अभिजित ताम्हणे
‘मतदारांची ताकद’ दृश्यकलेतून दाखवणारा किंवा ज्यानं कलाकृतींमधून ‘जनादेशा’ला आकार दिला असा कलावंत म्हणून हान्स हाकेच्या कलाकृतींची आठवण आज होते आहे. जनमत आणि कला यांचा संबंध त्यानं सिद्ध केला…
मतदारांची ताकद, लोकांचा कौल, लोकशाहीची सुप्तशक्ती, जनादेश… हे शब्दप्रयोग ४ जूनच्या मंगळवारपासून आपण सर्वांनीच पुन्हा ऐकले/ वाचले आहेत. यंदाच्या- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक असल्याचं अनेक जाणकारांनी मान्य केलेलं आहे आणि या निकालानंतर जी विश्लेषणं प्रांजळपणे होताहेत, त्यांत बऱ्याच वर्षांनी केवळ नेते/ राजकारणी यांच्यापेक्षा मतदारांनी काय बदलू पाहिलं यावर भर दिला जातो आहे. ‘शीर्षस्थ’ म्हणवणाऱ्या नेत्यांच्या भाषणांना लोकांनी महत्त्व दिलं नाही, त्यांना डोक्यावर घेतलं नाही, हेही यातून दिसतं आहे. जमिनीवरची परिस्थिती आणि शीर्षस्थ यांमधली फारकत स्पष्ट करणारा हा निकाल होता, हे राज्यशास्त्राच्या आणि समाजविज्ञानाच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाचं ठरेलच, पण कुठल्याही कलेचा संबंध जगण्याशी असतो, असं मानणाऱ्यांनाही हा निकाल महत्त्वाचा वाटेल. त्यापैकी काही जणांना कदाचित हान्स हाके हा मूळचा जर्मनबिर्मन पण नंतर अमेरिकेत राहू लागलेला कलावंत माहीत असेल, बऱ्याच जणांना माहीत नसेल… पण दृश्यकलेतून ‘मतदारांची ताकद’ दाखवणारा किंवा ज्यानं कलाकृतींमधून ‘जनादेशा’ला आकार दिला असा कलावंत म्हणून या हान्स हाकेच्या दोन कलाकृतींची आठवण आज होते आहे. पैकी एक प्रस्तुत लेखकानं फक्त पाहिलेली आहे, तर दुसरी अनुभवलेली आहे (असं का, याचं कारण मजकुराच्या ओघात कळेलच). पण त्याआधी जनमत आणि दृश्य-प्रतिमा यांच्या संबंधाबद्दल.
‘लोक’ किंवा ‘जनता’ म्हणून वर्तमानपत्रांत कशाचा फोटो वापरतात आठवून पाहा- खरेदीसाठी किंवा रोजच्या प्रवासासाठी होणारी गर्दी ही सर्वाधिक वेळा वापरली जाणारी प्रतिमा. या गर्दीला चेहरा नसतो. क्वचित मोर्चा/सभांमधल्या गर्दीचे फोटो वापरले जातात आणि कधी कधी त्यापैकी काही चेहऱ्यांवर त्वेष/ हुरूप आदी भावना दिसत असतात… यातून त्या साऱ्या जनसंमर्दाची मतं कळावीत असा हेतूच नसतो, त्यामुळे हे फोटो वर्तमानपत्रांत/ साप्ताहिकांत चालून जातात. पण उदाहरणार्थ मतमोजणीच्या दिवशी टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे आलेख, प्रणय रॉय यांच्या कार्यक्रमांतला ‘स्विंग’ किंवा जनमताचा झुकाव स्पष्ट करणारे हलते आलेख ही त्या निकालातल्या ‘जनमता’ची प्रतिमा म्हणूनच दाखवली जाते आणि तिला आकड्यांचा भक्कम आधार असल्यानं ती प्रतिमा योग्यही ठरते. हीच वैशिष्ट्यं हान्स हाके याच्या ‘द मोमा पोल’ या कलाकृतीत १९७० साली उतरली होती.
लक्षात घ्या- १९७० साली… म्हणजे भारतात टीव्ही फक्त दिल्लीत, तोही ‘प्रायोगिक तत्त्वावर’ चालत होता तेव्हा. संगणक म्हणजे प्रचंड खोलीतले मोठ्ठे सर्व्हर असायचे तेव्हा. मतदान यंत्रं वगैरे जगात कुठेही नव्हती, तेव्हा! आणि हान्स हाके यानं वयाची पस्तिशीही पार केली नव्हती, तेव्हा.
तेव्हा त्याचा समावेश न्यू यॉर्कच्या ‘मोमा’ अर्थात ‘म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट’मधल्या ‘इन्फर्मेशन’ नावाच्या प्रदर्शनात झाला- ‘संकल्पनात्मक कला’ म्हणजे कन्सेप्च्युअल आर्ट या त्या वेळी नव्या मानल्या जाणाऱ्या कलाप्रकारात काम करणाऱ्या तरुण कलावंतांचं हे प्रदर्शन. त्याचा गुंफणकारही तरुणच, मूळचा हैतीचा- कायनास्टन मॅक्शाइन. त्याला आणि हान्स हाके याला नव-कलेच्या इतिहासात अढळ स्थान मिळवून देणारं प्रदर्शन ठरलं ते!
हान्स हाकेची ‘कलाकृती’ पहिल्या दिवशी साधीशी दिसत होती… तीच अखेरच्या दिवशी खूपच निराळी दिसली. कारण कलाकृती म्हणून त्यानं चित्र किंवा शिल्पबिल्प मांडलंच नव्हतं. त्यानं मांडले होते दोन उंचसे खोके. पारदर्शक. अॅक्रिलिक शिटपासून बनवलेले हे उंच खोके म्हणजे हान्स हाके याच्या कलाकृतीतल्या ‘मतपेट्या’ होत्या. यापैकी एकीमध्ये ‘होय’ मतं, तर दुसऱ्या पारदर्शक पेटीत ‘नाही’ मतं लोकांनी टाकायची. पहिल्या दिवशी अर्थातच त्या पूर्ण रिकाम्या होत्या. पण प्रदर्शनाला येणाऱ्या लोकांच्या सहभागातून त्या भरू लागणार होत्या. मतपत्रिका पांढऱ्या होत्याच, पण गुलाबी, पिवळा, निळा अशा रंगांच्याही होत्या. ज्याला जो हवा तो रंग निवडायचा. अशा ठिकाणी लोकांची रंगनिवड अनेकदा भावनिक असते, पण लोकांनीच करण्याचा पुढला भाग पूर्णत: बौद्धिक असावा, अशी हान्स हाके याची अपेक्षा होती. हा भाग हान्सनं विचारलेल्या एकाच प्रश्नावर ‘होय’ किंवा ‘नाही’ असं उत्तर देण्याचा. दिलेल्या कागदावर प्रेक्षक आणखीही मोठं उत्तर लिहू शकणार होते, कागदावर तेवढी जागा होती! पण तो कागद ‘होय’च्या पेटीत जाणार की ‘नाही’च्या, हेच या कलाकृतीचं दृश्य-वैशिष्ट्य ठरणार होतं.
हान्स हाके यांनी विचारलेला प्रश्न गाजलाच… कारण मुळात, ‘मोमा’ या संग्रहालयातल्या प्रदर्शनात लोकांना विचारला जाणं हेच भारी होतं. नेल्सन रॉकफेलर (उच्चारातला पाठभेद ‘रॉकेफेलर’) हे जगड्व्याळ फाउंडेशन स्थापून मोठमोठे उपक्रम राबवणाऱ्या बड्या उद्याोगपती घराण्याचे वंशज १९५९ पासून न्यू यॉर्क राज्याच्या गव्हर्नरपदी असताना आणि न्यू यॉर्क शहरातल्या ‘मोमा’चे रॉकफेलर हे प्रमुख देणगीदार असूनसुद्धा हान्स हाके यांनी तो प्रश्न विचारला होता.
‘‘गव्हर्नर रॉकफेलर यांनी राष्ट्राध्यक्ष निक्सनच्या इंडोचायना धोरणाचा निषेध केला नाही, हे तथ्य नोव्हेंबरमध्ये तुम्ही त्यांना मतदान न करण्याचे कारण असेल?’’ असा तो प्रश्न! प्रत्यक्षात व्हिएतनाममध्ये नापाम बॉम्बसारख्या रासायनिक अस्त्रांचा वापर करू देणारे निक्सन आणि किती अमेरिकी तरुण तिथं लढताना मरताहेत/ जायबंदी होताहेत याकडे दुर्लक्ष करून या धोरणाला साथ देणारे रॉकफेलर हे दोघेही तगडे उमेदवार होते… त्यामुळे पुढल्या निवडणुकीत ते जिंकलेसुद्धा… पण तरीही ‘मोमा’मधल्या या प्रदर्शनाला आलेले बहुसंख्य प्रेक्षक या दोघांच्या धोरणांना साथ न देणारे आहेत’ हे हान्स हाके यांच्या कलाकृतीनं दाखवून दिलं. कलेच्या ‘मतदारसंघा’त निक्सन आणि रॉकफेलर यांचा पराभव झाला.
हा मतदारसंघ तो कितीसा, हे त्या पारदर्शक पेट्यांमध्ये दिसत होतं. पण हाके यांचा अशा प्रकारच्या कलाकृतींवरला विश्वास अढळ राहिला. पुढंही त्यांनी अनेक प्रकारे जनमत अजमावणाऱ्या कलाकृती- अर्थातच कलाप्रेक्षकांच्या साथीनं- घडवल्या आणि कलाप्रेक्षक हा समाजाचा, राजकारणाचा विचार करणारा असतो, हेही वारंवार सिद्ध केलं! त्यामुळेच ‘मोमा पोल- १९७०’ ही त्यांची त्या दोन पारदर्शक पेट्यांमधली ‘कलाकृती’ पुन्हा २०१५ सालच्या ‘व्हेनिस बिएनाले’मध्ये मांडलेली पाहायला मिळाली! त्या बिएनालेचे गुंफणकार होते ओक्वी एन्वेझर! व्हेनिसला १८९५ पासून (काही अपवाद वगळता) दर दोन वर्षांनी भरणाऱ्या या महाप्रदर्शनाचे ते पहिले युरोपियनेतर गुंफणकार- ‘साऱ्या जगाची भवितव्यं कला पाहात असते’ अशा मध्यवर्ती कल्पनेभोवती ओक्वी एन्वेझर यांनी २०१५ ची बिएनाले गुंफली होती. त्यात हान्स हाके यांची नवी कोरी कलाकृतीसुद्धा होती, ती तिथं अनुभवता आली. साधारण अर्धा तास गेला त्या कलाकृतीत… ‘सहभागी प्रेक्षक’ म्हणून मला वापरायला दिलेल्या आयपॅडच्या पडद्यावर एकापाठोपाठ २० प्रश्न होते; त्यापैकी पहिले आठ स्वत:बद्दलचे (व्हेनिसला कुठून आलात, कला क्षेत्रात काही स्थानबिन आहे की काय तुम्हाला, साधारण उत्पन्न गट काय हो तुमचा, असेसुद्धा) आणि उरलेले डझनभर प्रश्न कला क्षेत्राबद्दल किंवा अमेरिकी विषमतावादी धोरणांबद्दलचे होते. ही प्रश्नावली युरोपीय भाषांप्रमाणेच हिंदी, बंगालीतही होती. त्यातला एक प्रश्न अबु धाबीमध्ये त्या वेळी उभारली जात असलेल्या ‘गुगेनहाइम म्युझियम’ ‘लूव्र अबुधाबी’ या बड्या संग्रहालयांच्या शाखा आणि न्यू यॉर्क विद्यापीठाचं उपकेंद्र यांच्या इमारत-बांधणीत दक्षिण आशियाई मजुरांची पिळवणूक झाल्याचा ‘ह्यूमन राइट्स वॉच’चा निष्कर्ष आणि त्यानंतर दृश्यकलावंतांनी स्थापलेल्या ‘गल्फ लेबर’ या गटानं लूव्र किंवा न्यू यॉर्क विद्यापीठानंच ही पिळवणूक थांबवून मजुरी वाढवावी अशी केलेली मागणी यांना तुम्ही पाठिंबा द्याल का, असा होता. नंतर कळलं की, एकंदर २२३५२ सहभागींपैकी ९१ टक्क्यांचं उत्तर ‘हो’ होतं!
हान्स हाके आता ८७ वर्षांचे आहेत. त्यांच्या ‘कलाकृती’ संग्रहालयांत जपल्या जाताहेत आणि त्यांत ही कलाप्रेक्षकांची मतंही आहेत… त्या कलाकृती त्या-त्या वेळच्या मतांची आठवण देत राहतीलच, पण ही सारी मतं मानवतेच्या बाजूची होती, जग कमी विषमतावादी आणि अधिक शांततावादी असावं असं म्हणणारी होती, म्हणून अभिजात कलेला शोभणारा उदात्त आदर्शवादही त्यांत आहे. हान्स हाकेंनीच एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे या कलाकृती हे ‘कलाप्रेक्षकांनी समाजाचं काढलेलं आत्मचित्र आहे.’
पण हाके यांना खास धन्यवाद एवढ्याचसाठी की, जनमताच्या कौलातूनही ‘कलाकृती’चा आनंद मिळू शकतो याची जाणीव त्यांनी दिली!