अमृतांशु नेरुरकर,‘चिप’-उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ.
सॅमसंग या कंपनीची वा त्या नाममुद्रेची भारतीयांना ओळख करून द्यायची गरज नाही इतकं हे नाव आपल्याला सुपरिचित आहे. डिजिटल युगात आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या अनेक इलेक्ट्रॉनिक स्मार्ट उपकरणांची निर्मिती करणारी कंपनी म्हणून सॅमसंग आज नावारूपाला आली आहे. मोबाइल फोन, टॅब्लेट, टेलिव्हिजन, संगणक आणि तत्सम डिजिटल उपकरणांबरोबरच रेफ्रिजरेटर, कपडे वा भांडी धुणारी यंत्रं, व्हॅक्युम क्लीनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, अशा विविध ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीत सॅमसंग ही सध्या जगातली एक आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॅमसंगची एक अपरिचित बाजूही आहे, ती म्हणजे या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या परिचालनासाठी अत्यावश्यक असलेल्या मेमरी तसेच लॉजिक चिपचं आरेखन आणि निर्मितीही सॅमसंगच करते. एवढंच नव्हे तर चिपनिर्मितीसाठी लागणाऱ्या काही प्रमुख घटकांच्या निर्मितीतही (उदा. सब्स्ट्रेट) उत्पादनातही सॅमसंग आघाडीवर आहे. चिप क्षितिजावर एका बाजूला अमेरिकेचं पुनरुत्थान आणि अमेरिकी शासन तसंच चिप कंपन्यांच्या पाठिंब्यावर झालेला दक्षिण कोरिया आणि सॅमसंग या दोघांचा उदय तर दुसऱ्या बाजूला जपानी मेमरी चिप कंपन्यांची पीछेहाट या समांतरपणे घडलेल्या घटना आहेत. त्यांचं विश्लेषण करणं नव्वदोत्तर सेमीकंडक्टर उद्योगामधली गुंतागुंत समजून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे.

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत (विशेषत: डीरॅम मेमरी) चिपनिर्मिती क्षेत्रात जपानी कंपन्यांचा अश्वमेध कोणी रोखू शकेल असं वाटत नव्हतं. सुदृढ अवस्थेतील अर्थव्यवस्था, उत्तुंग झेप घेत असलेला शेअरबाजार, शासकीय तसेच इतर वित्तीय संस्थांचं असलेलं भक्कम आर्थिक पाठबळ, सोनी, तोशिबा, हिताची, कॅसिओ अशा विविध जपानी इलेक्ट्रॉनिक व चिपनिर्मिती कंपन्यांची उत्कृष्ट कामगिरी आणि या सर्वामुळे लोकांचं सुधारलेलं राहणीमान – दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्णत: बेचिराख होऊनही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतलेला जपान हा विसाव्या शतकातील एक प्रमुख यशोगाथा बनला होता. सेमीकंडक्टर व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात अल्पावधीतच केलेल्या या प्रगतीमुळे जपानी राजकारण्यांपासून ते उद्योजकांना व आर्थिक विश्लेषकांपासून ते अगदी सामान्यांना अमेरिकेला मागे टाकून जपान जागतिक महासत्ता बनू शकत असल्याची स्वप्नं पडायला लागली होती. पण या स्वप्नांचा फुगा फुटायला फार काळ जावा लागला नाही.

१९९० मध्ये जपानमध्ये आर्थिक मंदी आली. ऐंशीच्या दशकातील आर्थिक सुबत्तेमुळे गगनाला भिडलेले जागांचे दर कोसळले. टोकियो शेअरबाजार गडगडला, एवढा की वर्षभरातच त्याची पातळी १९९०च्या तुलनेत अध्र्यावर आली. त्याच सुमारास जगभरातील मेमरी चिपच्या मागणीतही फारशी वाढ नोंदली जात नव्हती. तोपर्यंत जपानी चिपनिर्मिती कंपन्यांना मेमरी चिपच्या मागणीतील चढ उतारांनी फारसा फरक पडत नव्हता. शासकीय स्तरावरून सातत्यानं येत असलेला निधीचा ओघ आणि जपानी वित्तीय संस्थांकडून अत्यल्प दरात होत असलेला पतपुरवठा, असं स्वस्तात भांडवल उपलब्ध होत असल्यामुळे जपानी कंपन्यांना ऐंशीच्या दशकात चिपच्या मागणीतल्या बदलांची फिकीर नव्हती आणि कंपनीच्या नफ्या-तोटय़ावर याचा परिणाम होईल याची पर्वाही नव्हती.

बाजारात डीरॅम चिपला खरी मागणी किती, याचा कोणताही अदमास न घेता स्वस्त उपलब्ध असलेल्या भांडवलाच्या मदतीनं जपानी कंपन्या आपली चिपनिर्मिती क्षमता नवनवे कारखाने स्थापन करून वाढवत चालल्या होत्या. याउलट अमेरिकी कंपन्यांना थेट स्वरूपात शासकीय किंवा वित्तीय संस्थांकडून भरघोस अशी मदत कधी मिळालीच नसल्यानं त्यांनी अत्यंत काटेकोरपणे, नफ्या-तोटय़ाचं गणित सांभाळत गुंतवणूक आणि चिप उत्पादन सुरू ठेवलं. अमेरिकी कंपन्यांसाठी हा जीवन मरणाचा प्रश्न असल्यानं त्यांना सावध राहणं गरजेचंच होतं. पण जपानी कंपन्यांना यापैकी कशाचीच तमा नव्हती. जोवर जपानी अर्थव्यवस्था स्थिर आणि मजबूत होती तोवर ही बेबंदपणे चाललेली पैशांची उधळपट्टी एकवेळ क्षम्य होती. पण आर्थिक मंदीमुळे पैशांचा ओघ जेव्हा आटला त्यानंतर जपानी कंपन्यांना मागणी नसतानाही चिपनिर्मिती करत राहण्याचा खर्च परवडेनासा झाला.     

‘डीरॅम चिप हे आता नावीन्यपूर्ण उत्पादन राहिलं नसून एक कमॉडिटी बनलं आहे’- ही वस्तुस्थिती बटाटय़ाची शेती करणाऱ्या जॅक सिम्प्लॉटलादेखील समजली होती, पण जपानी कंपन्यांना हे आकलन योग्य वेळी झालं नाही. त्यात भर म्हणजे, डीरॅम चिपनिर्मितीत आकंठ बुडालेल्या जपानी कंपन्यांचं संगणकाला लागणाऱ्या मायक्रोप्रोसेसर लॉजिक चिपकडेही अक्षम्य दुर्लक्ष झालं. अँडी ग्रोव्हसारख्या द्रष्टय़ा व्यावसायिकानं योग्य वेळी इंटेलला मेमरी चिपनिर्मितीतून बाहेर काढून लॉजिक चिपनिर्मितीवर आपली सर्व ऊर्जा खर्च करायला लावली होती, याची मधुर फळं इंटेलला भविष्यात चाखायला मिळाली.

त्याउलट जपानी कंपन्यांना मात्र येणारं युग हे संगणकाचं युग आहे याचा अदमास येईपर्यंत फार उशीर झाला होता. एकमेव ‘एनईसी’चा अपवाद वगळला तर हिताची, तोशिबासारख्या इतर मेमरी चिपनिर्मिती कंपन्या मायक्रोप्रोसेसर निर्मितीत कधी पडल्याच नाहीत. पुष्कळ प्रयत्न करूनही ‘एनईसी’ला मायक्रोप्रोसेसर चिपनिर्मितीत विशेष बाजारहिस्सा प्राप्त झाला नाही. एका बाजूला भांडवलाच्या अभावी दिवसेंदिवस तोटय़ात चाललेला डीरॅम निर्मिती उद्योग तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक वापराच्या संगणक (पीसी) युगाचा न आलेला अंदाज अशा दुहेरी गर्तेत जपानी चिप उद्योग फसला. त्यातून कधी बाहेर येऊच शकला नाही. १९९३ मध्ये सर्वाधिक चिपनिर्मितीसाठी अमेरिकेनं जपानला मागे टाकून पुनश्च प्रथम क्रमांक पटकावला तर विसावं शतक संपता संपता डीरॅम चिपनिर्मितीत कोरियानं जपानला गाठलं. डीरॅम चिपनिर्मितीत १९८८-८९ पर्यंत ९० टक्क्यांवर असलेला जपानी कंपन्यांचा बाजारहिस्सा पुढल्या दहा वर्षांतच फक्त २० टक्क्यांवर घसरला. यासाठी जपानने दीड दशकांहूनही अधिक काळ अनुभवलेली आर्थिक मंदी (जिला ‘लॉस्ट डीकेड’ असं म्हटलं जातं)  जेवढी जबाबदार आहे त्याच्या दुपटीनं जपानी चिपनिर्मिती कंपन्यांची आर्थिक बेशिस्त कारणीभूत आहे.

चिप क्षितिजावरील जपानच्या पीछेहाटीतच दक्षिण कोरिया व पर्यायाने सॅमसंगच्या उत्कर्षांची बीजं दडलेली आहेत. सॅमसंग काही पहिल्यापासून सेमीकंडक्टर किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नव्हती. १९३८ मध्ये ली ब्यंग-चुल या धूर्त व्यापाऱ्यानं जेव्हा सॅमसंगची पायाभरणी केली तेव्हा तिचा मूळ व्यवसाय हा कोरियामध्ये पिकणारा विविध प्रकारचा भाजीपाला व सुका बाजार जपानमध्ये विकणं एवढय़ापुरताच मर्यादित होता. त्या काळात दक्षिण कोरिया हा एक कृषिप्रधान देश होता व जपानच्या जोखडाखाली असल्यानं आधुनिक तंत्रज्ञानासाठी सर्वस्वी जपानवर अवलंबून होता.           

पण ली ब्यंग-चुलची महत्त्वाकांक्षा मोठी होती. चिपनिर्मिती व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील जपानच्या आश्चर्यकारक प्रगतीचं अवलोकन करत असताना त्याने सॅमसंगलाही चिपनिर्मिती क्षेत्रात उतरवण्याचा चंग बांधला. अत्यंत निष्णात व्यावसायिक असल्यामुळे त्यानं आततायी पद्धतीनं कोणताही निर्णय घेतला नाही. योग्य वेळेची वाट बघत राहिला. त्याच्या सुदैवानं अशी योग्य वेळ लवकरच त्याच्या वाटेला आली. १९६२ मध्ये दक्षिण कोरियाचे तत्कालीन लष्करप्रमुख पार्क चुंग ही यांनी बंड करून सत्ता हस्तगत केल्यानंतर, ‘दक्षिण कोरियाला सेमीकंडक्टर क्षेत्रात ऑफशोअिरगसाठीचं एक महत्त्वाचं जागतिक केंद्र बनवू’  एवढीच घोषणा न करता ही यांनी त्यासाठी तब्बल चाळीस कोटी डॉलरचा निधी उपलब्ध करू, असं जाहीर केलं.

सॅमसंगनं या शासकीय निधीचा तसेच बँकांकडून अत्यल्प व्याजावर मिळत असलेल्या पतपुरवठय़ाचा पुरेपूर लाभ उठवून आपली चिपनिर्मिती क्षमता वाढवली. त्या कालखंडात बहुतेक सर्व अमेरिकी चिपनिर्मिती कंपन्या डीरॅम निर्मितीतून तातडीनं बाहेर पडत असल्यामुळे मेमरी चिपनिर्मिती प्रक्रिया अमेरिकी कंपन्यांकडून ‘परवाना (लायसन्स) पद्धती’नं मिळवण्यासाठी सॅमसंगला फार कष्ट पडले नाहीत. किंबहुना सेमीकंडक्टर क्षेत्रात जपानला शह देण्यासाठी अमेरिकी शासन आणि चिपनिर्मिती कंपन्या दक्षिण कोरिया आणि पर्यायाने सॅमसंगला हवी ती तांत्रिक मदत पुरवण्यासाठी आपणहूनच तयार होत्या. त्यामुळेच इंटेलनं स्वत:चं डीरॅम चिपनिर्मितीचं तंत्रज्ञान लायसन्स तत्त्वावर वापरण्यासाठी सॅमसंगला कोणतीही आडकाठी केली नाही. मायक्रॉननं तर, अधिक किफायतशीर पद्धतीनं मेमरी चिपनिर्मिती करण्यासाठी सॅमसंगशी भागीदारीच केली. कोरियाचे वेतन-दर जपानच्या तुलनेत नगण्य असल्याने सॅमसंगला जपानहूनही अधिक किफायतशीर पद्धतीनं डीरॅम चिपनिर्मिती करता येणार होती. सेमीकंडक्टर उद्योगात जपानला नामोहरम करण्यासाठी दक्षिण कोरिया व सॅमसंगच्या रूपानं अमेरिकेला एक समर्थ पर्याय मिळाला हे नक्की!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chip charitra chip manufacturing us japan korean company samsung amy
Show comments