महेश सरलष्कर
बिहार, ओडिशात युती होईल तेव्हा होईल. पण महाराष्ट्रात आपापल्या मूळ पक्षापासून वेगळे होऊन भाजपला साथ देणाऱ्यांना जागा हव्या आहेत, त्या का दिल्या जात नाहीत?
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ‘इंडि’आघाडी,घमंडिया आघाडी ही दूषणे देणे कमी झाले आहे असे दिसते. खरेतर भाजपला विरोधकांच्या आघाडीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ‘एनडीए’तील आघाड्या करण्यातच भाजप गुरफटून गेला आहे. या आघाड्यांवर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत भाजपला ३७० जागा जिंकण्याची खात्री देता येत नाही. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये भरवशाच्या उमेदवारांना पुन्हा उमेदवारी दिली गेली. त्यामध्ये बहुसंख्य केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता. हे मंत्री भाजपचे हुकमी एक्के आहेत. पहिल्या यादीतून भाजपने घरच्या मैदानावरील सुरक्षित खेळी खेळली आहे. खरी कसरत दुसऱ्या यादीत असेल. इथे आघाड्या मजबूत करून भाजपला जागांची संख्या आणि उमेदवार ठरवावे लागणार आहेत.
महाराष्ट्रातील जागावाटपाला इतका वेळ लागेल असे भाजपला वाटले नव्हते. महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने अनपेक्षितरीत्या खमकी भूमिका घेतली आहे. महायुतीतील तीनही दिग्गज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक सहमती होणे अपेक्षित होते. त्यानंतर तिघांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करून जागावाटपावर शिक्कामोर्तब होऊ शकले असते. पण भाजपची पहिली यादी जाहीर झाली तरी महायुतीत प्राथमिक तडजोडही होऊ शकली नाही. अखेर शहांना मुंबईला जाऊन शिंदे आणि पवार यांची बैठक घ्यावी लागली. शहांनी बैठक घेतल्यामुळे आता तिढा सुटणार असे मानले जात होते. पण, दोन्ही नेत्यांशी स्वतंत्र चर्चा करूनदेखील शहांच्या हाती काही लागले नाही. अखेर या दोन्ही नेत्यांना शहांनी शुक्रवारी दिल्लीत बोलावले. ही बैठकदेखील अपयशी ठरली हे पाहता भाजप महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा लढवण्याबाबत किती आग्रही आहे हे स्पष्ट होते.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : ‘नोटा’ला वैधतेची धार हवीच..
बेरजेऐवजी वजाबाकी?
या बैठकीतून भाजपला शिंदे आणि पवार गटाच्या विजयाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास नाही हेही दिसून आले. तसे असते तर शिंदेंनी मागितलेल्या १३ काय २३ जागाही शहांनी देऊन टाकल्या असत्या. अजित पवारांना दहापेक्षा जास्त जागा हव्या असतील तर त्याही दिल्या असत्या. पण, त्यांच्या मागण्या शहांनी मान्य केलेल्या नाहीत म्हणूनच दोन वेळा बैठक होऊनही महाराष्ट्रात महायुतीचे जागावाटप झालेले नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून लोकसभा निवडणुकीत बेरजेचे गणित भाजपने मांडलेले होते; पण जागावाटप करताना भाजपच्या लक्षात आले असावे की ही तर वजाबाकी होऊ लागली आहे! राज्यात भाजप नवे उमेदवार देईल. शिवाय, त्यांच्याकडे मोदींसारखा विजयाची खात्री देणारा नेता आहे. शिंदे आणि पवार गटाला त्यांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठीदेखील मोदीच हवेत. शिंदे गटाची अडचण अशी की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून शिवसेनेचे नेते त्यांच्यासोबत आले; पण आता विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळणार नसेल तर शिंदेंची ताकद त्यांच्या पक्षात तरी काय राहील हा प्रश्न निर्माण होईल. मग, नेते पूर्वाश्रमीच्या शिवसेनेकडे परतीचा मार्ग पकडतील. शिंदेंनी विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली तर त्यांच्यापैकी किती निवडून येतील याची खात्री नाही. हीच स्थिती अजित पवार गटाचीही आहे. शिंदे आणि पवार गटांना अधिक जागा द्यायच्या आणि त्यांचे खासदार पराभूत झाले तर त्याचा फटका भाजपला सहन करावा लागेल.
हेही वाचा >>> अग्रलेख: नस्ती उठाठेव कशाला?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. तसे नसते तर भाजपने हेमामालिनी यांना मथुरामधून पुन्हा उमेदवारी दिली नसती. त्यांना तिकीट मिळणार नाही अशी चर्चा दिल्लीत रंगली होती; पण मथुरामधून हेमामालिनी विजयी होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांना पुन्हा संधी दिली गेली. विजयाची क्षमता हा नियम महाराष्ट्रातही लागू पडतो. शिंदे वा पवार गटातील उमेदवारांपेक्षा भाजप उमेदवारांच्या विजयाची शक्यता अधिक असेल तर भाजपने अधिक जागांची मागणी केली तर बिघडले कुठे, असा सवाल भाजपने महायुतीतील घटक पक्षांना केलेला आहे. भाजप लोकसभेसाठी तडजोड करण्याच्या मनःस्थितीत नाही असे दिसते. कदाचित राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिंदे व पवार गटांना अधिक जागा दिल्या जाऊ शकतील. मोदी-शहांचा भाजप नेहमीच काळाच्या पुढे जाऊन विचार करतो असे म्हणतात. हे खरे असेल तर त्यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचाही विचार केलेला असू शकतो. महायुतीला पुन्हा सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री कोण, याचीही चर्चा रंगेल. तेव्हा मोदी-शहा कोणाच्या पारड्यात वजन टाकतात यावर या नेत्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे नजीकच्या भविष्यात आपला फायदा होऊ शकतो, असा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही लोकसभेसाठी जागांची तडजोड करण्यास तयारही होऊ शकतील. पण, आणखी सहा महिन्यांनी कोणती राजकीय परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येणे कठीण असल्याने आत्ताच्या घडीला आपली मागणी मान्य करून घेण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यातून खरेतर शिंदे व पवार गट भाजपवर किती विश्वास ठेवतात, ही बाबही उघड होते.
नामुष्की टाळण्याची कसरत
महाराष्ट्रामध्ये पक्षांच्या फोडाफोडीमुळे राजकारणाचा बराच गुंता झालेला आहे. त्यातच मराठा विरुद्ध ओबीसी असा नवा संघर्ष तीव्र झाला आहे. गेल्यावेळी शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले म्हणून त्यातही प्रामुख्याने मुंबईमध्ये त्याच जागांची मागणी केली तर ‘आम्हीच जिंकू’ असा दावा ठामपणे शिंदे गटाला करता आलेला नाही. त्यापेक्षा ‘आम्ही लढतो आणि जिंकतो’, असे भाजप म्हणू लागला आहे. गेल्या वेळी १८ जागा जिंकल्या असताना शिंदे गटाच्या वाट्याला १०-१२ जागा येत असतील आणि अजित पवार गटाला केवळ ३-४ जागा मिळत असतील तर हा त्यांना भाजपने अपमान केला असे वाटू शकते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या पक्षाच्या प्रमुख आणि अध्यक्षांना आव्हान देऊन हे नेते भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. मूळ पक्षापासून वेगळे झाल्यानंतर या नेत्यांनी ठाकरे-पवार यांच्याविरोधात थेट टीका-टिप्पणी आणि आरोपसुद्धा केलेले आहेत. स्वतःचे नेतेपण टिकवायचे असेल तर या दोन्ही नेत्यांना भाजपसमोर जाहीरपणे नांगी टाकून कसे चालेल? त्यांना नामुष्की वाट्याला न येता जागावाटप घडवून आणावे लागेल. ही शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी जबरदस्त कसरत असेल.
बिहार आणि ओडिशा
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारखे प्रशासन आणि राजकारणावर पकड असलेले मुख्यमंत्री असतानादेखील भाजपने जयंत चौधरी, ओमप्रकाश राजभर, संजय निषाद या प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना सोबत घेतले आहे, त्यांच्या पक्षाला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. बिहारमध्ये नितीशकुमार ‘एनडीए’मध्ये आले असले तरी, त्यांची लोकसभा निवडणुकीची लढाई अर्ध्यावर सोडली की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ओडिशामध्ये बिजू जनता दलाशी भाजपला युती करायची असली तरी तेही घोंगडे भिजत पडलेले आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांना ‘एनडीए’मध्ये आणण्यात भाजपला यश आलेले आहे. भाजपचा हा विविध राज्यांतील आघाड्यांचा खेळ पाहता त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील यश कळीचे ठरणार आहे. त्यासाठीच भाजप अधिक जागांचा अट्टहास सोडायला तयार नाही.mahesh.sarlashkar@expressindia.com