महेश सरलष्कर

भाजपच्या जागावाटपाला २२ जानेवारीनंतरच वेग येईल. तोवर काँग्रेसची न्याय यात्रा पुढे गेलेली असेल आणि ‘इंडिया’चीही बोलणी सुरू झालेली असतील. सध्या मात्र चाचपणीच सुरू आहे.. 

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
prithviraj chavan congress cm
मविआची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…
manipur violence 10 militants killed in encounter with crpf
अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
political parties in uttar pradesh hail sc judgement on bulldozer action
‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया
Paaru
अहिल्यादेवीचा जीव धोक्यात? बंदूक घेऊन किर्लोस्करांच्या घरात एका व्यक्तीने केला प्रवेश, ‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट

दिल्लीतील प्रसारमाध्यमांमधून प्रसारित होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या विविधांगी वृत्तांमुळे देशात बाकी काहीही घडत नसल्याचा भास निर्माण होऊ शकतो हे खरे; पण आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. काँग्रेस आणि भाजपच्या मुख्यालयांमध्ये एकामागून एक बैठका होत आहेत. वेगवेगळय़ा राज्यांमध्ये नवी राजकीय गणिते मांडली जात आहेत. या सगळय़ा घडामोडींवर २२ जानेवारीनंतर शिक्कामोर्तब होईल. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर खरा धूमधडाका पाहायला मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दक्षिणेत फेरी मारून आलेले आहेत. केरळ, तमिळनाडू, लक्षद्वीप असा दौरा करून उत्तरेला दक्षिणेशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाजपने विरोधकांच्या ‘इंडिया’ महाआघाडीवर उत्तर-दक्षिण राज्यांमध्ये आडवी फूट पाडण्याचा आरोप केलेला होता. उत्तरेत राम मंदिराचा मुद्दा राजकीय केला असताना दक्षिणेत ‘सेन्गोल’ राजदंड नव्या संसदेत बसवून तमिळ संस्कृतीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न झालेला होता. वाराणसीमध्ये ‘काशी-तमिळ संगमम’चे सलग दुसरे संमेलन आयोजित केले गेले होते. या पार्श्वभूमीवर मोदींची दक्षिणवारी महत्त्वाची ठरते. मोदींच्या ‘चलो दक्षिण’ प्रयोगामध्ये कर्नाटकच्या पराभवानंतर अडथळे आले असले तरी, दक्षिणेत धडक मारण्याचे भाजपने थांबवलेले नाही. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या पाचही राज्यांमध्ये भाजपला अपवादात्मक जागा जिंकता येईल.

दक्षिणेतील आंध्र प्रदेशात काँग्रेस सर्वात कमकुवत आहे. ‘वायएसआर तेलंगणा’ काँग्रेसमध्ये विलीन करून वाय. एस. शर्मिला यांनी काँग्रेसला आधार मिळवून दिला आहे. इथे जगनमोहन रेड्डी यांच्या ‘वायएसआर काँग्रेस’विरोधात काँग्रेसला एकटय़ाने लढता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत पवन कल्याण यांचा ‘जनसेना पक्ष’ भाजपसोबत जाणार असेल तर तेलुगु देसमला काँग्रेसशी आघाडी करता येऊ शकेल. पण चंद्राबाबू ‘इंडिया’मध्ये सामील होणार की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही आघाडी झाली तर काँग्रेसला कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये जागा वाढवण्याची संधी असेल. लोकसभा निवडणुकीनंतर ‘भारत राष्ट्र समिती’ कदाचित ‘इंडिया’च्या मांडीला मांडी लावून बसू शकेल. ‘वायएसआर काँग्रेस’ मात्र भाजप आघाडीकडे झुकण्याची शक्यता दिसते. तेलंगणामध्ये ‘भारत राष्ट्र समिती’च्या पराभवामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीविरोधात तिसरी आघाडी उघडण्याचा भाजपच्या प्रयत्नाला खीळ बसली. त्याचा फायदा विरोधकांना लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो.

दक्षिणेमध्ये नव्या राजकीय आघाडीची शक्यता निर्माण झाली असताना दिल्लीमध्ये काँग्रेस आणि भाजपचा ‘अंदाज अपना अपना’ सुरू आहे. दोन्ही पक्ष आपापली रणनीती आखून कामाला लागले आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी मोदींनी नेते-पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीचा अजेंडा दिलेला असून त्याची तंतोतंत अंमलबजावणीही केली जात आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराआधी राम मंदिराचा आधार घेत देशभर भाजपसाठी वातावरण निर्मिती केली जाईल. मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा सर्व लोकसभा मतदारसंघांत लोकांना प्रत्यक्ष पाहता येईल. मोदींची ‘मन की बात’ जशी घोळक्याने ऐकली जाते तसाच हा सोहळाही पाहिला जाईल. रामभक्तांना अयोध्येत जाण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सहकार्य करणार आहेत. भाविकांच्या अयोध्यावारीचा भाजपशी थेट संबंध नसल्याचे दाखवले जात असले तरी, वेगवेगळय़ा संस्था-संघटना-मंडळांच्या माध्यमातून भाजपकडून भाविकांची वारी घडवून आणली जाईल. हा टप्पा आचारसंहिता लागू होईपर्यंत चालू शकेल.

भाजप नेहमीच निवडणुकांच्या मूडमध्ये असल्यामुळे त्यांना वेगळी तयारी करावी लागत नाही; फक्त प्राधान्यक्रम बदलावे लागतात. भाजपने कार्यकर्त्यांना ‘अगली बार चारसो पार’चे लक्ष्य दिलेले आहे. त्यासाठी नव्या मतदारांशी संपर्क साधणे आणि केंद्राच्या योजनांचा अधिकाधिक विस्तार करणे या दोन बाबींकडे लक्ष केंद्रित करण्याची सूचना केलेली आहे. त्यानुसार बूथ स्तरावर संपर्क यंत्रणा, फीडबॅक, फॉलो-अप हे ठरलेले टप्पे पार पाडले जातील. प्रत्यक्ष उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झालेली नसली तरी, राज्य स्तरावर प्राथमिक चाळणी लावण्याचे काम केले जात आहे. २२ जानेवारीनंतर भाजपचे केंद्रीय नेते प्रदेश भाजपकडून याद्या मागवतील. त्यानंतर खरा खेळ सुरू होईल. रामलल्ला नव्या मंदिरामध्ये स्थानापन्न होईपर्यंत भाजप रामाचा जप करत राहील.

काँग्रेसला- विशेषत: पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना- ‘इंडिया’च्या घटक पक्षांशी समन्वय आणि काँग्रेसच्या जागांची पक्षांतर्गत चाचपणी अशी दोन्ही गोष्टी एकाच वेळी कराव्या लागत आहेत. या दोन्हीला समांतर राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पाही सुरू होईल. भाजप राम मंदिरातून तर काँग्रेस ‘भारत न्याय यात्रे’तून निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करू पाहात आहे. ही यात्रा पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतून प्रवास करणार असली तरी तिथे काँग्रेस कमीत कमी जागा लढवेल. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस फक्त दोन जागा सोडेल. वास्तविक, या दोन जागा परंपरागत काँग्रेसच्याच आहेत. माकप-काँग्रेस एकत्र लढले तर काँग्रेसच्या पदरात अधिक जागा येतील. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने सुमारे ६५ जागा लढवण्याचा निर्धार केला असल्यामुळे काँग्रेसला जास्तीत जास्त १५ जागा मिळतील. बिहारमध्ये ४-५ जागांवर समाधान मानावे लागेल. महाराष्ट्रामध्ये १८-२१ जागा वाटय़ाला येऊ शकतील. राहुल गांधींची यात्रा राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात यादेखील राज्यांतून जाणार असली तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकतर्फी यश मिळाले होते. आत्ताही विधानसभा निवडणुकीत ही सगळी राज्ये भाजपने काबीज केली आहेत. कर्नाटक व तेलंगणामध्ये यात्रेचा राजकीय फायदा झाला तसा इथे मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जागांमध्ये थोडीफार वाढ झाली तरी यात्रा यशस्वी झाली असे म्हणता येईल!

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चारशेहून अधिक जागा लढवल्या होत्या, या वेळी काँग्रेस २५०-२५५ जागा लढवेल असे सांगितले जात आहे. तसे झाले तर ‘इंडिया’तील घटक पक्षांना जागावाटपात झुकते माप देण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे दिसते. पंजाब काँग्रेसचा स्वतंत्र लढण्याचा हेका केंद्रीय स्तरावर मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे दिल्ली, पंजाब आणि गुजरातमध्ये काँग्रेस ‘आप’शी जागांच्या वाटाघाटी करू शकेल. अरुणाचल प्रदेश वगैरे काही राज्यांमध्ये जागा लढवण्याचे ‘सप’ने ठरवले असले तरी, प्रत्यक्षात जागावाटपाची चर्चा सुरू होईल तेव्हा ‘इंडिया’तील सर्वच प्रादेशिक पक्ष तडजोड करतील असे दिसते. काँग्रेसने पक्षांतर्गत चर्चेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. मुकुल वासनिक यांच्या समितीने राज्या-राज्यांतील काँग्रेसला अपेक्षित असलेल्या जागांची चाचपणी केलेली आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी वासनिक समितीला जागावाटपांच्या शक्या-शक्यतेचा अहवाल दिलेला आहे. या समितीने चार दिवसांपूर्वी खरगेंशी सविस्तर चर्चाही केलेली आहे. त्यामुळे ‘इंडिया’तील घटक पक्षांशी चर्चा करताना कोणत्या जागांचा आग्रह धरायचा याची माहिती खरगे व राहुल गांधींकडे उपलब्ध आहे. पुढील दोन आठवडय़ांमध्ये ‘इंडिया’च्या जागावाटपांचे चित्र स्पष्ट होऊ शकेल. दिल्लीत मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत खरगेंनी, घटक पक्षांशी लवकरात लवकर जागावाटपाचा पेच सोडवला जाईल असे स्पष्ट केले आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. काँग्रेस सर्व मतदारसंघांमध्ये जागा लढणार नसला तरी वाटाघाटीमध्ये मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता असल्याने किमान पाचशे लोकसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १४ जानेवारी रोजी मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा निघेल. मग, काँग्रेसकडून जागावाटपाच्या चर्चेला गती दिली जाईल. तोपर्यंत आढावा-अंदाज घेण्याचे काम होत राहील.

mahesh.sarlashkar @expressindia.com