इन्स्टाग्रामवर फोटोंचा पाऊस पडत असतो. व्हॉट्सअॅपवर किंवा फेसबुक, ट्विटर, टेलिग्रामवरही दृश्यं भरपूर. इतक्या मोठ्या प्रमाणावर दृश्यं पाहण्याची सोय कुठल्याही काळातल्या कुठल्याही मानवाला मिळाली नसेल, अशा काळात आपण जगतो. असंच पन्नास-साठ वर्षांपूर्वी रेडिओमुळे झालं होतं. तेव्हाची माणसं आदल्या सर्व पिढ्यांपेक्षा जास्त ऐकू शकत होती! ‘रेडिओ सिलोन’ म्हटलं की हळवेबिळवे होणारे अद्यापही काही जण असतील. हिंदी सिनेसंगीत ऐकून ऐकून लोक गुणगुणू लागले, याचं कारण नभोवाणी. रेडिओतून कानांवर येणारं प्रत्येक गाणं ऐकून ‘याचा अर्थ काय?’ असं सर्वच जणांनी विचारलं नसेल… पण हे सर्वच जण स्वत:ला सिनेसंगीताचे रसिक मानणारे होते. उदाहरणार्थ ‘रफ़्ता रफ़्ता’ या शब्दाच्या डबलबारचा अर्थ जरी माहीत नसला तरी काही जणांना ‘रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामाँ हो गए’ (चित्रपट : हम कहाँ जा रहे है; गायक : महेंद्र कपूर, आशा भोसले) आणि आणखी काही जणांना ‘रफ्ता रफ्ता देखो आँख मेरी लडी है’ (चित्रपट : कहानी किस्मत की; गायक : किशोर कुमार) आठवेल. अगदी आवडीनं आठवेल. ही आवड कशातून आली? ‘पुरवठ्यामुळे मागणी तयार होते’ हे भांडवलशाहीचं तत्त्व रेडिओवरल्या फिल्मी गाण्यांबाबत लागू झालं होतं की काय? तसं असेल, तर मग चित्रकलेपासनं लोक दूर राहिले याला फक्त ‘पुरवठा नाही’ हे एकच कारण असू शकेल? पण महाराष्ट्रात तर नागपूरपासनं सांगली, औंध, कोल्हापूर, पुणे, मुंबई इथं चित्रकलेची उत्तम संग्रहालयं आहेत. मराठवाड्यातली अजिंठा लेणी जागतिक वारसा आहेत आणि इथं गुंफा क्रमांक एक ही भिंतीवरल्या चित्रांचीच तर आहे!
पण तरीही चित्रांपासनं लोक (त्यातही मराठी वाचू-बोलू शकणारे लोक) लांबच राहिलेले दिसतात. चित्र समोर असलं तरी अनेक जण चित्रापासून मानसिकदृष्ट्या दूरच असतात. असं का झालं असावं?
भारतीय कलांचा इतिहास फार म्हणजे फारच मोठा आहे आणि कलाविषयक चिंतनही भारतात पूर्वापार झालं आहे, त्यात ‘रसिक’ म्हणजे नवरसांपैकी जे रस कलाकृतीतून उद्भवतात त्यांचं नेमकं ग्रहण करणारी माणसं. पण मग हे रस-ग्रहण करण्यासाठी आधी ‘अर्थ’ कळावा लागतो, ही अट मुख्यत: संस्कृतात असलेल्या काव्यांनी (काव्व्यांनी) घातली. ‘अर्थ कळला तरच आपण रसिक’ या अलिखित सक्तीपुढं दबलेले लोक मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत आजही दिसतात.
हे लोक प्रदर्शनाला जातात, चित्रकाराला गाठून ‘एक्स्क्यूज मी हं, पण अर्थ काय याचा?’ असं विचारतात. हेच लोक परदेशांतल्या संग्रहालयांमध्ये गेले तर तिथल्या चित्रांबद्दल गाईडचं ऐकून किंवा चित्रांसोबतची माहिती वाचून कृतकृत्य होतात. यापेक्षा निराळा मार्ग आपण शोधू शकतो. त्यासाठी हे सदर दर पंधरवड्याला लिहिलं जाईल.
या लिखाणाला दरवेळी एखाद्या दृश्य-कलाकृतीचा संदर्भ असेल. पण हे फक्त त्या विशिष्ट कलाकृतीचं रसग्रहण ठरू नये, याची काळजी घेतली जाईल. त्या कलाकृतीच्या निमित्तानं एकंदर दृश्यकलेच्या आणखी जवळ नेणारं काही तार्किक विवेचन होऊ शकतं का, असा प्रयत्न इथं असेल. दृश्यं (नुसतीच दृश्यं) हा तर जगण्याचा भाग आहेच, पण दृश्यकला हाही जगण्याशी संबंधित विषय आहे, अशा विश्वासातून हे सदर लिहिलं जाईल. अर्थातच, हल्लीच्या काळात हे सदर लिहिलं जातंय म्हणून काहीएक काळजीही शक्यतोवर घेतली जाईल.
साधारणपणे आजवरचा अनुभव असा की, समकालीन (म्हणजे हल्लीच्या, आजकालच्या) चित्रकलेबद्दल लिहिणाऱ्यांना कलाक्षेत्रातले जुने लोक, ‘हल्लीची कला फारच पाश्चात्त्यांच्या आहारी गेलीय’ असं वाटणारे लोक, यापैकी काहीच नसणारे पण देशप्रेमी/ राष्ट्रभक्त लोक यांपैकी कुणीतरी हटकतं की, ‘भारतीय कलापरंपरांबद्दल तुम्ही का नाही लिहित?’
या प्रश्नाला अगदीच सोप्पं थेट उत्तर आहे: ‘कलेची भाषा वैश्विक असते म्हणून’. पण मग प्रश्नकर्ता फाटे फोडतो. ते सगळे फाटे अंतिमत: एकाच गोष्टीशी जुळतात – ती बाब म्हणजे, प्रश्नकर्त्यामध्ये घट्ट रुजलेला सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचा गंड. आणि जर कोणताही आविर्भाव असेल, अभिनिवेश असेल, अहंगंड असेल, तर कलेशी नातं जुळत नाही, हा इतिहास आहे. तो फक्त कलाद्वेष्ट्या औरंगजेबापुरता नसून चित्रकला शिकलेल्या हिटलरचाही इतिहास आहे. तो इतिहास न उगाळता, इथं आपण कलेकडे अभिनिवेशाविना कसं पाहायचं याबद्दल चर्चा करू.
या मजकुरासोबत एका जुन्या सोन्याच्या नाण्याचं छायाचित्र आहे. ते छायाचित्र न छापतासुद्धा इतकी माहिती नक्कीच देता आली असती की : हे नाणं पाचव्या शतकातलं आहे, अधिक नेमकं सांगायचं तर कुमारगुप्त पहिला या राजाच्या कालखंडातलं- म्हणजे इसवी ४१५ ते ४५५ या ५० वर्षांमधलं ते नाणं आहे, त्याच्या दोन्ही बाजूंना ब्रह्मी लिपीतली अक्षरं आहेत, त्यापैकी एका बाजूला ‘कुमारगुप्तोराजा तत्र जयति रिपुन’ असं लिहिलंय तर दुसऱ्या बाजूला ‘सिंहहन्त महेन्द्र गज:’ असं लिहिलंय. आपण इथं पाहातो आहोत ती बाजू कोणती, हे वाचकांच्या लक्षात येणार नाही कदाचित, पण वाचकांपैकी जे या नाण्याचं छायाचित्र नीट पाहाताहेत त्यांना नक्की समजेल- होय, ‘सिंहाला मारणारा महेन्द्र गज’ अशाच अर्थाची अक्षरं या बाजूला असणार! म्हणजे नाण्यावरल्या चित्राचा ‘अर्थ’ कळलाच की!
पण आता हेच छायाचित्र पुन्हा पाहा- हत्ती दिसतोय; सिंह कुठाय? आमच्या लहानपणी एक विनोद होता, ‘गवत खाणारी गाय’ या चित्रातली गाय गवत खाऊन चित्रचौकटीबाहेर निघून गेल्याचं सांगत एका चतुर चंदूनं कोरा कागद दाखवल्याचा… तसं तर नाही इथं? नाही! इथं सिंह अख्खा नाही दिसत हे कबूल, पण सिंहाचं शेपूट दिसतंय नाण्याच्या अगदी कडेला. ते पाहिलं की मग हत्तीच्या सोंडेत सिंहाची आयाळही दिसू लागते. पण सिंहाचं नुसतं शेपूट बघूनच कळतं की हा प्राणी जाम घाबरलाय! त्या नाण्याच्या कुणा अज्ञात शिल्पीनं, ‘हत्तीचा जोष आणि भ्यालेला सिंह’ या दोन्हीचं चित्रण केलंय.
त्या सिंहाच्या भेदरट शेपटामुळेच या नाण्याकडे एक दृश्यकलाकृती म्हणून आपण ‘आजच्या’ नजरेनंही पाहू शकतो; इथं कलेचं नाणं बावनकशी ठरतं. समजा शेपूट जमेस धरलंच नाही, तर निव्वळ त्या नाण्याचा इतिहास कळेल, अभिमान-बिभिमान वाटेल ते नाणं शुद्ध सोन्याचं असल्याचा किंवा त्यावर एवढी ‘कारागिरी’ असल्याचा. ती निव्वळ कारागिरी नसून नाण्याच्या या ‘डिझाइन’कडे आज कलाकृती म्हणूनही पाहाता येईल, हे मात्र सिंहाच्या शेपटामुळे समजतं.
हत्तीच्या शक्तीचा प्रत्यय देण्याची खरी ताकद इथं सिंहाच्या शेपटाच्या चित्रणात आहे. दृश्यकलेत अर्थापेक्षा अनुभव महत्त्वाचा आणि अनुभवासाठी अनेकदा ‘प्रत्यय’ महत्त्वाचा असतो, हे अनेकांना माहीत आहेच. पण ज्यांनी असा विचार केलेला नव्हता, त्यांनाही प्रत्यय येण्याची सुरुवात या खणखणीत नाण्यापासून होवो!