मताधिक्य कमी झाले म्हणून भाजपला काहीही फरक पडत नाही.. भाजपचे म्हणणे होते की, जिथे जागांची कमाल पातळी गाठली तिथे एखाद-दोन जागा हातातून निसटूही शकतील; पण प. बंगाल, ओदिशासारख्या राज्यांतून तीनशे पारच्या आकडय़ांची जुळणी होऊ शकते..
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याआधी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील एका सदस्याने ‘एनडीए’ला ३५० जागा मिळू शकतील असे भाकीत केले होते. मतदानोत्तर पाहण्यांमधून कमी-अधिक प्रमाणात हाच अंदाज मांडलेला आहे. ‘एनडीए’ चारसो पार होण्याची शक्यता कमी असल्याचे भाजपचे निर्णयप्रक्रियेतील नेते सांगत होते. पण भाजप तीनशेपेक्षा कमी जागा जिंकेल यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनी शेवटपर्यंत ‘तीनशे पार’चे पालुपद कायम ठेवले होते, ते उद्या, मंगळवारी निकालामधून वास्तवात आलेले असू शकेल.
भाजप २०१९च्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करू शकेल असा विश्वास भाजपच्या नेत्यांना होता. त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख कारण होते. मोदी नसतील तर भाजप तीनशे पार करू शकणार नाही, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे होते. दुसरे कारण म्हणजे पाच वर्षांपूर्वी भाजपने इतके प्रचंड यश मिळवले होते की, ‘इंडिया’ आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी दोनशेहून अधिक जागांवर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते ‘इंडिया’ आघाडी मिळवू शकत नाही याची खात्री भाजपला होती. २०१९ मध्ये भाजपने २२४ जागांवर ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली होती. या जागा जिंकायच्या असतील तर ‘इंडिया’ आघाडीच्या बाजूने लाट असणे गरजेचे होते. त्याअभावी ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार भाजपच्या मतांची टक्केवारी फक्त कमी करू शकतील, ती पार करू शकणार नाहीत. तसे झाले तर निकालात बदल होण्याची शक्यता दुरावते. या जागांवर भाजपचेच उमेदवार विजयी होतील, फार तर त्यांचे मताधिक्य कमी होईल. मताधिक्य कमी झाले म्हणून भाजपला काहीही फरक पडत नाही. विजय एका मताने मिळाला काय वा एक लाख मतांनी मिळाला काय, विजय हा विजयच असतो. त्यामुळे मतदानाच्या सातही टप्प्यांमध्ये भाजपचे नेते भाजपला ३२० च्या आसपास तर, ‘एनडीए’ला ३५० पर्यंत जागा मिळतील असा दावा करत होते. एखाददोन मतदानोत्तर पाहण्यांमध्ये कमाल ४०१, ४१५ जागादेखील दाखवल्या आहेत; पण त्यावर भाजपचाही विश्वास नसेल.
तुलनेने कमी नुकसान
भाजपचे नेते खासगी चर्चामध्ये महाराष्ट्र आणि बिहारबद्दल चिंता व्यक्त करत होते. महाराष्ट्रामध्ये २०१९ मधील ४१ जागांचा आकडा गाठता येणार नाही याची कबुली त्यांनी खूप आधी दिली होती. महायुतीला २४-२८ या दरम्यान जागा मिळू शकतील असे काहींचे म्हणणे होते. त्यातही भाजपचे नुकसान कमी आणि महायुतीतील दोन पक्षांचे अधिक असेल असे म्हटले जात होते. गेल्या वेळी भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या, यावेळी दोन-तीन जागांचा तोटा होऊ शकेल. त्यापेक्षा जास्त नुकसानीची शक्यता नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे होते. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखेच घडू शकेल, भाजपपेक्षा नितीशकुमार यांच्या जनता दलाच्या (संयुक्त) जागा कमी होतील, असा कयास होता. मतदानोत्तर पाहण्यांनी भाजपच्या त्या नेत्यांचे म्हणणे खरे ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. पाहण्यांनुसार बिहारमध्ये ‘एनडीए’चे तुलनेने कमी नुकसान झाल्याचे दिसते.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये भाजपच्या जागा कमी होऊ शकतील ही बाब भाजपच्या नेत्यांनी लपवलेली नव्हती. त्यांचे म्हणणे होते की, महाराष्ट्रात डाव फसला आहे, कर्नाटकमध्ये पाच-सात जागांचा तोटा होईल. शिवाय, बिहारमध्ये जरी जागा कमी झाल्या तरी, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतून नुकसान भरून काढता येईल. त्यामुळे भाजप तीनशेपेक्षा कमी जागा जिंकेल अशी परिस्थिती उद्भवणार नाही.
थेट लढतींत भाजपची बाजी
ज्या चार-पाच राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतील तिथे भाजप ‘इंडिया’तील घटक पक्षाशी वा बिगरभाजप पक्षाशी थेट लढत देत आहे. थेट लढतीत भाजपने नेहमी बाजी मारलेली आहे. तेलंगणामध्ये ‘भारत राष्ट्र समिती’चा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर या पक्षाचे खच्चीकरण झाले. इथे काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत झाली. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-डावे पक्ष दुर्बळ असल्याने इथेही थेट लढाई भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांमध्ये झाली. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसकडे ताकद नव्हती. या राज्यात भाजप व तेलुगु देसम यांच्या आघाडीने ‘वायएसआर काँग्रेस’शी दोन हात केले. ओदिशामध्ये भाजपची लढाई बिजू जनता दलाशी होती, काँग्रेसशी नव्हे. भाजपचे म्हणणे होते की, जिथे जागांची कमाल पातळी गाठली तिथे कदाचित एखाद-दोन जागा हातातून निसटू शकतील; पण जिथे पक्षाला विस्तारासाठी जागा उपलब्ध आहेत, तिथून तीनशे पारच्या आकडय़ांची जुळणी होऊ शकते. मतदानोत्तर पाहण्यांमध्ये ही जुळवाजुळव होताना दिसते.
लोकसभा निवडणुकीच्या काळात आर्थिक मुसक्या आवळल्यानंतरही काँग्रेसने लढाई लढली हेच मोठे आश्चर्य म्हटले पाहिजे. त्यामुळेच कदाचित काँग्रेसचे नेते सातत्याने ही लढाई जनता भाजपविरोधात लढत असल्याचे सांगत होते. काँग्रेसमधील काही नेत्यांना नेहमीच काँग्रेसला सत्ता मिळेल असे वाटत असते. पण पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतील नेत्यांना सत्ता मिळवण्याची घाई असल्याचे दिसले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसला १०० च्या आसपास जागा मिळू शकतात. खरोखर भाजपविरोधात मतदान झाले असेल तर काँग्रेस १२० चा आकडा पार करू शकेल. तसे झाले तर सत्तेचा विचार करता येऊ शकेल. काँग्रेससाठी सत्तेपेक्षाही भाजप आणि काँग्रेसमधील जागांचे अंतर कमी करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे दिसले. एका उर्दू वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने काँग्रेसमधील एका मुस्लीम नेत्याला विचारले की, भाजप मुस्लिमांना उमेदवारी देत नाही- पण काँग्रेसनेही का दिली नाही? त्यावर, मुस्लीम उमेदवार निवडून येणार नाहीत. काँग्रेससाठी या जागा वाया जातील. आत्ता एकही जागा वाया घालवून चालणार नाही. मुस्लीमेतर उमेदवार देऊन जितक्या जागा जिंकता येतील तेवढय़ा पदरात पाडून घेतल्या पाहिजेत, असे या नेत्याचे म्हणणे होते. उमेदवारी देताना झालेला विचार पाहिला तर काँग्रेसची यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील रणनीती स्पष्ट होते. मुस्लीम व दलित मतदारांचा पाठिंबा हा काँग्रेस वा ‘इंडिया’ आघाडीचा भाजपविरोधात विजयाचा मुख्य आधार मानला गेला. या दोन्ही समाजातील मतदारांनी यावेळी ‘इंडिया’ला मतदान केल्याचे मानले जात आहे. पण प्रत्यक्ष निकालानंतर त्यावर अधिक भाष्य करता येऊ शकेल.
‘एनडीए’चेही अस्तित्व!
दिल्लीतील सात जागा भाजपसाठी जय-पराजयाची ‘लिटमस टेस्ट’ मानता येईल. इथे सर्व जागांवर भाजपने ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली आहेत. या जागांवर ‘इंडिया’ आघाडी भाजपवर मात करू शकली तर देशातील इतर ५० टक्के मतांच्या जागांवरही करू शकेल. पण, मतदानोत्तर पाहण्यांनी दिल्लीत तिसऱ्यांदा भाजपला सर्वच्या सर्व जागा मिळू शकतील वा एखादीच जागा भाजप गमावेल असा अंदाज बांधला आहे. हा अंदाज निकालात खरा ठरला तर २०१९ मध्ये पन्नास टक्के मते मिळवलेल्या बहुतांश जागा भाजपकडेच राहिल्या असे मानता येईल. पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मते मिळवून जिंकलेल्या जागा भाजपने गमावल्या तरी पश्चिम बंगाल व ओदिशामध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवून तोटा भरून काढला जाईल. २०१९ मध्ये भाजपसह ‘एनडीए’ला ३५३ जागा मिळाल्या होत्या. हे पाहता ‘एनडीए’ कमी-अधिक प्रमाणात पूर्वपदावर आलेली असेल. यावेळी भाजप आणि ‘एनडीए’ अस्तित्व टिकवण्यासाठी लढले असे म्हणता येऊ शकेल.