‘भारताची नवी मुत्सद्देगिरी!’ हा ‘पहिली बाजू’ सदरातील राम माधव यांचा लेख (५ डिसेंबर) वाचला. जोपर्यंत मुत्सद्देगिरीमुळे आपल्या राष्ट्राच्या नागरिकांचा फायदा होत नाही तोपर्यंत ती ‘चटपटीत वाक्येच’ असतात. लेखात त्यांनी उल्लेख केला आहे की मोदींनी जगाला ‘ही वेळ युद्धाची नाही,’ असे ठामपणे सांगितले आहे, पण त्यानंतर अद्याप रशिया- युक्रेन युद्ध थांबलेले नाही. म्हणजे या वाक्याचा अद्याप काहीही फायदा झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या परराष्ट्र विभागाने रशियाकडून तेल विकत घेण्याबद्दल पाश्चिमात्य राष्ट्रांना सुनावल्याचे लेखात म्हटले आहे, पण या स्वस्त तेलाचा फायदा देशातील नागरिकांपर्यंत पोहोचल्याचे दिसत नाही. (याचा फायदा फक्त आपले सरकार तेल कंपन्यांवर विंडफॉल कर लावून मिळवत आहे.) आजही भारतातील बहुतांश शहरांत पेट्रोलचे दर १०० रुपयांपेक्षा जास्त आहेत.

लेखात चीनच्या घुसखोरीबद्दलही लेखक सांगतात, पण पंतप्रधानांनीच जाहीरपणे कोणतीही घुसखोरी झाली नाही, असे स्पष्ट केले होते. ते आपल्या मुत्सद्देगिरीसाठी किती फायदेशीर होते की ते चटपटीत वाक्य केवळ पंतप्रधानांच्या प्रतिमा संवर्धनासाठी होते, याचा खुलासा लेखकाने केलेला नाही. तसेच मालदीवमधून आपले सैन्य माघारी घ्यायला सांगितले जाते तेव्हा आपण मुत्सद्देगिरीत कमी पडत नसतो का?

हेही वाचा >>> लोकमानस : रेवडयांतून निर्माण होणाऱ्या आर्थिक दरीचे काय?

शेजारील देशांशी असलेले आपले संबंध ताणले जातात तेव्हा आपण मुत्सद्देगिरीत कमी पडत नसतो का? कॅनडासारखा देश हा त्यांच्या संसदेत आपल्या देशावर जाहीर आरोप करतो, तेव्हा राम माधव यांना आपण तिथे मुत्सद्देगिरीत कमी पडत आहोत, असे वाटत नाही का? जेव्हा कतारमध्ये आपल्या आठ सैनिकांना फाशीची शिक्षा जाहीर केली जाते किंवा जेव्हा हेन्ले पासपोर्ट इंडेक्समधील आपले स्थान घसरते किंवा जेव्हा ९६ हजारांहून अधिक भारतीय बेकायदा अमेरिकेत जाताना पकडले जातात (त्यांना वैध व्हिसा मिळाला नसेल, असे गृहीत धरून) तेव्हा आपण मुत्सद्देगिरीमध्ये कमी पडत आहोत असे वाटत नाही का? सद्य:स्थितीत मुत्सद्देगिरी फक्त भाजपला निवडणुकीत मते मिळविण्यासाठी फायदेशीर आहे, असे वाटते.

संदीप कुटे, लोहा (नांदेड)

काँग्रेसमध्ये कुशल नेतृत्वाचा अभाव!

‘स्वान्तसुखाय सांख्यिकी!’ हे संपादकीय (५ डिसेंबर) वाचले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. राहुल गांधींचे छुपे नेतृत्व, काँग्रेसला वारंवार पराभवाकडे नेताना दिसते. लाल बहादूर शास्त्री, नरसिंह राव, मनमोहन सिंग या प्रभृतींनी आपल्या कर्तृत्वाने देशाच्या प्रगतीत मोलाची भर घातली होती. या निवडणुकांतील पराभव हा काँग्रेसचा पराभव नसून गांधी-नेहरू घराणेशाहीचा पराभव आहे. जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्यासारखे कुशल नेतृत्व आता या पक्षात उरलेले नाही.

प्रदीप करमरकर, ठाणे

दक्षिणेत मते, जागा वाढविण्यात भाजपला यश

कार्यकर्ते काँग्रेस पक्षाशी बांधील राहावेत, यासाठी- आपल्या मतांमध्ये घट झालेली नाही, हे त्यांच्या मनावर बिंबविणे गरजेचे आहे, हे न समजण्याएवढी काँग्रेस दूधखुळी नाही. भाजप आपली टक्केवारी अबाधित ठेवून वाढविण्यावर भर देत असताना इतरांची टक्केवारी कमी करण्याचेही प्रयत्न होत आहेत आणि हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे. दक्षिणेत भाजपसाठी द्वार बंद झाले आहे, असे छातीठोक सांगितले जात असले, तरीही तिथे भाजपला २०१८ मध्ये ७ टक्के मते मिळाली होती, ती वाढून आता १४ टक्क्यांच्या जवळ गेली आहेत. वाढलेल्या टक्केवारीबरोबर जागाही वाढल्या आहेत. एका निवडणुकीतील विजयाचा लाभ घेत पुढच्या निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी आता भाजप सज्ज होईल. प्रश्न हा आहे, काँग्रेस त्यावर कशी मात करतो.

परेश प्रमोद बंग, मूर्तिजापूर (अकोला)

हेही वाचा >>> लोकमानस: स्थानिक स्वराज्य : यंत्रणा कुचकामी ठरताहेत का?

प्रचार आणि वक्तृत्वात काँग्रेस मागे पडली

‘स्वान्तसुखाय सांख्यिकी!’ हा अग्रलेख वाचला. भाजपने काँग्रेसमधील भांडणांचा पुरेपूर फायदा घेतला. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधियांचा गट  आपल्या पक्षात खेचून आणला. राज्यात गरीब महिलांना घरबसल्या दरमहा दोन हजार रुपये व स्वस्त दरात अन्नधान्य, स्वयंरोजगार योजनेतील उद्योगांसाठी कर्जे आदी योजना राबविल्या आणि महिलांची मते स्वत:च्या पारडय़ात वळविली. शहरांतही महिला आरक्षणाचा फायदा झाला. निवडणुका जाहीर झाल्याबरोबर तरुण कार्यकर्त्यांबरोबर उत्साहाने प्रचार केला. मोदी- शहांच्या जनता रॅलीमुळे विशेषत: मोदींच्या प्रभावी वक्तृत्वामुळे फायदा झाला. याउलट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेही उत्साह दिसला नाही. तरुण कार्यकर्त्यांचा अभाव दिसत होता. दिग्विजयसिंह आणि कमलनाथ हे वरिष्ठ नेते विशेष काही करू शकले नाहीत. अशीच परिस्थिती राजस्थान, छत्तीसगडमध्येही होती. राजस्थानात गेहलोत आणि पायलट यांच्या भांडणांतच वेळ गेला, तर तिकडे छत्तीसगडमध्येही बघेल-सिंहदेव यांच्यात कुरबुरी सुरू होत्या.

राहुल आणि प्रियंकाही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. काँग्रेस पराभूत झाला असला, तरीही मतांची टक्केवारी कायम आहे. त्याचा अर्थ असा की देशात  काँग्रेसची मूलतत्त्वे मानणारे अजूनही अस्तित्वात आहेत. हे जाणून काँग्रेसने आपण संपलो, असे वाटून न घेता, काळाप्रमाणे आपल्या धोरणांत आणि दृष्टिकोनात बदल करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त तरुणांना आपल्याकडे कसे वळवता येईल ते पाहावे. काँग्रेस अद्याप संपलेली नाही. भाजपनेही हे लक्षात ठेवले पाहिजे. 

सुरेश आपटे, इंदोर (मध्य प्रदेश)

श्रीअन्न केंद्र सोलापुरातच होणे आवश्यक

श्रीअन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा घाट घातला जात असल्याची बातमी वाचली. असा घाट घातला जाणारच, त्यापुढे प्रश्नचिन्ह पडण्याची गरजच नसेल. कारण जी वृत्ती घेऊन आवळय़ा भोपळय़ाची मोट बांधली आहे तिला साजेसे कार्य होतच राहणार. जी-२० चा मोठय़ा शहरांनी पाहिलेला सोहळा, आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखविली गेलेली चकचकीत शहरे आणि या सगळय़ापासून अनभिज्ञ असणारी गावे..

सामान्य माणसाला त्यातही बांधावरच्या शेतकऱ्याला कदाचित जी-२० पासून एकच भविष्य दिसत होते आणि ते म्हणजे आजपर्यंत ज्या अन्नाने आपण पोट भरले कदाचित त्याला किंमत नसेल पण आता त्याला श्रीअन्न म्हणून संबोधून जागतिक स्तरावर महत्त्व आले आहे. आता शेतकऱ्याला भरभक्कम आर्थिक लाभ मिळेल. पण सत्ताबदलाने जे सोयाबीन संशोधन

केंद्राचे झाले तेच आज श्रीअन्न उत्कृष्टता केंद्राबाबतही घडताना दिसते. जिथे पिकते तीच जागा त्याच्या संशोधनासाठी, विकासासाठी योग्य असते. महाराष्ट्राच्या पोटात ज्वारीच्या भाकरीचा घास घालण्यात सोलापूर जिल्ह्याचा वाटा मोठा आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्याने आजपर्यंत पोट भरले त्याच जिल्ह्याची भाकर पळवून नेण्याचे राजकारण योग्य नाही. सोलापूर हा जिल्हा व्यापाराच्या बाबतीत मराठवाडय़ाचे कायम स्वागत करतो. हे केंद्र प्रस्तावित आहे त्याच ठिकाणी व्हायला हवे. कोणाचा लहरीपणा वा राजकारण शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येऊ नये.

गो. ना. पडवळ, मेडसिंगा (धाराशिव)

गुन्हेगारी नियंत्रणासाठी व्यापक जनजागृतीची गरज

‘देशात अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ’ ही बातमी (लोकसत्ता- ५ डिसेंबर) वाचली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनआरसीबी) देशामध्ये घडलेल्या विविध गुन्ह्यांसंदर्भात आपला अहवाल प्रकाशित करून आकडेवारी जाहीर केली. देशातील महानगरांमध्ये आणि इतर छोटय़ा शहरांमध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ही चिंतेत टाकणारी बाब आहे. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांच्या संदर्भातील आणि आर्थिक फसवणुकीसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. आपल्या देशात कायदे कठोर आहेत आणि कायद्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणासुद्धा कार्यक्षम आणि मजबूत असल्याचे दिसते. परंतु तरीही अशा प्रकारच्या घटना घडतात. सर्व प्रकारची गुन्हेगारी, अत्याचार आणि फसवणुकी संदर्भात समाजामध्ये शाळा, महाविद्यालये आणि प्रसारमाध्यमांनी स्वत:हून पुढाकार घेऊन जाणीव जागृती करणे ही काळाची गरज आहे. विविध गुन्ह्यांसंदर्भात समाजात जागरूकता निर्माण व्हावी आणि अस्तित्वात असलेल्या कायद्यांची माहिती सामान्य जनतेला मिळावी यासाठी स्थानिक कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या यंत्रणेने नागरिकांमध्ये विविध कार्यशाळांच्या (सेमिनार) माध्यमातून प्रबोधन सत्र आयोजित करायला हवे. विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी समाजामध्ये व्यापक जनजागृती होणे, ही काळाची गरज आहे. आधुनिक काळाची आव्हाने ओळखून कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारी यंत्रणासुद्धा मजबूत आणि सक्षम करावी लागेल. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या गुन्हेगारी नियंत्रणासाठी आणि अस्तित्वात असलेल्या कायद्यांची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी यासाठी समाजात व्यापक जनजागृती करणे ही काळाची गरज झालेली आहे. राजेश नंदनवरे, छत्रपती संभाजीनगर

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers comments readers reaction on loksatta editorial article and news zws
Show comments