भाजपला असे वाटत होते की, त्यांनी दहा वर्षे जो खेळ केला तो इतरांना करता येणार नाही. पण त्यांच्याच आयुधाने काँग्रेसने भाजपवर वार केला. हा अचानक झालेला वार भाजपला सहन झाला नाही. भाजपने आत्तापर्यंत काँग्रेस नेत्यांच्या चित्रफिती ‘व्हायरल’ केल्या नव्हत्या का? राहुल गांधी हे तर भाजपसाठी समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याचे हुकमी गिऱ्हाईक होते. भाजपने राहुल गांधींची जेवढी टिंगल केली तेवढी कोणाचीही केली नसेल. त्यांची टिंगल करण्यात भाजपला मजाही येत होती. हिंदीमध्ये आपले विचार नीट लोकांपर्यंत पोहोचवता येत नाहीत ही राहुल गांधींची मोठी अडचण आहे. मग, ते जाहीर सभेतील भाषण असो वा लोकसभेतील. या भाषणांमध्ये शब्दांचा अचूक वापर होत नाही. मग, त्यातून भाजपचे नेते खोट काढून राहुल गांधींची चेष्टा करतात. पण, या वेळी काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाक्यात खोट काढून त्यांना कोंडीत पकडले. त्यांच्या राज्यसभेतील भाषणातील वाक्ये बरोबर चिमटीत पकडली आणि ती व्हायरल केली. शहांचे म्हणणे होते की, वाक्यांची मोडतोड केली, चुकीचा अर्थ काढला गेला. पण, शहा इतके स्पष्ट बोललेेले आहेत की त्याचा याहून चुकीचा अर्थ काढला जाणे अशक्य आहे. शहा काय म्हणाले हे पूर्ण ऐकले तर समजेल. त्यांना जे म्हणायचे होते तेच त्यांनी म्हटलेले आहे. त्यामध्ये चुकीचा अर्थ काढण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. काँग्रेसने थेट शहांवरच हल्लाबोल केल्यामुळे भाजपची धावपळ सुरू झाली होती. शहांची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर भाजपचे नेते अक्षरश: सैरावैरा धावत असल्याचे पाहायला मिळाले. संसदेचे हिवाळी अधिवेशन संपता संपता हा सामना काँग्रेसने निर्विवादपणे जिंकला हे मान्य करावे लागेल. नंतरचा भाजपचा आक्रमकपणा हा निव्वळ चेहरा वाचवण्याचा प्रकार होता!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा