जयपाल सिंग मुंडा यांनी नागरी सेवेतील प्रतिष्ठेची नोकरी सोडून आदिवासींच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा दिला..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संविधान सभेत वेगवेगळय़ा पार्श्वभूमीतून आलेले सदस्य होते. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव होते जयपाल सिंग मुंडा. संविधान सभेमध्ये मुंडा आले ते बिहार प्रांतामधून (आताचे झारखंड).  ते स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आले होते.

रांचीपासून ३० किलोमीटर दूर असलेल्या खुंटीमधील टकरी या छोटय़ाशा गावात त्यांचा १९०३ साली मुंडा जमातीमध्ये जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्डमधल्या सेंट जॉन्स कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. या काळात त्यांनी विविध क्षेत्रांत गती प्राप्त केली. येथे असतानाच त्यांनी हॉकीमध्ये प्रावीण्य मिळवले. पुढे त्यांची निवड भारतीय नागरी सेवा (आयसीएस) अधिकारी म्हणून झाली. १९२८ साली अ‍ॅमस्टरडॅम येथे ऑिलपिक सामने होते. भारतीय हॉकी टीमचे कर्णधारपद स्वीकारावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली. तेव्हा मुंडा हे भारतीय नागरी सेवेत प्रोबेशनवर होते त्यामुळे त्यांना रजा देता येणार नाही, असे सांगण्यात आले. मुंडा यांनी कशाचाही विचार न करता नोकरी सोडली आणि हॉकी संघाचे कर्णधारपद स्वीकारले. त्यावर्षी भारतीय हॉकी संघाने ऑिलपिकमधील सुवर्णपदक प्राप्त केले. ऑिलपिकमध्ये देशाने मिळवलेले हे पहिले सुवर्णपदक!

या ऑिलपिक सामन्यांनंतरही नागरी सेवेत रुजू होण्याचा पर्याय ब्रिटिशांनी त्यांच्या समोर ठेवला होता. मुंडा यांनी तो पर्याय नाकारला आणि आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. १९३८ साली आदिवासी महासभा स्थापन झाली होती. १९३९ साली या महासभेच्या अध्यक्षस्थानी त्यांची निवड झाली. येथून त्यांच्या नेतृत्वात आदिवासींचे मूलभूत प्रश्न तीव्रतेने मांडण्यास सुरुवात झाली.

स्वत: आदिवासी असल्याने अनेक वेळा त्यांनी भेदभावाचा सामना केला होता. आदिवासींचे कसे शोषण केले जाते, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते, अनुभवले होते.  त्यांनी ब्रिटिशांना आणि काँग्रेसला आदिवासी प्रश्न समजावून सांगितला. आदिवासींमधील लोकप्रियता वाढल्याने त्यांना ‘मरांग गोमके’ ( सर्वोच्च नेता) असे म्हटले जाऊ लागले. संविधान सभेत त्यांचा प्रवेश झाला तेव्हा मूलभूत हक्कांबाबत असलेली सल्लागार समिती तसेच अल्पसंख्याकांकरता आणि आदिवासींकरता असलेल्या समितीमध्ये त्यांचा समावेश झाला. मुंडा यांनी केलेली मांडणी ही तेव्हाच्या संविधान सभेत सर्वाना चक्रावून टाकणारी होती. आपण सिंधू संस्कृतीचे वंशज असून हजारो वर्षांपासून सर्वाधिक अन्याय आदिवासींवर झाला आहे, हे सांगतानाच ते म्हणाले, आदिवासींना लोकशाही प्रक्रिया शिकवण्याचा तुम्ही लोक प्रयत्न करत आहात; मात्र मुळातच लोकशाही प्रक्रियेनुसार जगणारे लोक आदिवासी जमातीमधील आहेत. आदिवासींना लोकशाही शिकवण्याऐवजी तुम्ही आदिवासींकडून लोकशाही मूल्ये शिकली पाहिजेत, असे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते. संविधान सभेतील अनेकांसाठी मुंडा यांच्या मांडणीने सांस्कृतिक धक्का बसला मात्र वादविवादात आदिवासींबाबतचे मूलभूत प्रश्न मुंडा मांडू शकले, हे विशेष. अश्विनी कुमार पंकज यांनी संपादित केलेल्या ‘आदिवासीडम’ (२०१७) या पुस्तकात जयपाल सिंग मुंडा यांचे निवडक लेख आणि भाषणे आहेत. जयपाल सिंग यांनी स्वातंत्र्योत्तर काळातही महत्त्वाची भूमिका बजावली. मुख्य म्हणजे जल, जंगल आणि जमिनीसोबतचे आपले पूर्वीपासूनचे नाते सांगत जयपाल सिंग आयुष्यभर आदिवासींचे प्रश्न मांडत राहिले. जसिंता केरकेट्टा नावाची कवयित्री म्हणते,

‘‘वे हमारे सभ्य होने के इंतजार में है

और हम उनके मनुष्य होने के !’’

जयपाल सिंग मुंडा यांचा प्रयत्न इतरांना माणूसपणाच्या वाटेवर आणण्याचा होता. त्यांच्यामुळे संविधान सभेत ‘हूल जोहार’च्या (विद्रोही अभिवादन) घोषणेचा नाद निनादत राहिला.

डॉ. श्रीरंजन आवटे 

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta constitution constituent assembly member jaipal singh munda amy