जैवतंत्रज्ञान म्हणजे सजीवांचा (वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव) किंवा त्यांच्या पेशींचा किंवा त्यांनी तयार केलेल्या पदार्थाचा मानवाच्या भल्यासाठी केलेला उपयोग आणि त्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान. सागरी जैवतंत्रज्ञान म्हणजे सागरातील सजीवांचा माणसाच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेला उपयोग.
संपूर्ण पृथ्वीवर जैवविविधता आहेच, सागरातील बरीचशी जैवविविधता अद्याप विस्तृतपणे अभ्यासली गेलेली नाही. येथे असणाऱ्या जिवाणूंची संख्यादेखील बरीच आहे. जमिनीवरील सजीवांचा जेवढा अभ्यास झाला आहे त्यामानाने सागरी सजीव अद्याप अज्ञात आहेत. म्हणजेच सागरी जैवतंत्रज्ञानामध्ये संशोधन करायला प्रचंड वाव आहे.
सागरी सजीवांतील वैविध्य मोठे म्हणजेच त्या सजीवांनी निर्माण केलेल्या रासायनिक पदार्थातसुद्धा वैविध्य मोठे! वनस्पती, एकपेशीय प्राणी, बहुपेशीय प्राणी, शैवाले, जिवाणू, कवके अशा असंख्य सजीवांचा खजिना समुद्रात दडला आहे. त्यांच्यापासून जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने अन्न, उपयुक्त रासायनिक पदार्थ, विकरे, सौंदर्यप्रसाधने, जीवनसत्त्वे, प्रतिजैविके आणि असंख्य औषधे मिळवता येऊ शकतात. औषधांमध्ये जिवाणू, विषाणू, कर्करोग, मलेरिया, दाह, ज्वर यांविरोधी तसेच वेदनाशमन करणारी, चेतापेशी आरोग्य संवर्धक, प्रतिकारशक्ती संवर्धक अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
सागरी सजीवांनी तयार केलेल्या जवळजवळ १५००० पेक्षा अधिक नैसर्गिक रासायनिक रेणूंचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यातील ३० टक्के रेणू स्पंज प्राणी तयार करतात. अनेक प्रचलित प्रतिजैविके मातीतील जिवाणू, कवके या गटातील सजीवांपासून तयार करतात. उदाहरणार्थ, पेनिसिलिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, इ. समुद्रातील सूक्ष्मजीवही अशी प्रतिजैविके तयार करू शकतात. त्यांचा शोध घेतला तर आणखी प्रतिजैविकांचा मोठ्ठा खजिना हाती लागू शकेल.
जनुक अभियांत्रिकी या तंत्रज्ञानाने कोणत्याही सजीवातील जनुक दुसऱ्या सजीवात घालता येते. ज्या सजीवात ते जनुक घातले आहे तो सजीव ते विशिष्ट प्रथिन तयार करू लागतो. समुद्रातील सजीवांतून अशी उपयुक्त जनुके काढून काही जिवाणूंमध्ये घालता येतील आणि या जिवाणूंना मोठय़ा प्रमाणावर वाढवता येईल आणि समुद्री सजीवातील ते प्रथिन आपल्याला हवे तेव्हा आणि हवे तेवढय़ा प्रमाणात मिळवता येईल. असे प्रयोग जगभरातील अनेक संशोधन संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये सुरू आहेत आणि यशस्वी झाले आहेत. सागरी प्राण्यांत असणारी जैव-सक्रिय संयुगे काही प्रमाणात अभ्यासली गेली आहेत.
– बिपिन भालचंद्र देशमाने ,मराठी विज्ञान परिषद