जगत प्रकाश नड्डा
जगातील सर्वांत मोठ्या आरोग्यसेवा उपक्रमांपैकी एक ठरलेल्या ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ला ( AB- PMJA) सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सप्टेंबर २०१८ मध्ये ही कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली. सर्व नागरिकांना विशेषत: सर्वाधिक दुर्बल घटकांतील व्यक्तींना समन्यायी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, हे या योजनेचे उद्दिष्ट होते. गेल्या सहा वर्षांतील या योजनेच्या अंमलबजावणीतून सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित झाली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेने लाखो नागरिकांमध्ये आरोग्यपूर्ण आयुष्याविषयी आशा निर्माण केली. रुग्णांना दिलासा दिला. उत्तम दर्जाचे उपचार देऊन अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. देशातील नागरिकांचे कल्याण करणे आणि त्यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारणे हे सामायिक उद्दिष्ट घेऊन एक राष्ट्र एकत्र आल्यावर काय साध्य केले जाऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आयुष्मान भारत योजना आहे.

आयुष्मान भारत योजनेचे मुख्य ध्येय साधेसोपे पण क्रांतिकारी आहे. ते म्हणजे, कोणाही भारतीयाला त्याच्या आर्थिक स्थितीमुळे आरोग्यसेवा नाकारली जाऊ नये. द्वितीय आणि तृतीय स्तरांवरील रुग्णालयांत उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी आयुष्मान भारत योजनेतून प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक सुरक्षा कवचासह आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांना देशातील काही सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये गुणवत्तापूर्ण वैद्याकीय सेवा मोफत मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

आरोग्यखर्चाच्या ओझ्यातून सुटका

वयोवृद्धांना निवृत्तीनंतरच्या आर्थिक ओढगस्तीच्या आणि आरोग्य खालावत जाण्याच्या काळात उत्तम उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून या योजनेद्वारे प्रयत्न करण्यात आले आहेत. आयुष्मान भारत योजनेचा लाभ ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या, कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्थितीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय भारत सरकारने अलीकडेच घेतला आहे. हा निर्णय देशातील बदलती लोकसंख्याशास्त्रीय परिस्थिती विचारात घेऊन उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यापूर्वी आपल्या सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांची कुटुंबे- मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या (आशा), अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेच्या कवचाखाली आणण्यात आले होते. आजमितीस या योजनेंतर्गत ५५ कोटींहून अधिक लोक आरोग्य सेवांसाठी पात्र आहेत आणि सात कोटी ५० लाखांहून अधिक रुग्णांना उपचारांसाठी एक लाख कोटी रुपयांची मदत यशस्वीरीत्या पुरविण्यात आली आहे. ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे.

एकेकाळी प्रचंड आरोग्य खर्चामुळे गरिबीत ढकलल्या जाणाऱ्या कुटुंबांना आता अशा संकटांपासून संरक्षण देणारी आर्थिक ढाल उपलब्ध झाली आहे. वैद्याकीय उपचारांसाठी प्रचंड खर्चाचा सामना करणाऱ्या कुटुंबांसाठी ही योजना जीवनदायी ठरली आहे. या योजनेने आर्थिक संकटाच्या दरीत लोटले जाण्यापासून कसे वाचवले, हे सांगणारी शेतकऱ्यांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांपर्यंत अनेक लाभार्थ्यांची प्रशंसापत्रे आहेत. या अर्थाने आयुष्मान भारतने आपले वचन खरोखर पूर्ण केले आहे. ही योजना व्यापक असून बायपास, सांधे बदलणे यांसारख्या जटिल शस्त्रक्रियांपासून ते कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या व्याधींवरील उपचारांपर्यंत १९०० हून अधिक वैद्याकीय प्रक्रियांचा समावेश यात आहे. हे उपचार पूर्वी अनेकांना आवाक्याबाहेरचे वाटत मात्र आयुष्मान भारत योजनेने ते सर्वांसाठी सुलभरीत्या आणि किफायतशीर दरांत उपलब्ध करून दिले आहेत.

मजबूत जाळे, पारदर्शी व्यवहार

आयुष्मान भारतचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत आरोग्यसेवा प्रदात्यांचे मजबूत जाळे निर्माण करण्याची क्षमता, हे आहे. आज, १३ हजारांहून अधिक खासगी रुग्णालयांसह संपूर्ण भारतातील २९ हजारांहून अधिक रुग्णालये या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत. हे जाळे ग्रामीण आणि शहरी भागांत सारख्याच प्रमाणात विस्तारलेले असून देशाच्या अतिदुर्गम भागांत राहणाऱ्यांनाही दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल याची काळजी ते घेते. या योजनेच्या अद्वितीय अशा पोर्टेबिलिटी वैशिष्ट्यामुळे लाभार्थ्यांना ते ज्या राज्याचे रहिवासी आहेत, त्याव्यतिरिक्त इतर देशांत इतरत्र असलेल्या रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणे शक्य होणार आहे.

योजनेअंतर्गत सर्व कारभार वेगाने आणि पारदर्शीपणे व्हावा यासाठी अत्यंत व्यापक स्वरूपाच्या या जाळ्याला माहिती तंत्रज्ञानविषयक पायाभूत सेवासुविधांची जोड देण्यात आली आहे. त्याद्वारे पारदर्शकता, परिणामकारकता आणि दाव्यांच्या तडजोडीची जलद कारवाई सुनिश्चित करण्यात आली आहे. आधार कार्डवर आधारित बायोमेट्रिक पडताळणी आणि कागदरहित दावे यांच्यामुळे अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर राबवल्या जाणाऱ्या सार्वजनिक हिताच्या योजनांमध्ये बरेचदा होणारे भ्रष्टाचारासारखे अपप्रकार आणि अकार्यक्षमता यांच्यात लक्षणीय घट झाली आहे.

आयुष्मान भारत योजनेच्या यशाने आरोग्यसेवा परिसंस्थेतील इतर भागांमध्येही सुधारणा घडवून आणल्या आहेत. गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा हे या योजनेचे गुणवैशिष्ट्य असल्याने या योजनेने सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांना आपल्या पायाभूत सुविधा आणि सेवा अधिक उत्तम दर्जाच्या करण्यास प्रवृत्त केले आहे. याव्यतिरिक्त या योजनेने निकोप स्पर्धात्मक वातावरणाला चालना दिल्याने रुग्णालयांना अधिक उत्तम रुग्णसेवा प्रदान करण्यासाठीदेखील प्रोत्साहित केले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

आयुष्मान भारत ही केवळ रुग्णालयातील सेवेशी निगडित योजना नाही. या योजनेसमवेत केंद्र सरकार आयुष्मान आरोग्य मंदिरांची स्थापना करून प्राथमिक आरोग्यविषयक सेवा अधिक बळकट करण्यासाठी कार्य करत आहे. एकंदर लोकसंख्येवर आजारांचा पडणारा भार कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवांवर लक्ष केंद्रित करेल. आतापर्यंत, भारतभर एक लाख ७३ हजारांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरांची स्थापना करण्यात आली असून यामध्ये सामान्य आजारांसह मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन आजारांसंदर्भात रुग्णांची मोफत तपासणी आणि निदान केले जाते आणि औषधे दिली जातात. ही केंद्रे, एक सर्वसमावेशक आणि सर्वांगीण आरोग्यसेवा प्रारूपाची रचना करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या आपल्या वाटचालीच्या केंद्रस्थानी आहेत. याअंतर्गत निरामयता आणि वेळीच निदान या गोष्टींना प्रोत्साहन देऊन रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता कमी केली जाईल आणि आरोग्यसेवा अधिक शाश्वत होत जाईल, असा ठाम विश्वास आहे.

आयुष्मान भारत योजनेची यशोगाथा साजरी करत असताना एकीकडे आपल्यासमोर असलेली आव्हानेदेखील आपण स्वीकारली पाहिजेत. या योजनेचा आवाका अतिशय प्रचंड असून त्यामुळेच त्यात सातत्याने बदल घडवून आणून ती अधिक उत्तम करून त्यात सुधारणा करण्याची जबाबदारीदेखील आपसूकच येते. या योजनेची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने आम्ही सातत्याने काम करत आहोत, रुग्णालयांना त्यांचे पैसे वेळेवर अदा केले जातात आणि प्रत्येक लाभार्थ्याला मिळणाऱ्या सेवेची गुणवत्ता वाढविली जात आहे.

पुढे मार्गक्रमण करताना, आम्ही आयुष्मान भारत योजना अधिक बळकट करू आणि एका समग्र, परवडण्याजोग्या आणि गुणवत्तापूर्ण दर्जेदार आरोग्यसेवेकडे सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात ही योजना कायमच आघाडीवर राहील, असा विश्वास वाटतो. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या उपचारांची संख्या आणि पॅनेलमधील रुग्णालयांची संख्या आणखी वाढवण्यासाठी तसेच आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या यशस्वी कामगिरीच्या पलीकडे अधिक यशस्वी वाटचाल करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

राष्ट्राचे आरोग्य हा त्याच्या समृद्धीचा पाया असतो, असा केंद्रीय आरोग्यमंत्री या नात्याने माझा दृढ विश्वास आहे. देशाची निरोगी जनता ही त्या देशाची वृद्धी, उत्पादकता आणि नावीन्यपूर्ण कल्पना यामध्ये योगदान देण्यासाठी अधिक सक्षम असते. आरोग्यपूर्ण, मजबूत आणि विकसित भारताच्या या दूरदृष्टीमध्ये आयुष्मान भारत केंद्रस्थानी आहे. या योजनेला आतापर्यंत मिळालेल्या यशातून कठोर परिश्रम, समर्पण तसेच केंद्र सरकार, आरोग्यसेवा प्रदाते आणि नागरिकांमधील समन्वय प्रतिबिंबित होतो. आम्ही प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी आणि त्याला आरोग्यपूर्ण आयुष्य प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त, आपण सर्वसमावेशक, सुलभ आणि सर्वांची काळजी घेणारी अशी आरोग्यसेवा व्यवस्था निर्माण करण्याच्या आपल्या समर्पणाला अधिक बळकटी देऊ या. भावी पिढ्यांसाठी एकत्रितपणे निरोगी भारताची निर्मिती करण्यासाठी पावले टाकूया…