अभिजित ताम्हणे
यंदाचीही गांधी जयंती नेहमीच्याच उत्साहात साजरी होईल. यंदा तर १५५ वी जयंती, त्यामुळे उत्साह अधिकसुद्धा असू शकतो. चित्रकलेच्या प्रांतात गांधीजींची आठवण होण्यासाठी गांधी जयंतीच उजाडावी लागते, असं काही नाही. गांधीजींची स्मरणीय ठरणारी चित्रं नंदलाल बोस ते अतुल दोडिया अशा अनेक भारतीय चित्रकारांनी केली आहेत. जगभरात गांधीजींचा अहिंसक सत्याग्रहाचा विचार पोहोचलेला आहेच (अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर, दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांनी आपापल्या देश-काळाच्या संदर्भात तो विचार आचरणातही आणल्याचा इतिहास आहे); पण समजा मरीना अब्राहमोविच हिच्यासारख्या सर्बियन ‘परफॉर्मन्स आर्टिस्ट’ला गांधीजी समजा माहीतच नसले, तरी १९७४ सालच्या तिच्या ‘ऱ्हिदम झीरो’ सारख्या कलाकृतीतून गांधीजींच्या कणखर अहिंसक प्रतिकाराचा संदेशच उजळलेला आहे.

‘परफॉर्मन्स आर्ट’ ही दृश्यकलावंतानं प्रेक्षकांसमोर जगलेल्या क्षणांमधून साध्य होते आणि कलावंतानं केवळ या क्षणांची मध्यवर्ती कल्पना ठरवलेली असते… पुढं जे काही घडतं ते प्रत्यक्ष घडत जातं, हे ज्यांना माहीत आहे त्यांना मरीना अब्राहमोविचसुद्धा माहीत असेलच. पन्नास वर्षांपूर्वी त्या ‘ऱ्हिदम झीरो’ या परफॉर्मन्स कलाकृतीसाठी ती सहा तास प्रेक्षकांसमोर स्तब्ध उभी राहिली (तेव्हा ती युगोस्लाव्हियातली २८ वर्षांची तरुणी होती) आणि शेजारच्या टेबलावर तिनं ७२ विविध प्रकारच्या वस्तू ठेवल्या. लिपस्टिक, परफ्यूम, ब्रेड, वर्तमानपत्र… चाकूचं पातं, कात्री… फुलांचा गुच्छ, आरसा, काडेपेटी, मेणबत्ती, बॅण्डेज… अशी त्या वस्तूंची यादी आता ‘टेट गॅलरी’च्या संकेतस्थळावर सापडते. ‘या वस्तूंपैकी कोणतीही एखादी वस्तू प्रेक्षकांपैकी एकेकानं येऊन उचलावी, मरीनावर त्या वस्तूचा उपयोग करावा’ अशी या ‘ऱ्हिदम झीरो’ची मध्यवर्ती कल्पना! त्यातून मरीनाच्या शरीरावर जखमा झाल्या, तिचे कपडे फाडले गेले… पण न डगमगता तिनं हे सहन केलं. याचं भारतीय विश्लेषण असं होऊ शकतं की, महात्मा गांधींच्या अहिंसक प्रतिकाराची ताकद, स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगातल्या ‘लोखंडी गोळा आदळला तरी अविचल राहणाऱ्या भिंती’ची ताकद मरीनानं दाखवली.

ग्वाटेमाला या देशातली रेजिना होजे गालिन्दो हीदेखील परफॉर्मन्स आर्टिस्ट. ‘व्यवस्थात्मक अन्याय आणि मानवी हक्कांचं उल्लंघन’ हे या रेजिनाच्या परफॉर्मन्समधून वारंवार येणारे विषय. ती दिसते लहानखुरी, पण गेली सुमारे ३० वर्षं तिचं काम सुरू आहे (तिचा जन्म २०७४ सालचा, हा अब्राहमोविच यांच्या संदर्भात पाहिल्यास एक योगायोगच). या रेजिना गालिन्दो यांना २०१७ च्या ‘डॉक्युमेण्टा’ महाप्रदर्शनात त्यांची कलाकृती सादर करण्याचं निमंत्रण आलं, ते त्यांनी स्वीकारलंही. पण जर्मनीच्या कासेल शहरात दर पाच वर्षांनी भरणारं (आणि केवळ त्याच खेपेपुरतं, ग्रीसच्या अथेन्स या राजधानीतही तितक्याच प्रमाणावर भरलेलं) हे ‘डॉक्युमेण्टा’ महाप्रदर्शन १०० दिवसांचं असतं. तेवढे दिवस कसा काय करणार परफॉर्मन्स? मग रेजिना यांनी पाच-सहाच दिवस आणि तीन-तीन तासांच्या वेळा ठरवल्या आणि त्यानुसार त्यांनी स्वत:, सदेह सहभाग या ‘परफॉर्मन्स’मध्ये नोंदवला… पण या परफॉर्मन्स कलाकृतीचं नेपथ्य त्यांनी असं केलं होतं की, पाहणारे आणि पाहिले जाणारे हे दोघेही सहभागी असतील. एका मध्यवर्ती कल्पनेआधारे जगलेल्या क्षणांमधून जे काही घडलं, त्याचा अनुभव त्या दोन्ही प्रकारच्या सहभागींना मिळेल.

वरची वाक्यं चटकन समजणार नाहीत कदाचित; पण त्या कलाकृतीच्या नेपथ्याचं वर्णन समजेल. शिवाय इथं छायाचित्रंही आहेतच. एक चौकोनी खोली- पण तिच्या चारही कोपऱ्यांत काचा- बाहेरून अपारदर्शक आणि आतून काळ्या- या प्रत्येक काचेमधून बंदुकीची नळी रोखली गेली आहे… ही आहे ‘जी ३६’ या जर्मन रायफलीची नळी. या बंदुकीचा खटका खोलीबाहेरच्या प्रेक्षकाच्या हाती आहे.

खोलीत कोण उभं आहे, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरले भाव बंदुकीच्या नळीसमोर आल्यावर कसे होताहेत, हे बाहेरून पाहता येतंय… पण ते पाहण्यासाठी रायफलच वापरावी लागते आहे. रायफलीला ‘लक्ष्य’केंद्रित करण्यासाठी जो डोळा (स्नायपर) असतो, त्यावर लक्ष केंद्रित करून मगच आतलं पाहता येईल, अशी व्यवस्था रेजिना यांनी केली होती.

लोक येत होते, काही आत जात होते. काही बाहेरून पाहात होते. पाहण्यासाठी रायफलीशी खटपट करत होते. यातून सोबतचं छायाचित्र टिपता आलं. ‘लक्ष्य’ असलेल्या खोलीच्या बाहेरून कुणी एक युरोपीय तरुण रायफलीपासून शक्य तितक्या लांब राहून पाहायचा प्रयत्न करत होता! दुसरा फोटो रेजिना होजे गालिन्दो यांच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेला आहे. चेहऱ्यावर संमिश्र भाव (काहीशी भीती, पण बराचसा निर्धार) कायम ठेवून त्या उभ्या असल्याचं त्यातून दिसतं. हेच भाव खोलीत शिरलेल्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर असतील असं नाही… पण आपण बंदुकीसमोर आहोत याची जाणीव प्रत्येकाला झाली असेल- आत्ता या क्षणाला बंदुकीत गोळ्या नसाव्यात, त्यामुळे आपलं काहीच बिघडत नाही, अशा खात्रीमुळे आलेली बेफिकिरीसुद्धा असेल काहींच्या चेहऱ्यावर. पण बंदुकीतून ‘लक्ष्या’कडे पाहणारे बंदुकीच्या अलीकडचे लोक मात्र अगदी ‘आपण सैनिक आणि पलीकडचा शत्रू’ अशा आविर्भावातच पाहात होते… तेही बहुधा ‘साहजिकच’ होतं.

त्या बऱ्याच जणांच्यात हा इथल्या फोटोतला तरुण निराळा वाटला, इतकंच.

कदाचित गांधीजी माहीत असतील त्याला, कदाचित नसतील.

पण आत्ता बंदुकीच्या अलीकडे असलेले लोक काही वेळानंतर बंदुकीच्या पलीकडे- नळीच्या समोर- असू शकतात, हा अनुभवसुद्धा ही कलाकृती देत होती.

बंदुकीच्या अल्याड-पल्याड असणारी माणसं बदलत होती.

बंदूक मात्र तिथंच राहात होती!