एका वाक्यात उत्तरे द्या, गाळलेल्या जागा भरा, योग्य पर्याय निवडा, यामध्ये तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान कोण, हा प्रश्न हमखास असे. हा काळ १९७० च्या आसपासचा. नेहरू, नंदा आणि शास्त्री या पहिल्या तीन पंतप्रधानांना मी बघितले ते फोटोत. त्यानंतरचे ११ मात्र मी अनेकदा दूरदर्शन, वर्तमानपत्र, जाहीर सभा यात बघितले, वाचले आणि ऐकलेसुद्धा.परवा मात्र मी लोकसभेत एक अभूतपूर्व भाषण ऐकले, बघितले. राष्ट्रपतींनी लोकसभेत केलेल्या भाषणावर आभारप्रदर्शन हा एक उपचार असतो आणि प्रथम विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांना बोलण्याची संधी मिळाली. त्याचा संधीत वापर करून त्यांनी अदानी प्रकरणाचा आधार घेऊन सत्ताधारी पक्षाला काही प्रश्न विचारले, ते अगदी संसदीय भाषेत, दोषारोप न करता, सत्ताधारी पक्षातील कुणालाही जबाबदार न धरता, आत्ताच्या आत्ता उत्तर द्या, असा हेका न लावता. त्यांची उत्तरं अगदी साधी आणि सोपी होती. शोधाशोध करून बोलण्यासारखे, लपवण्यासारखे तर त्यात मुळीच काहीही नव्हते.
तुम्ही-आम्ही पेपरात छापून आलेले वाचले, ते सगळे खोटे, बिनबुडाचे, गैरसमज पसरवणारे असल्याने जे कुणी ते पसरवल्याने भांडवली बाजाराची घसरण झाली, त्यांना अद्दल घडवू, असे म्हटले गेले, पण तसे काहीच घडले नाही. सत्य तसेच असेल, परदेशातून असे काही षड्यंत्र रचले जात असेल, तर ते अमृतकाळातील नवा भारत सहन करणार नाही हे जगाला ठणकावून सांगण्याची संधी आपण घालवून बसलो. त्यासंदर्भात पंतप्रधानांनी दीड तास जोषपूर्ण पण निर्थक भाषण केले. १४० कोटी लोकांचा आपल्यावर विश्वास आहे, असे ते बऱ्याचदा म्हणतात. वस्तुस्थिती अशी की, जवळपास ३५ कोटी, हे वयाच्या अटीनुसार मतदानास पात्र नाहीत. म्हणजे १०५ कोटींतील सरासरी ६० टक्के लोक मतदान करतात. म्हणजे ६३ कोटी. त्यातील ३७ टक्के त्यांच्या पक्षाला मत देतात. म्हणजे साधारण २४ कोटी. म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या जेमतेम १८ टक्के. असेच काही आकडय़ांचे गैरसमज अदानी यांच्या बाबतीत घडू शकले का?तसे असेल तर बाजारात विक्रीसाठी ठेवलेले, विकले गेलेले समभाग रद्द करण्याची वेळ का आली? असेच बिनबुडाचे आरोप तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्यावर शेअर दलाल हर्षद मेहता याने, भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्यामार्फत केले होते. त्याकडे राव यांनी ढुंकूनही पाहिले नाही, कारण मेहता ही काय वल्ली आहे, हे सगळय़ा जगाला ठाऊक होते. तसेच आताही असेल का? गांधी घराण्यातील कुणीही नेहरू हे आडनाव का वापरत नाही? ईडीला घाबरून सगळे विरोधक एकत्र आले आहेत. मी कसा एकटा सगळय़ांना पुरून उरलो आहे हे वाक्य तर सगळय़ा गोष्टींचा कळस होते. ७५ वर्षांतील, मागील १३ पंतप्रधानांनी लोकसभेत गंभीर विषयावर असे भाषण करताना मी पाहिले नाही. आम्ही पाहिले होते, असे सांगणारे इतर कुणी मला अजून भेटलेले नाहीत.सोने अस्सल असेल तर त्यास अग्निपरीक्षेसाठी कितीही वेळा, कुणाही समोर तयार असावे लागते. तुझे आडनाव सोनार की लोहार असले बाष्कळ प्रश्न उपस्थित केले की पितळ उघडे पडण्याचा धोका अधिक. –योगेश पटवर्धन
मध्यमवर्गाला भुलवण्याचा अतार्किक प्रकार
‘मोदींची मध्यमवर्गाला साद’ या बातमीत मध्यमवर्गाला प्राप्तिकरात सवलत दिल्याचा पंतप्रधान मोदी यांचा दावा धादांत खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. कारण..
१) आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणारे लोक भारत सरकारच्याच नियमांनुसार आर्थिकदृष्टय़ा ‘दुर्बल’ म्हणजे गरीब या वर्गात मोडतात, मध्यमवर्गात नव्हे. (संदर्भ: भारत सरकार, कार्मिक विभाग, कार्यालयीन ज्ञापन क्र. ३६०३९/१/२०१९- ए२३३( फी२) दिनांक ३१ जानेवारी २०१९)
२) अर्थसंकल्पात प्राप्तिकरातील शून्य सवलत ही फक्त सात लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांनाच दिलेली आहे. सात लाखांपेक्षा एक रुपया जरी उत्पन्न अधिक असेल तर मात्र त्यांना तीन लाख रुपयांवरील उत्पन्नावर प्राप्तिकर द्यावा लागतो. म्हणजेच आठ लाखांपर्यंत उत्पन्न मिळवणारे लोक आर्थिकदृष्टय़ा ‘दुर्बल’ म्हणजे गरीब असूनदेखील त्यांच्याकडून या सरकारद्वारा प्राप्तिकर वसूल केला जातो आणि नवीन अर्थसंकल्पानुसारसुद्धा वसूल केला जाणार आहे.
थोडक्यात, प्राप्तिकरात शून्य सवलत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल वर्गाला द्यायची आणि ती मध्यमवर्गाला दिल्याची थाप मारून त्यांना भुलवायचे हा प्रकार अतार्किक वाटत असला तरी वर्तमान परिस्थितीत मध्यमवर्गाची एकंदरीत मानसिकता पाहता हा वर्ग या थापेला भुलून नक्कीच हुरळून जाऊ शकतो. -उत्तम जोगदंड, कल्याण</strong>
हे तर नेहमीचेच..
‘..तर बरे झाले असते!’ या संपादकीयातून जनतेच्या मनात असलेली खदखद व्यक्त झाली आहे. सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी बऱ्याच गोष्टी केल्या, ज्या आधीच्या पंतप्रधानांनीही केल्या असतील, पण त्यांचा गवगवा करणे, त्यांना योग्य वाटले नसेल. आपल्या वर्तमान पंतप्रधानांचे हेच वैशिष्टय़ आहे की जे काही करायचे ते वाजतगाजत. पण त्याचबरोबर त्यांनी विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न ही चर्चा करून अथवा उत्तरे दिली असती तर त्यांची प्रतिमा अधिक उजळली असती.. देशाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना अशी बगल देणे हे कदापि अपेक्षित नाही. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. जे पंतप्रधानपदाची प्रतिमा झाकोळून टाकतात. आपल्या विरोधकांना सन्मान न देता त्यांची खिल्ली उडवत राहणे, उपस्थित केलेल्या प्रश्नांना सामोरे न जाणे, त्याच त्याच कामगिरीचा आढावा घेणे, आपल्या कारकीर्दीत एकादाही पत्रकार परिषद न घेणे इत्यादी मोदी यांची वैशिष्टय़े..हे सगळे आता नेहमीचेच झाले आहे..-विद्या पवार, मुंबई</strong>
पेपरफुटीला विद्यार्थी जबाबदार कसे?
‘दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना या वर्षी दहा मिनिटे अगोदर देणार नाही’ अशी माहिती मंडळाकडून प्रसृत झाली आहे. त्यासाठी दिलेली कारणे न पटणारी तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहेत. कोणत्याही परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी संख्या, ब्लॉक संख्या आधीच निश्चित झालेली असते. सीलबंद प्रश्नपत्रिका उघडून प्रत्येक ब्लॉकनुसार मोजून पर्यवेक्षकांकडे वाटप करणे हे काम आधीच सुरू होत असते. ही परीक्षापूर्व प्रक्रिया कार्यक्षम हवी. ती ढिसाळ आणि बेशिस्त असेल तर यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरून प्रश्नपत्रिका काही मिनिटे अगोदर मिळण्याच्या न्याय्य हक्कापासून डावलले का जात आहे?
दहावीच्या मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिका पाच-सहा पानी असतात. इंग्रजीत एकूण सात प्रश्न आहेत, ते सहाव्या-सातव्या पानांपर्यंत आहेत. प्रत्येक प्रश्नात अनेक बारीक एक, दोन गुणांचे उपप्रश्न, विकल्प, पर्याय आहेत. याच्या वाचनाची, लेखन नियोजन करण्याची अपेक्षा प्रश्नपत्रिका नंतर देऊन करणे चुकीचे आहे. विद्यापीठांच्या पदवी परीक्षांच्या प्रौढ विद्यार्थ्यांना दहा मिनिटे प्रश्नपत्रिका अगोदर देण्याची सुविधा आजही आहे. मग शालेय विद्यार्थ्यांना का नाही? –प्रा. डॉ. अभिजीत महाले, सिंधुदुर्ग
मानव जातीच्या कल्याणासाठी शहाणे व्हा
चीत भी मेरी.. हा अन्यथा सदरातील (११ फेब्रुवारी) गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. पर्यावरणाची अतोनात हानी करणारेच पर्यावरणाची काळजी करीत आहेत असे विचित्र चित्र आज दिसत आहे. कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, प्लास्टिक उद्योग, कचऱ्याचे ढिगारे, सांडपाणी, वृक्षतोड व वाहनांमधून निघणारी प्रदूषके यामुळे सर्वाधिक प्रदूषण होते. २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन धोरण सभासंमेलनाच्या भाषणापुरते ठीक आहे. परंतु पुढच्या पिढय़ांचे काय होईल हे मात्र सर्वस्वी पर्यावरणाच्या संतुलनावर अवलंबून असेल या वैज्ञानिक सल्ल्याचे आपण काय करणार आहोत? –दादाराव गोराडे, दीडगाव (औरंगाबाद)
मुख्य प्रवाहाला विद्रोही विचार समजलेच नाहीत
‘माणसं गवसण्याची गोष्ट.. ’ या ‘रविवार विशेष’मधील लेखातून (१२ फेब्रुवारी)रसिका आगाशे यांनी लेख विद्रोही साहित्य संमेलनाचा हेतू व गरज उत्तम प्रकारे मांडली आहे. ज्ञानेश्वरी, गाथा ठेवून ग्रंथिदडीने साहित्य संमेलनाचा शुभारंभ करणाऱ्या प्रस्थापित साहित्यिकांना व त्यांच्या आश्रयदात्यांना ज्ञानोबा, तुकोबांचे विद्रोही विचारच नीटसे उमगलेले नाहीत. असे झाले असते तर विद्रोही साहित्यिकांचा समांतर मंडप गेल्या काही वर्षांत उभाच राहिला नसता! हे संतविचार, संत वाङ्मय कळले असते तर आम्ही ‘ग्रामीण साहित्य’, ‘दलित साहित्य’ अशी लेबले लावून प्रस्थापितांना त्यांचा उपहास करून त्यांना दुर्लक्षित केले नसते! ‘समाजाचे प्रतििबब साहित्यात अवतरले पाहिजे’ हे वाक्य फक्त साहित्य संमेलनाच्या मंडपात टाळय़ा घेण्यासाठीच आहे का?
सर्वसामान्य माणसाला मेटाकुटीस आणणारे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिलांवरील अत्याचार, लोकशाहीची गळचेपी, भ्रष्टाचार, शेती, नापिकी यांसारखे प्रश्न साहित्यात कधी अवतरणार? – टिळक उमाजी खाडे, नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड</strong>