‘शाहीनबाग’सारखे विषयही वस्त्रकलेतून मांडता येतात, वस्त्रकला घडवताना मदतनिसांऐवजी साथीदारांशी वैचारिक संवाद होऊ शकतो, पण हा संवाद कुणापर्यंत पोहोचतो आहे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘वस्त्रकला’ असा निराळा विभागच मुंबईच्या सर ज. जी. कला महाविद्यालयात आहे, तसाच तो राज्य सरकारच्या छत्रपती संभाजीनगरच्याही कला महाविद्यालयात वर्षांनुवर्ष आहे. शांतिनिकेतनमध्ये गांभीर्यानं कापडावरलं ‘बाटिक’ तंत्र शिकवलं जाऊ लागलं, त्याला तर शंभर वर्ष झाली आहेत. जवळपास तितक्याच पूर्वीपासून आाधुनिकतावादी जगण्याशी सुसंगत कलाविष्कार करू पाहणाऱ्या ‘बाउहाउस’ या जर्मन संस्थेनंही वस्त्रकलेकडे लक्ष दिलं होतं (बाउहाउसला ‘कलाशाळा’ म्हणणं जड जातंय, म्हणून नुसतं संस्था). मात्र वस्त्रकलेचा किंवा कोणताही अभ्यासक्रम कौशल्यं शिकवतो आणि या कौशल्यांनिशी आजवर लोकांनी काय काय केलं आहे याची जाण देतो. त्यापुढे स्वत:ची अभिव्यक्ती मात्र प्रत्येकाला शोधावी लागते. चित्रकलेच्या क्षेत्रात ‘कॅनव्हासवर तैलरंग’ प्रकारच्या चित्रांची मिरास मोठी. त्यानंतर कलाप्रकारांची (साधनांनुसार) ‘जातिव्यवस्था’ पाहू गेलं तर वस्त्रकला ही अगदी गेल्या तीन दशकांपर्यंत गावकुसाबाहेर होती. ही जगभरची कथा. ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न देशोदेशींच्या कलावंतांनी केला, त्यांना प्रतिसादही मिळू लागला. तरीही ‘जागतिक’ कला-पटलावर वस्त्रकलेचं महत्त्व कमीच लेखलं जात होतं.. जी महाप्रदर्शनं पाहण्यासाठी देशोदेशीहून कलाप्रेक्षक मुद्दाम येतात, अशा प्रदर्शनांत वस्त्रकला मांडली जाण्यासाठी एकविसावं शतक उजाडावं लागलं.
यंदाच्या ‘व्हेनिस बिएनाले’त एक विभागच्या विभाग वस्त्रकलेचा होता.. पण हेही ‘आम्ही अमुक पद अमक्या समाजातल्या व्यक्तीला दिलंय, असं करणारे आम्हीच पहिले’ या प्रकारच्या प्रतिपाळभावाचं लक्षण ठरतंय का, असं किल्मिष आजही उरावं अशी परिस्थिती आहे. लंडनच्या ‘बार्बिकन आर्ट सेंटर’नं ४५ वस्त्र-कलावंतांच्या अभिव्यक्तीचं प्रदर्शन फेब्रुवारीत भरवलं, त्याचं शीर्षक ‘अनरॅव्हल- द पॉवर अॅण्ड पॉलिटिक्स ऑफ टेक्स्टाइल्स इन आर्ट’ असं होतं. बार्बिकनच्या प्रदर्शनात ४५ पैकी ११ च वस्त्रकलावंत पुरुष (त्यांपैकी चौघे उघड गे) होते. ‘हे क्षेत्र स्त्रियांचंच’ असं जणू जगानं ठरवून टाकलंय. या प्रदर्शनाचा सटीप कॅटलॉग पाहिला आणि व्हेनिस बिएनालेतली वस्त्रकला पाहून जे लक्षात आलं होतं तेच पक्कं झालं : वस्त्रकलेतला अभिव्यक्तीवाद आणि अमूर्तवाद हे दोन प्रवाह ठळकपणे दिसतात. यापैकी अभिव्यक्तीवादी काम करणारेही वस्त्रकलावंत भारतात आहेत, पण त्यांच्याकडे एकंदर जगाचं लक्ष कमी आहे. मृणालिनी मुखर्जी यांची तागाच्या सुतळीवजा दोऱ्यांना गाठी मारून घडवलेली शिल्पं ‘स्त्रीवादी देवताकार’ म्हणून बार्बिकनच्या प्रदर्शनात होती. पण गेल्या काही वर्षांत लावण्या मणी, वरुणिका सराफ, जयिता चटर्जी यांनी अभिव्यक्तीवादी वस्त्रकला केल्याचं दिसलं. सराफ यांनी ‘शाहीनबाग आंदोलना’सारखे विषय वस्त्रकलेत आणले, तर चटर्जीनी गरीब महिलांचं जगणं. मुंबईत जी तीन मोठी संग्रहालयं (जागेच्या चढत्या भाजणीनं : भाऊ दाजी लाड संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय- एनजीएमए) समकालीन कलेच्या प्रदर्शनांसाठी उपलब्ध आहेत, तिथं एकेकदा तरी वस्त्रकलेची प्रदर्शनं भरलेली आहेत. यापैकी ‘एनजीएमए’तलं प्रदर्शन तुलनेनं अलीकडचं, पण तिथं भारतीय वस्त्रांच्या इतिहासावर भर होता. सरकारी कलादालन असल्यानं राजकीय आशयाची अभिव्यक्ती वगैरे दिसणं शक्यच नव्हतं!
हा अभिव्यक्तीचा खंदा आविष्कार सातत्यानं झालेला दिसतो मूळच्या फिलिपाइन्सच्या आणि नंतर अमेरिका- युरोपात बराच काळ काढून सिंगापूरमध्ये अखेरचा श्वास घेतलेल्या पासिता आबाद यांच्या कलाकृतींमध्ये. वस्त्रचित्रांसाठी त्यांनी निरनिराळय़ा तंत्रांचा वापर केला. म्हणजे एकाच चित्रात ‘अॅप्लीक’सारखं जोडकाम, भरतकाम, कांथासारखे सर्वत्र धावदोऱ्याचे टाके देऊन पोत साधणं.. आणि आवश्यक तिथे रंगकामसुद्धा. त्यांची जी दोन चित्रं व्हेनिसमध्ये यंदा पाहायला मिळाली (नोव्हेंबपर्यंत पाहता येतील), त्यांपैकी एक हाँगकाँगच्या – किंवा तत्सम कोणत्याही महानगरातल्या – जागतिकीकरणोत्तर बाजारातली चमक आणि तिथल्या सर्वसामान्यांचं जगणं यांमधला विरोधाभास दाखवणारं होतं. या चित्रातली माणसं नुसतीच सर्वसामान्य नाहीत, ते सारे हाँगकाँगमध्ये जगायला आलेले फिलिपिनो आहेत, असं या चित्राचं शीर्षक सांगतं. दुसरं चित्र ‘अमेरिकेत प्रवेश मिळण्याची वाट पाहत ग्वांतानामो बे मध्ये ताटकळलेले हैती-वासी’ अशा शीर्षकाचं नसतं, तरीही कुणा तरी सामान्य व्यवसाय करणाऱ्या गरिबांना कुणी तरी काटेरी तारांच्या कुंपणापल्याड ठेवलंय, एवढं तर चित्रातून दिसतच होतं. पासिता आाबाद २००४ मध्ये गेल्या. त्याआधीच्या काळात आधुनिकतावादी आणि आधुनिकोत्तर असे दोन्ही कला-विचार प्रवाह त्यांनी पाहिले. वस्त्रकला हेच अभिव्यक्तीचं साधन मानून त्या काम करत राहिल्या. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात (म्हणजे वयाच्या विशीत) अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय चळवळीनं त्या प्रभावित झाल्या होत्या. अमेरिकेतच स्थायिक झाल्यावर जॅक गॅरिटी हे विकास-अर्थशास्त्राचे अभ्यासक त्यांचे जोडीदार झाले आणि या जोडीनं अनेक देशांत वास्तव्य केलं. विश्वनागरिकत्वाचा खंदा पुरस्कार तिथून अंगी भिनला.
या मजकुरासह जे मिरवणुकीसारखं छायाचित्र दिसतंय ते आहे गुनेस तेर्कोल यांच्या वस्त्र-चित्राच्या मिरवणुकीचं. गुनेस मूळच्या तुर्कस्तानच्या. अनेक महिलांची साथ घेऊन त्यांची वस्त्रचित्रं साकार होतात. या महिला ‘मदतनीस’ नाहीत, तर ‘साथी’ आहेत, असं गुनेस मानतात. महिलांची कार्यशाळा, त्यात वैचारिक चर्चा, त्यातून चित्रविषयाची रूपरेषा ठरवणं आणि मग प्रत्येकीनं या चित्रात आपापल्या प्रतिमेची भर घालणं, असा गुनेस यांच्या चित्रांचा प्रवास होतो. हे चित्र व्हेनिसमध्ये त्यांनी केलं. त्यासाठी जमलेल्या महिला साथींनी, व्हेनिसच्या भर ‘पियाझ्झा सान मार्को’मध्ये – मुख्य चौकात- आपण निदर्शनं केली तरी प्रत्येकीच्या मनात निरनिराळे विचार असतील- ते आपापल्या संस्कृतीतून आणि आर्थिक-सामाजिक अनुभवांतून आलेले असतील, असा मुद्दा मांडला. तो इथं या चित्रात दिसतो आहे. या साऱ्या जणी मिळून काही दिवस एकत्र राहिल्या, त्यांनी चित्र पूर्ण केलं, भरपूर बोलल्या एकमेकींशी.. आणि मग ठरलं.. आपण बिएनालेच्या जागी हे चित्र मिरवणुकीनं न्यायचं.. स्त्रीमुक्तीची गाणी म्हणू, पर्यावरणवादी घोषणा देऊ.. काहीही करू.. पण या चित्रातला भाव आपण काही क्षण तरी जगू या. तेही घडलं! त्या क्षणाचा साक्षीदार ज्यांना होता आलं, तेही हा क्षण जगले असतील.
पण तो क्षण जगून झाल्यावर प्रश्न पडला: ही थेट आंदोलकांसारखी भाषा करणारी कलाकृती असूनसुद्धा तिला आंदोलकांसारखा- रस्त्यावर उतरण्याचा- उत्साह महत्त्वाचा वाटतो आहे.. म्हणजे मग, नुसत्या कलाकृतींचं म्हणणं समाजापर्यंत पोहोचतं का? ज्यांच्यापर्यंत हे म्हणणं पोहोचलं पाहिजे, ते कुठे येतात- बिएनाले वगैर पाहायला? वस्त्रकलाकृती घडवताना लोकसहभाग झाला, पण मग पुढे ती लोकांमध्ये उतरावी की नाही? तसं होत नाही. कदाचित, वस्त्रकलेची प्रतिष्ठा वाढत जाईल तसतशी ती लोकांपासून दुरावेलसुद्धा. वस्त्रकलेचे रंग ‘आर्ट बासल’सारख्या कलाव्यापार मेळय़ांत, व्हेनिससह अनेक द्वैवार्षिक महाप्रदर्शनांत दिसत राहातील, पण कापडी कलाकृतींचे हे वैचारिक रंग जनमानसात उतरणार नाहीत. ते उतरण्यासाठी निराळे प्रयत्न करावे लागतील.