गणेशोत्सव तोंडावर आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या गर्दीचे नियोजन हे नेहमीच प्रशासनापुढे मोठे आव्हान असते. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवापेक्षा कितीतरी अधिक गर्दी लोटते, अशा वारीचे नियोजन मार्गदर्शक ठरू शकते. आषाढी वारी झाली की वारीमार्गावर अस्वच्छता, पाठोपाठ साथरोग हे चित्र गेल्या काही वर्षांत बदलू लागले आहे. प्रत्येक टप्प्याचे अचूक नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी यातून यंदाची वारी यशस्वी कशी करण्यात आली, याविषयी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंढरपूर वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. अनेक संतांच्या पालख्यांसह लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीची वाट धरत असतात. पंढरीत आषाढी एकादशीला लाखो वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळते. वारी सरल्यानंतर कृतकृत्य होऊन वारकरी परततात, ते पुन्हा येण्यासाठीच. यंदाच्या वारीने तब्बल १७ लाख भाविक आणि वारकरी असा उच्चांक गाठला. वारीचे नियोजन करताना समोर उभी ठाकणारी असंख्य आव्हाने जिल्हा प्रशासनाने लीलया पेलली, यासाठी अनेकांचा हातभारही लागला.
काही वर्षांपूर्वीपर्यंत पंढरपूरच्या वारीनंतर पवित्र चंद्रभागा मोठ्या प्रमाणावर दूषित होऊन सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत असे. चंद्रभागेच्या वाळवंटावर पावलागणिक अक्षरश: मैला तुडवत जावे लागत असे. कॉलरासारख्या साथ रोगांचा फैलाव होई. गेल्या दहा वर्षांत या परिस्थितीत सुधारणा झाली. त्यात सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत चंद्रभागेच्या काठावर विनावापर पडून असलेल्या ६५ एकर जमिनीचा उपयोग करून वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर जिल्हाधिकारी या नात्याने या सोयीसुविधांत आणखी भर घालणे हे कर्तव्य होते. गडचिरोलीसारख्या नक्षली भागातून जिल्हाधिकारी म्हणून सोलापुरात रुजू झाल्यानंतरच्या या पहिल्याच वर्षात स्थानिक दुष्काळ निवारण आणि लोकसभा निवडणुकीचे नियोजन यशस्वी केल्यानंतर पंढरपूरच्या आषाढी वारीचे मोठे नियोजन यशस्वी करण्याचे आव्हान होते. यात अधिक लोकांशी संबंध येणार होता, त्यामुळे हे काम काहीसे कठीणही होते. परंतु प्रशासकीय कौशल्ये, कठोर परिश्रम, नेतृत्व गुण, सर्वांना सोबत घेऊन काम आखण्याची हातोटी या बळावर पंढरपूरची वारी केवळ यशस्वीच झाली नाही, तर यंदा त्यातून नवीन मानदंड तयार झाला. पंढरपूरच्या वारीतील स्वच्छतेचे कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केले.
पंढरपूरची वारी यशस्वी करण्यासाठी साधारणत: दोन महिने आधीपासून नियोजन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात पालख्यांचे आगमन झाल्यापासून वारी सरेपर्यंत दर्शन, निवास, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता इतर सोयी-सुविधांमध्ये कोठेही गडबड-गोंधळ होणार नाही, मुख्य म्हणजे अस्वच्छता होणार नाही, दुर्गंधी पसरणार नाही, प्रदूषणात भर पडणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेतली गेली. तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप व टोकन दर्शन व्यवस्था राबवण्यासाठी प्रशासनाने सादर केलेल्या शंभर कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजुरी दिली होती. वारीचे नियोजन करताना काही कठोर उपायही योजले गेले. दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. दर्शन रांगेत दुहेरी कठडे उभारल्यामुळे घुसखोरीला वाव मिळाला नाही. रांगेत चार ठिकाणी विसावा केंद्रे उभारली होती. त्यामुळे भाविकांना थकवा आल्यास ते या विसावा केंद्रांत आराम करत. ही संकल्पना भाविकांसाठी खूपच लाभदायी ठरली.
एरव्ही, विठ्ठल मंदिरात होणाऱ्या व्हीआयपी दर्शनामुळे वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. ही व्हीआयपी दर्शन पद्धतच यंदा बंद करण्यात आली, त्यामुळे भाविकांसाठी दर्शन सुसह्य झाले. पालखी मार्ग व पंढरपूर शहरात वारकरी व भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवणे, गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेणे, ड्रोन कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवणे तसेच चंद्रभागा नदीमध्ये कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी प्रयत्न करणे, या दृष्टिकोनातून नियोजनबद्ध काम करण्यात आले.
वारीतील सोयी सुविधा
यंदाच्या वर्षी आषाढी वारीमध्ये मागील वर्षीच्या दीडपट भाविक येतील, हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने पालखी मार्ग, विसावा, वाखरी पालखी तळ आणि मुक्कामांच्या ठिकाणांसह पंढरपूर शहर, तसेच चंद्रभागा परिसरातील ६५ एकर क्षेत्रात वारकरी, भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. पिण्याचे स्वच्छ पाणी, १५ लाख पाणी बाटल्या व आंबा पेय (मँगो ज्यूस), पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटविणे, पालखी तळाचे मुरमीकरण, मुक्कामाच्या ठिकाणी जलरोधक मंडप, चंद्रभागा वाळवंटात तात्पुरती स्नानगृहे, स्तनदांसाठी हिरकणी कक्ष, ठिकठिकाणी आरोग्य पथके, दुचाकीवर आरोग्य दूत, फिरती शौचालये, सुलभ शौचालये या सुविधांचा समावेश समाधानकारक ठरला. नियमित रस्ते सफाई, कचऱ्याची विल्हेवाट लावताना भूमिगत गटारे तुंबून सांडपाणी रस्त्यावरून वाहणार नाही, याची दक्षता घेतली गेली. शौचालयांसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात आले. मैला उचलून घेऊन जाण्यासाठी नगरपालिकेने सक्शन यंत्र ठेवले होते. वाहनाच्या व्यवस्थेसह वेळच्यावेळी साफसफाई केल्याने शौचालये स्वच्छ ठेवता आली. सुलभ इंटरनॅशनल संस्थेसह सार्वजनिक बांधकाम विभाग, एमटीडीसी, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पंढरपूर नगर परिषदेने विविध ११० ठिकाणी सहा हजार २०० शौचालये उपलब्ध केली होती.
प्रशासकीय बाजू
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पंढरीच्या दिशेने जाताना ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे, त्या ठिकाणचा मुक्काम संपल्यानंतर संबंधित नगर पंचायत व ग्रामपंचायतीमार्फत तात्काळ स्वच्छता मोहीम हाती घेतली गेली. यावर्षी वारीमध्ये प्रथमच या पद्धतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वारीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात येऊन पालखी मार्गासह रस्ते, सार्वजनिक शौचालयांतील स्वच्छता व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि भाविकांशी संवाद साधला. आषाढी वारीतील गर्दीचा अंदाज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने पंढरपूर शहराचे पाच भाग पाडले होते. त्यात स्वच्छतेची धुरा सांभाळण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी ब्रांच डायरेक्टर ऑफ हायजिन म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार यांची नियुक्ती केली. त्यांच्या अंतर्गत पाच वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १३ मुख्याधिकारी स्वच्छता नोडल अधिकारी म्हणून कार्यरत होते. स्वच्छतेच्या दृष्टीने चंद्रभागा वाळवंट हा सर्वांत आव्हानात्मक भाग असल्यामुळे तेथे एकूण सात भागांत सात मुख्याधिकारी नेमले होते. प्रत्येक मुख्याधिकाऱ्याकडे शहर समन्वयक, शहर अभियंता, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद लिपिक तसेच सफाई कर्मचारी अशा २० जणांचे पथक होते. शिवाय ५० स्वयंसेवकांनीसुद्धा हातभार लावला. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत चंद्रभागेत कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून यंत्रसामुग्रीसह प्रशिक्षित मनुष्यबळ अहोरात्र कार्यरत होते. यातून ५० पेक्षा अधिक भाविकांना चंद्रभागेत बुडताना वाचविण्यात आले. आषाढी एकादशीच्या रात्रीपासूनच २४ तास स्वच्छता व कचरा संकलनाचे काम युद्धपातळीवर हाती घेताना दररोज ७० ते ८० टन कचरा उचलण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीसह एक हजार ३४८ स्वच्छता कर्मचारी झटले.
या वारीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून पंढरीत विविध चार ठिकाणी महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. त्यात लाखो वारकरी, भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आणि गरजेनुसार वैद्याकीय उपचार केले गेले. पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध होत्या. त्यांचा फायदा एक हजार ४३८ गंभीर रुग्णांना झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले.