महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा एखाद-दोन दिवसांत होऊ शकेल असे दिसते. हरियाणा भाजपने जिंकले असल्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीला वेगळेच महत्त्व आलेले आहे. इथे एक बदल झालेला पाहायला मिळेल असे वाटते. लोकसभा निवडणुकीमध्ये ना राम-संबंधित मुद्दा चालला ना मोदी. त्यामुळे हरियाणात भाजपने मोदींवर अवलंबून न राहता निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. पण, महाराष्ट्रामध्ये भाजपला कदाचित नको असले तरीही मोदी जोरदार प्रचार करणार हे नक्की! त्याचा महायुतीला किती फायदा होईल हा भाग वेगळा; पण भाजपवरील आपली पकड अजूनही तितकीच घट्ट आहे हे मोदी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध करू पाहतील. मध्यंतरीच्या काळात मोदींविरोधात भाजपमधील काही ज्येष्ठ नेते उघडपणे बोलू लागले होते, राज्यात येऊन मोदी त्यांना चपराक देण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवडणुकीत कोणती आघाडी वा युती जिंकेल हे फारसे महत्त्वाचे नाही, प्रचारामध्ये मोदी-शहा काय करतात हे पाहण्याजोगे असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीतली शिरजोरी

हरियाणातील निकालाआधी राज्यात विरोधकांच्या महाविकास आघाडीला तुलनेत अनुकूल परिस्थिती होती असे मानले जात होते. पण ही निवडणूक एकतर्फी होईल आणि महाविकास आघाडीला मोकळे रान मिळेल असे कोणीही म्हणत नव्हते. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या आणि भाजपला अनपेक्षितपणे कमी जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असेल अशी चर्चा होत होती. मध्यंतरीच्या काळात महायुतीतील घटक पक्षांमध्ये तीव्र झालेल्या मतभेदांमुळेही महाविकास आघाडीला सत्ता मिळू शकते असे बोलले जाऊ लागले. महायुतीतील संघर्ष अजूनही थांबलेला नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली कोंडी कोणीही नाकारू शकत नाही. अजित पवारांच्या गटाला ना महायुतीतून बाहेर पडून काही मिळेल ना महायुतीत राहून फार काही हाती लागेल असे जाणकारांचे म्हणणे होते. असे असले तरी प्रतिकूल परिस्थितीत राजकारणामध्ये टिकून राहणे हेदेखील मोठी गोष्ट असते. सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राजकारणात टिकून राहण्याला अधिक प्राधान्य देत असल्याचे मानले जाते. महायुतीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने जबरदस्त बाजी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरून पंतप्रधान मोदी थेट ठाण्यात जाऊन जाहीर सभा घेतात. इथेच शिंदेंचे महायुतीतील महत्त्व स्पष्ट होते. खरे तर महायुतीमध्ये शिंदे गट भाजप आणि अजित पवार गटाला शिरजोर झाला आहे, ही बाब दोन्ही पक्षांना रुचलेली नाही. अगदी संघालादेखील शिंदे गट पसंत आहे असे नव्हे. पण, मोदी-शहांची शिंदेंना पसंती असल्यामुळे राज्यातील भाजपच्या नेत्यांना शिंदे गटाविरोधात काही करता येते ना अजित पवार गटाला! त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात मिळतील तितक्या जागा घेऊन निवडणूक लढवण्यापलीकडे या पक्षांना काही करता येणार नाही. त्यातल्या त्यात भाजपसाठी जमेची बाजू म्हणजे राज्यात संघाच्या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेऊन भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेते निवडणुकीची तयारी करताना दिसतात. त्यामुळे संघाच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे नाइलाजाने का होईना केंद्रातील भाजप नेत्यांना ऐकावे लागत असल्याचे बोलले जाते.

आव्हान ठाकरेंपुढे

महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत धिम्या गतीने, पण ठामपणे पावले टाकत निवडणुकीसाठी मशागत केलेली आहे. शांत झोप यावी म्हणून काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आता तुतारी हाती घेतली आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून तुतारीकडे नेते आकर्षित होऊ लागले आहेत. खुद्द शरद पवार पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्याची आक्रमक भाषा ते वापरताना दिसतात. निवडणुकीसाठी सूक्ष्म व्यवस्थापन किती महत्त्वाचे असते याची जाणीव असलेले भाजपव्यतिरिक्तचे एकमेव नेते म्हणजे शरद पवार. त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी कोणाच्याही नजरेत न भरता पक्षाची आणि मतदारसंघाची बांधणी केली. त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीपासूनच झाली होती. मतदारसंघनिहाय नवे चेहरे कोण असू शकतात, कोणाला पुन्हा पक्षात घेतले जाऊ शकते, कुठला नेता विधानसभा निवडणुकीसाठी उपयुक्त ठरेल याची गणिते शरद पवारांनी केल्याचे सांगितले जाते. ते आत्ता काही नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे लोकांसमोर येऊ लागले आहे.

सूक्ष्म व्यवस्थापनाचे महत्त्व काँग्रेसला कळले नसल्यामुळे त्यांचे नेते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाशी मुख्यमंत्रीपदावरून भांडताना दिसले. हरियाणामध्ये भाजपने कशी मात केली याचा थोडा जरी अभ्यास केला तरी राज्यात काँग्रेसला चुका टाळता येऊ शकतात. महाराष्ट्रात काँग्रेसचा भर राहुल गांधींच्या प्रचारावरच असेल. प्रामुख्याने विदर्भ आणि मुंबईमध्ये राहुल गांधींनी काँग्रेसला जागा मिळवून दिल्या तर महाविकास आघाडी सत्तेच्या स्पर्धेत राहू शकेल.

खरी परीक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची असेल असे दिसते. लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मुस्लीम व दलित या दोन्ही मतदारांनी पाठिंबा दिला होता. मुंबईमध्ये मुस्लीम मतदार ठाकरे गटाकडे वळवण्यामध्ये तिथल्या नागरी संघटनांनी खूप मोठी भूमिका निभावलेली होती. हे दोन्ही मतदार विधानसभा निवडणुकीमध्येही कायम राहण्यासाठी ठाकरे गटाकडून काय केले जाते यावर या गटाचे यश अवलंबून असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठी मतदार ठाकरे व शिंदे गटामध्ये विभागले गेले होते. त्यामुळे ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नव्हते. आत्ता सरकारी योजनांच्या माध्यमातून, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिगत जनसंपर्कामुळे शिंदे गटाने आगेकूच केली असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मतदारांपर्यंत पोहोचून गड-किल्ले राखावे लागणार आहेत. तसे झाले नाही तर कदाचित महाविकास आघाडीमध्ये हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.

कोण काय साधणार?

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तुल्यबळ लढाई होईल हे कोणी नाकारत नाही. हरियाणाच्या निकालाने महायुतीला ताकद दिली हेही मान्य करावे लागेल. त्यामुळेच महाराष्ट्रातील निकाल मोदी-शहांसाठी महत्त्वाचे असतील. या निवडणुकीतून मोदी-शहांना दोन्ही बाबी साध्य करायच्या आहेत असे दिसते. इतक्या प्रचंड गोंधळानंतरही महायुतीला सत्ता राखण्यामध्ये यश मिळाले तर ‘इंडिया आघाडी’चे मानसिक खच्चीकरण होईल. त्याचा मोठा लाभ केंद्रात आघाडीचे सरकार चालवताना होऊ शकतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना मोदी-शहांवर शिरजोर होता येणार नाही. केंद्रातील सरकार अधिक भक्कम करता येऊ शकेल. इतकेच नव्हे तर भाजपअंतर्गत विरोधकांवर पुन्हा नियंत्रण मिळवता येऊ शकेल. भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये संघाचा सल्ला मान्य करण्याचे दडपणही झुगारून देता येईल. भाजप आणि संघाच्या संबंधांमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व मिळवता येईल. अशा अनेक गोष्टी मोदी-शहांना एकाच वेळी साधता येतील. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रचारसभांमध्ये मोदींचा पवित्रा कसा असेल याकडे भाजप आणि संघाच्या नेत्यांचे लक्ष असेल असे दिसते.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lalkilaa attention to modi shah in state elections 2024 amy
Show comments