‘दिवाळी ती दिवाळीच!’ हा संपादकीय लेख (२२ ऑक्टोबर) वाचला. आजच्या दीपोत्सवाचा एकूणच बाज बघता एवढेच म्हणावेसे वाटते की, ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी!’ आजकाल सणाला आलेले इव्हेन्टीकरण बघून प्रश्न पडतो की, आपण सण, प्रथा, परंपरांचे वाहक आहोत की भारवाहक!
सणाचा आनंद नवे कपडे, दागदागिने परिधाने, अत्तर, फराळ अशा औपचारिक पण इंद्रियांना सुखावणाऱ्या गोष्टींतच का ठेवायचा ? उत्कटता हे मानवी मेंदूला मिळालेले एक असाधारण असे निसर्गदत्त वरदान आहे. ते वरदान आहे, हे ज्या कोणाला उमजते त्यांना जगण्यातला उत्साह, त्यातून मिळणारी शाश्वत ऊर्जा आणि त्या ऊर्जेतून निर्माण होणारा आनंद याची साखळी बनवता येते. जीवनातला असा उत्कट आनंद टिकाऊ – शाश्वत असतो, कारण त्यात पुन:प्रत्ययाची शक्यता असते. केवळ जाणिवतेनेही ती मिळवता येते. मात्र, त्यासाठी आपल्याला स्वत:च्या मनाच्या मशागतीची तयारी करावी लागते. मेंदूच्या मदतीनं आनंद मिळवायला जमायला लागलं की मग तो किती अक्षय्य असतो हे सहजपणे लक्षात यायला लागतं. आजूबाजूला दिसणाऱ्या बाजारपेठीय कल्पनांना धुडकावून लावण्याची क्षमता आपोआप तयार होते. एकदा हे साध्य झालं की बाजारपेठीय कल्पनांचे आपण दास बनत नाही, उलटपक्षी आपल्या हुकमावर त्या कल्पनांना नाचवायची ताकद आपोआप मिळायला लागते. प्रत्यक्षातल्या आनंदाला जेव्हा उत्कटतेची झालर चढते तेव्हा तो आनंद निर्मम बनतो आणि आपल्याला संपन्न बनवतो. म्हणून सुख शोधण्यापेक्षा आनंदी राहायला शिकणे महत्त्वाचे. – बाळकृष्ण शिंदे, पुणे</strong>
ही मंडळी भारताचे परदेशातील राजदूत..
‘माझा कुणा म्हणू मी?’ या ‘अन्यथा’ या सदरातील लेखात गिरीश कुबेर यांनी भारतीय मानसिकतेची नस बरोबर पकडली आहे अमेरिकेतील मोठमोठय़ा कंपन्यांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी हे मूळचे भारतीय वंशाचे आहेत. तसेच पाश्चात्त्य देशातील मंत्रिमंडळात, राजकारणात अशी भारतीय मंडळी आघाडीवर आहेत. शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, अभियंते, शल्यविशारद, वास्तुकलातज्ज्ञ, उद्योजक, तंत्रज्ञ अशी नानाविध भारतीय मंडळी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे आर्थिक, औद्योगिक, सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत ही अभिमानाची बाब आहे. परंतु त्यांची प्रगती त्यांनी आधुनिक ‘भारत छोडो चळवळ’ हाती घेतली म्हणून झाली हे नाकारता येणार नाही. त्यांची बुद्धिमत्ता, कौशल्य, महत्त्वाकांक्षा, धाडस, कष्ट, प्रयत्न याला प्रगत देशातील पोषक वातावरणाची साथ आणि संधी मिळाली म्हणूनच त्यांना हे यश मिळाले. भारतात राहून त्यांना एवढे मोठे यश मिळाले असते का, हा प्रश्नच पडतो.
‘ब्रेनड्रेन इज बेटर दॅन ब्रेन इन द ड्रेन’ हे सत्य कसे नाकारता येईल?
आता आपले पंतप्रधान प्रगत देशातील भेटीत अनिवासी भारतीयांचे मेळावे घेतात आणि भारतात त्यांना आर्थिक, औद्योगिक, सामाजिक गुंतवणूक करण्याचे भावनिक आवाहन करतात यावरून या अनिवासी भारतीयांचे मोठेपण आणि महत्त्व सिद्ध होते. आता ‘ब्रेनबँक’ची चर्चा आहे. परंतु जोपर्यंत भारत एक प्रगत राष्ट्र बनत नाही तोपर्यंत ‘रिझव्र्ह ब्रेनड्रेन कठीण गोष्ट आहे. अशा अनिवासी भारतीयांची प्राथमिकता ते ज्या प्रगत देशात ते वास्तव्य करून आहेत त्याच देशाला असते आणि ते योग्यच आहे. त्यांच्या दृष्टीने भारत दुय्यम स्थानावर असणार हे साहजिकच आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने बोटेही मोडू नयेत किंवा त्यांच्या यशाने हुरळूनही जाऊ नये.
एक मात्र खरे आहे की मंडळी भारताची राजदूत आहेत. त्यामुळे जगाच्या परिप्रेक्ष्यात प्रगत देशांची भारताविषयी भूमिका अनुकूल करण्यात ही मंडळी हातभारच लावत असतात. भारतीय लोक उच्चशिक्षित, शांतताप्रिय, उद्योगी, कायद्याचे पालन करणारे असतात. हे तेथील प्रशासनाच्या लक्षात येते. इस्राइलसारख्या चिमुकल्या देशाची ‘ज्यू लॉबी’ अमेरिकेत प्रभावी आहे. भारतीयांची ‘ हिंदूू लॉबी ’ अमेरिकेत अजून तेवढा प्रभाव टाकू शकलेली नाही याचे कारण ही मंडळी गुजराती, बंगाली, मल्याळी, तेलगू, पंजाबी, महाराष्ट्रीय, तमिळ, कानडी अशा आपापल्या कोषात राहातात, ती भारतीय म्हणून राहात नाहीत हे वास्तव मात्र खटकते. – डॉ. विकास इनामदार, पुणे
हे शहाणपण केव्हा येणार?
‘माझा कुणा म्हणू मी’ या अन्यथा या सदरातील गिरीश कुबेर यांचा लेख (२२ ऑक्टोबर) वाचला. आपण भारतीय वंशाचे आहोत हे इतर देशात मोठे यश मिळवलेल्या व्यक्तीने अभिमानाने सांगावे याची वाट पाहण्याचे शहाणपण आपल्यात केव्हा येणार असा प्रश्न पडतो. अमुकतमुक भारतीय वंशाचे हे भारतीयांनी सांगण्यात पोरकटपणा किंवा बालिशपणा आहे. एवढय़ा कर्तृत्वाची क्षमता असलेल्या व्यक्ती सुखासुखी आपली मायभूमी, नातेवाईक, रुजलेली मुळे सोडून परदेशात जातात ही देशाला फारशी अभिमानाची गोष्ट नाही ! उद्या ऋषी सुनाक ब्रिटनचे पंतप्रधान झालेच तर शौनक ऋषींचे स्मरणसुद्धा या भारतीय वंशवाल्यांना होईल या कल्पनेनेच संकोच वाटतो !– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)
भाबडेपणा, न्यूनगंड आणि दुटप्पीपणा टाळावा!
‘माझा कुणा म्हणू मी?’ हा ‘अन्यथा’ सदरातील लेख भारतीय मानसिकतेला अनेक प्रकारे आरसा दाखवणारा आहे. वयाची पहिली संस्कारक्षम वर्षे व्यक्ती जिथे राहते तिथला सखोल प्रभाव व्यक्तीवर आयुष्यभर असतो असे म्हणतात. ऋषी सुनाक वा कमला हॅरिस यांचा जन्म, शिक्षण हे सारे परदेशात झाले आहे. त्यामुळे त्यांना भारतीय वंशाचे वा ‘आपले’ म्हणणे हा भाबडेपणा तर आहेच, शिवाय त्यांच्यावर अन्यायही. परदेशात अशा उच्च पदांवर पोहोचलेल्या व्यक्तींबद्दल – त्यांचे नागरिकत्व व त्यांनी शपथेवर वाहिलेली निष्ठा परदेशी असूनही – आपल्याला इतका अभिमान वाटावा हा पराकोटीचा भाबडेपणाच म्हटला पाहिजे.
प्रिन्स चार्ल्सने आपल्या डबेवाल्यांचा सन्मान केला याचा आपल्याला अभिमान वाटतो. परंतु डबेवाल्यांच्या ज्या गुणांचा त्याने सन्मान केला त्याच गुणांचा आपल्याला त्याच्या आधी कधी तसाच अभिमान वाटला होता का, याचे उत्तर नकारार्थीच आहे. साहेबांनी केलेले कौतुक फक्त अभिमानास्पद – डबेवाल्यांचे गुण व कष्ट नाही! यातून फक्त न्यूनगंडच दिसतो.इंग्लंडमध्ये चहापासून ते आलिशान मोटारींपर्यंत अनेक नामांकित कंपन्या टाटा उद्योगसमूहाने विकत घेतल्या त्याचा आपल्याला कोण अभिमान वाटला. परंतु त्याच समूहाने विमान कंपनीकरिता निखळ गुणवत्तेच्या निकषावर निवडलेला सीईओ आपल्याला भलत्याच कारणांमुळे पसंत नव्हता. कमला वा सुनाक यांचे कौतुक करताना आपल्या देशाच्या राजकारणात परदेशी मूळ असलेल्या व्यक्तीचे प्रस्थ मात्र आपल्यापैकी अनेकांना खटकते. उपरोल्लेखित भाबडेपणा, न्यूनगंड यांप्रमाणेच असा दुटप्पीपणाही आपण प्रयत्नपूर्वक टाळला पाहिजे असे वाटते. – प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>
हा फरक अंतर्मुख करायला लावणारा..
आजच्या अंकात ‘लिझ ट्रस पायउतार’ झाल्याचे वाचले. एकीकडे इंग्लंड, अमेरिकेतील लोकशाही तर दुसरीकडे आपली, लोकशाहीच्या या दोन प्रारूपांत जमीन-अस्मानाचे असणारे अंतर आम्हा भारतीयांना निश्चितच अंतर्मुख करणारे. एकीकडे कायद्यापुढे, त्याच्या पालिकांपुढे राजकीय व्यवस्था नतमस्तक होत असल्याचे आशादायी चित्र, तर दुसरीकडे व्यक्तिपूजेच्या आधारावर उभ्या असणाऱ्या साऱ्या संस्थांच राजकीय व्यवस्थेपुढे नतमस्तक होत असल्याचे चित्र. विशेषत: दुसरं चित्र देशात लोकशाहीच्या अस्तित्वाविषयी काळजी निर्माण करणारे वाटते. देशप्रमुख असला तरीही कर्तव्यातील चुकीला माफी नाही, हे ब्रिटनमधील घटना सुचवतात.
इंग्लंडमध्ये बरंच काही घडत असताना इंग्रज जनता कोणाच्याही समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याचे ऐकिवात नाही. भारतीय जनतेच्या वागण्यात एवढी प्रगल्भता दिसली असती काय? आज जे काही आपल्या देशात दिसतेय त्याने याचे उत्तर न शोधणेच योग्य. असो. इंग्लंडमधील या व अशा बातम्यांनी भारतीय जनमानसात लोकशाहीविषयी आदर निर्माण करणाऱ्या ठराव्यात. त्याचबरोबर लोकशाहीच्या दोन प्रारूपांत इंग्लंडने अंगीकारलेले प्रारूप श्रेष्ठ वाटते. – शैलेश न. पुरोहित, मुलुंड (मुंबई)
नातेवाईक राजकारणाचे उत्तराधिकारी कसे?
अंधेरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार माघारी घेऊन, मुख्यत: निवडणूक टाळून भाजपने जनतेचा, तिच्या पसंतीचा उमेदवार निवडण्याचा हक्क जवळ-जवळ हिरावून घेतला आहे. थोडक्यात एका विशिष्ट पक्षाचा उमेदवार अंधेरी विधानसभा मतदार संघावर लादला आहे, याची या पक्षाच्या नेत्यांना कल्पना आहे का?मुळात या किंवा इतर कोणत्याही पोटनिवडणुकीची जागा पूर्वाश्रमीच्या प्रस्थापित व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला देण्याचा प्रघात त्या त्या विशिष्ट घराण्याची, कुटुंबाची सद्दी त्या त्या मतदारसंघावर चालविण्याचा एक भाग असून तेथील पात्र कार्यकर्त्यांवर किंवा समाजसेवकावर अन्याय तसेच लोकशाहीसाठी विघातक ठरू शकतो.आधीच्या आमदार / नगरसेवकाची सेवा किंवा त्याचे कार्य त्याच्या नातेवाईकांकडे आपोआप परिवर्तित होते, असे आपल्या देशातील राज्यकर्त्यांना वाटणे हे खरोखरीच आपल्या राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे.कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या देशासाठी किंवा सेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, अशा हुतात्म्यांच्या नातेवाईकाला एखाद्या मतदारसंघाची उमेदवारी दिल्याचे कुणाला स्मरते का, ते जरूर आठवून पाहावे. निदान मला तरी ज्ञात नाही.-उज्ज्वल वंजारे
loksatta@expressindia.com