एकमेव मोदी आणि त्यांचा मंत्र पुढे नेणारे बाकीचे भाजपनेते, हे चित्र यंदाच्या प्रचारात रंगत नसले तरी उत्तरेकडील इतर काही राज्यांत २०१९ मध्ये गाठलेली जागांची कमाल पातळी टिकवण्याची आशा यंदाही भाजपला आहे…

लोकसभा निवडणुकीतील भाजपचा जय आणि पराजय यांच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती उभी आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. भाजपमधून मोदींना वजा करा, तीनशे जागादेखील मिळणार नाहीत. ‘इंडिया’विरोधात एकासएक लढाई झाली तर भाजपला तग धरता येणार नाही, असे भाजपमध्ये कोणी बोलून दाखवत असेल तर देशातील राजकीय वातावरण बदलू लागल्याचे संकेत म्हणावे लागतील. त्यात आता तिहार तुरुंगातून बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजपचे किती नुकसान करतील हे खरोखर सांगता येत नाही.

Katol, Saoner, salil Deshmukh, Ashish deshmukh,
विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024, aheri constituency,
भाजप पाठोपाठ काँग्रेसचाही बंडखोरांना छुपा पाठिंबा, अहेरी विधानसभेत युती, आघाडीत अंतर्गत कलह
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
Kothrud Assembly Constituency Assembly Election 2024 Division of Hindutva votes between BJP Shiv Sena Thackeray and MNS Pune news
‘सुरक्षित’ असूनही भाजपची कसोटी
Constituent parties Shiv Sena and NCP in Mahayuti in Vasai are upset
वसईतील महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष नाराज
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव

दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून मोदी व भाजपवर थेट हल्लाबोल केजरीवालांइतका प्रभावीपणे विरोधकांमधील एकाही नेत्याला करता आलेला नाही. केजरीवालांना गप्प करता न आल्याचे वैफल्य भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. केजरीवालांना सगळ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न करूनही ते हाताला लागले नाहीत. मग भाजपचा संयम सुटला. ‘ईडी’ने केजरीवालांना अवेळी अटक केली. मोठी चूक केल्याची जाणीव भाजपला झाली; पण न्यायालय केजरीवालांना जामीन देणार नाही ही आशा होती. तीही सर्वोच्च न्यायालयाने फोल ठरवली. देशाची जनता तुमच्या पाठीशी असल्याचा आत्मविश्वास असेल तर कित्येक चुका निभावून नेता येतात. पण तशी खात्री नसेल तर चुकांची व्याप्ती मोठी होऊ लागते. केजरीवालांची तुरुंगातून २१ दिवसांसाठी का होईना झालेली सुटका ही भाजपच्या अनेक चुकांपैकी एक म्हणता येईल. नेता व पक्ष अतिआत्मविश्वासातून चुका करायला लावतो. भाजपचेही तसेच झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

मोदींनी विरोधकांच्या अविश्वास ठरावाला उत्तर देताना, मी एकटा पुरेसा असल्याचे सांगितले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संसदेत ‘चारसो पार’चा नारा दिला. मग, राम मंदिराच्या उद्घाटनाचा ‘वन मॅन शो’ झाला. नितीशकुमार, एकनाथ शिंदे, अजित पवार अशा असंख्य भाजपेतर नेत्यांना ‘एनडीए’मध्ये आणले गेले. स्वपक्षीय उमेदवार बदलून झाले, राज्यसभेतील नेत्यांना लोकसभेसाठी उतरवले. महाराष्ट्रात तर एकेका जागेसाठी महायुतीत संघर्ष झाला. अखेरपर्यंत उमेदवारांच्या निवडीसाठी वणवण केली. ही सगळी राजकीय उठाठेव करून झाली. पण मोदींच्या हाती राष्ट्रीय मुद्दा नसणे ही भाजपची खरी अडचण ठरली. अखेर मोदींना काँग्रेसचा जाहीरनामा हाती घ्यावा लागला. टोपीतून कबूतर काढावे तसे याच जाहीरनाम्यातून मोदींनी मुद्दे काढले. इतके करूनही आता मतदानाच्या तीन टप्प्यांनंतर भाजपला जागा मिळणार कुठून अशी चर्चा सुरू झालेली आहे.

प्रियंका आणि केजरीवाल!

मोदींच्या भाषणातील कुठलाही मुद्दा हा भाजपच्या नेत्यांसाठी आक्रमक युक्तिवादाचा दिलेला मंत्र असतो. त्याच आधारावर निर्मला सीतारामन यांच्यासारख्या बुद्धिवान नेत्यानेही मोदींच्या नोटाबंदीचे जिवापाड समर्थन केले होते. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मंत्र द्यायला मोदींकडे मुद्दे नाहीत! अगदी ‘मंगळसूत्रा’वरही प्रियंका गांधी-वाड्रांनी, ‘माझ्या आईने देशासाठी मंगळसूत्र दिले’, असे प्रत्युत्तर देत मोदींना गप्प केले आणि महिला मतदारांना आपलेसे केले. यावेळी संपूर्ण प्रचारामध्ये मोदी नव्हे तर प्रियंका सर्वात लोकप्रिय प्रचारक ठरल्या असून त्यांच्या भाषणांना कधी नव्हे इतका लोकांचा प्रतिसाद मिळू लागल्याचे भाजपही मान्य करेल. मोदींची भाषणे कधीही बुचकळ्यात टाकणारी नव्हती. पण, गेल्या आठवड्यात त्यांनी अदानी-अंबानींच्या कथित काळ्या पैशांवर भाष्य करून सगळ्यांना चक्रावून टाकले आहे. या विधानातून मोदींनी, देशातील राजकीय वारे बदलू लागल्याच्या चर्चेला बळ दिले आहे. ‘आम्ही तर तेच म्हणत होतो’, असे म्हणण्याची संधी मोदींनी विरोधकांना दिली आहे.

मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा अर्थाचा अनर्थ करत ‘संपत्तीच्या फेरवाटपा’वरून हिंदू मतदारांच्या मनात भीती घातली. काँग्रेसला मुस्लिमांचा पक्ष ठरवून टाकले. कुंपणावर बसलेल्या मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करून मते खेचण्याचा प्रयत्न मोदी करताना दिसले. हीच खेळी केजरीवाल मोदींवर उलटवू पाहात आहेत असे दिसते. मोदी ७५ व्या वर्षी निवृत्त होऊन पंतप्रधानपद अमित शहांकडे देतील असे म्हणत भाजपच्या निष्ठावान मतदारांमध्ये गोंधळ उडवून देण्याचा खेळ केजरीवालांनी खेळला आहे. भाजपच्या सर्वोच्च नेत्याबद्दल मतदारांच्या मनात किंतू निर्माण केला तर मोदींच्या भाजपला जिंकून देण्याच्या क्षमतेला धक्का लागू शकतो, असे केजरीवालांना वाटले असावे.

उत्तर प्रदेशवरच आशा

भाजपमध्ये आता ‘चारसो पार’बद्दल कोणी बोलत नाही. ‘एनडीए’सह तीनशेचा आकडा गाठला तरी घोडे गंगेत न्हाले असे भाजपला वाटू लागले आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार असल्याने राजकीय हित सांभाळण्यासाठी तरी महायुतीतील आमदारांना काम करावे लागत आहे. बिहारमध्ये भाजपला हादेखील अंकुश ठेवता येऊ शकत नाही. नितीशकुमारांमुळे ‘एनडीए’च्या जागांमध्ये मोठी घट होण्याची भीती सतावू लागली आहे. केजरीवालांमुळे दिल्ली, हरियाणामध्ये भाजपपुढे आव्हान निर्माण झाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये भाजप- तेलुगू देसम- जनसेना हे त्रिकूट ‘वायएसआर काँग्रेस’ला धोबीपछाड देईल असे वाटले होते; पण मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी इतक्या सहजपणे मैदान सोडायला तयार नाहीत असे दिसते. पश्चिम बंगालमध्ये विद्यामान १८ जागा टिकवताना भाजपला शक्ती पणाला लावावी लागली आहे. महाराष्ट्रात ४२ जागा सोडाच, तिशी गाठली तरी महायुतीला मोठे यश मिळाले असे म्हणता येईल. आता राहिला उत्तर प्रदेश, २०१९ मध्ये भाजपसह ‘एनडीए’ला ६४ जागा मिळाल्या होत्या. इथे भाजपला जागांची संभाव्य घसरण रोखता आली नाही तर भाजप कुठेपर्यंत गडगडत जाईल याचा अंदाज बांधणे कठीण असेल.

मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि आता अरविंद केजरीवाल अशा ‘इंडिया’तील नेत्यांचा हल्लाबोल होत असताना भाजपला वाचवण्यासाठी मोदींना ढाल बनून उभे राहावे लागले आहे. दहा वर्षांत पहिल्यांदाच मोदींना बचावासाठी लढावे लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (१३ मे) मतदान होत असून उर्वरित तीन टप्प्यांमध्ये थेट ‘कुरुक्षेत्रा’त लढाई होणार आहे. हेच अखेरचे टप्पे भाजपला तीनशे पार घेऊन जाऊ शकतात. त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, ओदिशा, महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली या राज्यांमध्ये मतदान होणार असून या राज्यांनी सलग दोन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला भरघोस यश मिळवून दिले होते. याच राज्यांमध्ये मोदी सर्वाधिक लोकप्रिय ठरले. मोदींची लोकप्रियता टिकून असेल तर इथले मतदार गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही मोदींच्या पाठीशी उभे राहू शकतील. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ७०-७५ जागांची अपेक्षा आहे. ओदिशामध्ये भाजपला २०१९ मध्ये आठ जागा मिळाल्या होत्या, किमान दहा जागा जास्त मिळवण्याचे भाजपचे लक्ष्य असेल. उत्तरेकडील इतर काही राज्यांमध्ये भाजपने जागांची कमाल पातळी गाठली होती, ती कायम ठेवली तर भाजपला जागांची संभाव्य घसरण रोखता येऊ शकेल. ही किमया फक्त मोदी करू शकत असल्यामुळे भाजपच्या ‘तीनसो पार’च्या आशा टिकून राहिल्या आहेत.