काळाचे गणित’ सोडवायला घेतलं त्याला दीड महिन्याहून अधिक काळ लोटला. सात लेख प्रसिद्ध झाले. आणि चर्चा फक्त सूर्याची! सूर्याचं भासमान भ्रमण, सौर वर्ष, सूर्याचं मकर संक्रमण. जणू काही आकाशात तेवढा एकच आहे. चंद्र जणू नाहीच. सूर्य असेल हो महातेजस्वी. आणि चंद्र असेल परप्रकाशित. पण म्हणून चंद्राकडे एवढं दुर्लक्ष?

ऋग्वेदातल्या पुरुषसूक्तातसुद्धा चंद्राचा उल्लेख आहे. तोदेखील सूर्याच्या आधी!

चन्द्रमा मनसो जातश्चक्षो: सूर्यो अजायत ।

श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत ॥

म्हणजे त्या विराट आदिपुरुषाच्या मनापासून चंद्र निर्माण झाला, त्याच्या डोळ्यांपासून सूर्य, कानांपासून वायू आणि प्राण तर मुखापासून अग्नी निर्माण झाला.

ठीक आहे. मग, आज, किंवा खरं तर आजपासून पुढचे काही लेख, ‘काळाचे गणित’ सोडवताना चंद्राची मदत होऊ शकते का ते पाहू.

सुरुवात करू चंद्राविषयी आपल्याला काय काय माहीत असतं तिथून. कवींना ‘चंद्र’ म्हटलं की प्रेयसीचा मुखचंद्र वगैरे आठवेल. पौराणिक कथा वाचलेल्यांना श्रीरामाने बालपणी चंद्र हवा असा हट्ट धरला होता ती कथा आठवेल आणि शास्त्रीय लेख वगैरे वाचणाऱ्यांना भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे चांद्रयान उतरवलं हे आठवेल. पण यातल्या कोणत्याच गोष्टीचा कालमापनाच्या संदर्भात काहीही उपयोग नाही.

ठीक आहे. मग सूर्योदय ते पुढचा सूर्योदय म्हणजे ‘दिन’ अशी व्याख्या करण्याऐवजी चंद्रोदय ते पुढचा चंद्रोदय म्हणजे ‘दिन’ अशी व्याख्या केली तर? तर आपण तोंडघशी पडू! कारण रोज चंद्रोदय होतो खरा पण तो झालेला आपल्याला दिसेलच असं नाही. धक्का बसला ना? हा काय प्रकार आहे ते पाहू.

अमावास्येला चंद्र दिसत नाही. कारण चंद्र आहे परप्रकाशित. सूर्याचा प्रकाश तो परावर्तित करतो. त्यामुळे कोणत्याही क्षणी चंद्राचा निम्मा भाग प्रकाशित आणि निम्मा अप्रकाशित असं असतं. अमावास्येला त्याचा अप्रकाशित भाग नेमका पृथ्वीसमोर येतो. तिथे तर काळामिट्ट अंधार. मग दिसणार काय? दुसरं असं की अमावास्येला चंद्र आणि सूर्य एकाच वेळी उगवतात आणि एकाच वेळी मावळतात. असलाच तर अवघ्या काही मिनिटांचा फरक.

उदाहरणादाखल जानेवारी महिन्यातली अमावास्या घेऊ. तारीख २९ जानेवारी. मौनी अमावास्या. कुंभमेळ्यामधे शाही स्नानाचा दिवस. त्या दिवशी सूर्योदय झाला सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी. आणि चंद्रोदय, न दिसणाऱ्या चंद्राचा उदय झाला सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी. त्याच दिवशी सूर्यास्त झाला संध्याकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी. आणि चंद्रास्त झाला संध्याकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी.

बरं, अमावास्येला सूर्य आणि चंद्र हातात हात घालून उगवतात आणि दिवसभर प्रवास करून संध्याकाळी जवळजवळ एकत्रच मावळतात. पुढे काय होतं? पुढे /चांदोबा चांदोबा भागलास का!/ म्हणजे, चंद्र दमतो-भागतो, मंदावतो. अर्थात, सूर्याच्या तुलनेत चंद्र मागे पडतो — दिवसभरात सुमारे पाऊण तास. सोबतचा तक्ता पाहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल.

आता गंमत बघा. शुद्ध प्रतिपदेला (३० जानेवारी) ७ वाजून १४ मिनिटांनी सूर्योदय झाला. ७ वाजून ५३ मिनिटं होईपर्यंत सूर्याचा प्रखर प्रकाश अवघ्या आसमंतात भरून राहिला असेल. मग त्या वेळेला झालेला चंद्रोदय दिसणार कसा? त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी चंद्रोदय अधिकाधिक उशिरा होऊ लागतो. आकाशात तेजस्वी सूर्य तळपत असताना हा चंद्रोदय दिसणं शक्यच नसतं. /थोडक्यात काय, तर शुद्ध पक्षात चंद्रोदय होतो तर रोज. पण दिसत मात्र कधीच नाही./

आजच्या काळात हाताशी विकसित तंत्रज्ञान असताना प्रत्यक्ष चंद्रोदय दिसत नसला तरी त्याची वेळ निश्चित सांगता येते. पण ज्या काळात ‘डोळ्यांना दिसतं तेच प्रमाण’ अशी परिस्थिती होती त्या काळात ‘एका चंद्रोदयापासून दुसऱ्या चंद्रोदयापर्यंत एक दिवस’ अशी व्याख्या करणं म्हणजे तोंडघशी पडणं झालं असतं! आणि त्या काळातल्या माणसांकडे तंत्रज्ञान नव्हतं पण अंगभूत हुशारी निश्चित होती. त्यामुळे त्यांनी चंद्राच्या भ्रमणाचा कालगणनेसाठी वापर तर केला. पण तो वेगळ्या पद्धतीने. बाकी सगळं, अर्थातच, पुढच्या लेखात.

तारीख | तिथी | सूर्योदय | चंद्रोदय |

२९ जानेवारी | अमावास्या | ७ वाजून १५ मिनिटे | ७ वाजून ६ मिनिटे |

३० जानेवारी | शु. प्रतिपदा | ७ वाजून १४ मिनिटे | ७ वाजून ५३ मिनिटे |

३१ जानेवारी | शु. द्वितीया | ७ वाजून १४ मिनिटे | ८ वाजून ३५ मिनिटे |

Story img Loader