संविधान-बदलाच्या मुद्दय़ाचा प्रतिवाद भाजपला अद्यापही करावा लागत असताना राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदुत्वाचा मुद्दा काढला. पण काँग्रेससाठी हिंदुत्वाचा मुद्दा दुधारी तलवारीसारखा ठरेल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट मोदींवर केलेला शाब्दिक प्रहार भाजपसाठी अनपेक्षित होता. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या जुन्या गाजलेल्या ‘वनलायनर’मध्ये सांगायचे तर, ‘जोर का झटका धीरे से लगे’ असा प्रकार होता. संसदेमध्ये राहुल गांधींचे भाषण कधी इतके प्रभावी झालेले कुणी पाहिले नव्हते. पूर्वीही त्यांनी केलेल्या भाषणावर मोदींच्या भाषणाचा झणझणीत उतारा असे. मग राहुल गांधींच्या भाषणाचा प्रभाव निघून जाई. या वेळी मोदींच्या ‘बालकबुद्धी’च्या उपहासापेक्षाही राहुल गांधींनी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून आव्हान दिल्याची चर्चा अधिक होत राहिली. आधी संविधान आणि आता हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून काँग्रेसने भाजपच्या राजकीय मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधींनी हिंदुत्वावरून आपली कोंडी केल्याचे भाजपला खूप उशिरा लक्षात आले. लोकसभेत राहुल गांधी बोलत असताना स्वत: मोदी दोन वेळा उठून उभे राहिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी किती वेळा हस्तक्षेप केला याची मोजदादच नाही. शहा उठून उभे राहिल्यावर इतर मंत्र्यांना मैदानात उडी घ्यावीच लागली. लोकसभेत हे सगळे नाटय़ सुरू असताना अत्यंत शांत बसून होते ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. त्यांनी आपला आब राखून ठेवला, संयमही ठेवला. अर्थात त्यांच्या मंत्रालयावर राहुल गांधी वा विरोधकांनी टिप्पणी केली नाही हा भाग वेगळा! पण हिंदुत्वावरून भाजपचे आधुनिक ‘चाणक्य’ हडबडून गेलेले दिसले, हे विशेष. राहुल गांधींच्या भाषणामुळे भाजपमध्ये किती कोलाहल माजला असेल याची कल्पना करता येऊ शकेल.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी म्हणाले की, देवाचे दर्शन घ्यायचे असते, प्रदर्शन करायचे नसते.. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता की, राहुल गांधींनी सभागृहात शंकराचे चित्र दाखवून हिंदू धर्माचा आणि देवांचा अपमान केला आहे. हा अपमान हिंदू समाज कधीही विसरणार नाही आणि राहुल गांधी वा काँग्रेसला देश माफ करणार नाही. मोदींचा खरा आक्षेप शंकराच्या चित्राला नव्हता; तर राहुल गांधींनी भाजपच्या हिंदुत्वाच्या मक्तेदारीला आव्हान दिले, हे त्यांचे खरे दु:ख असावे. हे दु:ख वेगळय़ा भाषेत बाहेर पडले इतकेच. राहुल गांधींनी हिंदू हिंसक असल्याचे म्हटले नव्हते. भाजप व संघवाले हिंसा आणि द्वेष पसरवतात असा त्यांनी आरोप केला होता. मोदींनी हा आरोप अख्ख्या हिंदू समाजाशी जोडून भाजपला वाचवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस हा हिंदूद्वेष्टा पक्ष असून हिंदूंचे खरे रक्षण फक्त भाजपच करू शकेल, असा मोदी यांचा युक्तिवाद होता. २०१४ नंतरही मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भाजपला यश मिळवून दिले. हिंदुत्वाच्या जोडीला राष्ट्रवाद आणि केंद्रातील लोककल्याणाच्या योजना असे मोदींच्या यशाचे सूत्र होते. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा नव्हताच. केंद्राच्या योजनांचा लाभ मिळाला हे नाकारता येत नाही. मध्य प्रदेशातील ‘लाडली बहना’च्या मदतीने भाजपने त्या राज्यातील अख्खी विधानसभा निवडणूक फिरवली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपचा हुकमी हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी ठरला नाही. भाजपला बहुमत न मिळण्यामागे हिंदुत्वाने दिलेला दगा हे प्रमुख कारण मानता येऊ शकेल. राम मंदिराची लाट विरून गेली हे लक्षात घेतले पाहिजे.

काँग्रेसने यापूर्वीही हिंदुत्वाच्या मुद्दय़ाला हात घातला होता. निवडणुका आल्या की, राहुल-प्रियंका हे भाऊ-बहीण ठिकठिकाणच्या मंदिरांना भेटी देत असत. पूजा-अर्जा केल्याची छायाचित्रे काँग्रेसकडून प्रसिद्ध केली जात. ‘भारत जोडो’ यात्रेमध्येही राहुल गांधींनी वेगवेगळय़ा मठांना आणि स्वामींना भेटी दिल्या होत्या. काँग्रेसचे हे सौम्य हिंदुत्व मानले गेले. त्याचा काँग्रेसला कधी राजकीयदृष्टय़ा फायदा झालेला दिसला नाही. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी हनुमानाचा मुद्दा प्रचारात आणला होता; पण भाजपचे कडवे हिंदुत्व मान्य असलेले मतदार काँग्रेसचे सौम्य हिंदुत्व का मान्य करतील हा प्रश्न होता. मध्य प्रदेश ही तर भाजप व संघाची हिंदुत्वाची प्रयोगशाळा मानली जाते. मग कमलनाथ यांचा हनुमान काँग्रेसला कसा पावेल असे तेव्हाही विचारले गेले होते. पण आता लोकसभेतील भाषणामध्ये राहुल गांधींनी हिंदुत्वाच्या मुद्दय़ाला पुन्हा हात घातला आहे. हा मुद्दा काँग्रेस कसा पुढे घेऊन जाईल याची उत्सुकता असेल.

लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा घेऊन काँग्रेस लोकांपर्यंत पोहोचला होता. भाजपने पूर्वी ‘हिंदू खतरे में’चा नारा दिला होता तसा, या वेळी काँग्रेसने ‘संविधान खतरें में’चा नारा दिला होता. काँग्रेसचा हा बाण भाजपच्या वर्मी बसला. देशभर मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, या निर्णयामुळेच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला काँग्रेसशी युती करावी लागली. संविधानाच्या मुद्दय़ामुळे दलित आणि ओबीसीही काँग्रेसकडे वळले. तसे नसते तर खुद्द मोदी वाराणसीमध्ये काठावर पास झाले नसते. वाराणसीमध्ये भाजपला कोणी दगाफटका केला यावर लखनऊमध्ये भाजपच्या बैठकीमध्ये चर्वितचर्वण झाल्याचे सांगितले जाते.

काँग्रेसच्या या संविधानाच्या मुद्दय़ाने भाजपच्या हिंदुत्वाला छेद दिला. सर्व हिंदू एक असून त्यांच्या रक्षणासाठी भाजपला केंद्रात सत्ता मिळवून दिली पाहिजे, हा विचार या वेळी भाजपच्या मदतीला आला नाही. भाजप आपले भले करू शकत नाही असे दलित आणि ओबीसींनाही वाटले. संविधानाच्या मुद्दय़ाविरोधात भाजपला अद्याप बिनतोड युक्तिवाद करता आलेला नाही. असे असताना काँग्रेसने हिंदुत्वाच्या मुद्दय़ाला हात घातला आहे. त्यामुळे काँग्रेस आता हिंदुत्वाचा मुद्दा भाजपकडून कसा हिरावून घेईल की, या मुद्दय़ामध्ये स्वत:च फसेल याकडे सर्वाधिक लक्ष भाजपचे असेल. काँग्रेसविरोधात भाजपने जाळे टाकायला सुरुवात केली आहे. भाजपचे ‘आयटी’ विभागाचे प्रमुख अमित मालवियांनी हिंदुत्वावरून राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. त्यातून भाजपच्या ‘ट्रोल आर्मी’ला संदेश दिला गेला आहे. त्यामुळे हिंदुत्वावरून भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष तीव्र झालेला असेल. लोकसभेतच नव्हे तर गुजरातमध्ये जाऊन राहुल गांधींनी ‘आम्ही तुम्हाला इथेही पराभूत करू’, असे थेट आव्हान दिले आहे. भाजपच्या गुजरातमधील बालेकिल्ल्याला तडे गेले तर भाजपच्या हिंदुत्वालाही तडा गेला असे मानता येईल.

हिंदू धर्मावर फक्त भाजपची मक्तेदारी नाही. भाजपचे हिंदुत्व हीच हिंदू धर्माची एकमेव व्याख्या नव्हे. काँग्रेसच नव्हे तर ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांतील नेते-कार्यकर्तेही हिंदू आहेत. ‘इंडिया’ आघाडीला मते देणारेही हिंदू आहेत. त्यामध्ये दलित-ओबीसीही आले. ‘भाजपचे हिंदुत्व दलितांवर अन्याय करणारे आहे; संविधान बदलून हक्क हिरावणारे आहे; राम मंदिराच्या नावाखाली लोकांची जमीन हडपणारे आहे; ते इतर धर्माविरोधात हिंसा घडवणारे आहे..’ अशी व्यापक मांडणी काँग्रेसने केली आहे. हाच राहुल गांधींच्या भाषणामध्ये भाजपच्या हिंदुत्वविरोधाचा मुख्य आधार होता. पण काँग्रेससाठी हिंदुत्वाचा मुद्दा दुधारी तलवारीसारखा असेल. काँग्रेस हा हिंदूंचा पर्यायी पक्ष होऊ पाहत आहे, असा गैरसमज मुस्लीम वा अन्य धर्मातील लोकांनी करून घेतला तर, ते काँग्रेसला मतदान करण्याबाबत फेरविचार करू शकतील. संविधानाचा आग्रह धरल्यामुळे दलित वा ओबीसी काँग्रेससोबत आले; पण हिंदुत्वाच्या मुद्दय़ामुळे काँग्रेसने संविधानाचा मुद्दा सोडून दिला वा दलित-ओबीसींना काँग्रेस आपले काहीच भले करू शकत नाही असे वाटले तर ते पुन्हा भाजपकडे वळण्याचा धोका असेल. भाजपच्या हिंदुत्वाला विरोध करताना काँग्रेस सौम्य हिंदुत्वाच्या मार्गाने पुढे गेला तर भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक काय असा प्रश्न दलित-ओबीसी व अल्पसंख्य मतदार विचारू शकतील. त्यावर काँग्रेसची रणनीती काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lalkilla bjp hinduism constitution rahul gandhi amy
Show comments