वर्षांनादेखील नावं हे शालिवाहन शकाचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलं. पण केवळ शालिवाहन शकच नव्हे तर इतरही अनेक भारतीय पंचांगांमध्ये आढळणारी एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ‘तिथी’ ही संकल्पना. पंचांगकर्त्यांच्या प्रतिभेची आणि बुद्धीची कमाल आहे ही संकल्पना. आज आपण ती समजून घेऊ. एकदा ही संकल्पना कळली की मग क्षय तिथी, वृद्धी तिथी, अधिक महिना वगैरे गोष्टी समजून घेणं अगदी सुलभ होईल. चला तर मग.

‘पौर्णिमेची रात्र होती. आकाशात रात्रभर पूर्ण चंद्र विलसत होता. पण माझी नजर मात्र तुझ्या मुखचंद्रावरून क्षणभरही ढळली नाही.’ ही अशी वाक्य ललित वाङ्मयात शोभून दिसतात. पण ‘काळाचे गणित’ सोडवायचं तर त्यांचा काही उपयोग नाही. कारण /पौर्णिमेची संपूर्ण रात्र आकाशात पूर्ण चंद्र दिसतो ही केवळ कविकल्पना आहे. प्रत्यक्षात असं होत नाही.

अनेकांना असं वाटतं की चंद्राच्या कला ही मोटारसायकलच्या गिअर्सप्रमाणे खटक्यांनी – एक-दोन-तीन-चार-…—चौदा—पंधरा – घडणारी घटना आहे. म्हणजे आज रात्री (आणि रात्रभर) शुद्ध चतुर्दशीचा चंद्र. मग एक खटका आणि उद्या रात्री (आणि रात्रभर) पौर्णिमेचा चंद्र. प्रत्यक्षात असं नसतं. ही सगळी घडामोड मोटारसायकलच्या गिअर्सप्रमाणे नाही तर अॅक्सलरेटरप्रमाणे असते — खटक्या-खटक्यांनी नाही तर सलगपणे घडणारी.

पृथ्वी स्वत:भोवती फिरता-फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते आणि चंद्रही स्वत:भोवती फिरता-फिरता पृथ्वीभोवती, पर्यायाने सूर्याभोवतीदेखील, प्रदक्षिणा घालतो. या सतत घडणाऱ्या हालचाली आहेत. त्यामुळे या संदर्भातल्या सगळ्या घटना, घडामोडी या सलगपणे घडणाऱ्याच असणार.

त्यामुळे, शुक्ल पक्षात चंद्र कलेकलेने वाढतो म्हणजे केवळ शुक्ल चतुर्दशीचा चंद्र शुक्ल त्रयोदशीच्या चंद्रापेक्षा मोठा असतो एवढंच नव्हे तर शुक्ल चतुर्दशीला चंद्र दिसू लागतो तेव्हापासून ते तो मावळेपर्यंतदेखील तो कणाकणाने मोठा होत जातो. त्याच्या आकारातला हा बदल आपल्याला जाणवत नाही. पण म्हणून तो होत नाही असं नव्हे. आणि त्याचं हे कणाकणाने मोठं होणं तो पूर्णपणे प्रकाशित होईपर्यंत चालूच राहतं.

सोबतच्या आकृतीत चंद्राचं भ्रमण दाखवलं आहे. चंद्र पृथ्वीभोवती घिरट्या घालत असताना एक क्षण असा येतो जेव्हा तो सूर्याच्या विरुद्ध बाजूला पण अगदी ठीक समोर असतो. आणि नेमक्या त्याच क्षणी तो पूर्ण गोलाकारात दिसू शकतो. त्याच्या आधीच्या क्षणाला तो पूर्णत्वाला पोहोचलेला नसतो. आणि त्याच्या पुढच्या क्षणाला त्याचं पूर्णत्व टिकत नाही. तो हे पूर्णत्व शब्दश: क्षणभराकरताच उपभोगतो — क्षणभंगुर पूर्णत्व. अर्थात, गणिती आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून हे पूर्णत्व क्षणभराचं असलं तरी आपल्या डोळ्यांना मात्र चंद्रबिंब या क्षणाआधी आणि या क्षणानंतर काही काळ (कित्येक तास) पूर्ण गोलाकारच दिसतं.

पूर्णत्वाला पोहोचण्याच्या क्षणापर्यंत त्याची वृद्धी होत असते. आणि पूर्णत्वाला पोहोचल्या क्षणानंतर त्याचा क्षय होऊ लागतो. पण चंद्र वृद्धिंगत होत असतो त्या काळाला ‘शुक्ल पक्ष’ म्हणतात. आणि चंद्र आक्रसत जातो त्या काळाला ‘कृष्ण पक्ष’ म्हणतात. मग चंद्र ज्या क्षणी पूर्णत्वाला पोहोचतो त्याच क्षणी शुक्ल पक्षही संपतो. आणि त्याच क्षणी पौर्णिमाही संपते.

अर्थात, हा क्षण रात्रीच यायला हवा असा काही नियम नाही. तो कधीही येऊ शकतो. उदाहरणार्थ, चैत्र पौर्णिमेची समाप्ती १३ एप्रिल रोजी पहाटे सहाच्या सुमारास होईल. वैशाख पौर्णिमेची समाप्ती १२ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास होईल आणि ज्येष्ठ पौर्णिमेची समाप्ती तर ११ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास होईल. आणि नेमक्या त्या क्षणी त्या त्या महिन्यांचे शुक्ल पक्षही संपतील.

शुक्ल पक्ष कधी संपतो ते पाहिलं आपण. आणि कृष्ण पक्ष कधी संपतो? आणि वेगवेगळ्या तिथी, त्या कधी संपतात? हे सगळंदेखील आपण पाहणार आहोत. पण ते पुढच्या भागांत.