग निर्माण करण्याचा पाठ त्यांना शिकवावयाचा आहे. आपले काव्य किंवा साहित्य ही एक शिल्पकला एक कारागिरी न ठरता, राष्ट्राचे पुनरुज्जीवन करणारी ती संजीवनी ठरावी हीच अपेक्षा आहे.’’ महाराज भजनात म्हणतात-
मैं कवि नहीं करुणा हूँ मैं,
उन दु:खियों की, दीन की।
मैं साधु निह मैं साधना हूँ,
प्रेम की सत् नेम की।।
राजेश बोबडे